Wednesday 21 October 2015


Reflection for the Homily of 30th Sunday in Ordinary Times (25/10/2015) by Leon D`Britto.







सामान्यकाळातील तिसावा रविवार

दिनांक: २५/१०/२०१५
पहिले वाचन: यिर्मया ३१:७-९
दुसरे वाचन: इब्री ५:१-६   
शुभवर्तमान: मार्क १०:४६-५२

तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.


प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील तिसावा रविवार साजरा करीत आहोत. देव एक पिता आहे आणि तो आपल्या लोकांना पुन्हा एकदा सुखात आणि आनंदात ठेवण्याचे वचन देतो’ हे यिर्मया प्रवक्ता इस्त्राएल लोकांस सांगतो. आपण देवाला नाही तर देव आपल्याला निवडत असतो व सर्वकाही त्याच्या इच्छेप्रमाणे होत असते असे इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात आपण ऐकतो. तर शुभवर्तमानात आपण शारिरिक दृष्ट्या आंधळा असलेल्या बार्तीमला त्याच्या विश्वासामुळे येशूकडून आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होत असल्याचा वृतांत ऐकतो.
आपला देव आपल्याबरोबर सदा असतो परंतु ह्या घाई-गडबडीच्या जीवनात आपण त्याला पूर्णपणे ओळखण्यास कमी पडत असतो. आजच्या ह्या मिस्साबलीदानात बार्तीमसारखा आपला विश्वास दृढ करण्यासाठी व ज्याप्रमाणे बार्तीमने येशूला दाविद्पुत्र म्हणून ओळखले तसे देवाला पूर्णपणे ओळखण्यास आपल्याला लागणारी कृपा व शक्ती आपण देवाकडे मांगुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया ३१:७-९
     ह्या उताऱ्यात यिर्मया इस्त्राएल लोकांस म्हणतो, ‘परमेश्वर तुम्हांला उत्तरेच्या देशांतून आणून तुम्हांस पृथ्वीच्या दिगंताहून जमा करील. तेव्हा तुमच्यात काही आंधळे, काही पांगळे, गर्भवती व प्रसूतिवेदना लागलेल्या स्त्रियासुद्धा असतील. तुम्ही सर्वजण अश्रूपात करीत परमेश्वराजवळ येऊन विनंती कराल. मग तो तुम्हांस ठोकर लागणार नाही अशा सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाकडे घेऊन जाईल. कारण परमेश्वर इस्त्राएलचा पिता झाला आहे व एफ्राईम परमेश्वराचा प्रथम जन्मलेला आहे’.

दुसरे वाचन: इब्री ५:१-६   
ह्या उताऱ्यात आपणास सांगण्यात येते की, ‘देवाच्या माणसाची निवड देव स्वतः करत असतो. देवासमोर जेव्हा माणूस येतो तेव्हा त्याच्याकडे स्वतःचे असे काहीही नसते. त्याचे सर्व अधिकार हे देवाच्या हातात असतात आणि हाच आपला सर्वसमर्थ देव आपली त्याचा अनुयायी अथवा शिष्य म्हणून निवड करत असतो. समजा, माणसानेच माणसाला देवाला अनुसरण्यास निवडले असते तर कदाचित त्यातून माणसाचे देवासाठी असलेले प्रेम दिसून आले असते परंतु जेव्हा देव माणसाला आपला शिष्य अथवा अनुयायी म्हणून निवडतो तेव्हा देवाचे माणसावर असलेले विशेष प्रेम दिसून येते.
देवाच्या कार्यासाठी देव आपली निवड करत असतो. पहिले पाउल तो उचलतो. आपल्याला फक्त सदा तत्पर राहून त्याच्या हाकेला प्रतिसाद द्यायची गरज आहे.

शुभवर्तमान: मार्क १०:४६-५२
आजचे शुभवर्तमान आपल्याला बार्तीमच्या दृढ विश्वासाची साक्ष देत आहे. बार्तीमचा विश्वास एखाद्या रहस्यावर अथवा शिकवणूकीवर आधारित नसून, येशू ख्रिस्त मला बरे करेल व मला नवीन-जीवन देईल ह्या विश्वासामध्ये सामावलेला होता. हा त्याचा विश्वास आजच्या शुभवर्तमानातील त्याच्या प्रत्येक कृत्यांतून दिसून येतो.

) येशूला तो पूर्णपणे ओळखतो: आपण मार्कच्या शुभवर्तमनात पाहिले तर आपल्याला समजते की बार्तीमप्रमाणे येशूला कोणीही इतक्या व्यवस्थितपणे ओळखले नव्हते. फक्त बार्तीमयाने येशूला दाविद्पुत्र येशू” म्हणून ओळखले.
बार्तीमीयसाठी दाविद्पुत्र हे नाव येशू हा देवाकडून आलेला आहे हे दर्शविते वयेशू एक राजा आहे’ अशी येशूची प्रतिमा उभी करते. मार्कच्या शुभवर्तमानात आपण पुढे पाहतो की येशू येरुशलेमेत राजा म्हणून प्रवेश करतो (१०:-१०), न्यायालयात येशूला याहुद्यांचा राजा म्हणून म्हटले जाते (१५:-१५), आणि येशू इस्रालचा राजा म्हणून मरण पत्करतो (१५:१६-३२). बार्तीमय अंध असला तरी येशू ख्रिस्ताची ओळख त्याला पटली होती. तो येशूला दाविद्पुत्र व राजा म्हणून ओळखतो.

) तो अडथळ्यांवर मात करतो: मार्कच्या शुभवर्तमानात आपल्याला एक विशेष गोष्ट दिसून येते ती म्हणजे फक्त विश्वासाने पाहिजे असलेले दान मिळत नाही तर विश्वासाबरोबर त्यासाठी श्रम करावे लागतात. (उदा: :, :२७, ३५-३६, :२७, :१८). येथे बार्तीमबरोबर सुद्धा हेच घडते. जेव्हा बार्तीमय येशूच्या नावाने ओरडू लागला तेव्हा लोकांनी त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. कदाचित लोकांना वाटले असेल की बार्तीमसारखा गरीब-भिकारी आंधळा असणे हे उचित आहे परंतु बार्तीमय लोकांच्या अडथळ्याला न जुमानता अजून जोराने येशूला हाक मारतो व येशूकडे पोहोचण्यासाठी लोकांच्या अडथळ्यावर मात करतो.

) तो पूर्ण बदलाची अपेक्षा करतो: येशू ख्रिस्त कदाचित त्याच्याकडे चालत गेला असता परंतु येशू बार्तीमला त्याच्याकडे बोलावून घेतो. आत्तापर्यंत जे कोणी बार्तीमला गप्प बसायला सांगत होते त्यांना बार्तीमला येशूकडे आणून येशूच्या कार्यात मदत करावी लागली. पुढे मार्क लिहतो: तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला’. वरील वाक्यातून मार्क सुवार्तिक आपणास सांगू इच्छितो की, ‘साधा आंधळा माणूस आपल्या स्वतःच्या वस्तू बाजूला न टाकता त्या नेहमीच आपल्या बरोबर ठेवतो. परंतु बार्तीमयचा विश्वास होता की येशू त्याला पूर्णपणे बरे करील. त्याचे शाररीक व्यंग (आंधळेपण) आणि त्याची आर्थी परिस्थिती (भिकारी) ह्याचे प्रतिक ते वस्त्र होते व जेव्हा तो ते वस्त्र फेकतो तेव्हा त्याद्वारे जणू तो हे सांगतो की मला आत्ता हे वस्त्र घेऊन दुसऱ्यांच्या भिक्षेवर अवलंबून राहावे लागणार नाही कारण माझा येशू आत्ता मला बरा करणार आहे.

) तो गरज असलेले दान मागतो: जेव्हा येशू बार्तीमयला म्हणतो की, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? तेव्हा बार्तीमय साध्या सोप्या भाषेत फक्त एवढेच म्हणतो की मला दृष्टी हवी आहे’. अश्याच प्रकारचा प्रश्न अध्याय १० आणि ओवी ३६ मध्ये येशू याकोब आणि योहान ह्यांना विचारतो तेव्हा ज्यातून त्यांना वैभव, प्रतिष्ठा मिळेल अशी एकाला डावीकडे व एकाला उजवीकडे बसण्याची इच्छा व्यक्त करतात तर याउलट बार्तीमय अशा कोणत्याही वैभवाची व प्रतिष्ठेची अपेक्षा करत नाही तर जे खरोखरच गरजेचे होते अशी त्याची दृष्टी तो मागतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मार्कच्या शुभवर्तमानात बार्तीमय हा पहिला माणूस नव्हे ज्याने विश्वासाने येशूकडून चमत्काराची अपक्षा केली होती परंतु तो एकच असा आहे जो एक अनुयायी म्हणून येशूच्या पाठीमागे जातो
   
बोधकथा
एकदा एक आंधळा मनुष्य त्याच्या मित्राच्या लग्नासाठी गेला होता. लग्नाचा कार्यक्रम एकदम बहारदार होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसापर्यंत बहुतेक लोक ह्या लग्न कार्यक्रमाविषयीच बोलत होते. लग्नातील डेकोरेशन, लायटिंग, जेवण वैगरे-वैगरे व हे सर्व हा आंधळा माणूसही ऐकत होता. परंतु त्याच्या मनात एकच विचार होता की लोकं एवढ सर्व कौतुक करतात, परंतू लग्नाच्यावेळी झालेल्या वैभवशाली घंटानादाविषयी कोणीही काहीच का बोलत नाही? त्यांना त्या ऐकू आल्या नाही का?
या आंधळ्या माणसासाठी वधू-वरांच्या आगमनाच्या वेळी झालेल्या वैभवशाली घंटानाद हा सगळ्यात महत्वाचा होता, कारण त्या घंटानादाने संपूर्ण वातावरण वैभवशाली व आनंददायी झाले होते. परंतु दुसऱ्या सर्वांच्या नजरेत ही गोष्ट आलीच नव्हती. कदाचित तो आंधळा असल्याने त्याचे कान तीक्ष्ण होते म्हणून त्याने घंटानादाचा आनंद अनुभवला. तर त्याने अनुभवलेला आनंद दुसऱ्यांनी पुरेपूर लक्ष न दिल्याने गमावला. जे सामान्य माणसासाठी शुल्लक होते त्यानेच त्या आंधळ्या माणसाला आनंदाने भरून काढले
 
मनन चिंतन
आजच्या शुभवर्तमानात आपण बार्तीमय नावाच्या आंधळ्या माणसाची गोष्ट ऐकतो. जरी तो आंधळा असला तरी त्याचे कान तीक्ष्ण होते. शुभवर्तमान सांगते की येशू तेथून जात असल्याचे त्याने ऐकले. जरी तो पाहू शकत नव्हता तरी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेने त्याने येशूशी संवाद साधला. त्याने येशू आल्याचे ऐकल्यावर आपल्या वाचेद्वारे येशूला मोठ्याने हाक मारली. जरी तो पाहू शकत नव्हता तरी "माझ्यावर दया करा" ह्या हृदयातून निघालेल्या खऱ्या प्रार्थनेने येशूशी संवाद साधला. त्याची ही प्रार्थना त्याचा येशूवर असलेला विश्वास दर्शवितो .
बार्तीमयने येशूला दाविद्पुत्र म्हणून ओळखले व येशू त्याला बरे करील हा विश्वास दाखवला. ह्यावरून आपल्याला समजून येते की, जरी तो शारीरिक दृष्ट्या आंधळा असला तरी तो आध्यात्मिक दृष्ट्या आंधळा नव्हता. त्याने येशूला आपल्या विश्वासाच्या डोळ्यांनी पाहिले. दुसऱ्यांनी त्याला हा विश्वास प्रकट करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. त्यावेळेला येशू यरीहोमधून येरुशलेमला जात होता परंतु बार्तीमच्या विश्वासाने त्याला थांबून ठेवले. बार्तीमकडे दुर्लक्ष करण्याएवजी येशू थांबला व बार्तीमला आपल्याकडे आणण्यास सांगितले. त्यावेळी आपले वस्त्र हे त्यासाठी सर्वकाही होते परंतु ते तो येशूसाठी सोडतो. ह्याद्वारे बार्तीमय व त्याचा विश्वास आपल्या सर्वाना येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास सांगत आहे. तसेच तो त्याच्या ह्या कृत्यांद्वारे आपल्याला येशूकडे येण्यासाठी आपले सर्वकाही सोडण्यास प्रवृत्त करत आहे. बार्तीमय आपल्याकडील ज्या वस्तू, अधिकार, पैसा, मालमत्ता आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यास परावृत्त करतात त्यांना बाजूला सारून येशूकडे धाव घेण्यास सांगत आहे.    
बार्तीमचा विश्वास हा त्याच्या जीवनाचा सुकाणू होता. जरी तो आंधळा होता तरी खरे काय आहे हे त्याने पाहिले होते. जेव्हा त्याला दृष्टी मिळाली तेव्हा तो बहकून न जाता त्याने त्याचा वापर येशूला अनुसरण्यास केला व आपला विश्वास अधिक दृढ केला.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, आमचा विश्वास दृढ कर
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, कार्डीनल्स, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे आणि ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यासाठी त्यांना मनोबल मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी ख्रिस्ताचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. बार्तीमयसारखा दृढ विश्वास आपणा सर्वाना मिळावा व येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवण्यास आपणास ख्रिस्ताची कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्याकडील ज्या वस्तू, अधिकार, पैसा मालमत्ता आपल्याला येशूवर विश्वास ठेवण्यापासून परावृत्त करतात, त्यांना बाजूला सारण्यास आपणास येशूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.  


    

1 comment: