Reflection for the homily of 29th Sunday in Ordinary Times (18/10/2015) By: Wikie Bavighar.
सामान्यकाळातील एकोणतिसावा
रविवार
दिनांक: १८/१०/२०१५
पहिले वाचन: यशया ५३: १०-११
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६
शुभवर्तमान: मार्क १०:३५-४५
प्रभू म्हणतो, ‘माझ्या लोकांची सेवा करा’
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील एकोणतिसावा रविवार तसेच मिशन संडे साजरा
करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूच्या मागे चालण्यास व त्याचे मिशन कार्य पुढे नेण्यासाठी बोलावित आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला देवाशी
एकनिष्ठ असावे आणि देवाचीच भक्ती व सेवा करावी असा संदेश देत आहे. दुसऱ्या वाचनात
ख्रिस्त हा परिपूर्ण धर्मगुरू आहे, हि कल्पना इब्री या पुस्तकात केलेली आहे. तर शुभवर्तमानात
येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, ‘जो कोणी तुम्हांमध्ये पहिला पाहू इच्छितो त्याने
सर्वांचा सेवक झाले पाहिजे आणि आपणा सर्वांस सेवा करण्याचे आमंत्रण देत आहे. कारण
मनुष्य जोपर्यंत नम्र व लहान होत नाही तोपर्यंत देवाच्या रहस्याची त्याला जाणीव होत
नाही. प्रभू येशूच्या मागे जाण्यास व त्याचे मिशन कार्य करण्यास परमेश्वराची कृपा आपणास
मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५३: १०-११
यशया संदेष्टा आपल्या जीवाला झालेल्या वेदना वाया गेलेल्या
नाहीत हे समजल्यावर त्याला समाधान लाभते. कारण त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल
होईल. माझा हा धर्मशील व आवडता सेवक (येशू ख्रिस्त) अनेकांच्या पापांचा भार
स्वतःवर घेईल ह्यांची शाश्वती आपणास देतो.
दुसरे वाचन: ईब्री ४:१४-१६
इब्री पुस्तकाचा लेखक आपणास सांगतो कि, ‘ख्रिस्त हा प्रमुख याजक
आहे. ख्रिस्त सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला असूनही तो निष्पाप होता’. पुढे
लेखक सांगतो की, ‘आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी देवाची कृपा मिळावी
म्हणून आपण धैर्याने ह्या कृपेच्या राजासनाजवळ प्रार्थना केली पाहिजे’.
शुभवर्तमान: मार्क १०:३५-४५
शुभवर्तमानात प्रभू येशूने, “सेवेचे महत्त्व” हा संदेश दिला
आहे. ख्रिस्त, ‘सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आला’, कारण येशू
ख्रिस्त हा सोशिक सेवक आहे. सेवा हाच त्याचा धर्म आहे. पैशामुळे खुर्ची मिळते आणि
खुर्चीवर जो बसतो तो मोठा असे सर्व सामान्य लोकांचे मत असते. हे मार्क सुवार्तिक
आपणास उदाहरणासहीत स्पष्ट करून देतो.
१. खरा मोठेपणा सेवा करण्यानेच मिळतो (मार्क १०:३५-४५) - मी तुम्हासाठी
काय करावे अशी तुमची इच्छा आहे हा प्रश्न प्रभू येशूने तुम्हाला आज विचारला, तर
तुमचे उत्तर काय असेल? याकोब व योहान यांना ते काय मागत होते तेच समजले नाही.
त्यांना स्वतःच्या सन्मानाचा लोभ सुटला होता. ख्रीस्ताबरोबर राज्य करण्यास काय
सोसावे लागते याची त्यांना कल्पना नव्हती. देवाच्या राज्यात केवळ कृपेने
विश्वासाच्या द्वारे विनामुल्य प्रवेश मिळतो. पण या राज्यातील स्थान ख्रिस्ताशी
एकनिष्ठ राहण्यावर अवलंबून आहे.
२. उरलेले दहा शिष्य संतापले – त्यांची वृत्ती याकोब
व योहान ह्यांच्यासारखी होती. जगातील अधिकारी जुलूम करून आपला मोठेपणा किंवा
अधिकार दाखवितात. देवाच्या राज्यात इतरांची सेवा करणारा मोठा मानला जातो (४३,४४).
याचे उत्कृष्ट उदाहरण येशु स्वतःच होता. तो या जगात कशासाठी होता याचा विचार करा.
त्याने आयुष्यभर सेवा केली आणि शेवटी वाधास्तंभावर स्वतःचा प्राण अर्पिला. म्हणून
देवाने त्याला अत्युच्य केले (फिलीप्पै २:९-११). आपण देवाच्या राज्यातील मोठेपणा
मिळविण्यासाठी ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेऊन चालू या (१ पेत्र २:२१,२२).
येशू ख्रिस्त
हा सोशिक सेवक आहे. सेवा हाच त्याचा धर्म आहे, हे सांगताना मार्क काही घटना कथन
करतो. एक दिवस योहान व याकोब ह्या दोन भावांनी येशूकडे येऊन, येशूच्या वैभवात
त्यांच्यापैकी एकाने त्याच्या उजवीकडे व दुसर्याने डावीकडे बसावे अशी मागणी केली
(१०:३७). ही मागणी येशूच्या दृष्टीने नक्कीच स्वार्थाची व हवारेपणाची होती. आपण
कोणाकडे काय मागतो ह्याचेही भान त्यांना राहले नाही. येशूने ही मागणी फेटाळून
लावलीच परंतु असा विचारही ख्रिस्ताच्या शिष्यांनी करु नये असे बजावले. जो ख्रिस्त
‘सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आला. (१०:४५). जो पहिला येऊ पाहतो
त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे (९:३५).
व्यवहारी जगात ऐहिक पातळीवरून विचार
करणाऱ्या येशु तत्वज्ञानाचे आणि अध्यात्माचे धडे देतो. शिष्यांनी सत्ता आणि अधिकार
ह्या मोहाला बळी पडू नये ह्याकडे मार्क शिष्यांचे लक्ष वेधतो.
बोधकथा:
१. हि एक फ्रेंच दंतकथा आहे. एका राजाचा एक अति प्रामाणिक
नोकर होता. राजाच्या त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. एक दिवस राजमहालाच्या बाजूला
असलेल्या घनदाट अरण्यात फिरायला गेला असताना तो डोंगरावरून खाली घसरला. तेथील
सुकलेल्या पानाच्या व दगडाच्या राशीत त्याच्या पायाजवळ त्याला एक जादूचा दिवा
दिसला. तो दिवा घासताच त्यातून ‘जेनी’ नावाची एक देवता बाहेर पडली. ती म्हणाली,
आयुष्यभर तू राजाचे काबाड कष्ट करत आलास, आता तुला तुझी एक इच्छा पूर्ण करण्याची
संधी आहे. अगदी मन लावून विचार कर. कारण हि एकच संधी आहे. तो नोकर म्हणाला,
‘माझ्या आयुष्यात मी इतरांचीच सेवा करत आलो आहे. मी राजाचा नोकर आहे, असेच सर्व
लोक मला ओळखतात. यापुढे लोकांनी आणि इतर नोकरांनी माझी सेवा करावी अशी माझी इच्छा
आहे. राजमहालात पोहचतात नेमकी तीच परिस्थिती त्याला दिसली. त्याच्यासाठी नोकरांनी
सेवा करायला सुरुवात केली. पहिला एक महिना त्याला हि सेवा आवडली. दुसऱ्या महिन्यात
ते नोकर त्याला अडगळ वाटू लागली. तिसऱ्या महिन्यात त्या सर्व नोकरांच्या सेवेमुळे
त्याचा जीव नकोसा झाला. तो माणूस परत अरण्यात गेला व देवतेला म्हणाला: मला कळून
चुकले आहे कि, लोकांनी माझी सेवा करणे तितकेसे मौजेचे जीवन नाही. मला इतरांचीच
सेवा करायची आहे. माझे मागचे जीवन मला मिळू दे. कृपया माझ्यावर दया करा आणि
इतरांनी माझी सेवा करण्यापेक्ष मी नरकात राहीन.
(तात्पर्य: मान, सन्मान, सत्ता, अधिकार नव्हे तर विनम्रपणे
गरीबाची सेवा करणे हीच ईश्वर सेवा होय).
२. एकदा ८० वर्षे वयाच्या बापाने आपल्या मुलाला
विचारले, ‘खिडकीवर कुठला पक्षी बसलेला आहे? मुलगा म्हणाला, ‘कावळा’. काही
मिनिटानंतर बापाने दुसऱ्यांदा विचारले, ‘काय आहे?’, मुलगा म्हणाला, ‘मी नुकताच
तुम्हाला सांगितले ना कि, तिथे कावळा आहे.’ हेच त्याने चार वेळा आपल्या मुलाला
विचारले, आणि मुलगा रागात म्हणाला, ‘काय, तुम्ही एकसारखे विचारता?. मी तुम्हाला
सांगून सुद्धा तो कावळा आहे, समजत नाही का तुम्हाला?’. ह्यावरून बाप आतल्या खोलीत
गेला व एक फाटकी तुटकी जुनी डायरी घेऊन आला. ती डायरी त्याने त्या मुलाच्या
जन्मापासून ठेवली होती. त्यातील एक पण त्याने उघडले व आपल्या मुलाला वाचायला
सांगितले. त्यावर खालील मजकूर होता: “आपले आई-वडील म्हातारे झाल्यानंतर त्यांना
प्रेमाने वागवा. राग करु नका. मानात असा विचार असू दया कि, मला माझ्या आई-वडिलांना
आनंदी ठेवायचे आहे. माझ्या लहानपणापासून त्यांनी माझी खूप सेवा केली आहे. आणि
निस्वार्थी प्रेमाने त्यांनी मला वाढवले आहे.
तात्पर्य: इतरांची सेवा करणे म्हणजे देवाची आज्ञा पाळणे
होय.
मनन चिंतन:
“जो कोणी तुम्हामध्ये पहिला
होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे” (१०:४४). सध्याच्या परिस्थितीत
अनेकांना समाजातील मान-सन्मान व प्रतिष्ठा मिळावी असे वाटते. कोणाचीच सेवा न करता
समाजसेवक किंवा कोणतीच लायकी नसताना नेता म्हणून मिरवायला आवडते. अनेकांना सत्ता व
अधिकाराची ओढ लागलेली असते. प्रभू येशू ख्रिस्त आज सर्वांनाच नम्रतेची आणि सेवेची
शिकवणूक देत आहे. याकोब व योहान हे जब्दीचे दोघे मुलगे प्रभू येशूचे शिष्य होते.
प्रभू येशू स्वर्गराज्याची शिकवणूक देत असताना या दोन्ही भावांनी प्रभू येशूकडे
सन्मानाची जागा मिळावी म्हणून मागणी केली. मात्र प्रभू येशूने परमेश्वर सर्व
सामर्थ्यशाली असल्याची जाणीव करून दिली.
आपण देखील ऐहिक मान-सन्मान व क्षणभंगुर
गोष्टीसाठी न झटता नम्रतेने व लीनतेने देवापुढे नत-मस्तक बनायला हवे. देवाला
धन्यवाद देऊन त्याची उपकारास्तुती करावी. विशेषतः त्याच्या प्रीतीची आज्ञा
पाळण्यासाठी स्वार्थ्यत्याग करण्याची तयारी ठेवायला हवी. म्हणूनच म्हणतात – ‘माणसाची
सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे’. आज प्रभूच्या वचनावर देखील चिंतन करु या. ख्रिस्ताचे
खरे अनुयायी, मान-सन्मान, सत्ता, अधिकार व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी धडपडले नाहीत
तर विनम्रपणे त्यांनी गरिबांची व गरजवंताची सेवा केली. ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी
आणि देवाराज्याच्या आगमनासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले. जीवनात त्याग करून
प्रभू येशूला अनुसरणे हे आपले आद्य कर्तव्य असावे तरच आपण प्रभू येशूचे खरे
अनुयायी आहोत.
संत फ्रान्सिस असिसीकर
ह्याने सुद्धा दिन दुःखिताची सेवा केली. त्याने कृष्ठरोग्यामध्ये प्रेमासाठी
व्याकूळ झालेला ख्रिस्त पहिला म्हणून त्याने स्वर्गीय पित्याची सेवा करण्याचा
मार्ग पत्करला. मदर तेरेजांनी स्वतः रस्त्यावर जाऊन कचऱ्याच्या पेटाऱ्यात जखमी
पडलेल्या अनाथांना उचलून त्याच्या घायांना मलम लावून त्याची सेवा केली. मलीन
झालेला चेहरा तिने पुसून टाकला. हि आहे माणसाची सेवा म्हणजे खरी ईश्वरसेवा होय.
प्रभू येशू आज आपणा प्रत्येकाला बोलावीत
आहे, “तू माझ्या मागे ये.” आपल्याला त्याची वाणी ऐकू येत आहे का? आपण त्याच्या
मागे जाण्यास तयार आहोत का? आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या. देवासाठी,
स्वतःसाठी तसेच इतरांसाठी सुद्धा आपल्याला जगता यावे म्हणून आत्मत्याग व सेवा
करण्यासाठी प्रेरणा मागू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तू आम्हाला तुझ्या
सेवेचे साधन बनव.
१. आज आपण आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू आणि
जे परमेश्वराच्या मळ्यात काम करतात त्यांच्यावर देवाचा विपुल आशीर्वाद असावा व
ख्रिस्त सभेचे कार्य नेहमी पुढे चालू ठेवण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण
प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आज आपण सर्व राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करुया की,
त्यांनी राज्याचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचाची प्रेरणा घेऊन आपले जीवन
लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आज ख्रिस्ती लोकांवर अत्याचार, खून, बलात्कार, छळवणूक व
पिळवणूक होत आहेत. तसेच बॉम्बस्फोट व दंगली होत आहेत. त्या थांबवतात व सर्वत्र
प्रेम व शांती निर्माण व्हावी म्हणून आपण
प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभूकडे
विशेष प्रार्थना करु या.
No comments:
Post a Comment