Thursday 1 October 2015

Reflections for the homily on feast of St. Francis of Assisi (04/10/2015) By: Fr. Benjamin Alphanso.

जागतिक पर्यावरण दिन


संत फ्रान्सीस असिसिकर सण


दिनांक: ०४/१०/२०१५.
पहिले वाचन: उत्पत्ती २:१८-२५.                       
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११.
शुभवर्तमान: मार्क १०:२-१६.

प्रस्तावना:

     आज पवित्र देऊळमाता असिसिकर संत फ्रान्सिस ह्याचा सण साजरा करत आहे. संत पोप जॉन पौल दुसरे ह्यांनी १९७९ साली संत फ्रान्सिस असिसिकार ह्यांना पर्यावरणाचे आश्रयदाते म्हणून घोषित केले, म्हणून आजचा दिवस “जागतिक पर्यावरण दिन” साजरा केला जातो. १२ व्या शतकात संत फ्रान्सिस ह्यांनी पर्यावरणावर एक स्तोत्र रचले त्याचे नाव “देवा मी तुझी स्तुती करतो”, (praise be to you lord “laudato si”). देवाने हे सुंदर जग उत्पन्न केलेले आहे आणि हे जग आपल्याला उपजीविकेसाठी दिलेले आहे. परंतु मानवाने त्याचा योग्य तो वापर न करता त्याचा त्यांनी उपभोग घेतला म्हणून आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. परमगुरु फ्रान्सीस ह्यानी १८ जून २०१५ मध्ये एक परिपत्रक काढले, “Laudato si”. परमगुरु फ्रान्सीस आपल्याला पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी बोलावत आहेत. आजची तिन्ही वाचने आपल्याला ह्याची जाणीव करून देतात आपण ह्या सुंदर निसर्गाची योग्य काळजी घेतो का? थोडा वेळ शांत राहून त्यावर मनन चिंतन करूया.

सम्यक विवरण :
पहिले वाचन: उत्पत्ती २:१८-२५.
     उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, देवाने हे सुंदर असे जग उत्पन्न केलेले आहे. देवाने हे जग आपल्याला उपजीविकेसाठी दिलेले आहे. जर आपण निसर्गाचा सन्मान केला तर त्याद्वारे आपला देवावरील विश्वास प्रगट करतो. देवाने मानवाचा ह्या निसर्गाशी संबध जुळवून दिलेला आहे. हा संबंध आपण जपला पाहिजे. पर्यावरणाचा सन्मान करण म्हणजेच देवाचा सन्मान करण.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११.
     इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातून आजचे दुसरे वाचन घेतलेले आहे. ह्या पत्राचे लेखक आपल्याला सांगत आहे कि, ‘प्रभू ख्रिस्त ह्या जगाचा केंद्रबिंदू आहे. सगळ्या गोष्टीला ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताद्वारे महत्व प्राप्त होते. ख्रिस्त आपल्याला आपल्या बंधूभगिनींचा सन्मान करण्यास बोलावत आहे.  आणि जर आपण आपल्या बंधु-भगीनींचा सन्मान, आदर केला तर आपण पर्यावरणाचा सुद्धा आदर राखू असे आपल्याला ख्रिस्त सांगत आहे. ख्रिस्ताने ह्या भूतलावर येऊन आपल्याला निसर्गाचे महत्व पटवून दिले आहे.

शुभवर्तमान: मार्क १०:२-१६.
     संत मार्कच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या वाचनात प्रभू येशू आपल्याला सुखी वैवाहित जीवन व घटस्पोटाचे दूष परिणाम ह्याविषयी बोलावत आहे. देवाची इच्छा आहे की, ह्या निसर्गमय भूतलावर कोणाचा नाश होऊ नये तर सगळ्यांचेच भले व तारण व्हावे. देवाने पती/पत्नीची निर्मिती केली. देवाने लग्नसंस्कार स्थापित केला. स्त्री-पुरुष आपले स्वार्थी नाते विसरून लग्नसंस्काराने एकत्रित व पवित्र होतात.

बोधकथा:

    एक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यावसायिक होता. त्याला निवृत्त व्हायचे होते आणि आपल्या मुलाऐवजी त्याच्या कंपनीतल्या कुणा एका कामगारालाच त्या कंपनीचा अध्यक्ष (प्रमुख) म्हणून नेमायचे होते. त्याने आपल्या कंपनीतल्या काही हुशार तरुणांना बोलावले व सांगितले की, ‘ह्या कंपनीचा अध्यक्ष म्हणून मला राजीनामा द्यायचा आहे. परंतु त्याअगोदर मला तुमच्यापैकी कोणा एकाला अध्यक्ष म्हणून नेमायचे आहे. ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण त्याने अट घातली ती म्हणजे, तुम्हां सगळ्यांना एका परीक्षेला सामोरे जावे लागेल. तुमच्यापैकी जो कोणी ह्या परीक्षेत सर्वोत्तम ठरेल त्याला मी अध्यक्ष बनवीन. मी प्रत्येकाला एक ‘बी’ देणार, तुम्ही सगळ्यांनी घरी जाऊन ते एका कुंडीत लावा. एक वर्षानंतर मी तुम्हाला बोलावीन. ज्याच रोपट अतिउत्तम असेल त्याची मी नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक करणार.
त्यांच्यामध्ये जिमी नावाचा एक कामगार होता. त्याने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली, त्याच्या बायकोने त्याला कुंडी आणण्यास मदत केली. त्याने कुंडीत बी लावले, खत-पाणी घातले. दिवस जात होते पण बी काही रुजत नव्हते त्याला फार चिंता लागली. हळूहळू एक आठवडा, एक महिना व एक वर्ष निघून गेले पण ते बी काही रुजले नाही. जिमीने ठरविले की, तो जशी कुंडी आहे तशी नेणार आणि अध्यक्षपुढे जे काही खरं आहे ते सांगणार.
एका वर्षानंतर अध्यक्षांनी सगळ्या होतकरू तरुणांना परीक्षणासाठी बोलावले. सगळेजण आप-आपल्या कुंड्या व त्यात उगवलेले रोपटे मोठया हर्षाने घेऊन आले. काही रोपटे उंच वाढले होते. जिमी थोडा घाबरलेला होता. अध्यक्षांनी सगळ्या कुंड्याचे निरीक्षण केले. मात्र अध्यक्ष जेव्हा जिमिच्या बाजूला आला तेव्हा जिमीची कुंडी खाली होती. शेवटी अध्यक्षांनी घोषणा केली की, कंपनीचा नवा अध्यक्ष जिमी आहे. मग त्यांनी सत्यता सगळ्यांना पटवून दिली. ते म्हणाले मी सगळ्यांना बाफलेल्या बिया दिल्या होत्या म्हणजे मेलेल्या बिया दिल्या होत्या. पुढे म्हणाले जिमी सोडून सगळे अप्रामाणिक वागले कारण तुम्ही दुसऱ्या बिया खरेदी केल्या पण जिमीने मात्र प्रामाणिकपण राहिला. त्याच्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल मी त्याला आपल्या कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडले आहे.
बोध: देवाने दिलेल्या निसर्गाची आपण प्रामाणिकपणे काळजी घेतली पाहिजे.

मनन-चिंतन:

परमगुरु फ्रान्सिस Laudoti Si (हे देवा मी तुझी स्तुती गातो) ह्या परिपत्रकामध्ये पृथ्वीविषयी बोलत आहेत. आज आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. कधी-कधी भूकंप होतात, पूर येतात, दुष्काळ येतात, दरडी कोसळतात आणि त्यामुळे असंख्य लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामध्ये जास्तकरून गरीब लोकांचा नाश होतो. आपण सर्वजण ह्याला जबाबदार आहोत. देवाने हि सृष्टी आपल्या सगळ्यांसाठी उत्पन्न केली आणि आपण त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. असिसिकार संत फ्रान्सीस ह्याने सर्व सृष्टीला बंधु-भगिनी म्हणून संबोधले आणि त्यांच्यावर प्रेम केले. आपण सुद्धा सृष्टीवर प्रेम करून तिची काळजी घेतली पाहिजे. तर निसर्ग आपली काळजी घेईल.

संदेश: आज जगात ३०% अन्न फुकट जाते. हजारो लोक भुकेलेले आहेत ज्यांना एकवेळचे अन्न भेटत नाही. हजारो लोक अजून बेघर आहेत. आपण आपल्याकडे असलेले जास्त अन्न फुकट घालवू नये तर ते गोरगरीबात वाटावे. आपण सर्व भाऊ-बहिण आहोत म्हणून एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे झाडे लावली पाहिजेत. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेऊ शकेल. सगळ्यांनी वीजेचा व पाण्याचा योग्य वापर करून ते गरजुसाठी वाचविले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एक ठोस निर्धार केला पाहिजे तरच देव आपल्याला आशीर्वादित करील.

अर्पणावरील प्रार्थना:
धर्मगुरू: हे सर्वसमर्थ पित्या परमेश्वरा तू ह्या अतिसुंदर सृष्टीची निर्मिती केली आहेस आणि तू ह्या भूतलावरील प्रत्येक गोष्टीत हजर आहेस. आज आम्ही तुला ह्या पृथ्वीवरील पंचमहाभूते अर्पण करीत आहोत.
1. आकाश/स्वर्ग: पवित्र बायबलमध्ये देवाने सुंदर आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली ह्याचे वर्णन आहे. त्याने सूर्य, चंद्र व तारे उत्पन्न केलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी तुझ्या प्रेमाची आणि अस्तित्वाची जाणीव आम्हाला करून देतात.
2. भूमाता (भूमी): हे सर्वसमर्थ देवा तू उत्पन्न केलेल्या ह्या भूमीबद्दल आम्ही तुझे उपकार व आभार मानतो. भूमाता आम्हांला तिचे फळ म्हणजे जेवण देते. आमची काळजी वाहते ह्या भूमातेच्या कुशीत सुंदर झाडे, फुले, पशु-पक्षी आहेत आम्हाला त्यांच्या सन्मान करण्यास शिकव.
3. पाणी: हे सर्वसमर्थ पित्या, आमची तहान भागविण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी आम्हाला तू स्वच्छ निर्मळ असे पाणी दिले आहेस या पाण्याचा योग्य वापर करण्यास आम्हाला शिकव.
4. अग्नी: अग्नी हा चांगला तसा घातकही आहे. त्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे अग्नी आम्हाला देवाची महती कळवतो. हे देवा अग्नीचा योग्य तो सन्मान करण्यास आम्हाला साहाय्य कर.
5. हवा: हवे शिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. हवेमुळेच आम्हाला परमेश्वराच्या प्रेमाचा आणि जीवनदानाचा अनुभव येतो. ती प्रदूषित न करता आणि अनेक आजाराला आम्ही बळी न पडावे म्हणून आम्हांला सहाय्य कर.

धर्मगुरू: हे प्रभू परमेश्वरा तू आम्हासाठी सर्वगुण संपन्न पृथ्वीची निर्मिती केलीस तिचा सन्मान करण्यास आम्हाला शक्ती दे व एकमेकांवर प्रेम करण्यास मदत कर.









No comments:

Post a Comment