Reflection for the homily of 3rd Sunday of Lent (28/02/2016) By: Baritan Nigrel.
दिनांक: २८/०२/१६
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ.
१३-१५
दुसरे वाचन: १ करिंथ १०:
१-६, १०-१२
‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल!’
प्रस्तावना:
प्रायश्चित काळातील ह्या
तिसऱ्या रविवारी, देऊळमाता आपल्याला पापी जीवनावर मनन-चिंतन करण्यासाठी व आपण
केलेल्या पापांचा पश्चाताप करून, प्रायश्चित संस्कार घेण्यास आमंत्रित करीत आहे.
निर्गम ह्या पुस्तकातून
घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात, इस्रायली जनतेने आपल्या पापांबद्दल पश्चाताप
करावा आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून देव मोशेला
पाचारण करतो. दुसऱ्या वाचनात, संत पौल इस्रायल लोकांचा उल्लेख करून ‘देव
त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता’; त्यांच्या अविश्वासामुळे व पापांमुळेच देवाने
त्यांचा नाश केला असे तो म्हणतो. लुकलिखित आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशु पश्चातापाचा
आपल्याला सल्ला देत असता, अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे
की, ‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’.
ह्या प्रायश्चित काळात
प्रभू परमेश्वर आपल्याशी समेट व परिवर्तन करून आपले जीवन ख्रिस्तमय बनविण्याची
संधी देत आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या पापी जीवनापासून परावृत्त होऊन देवाकडे
परत यावे व पश्चातापी अंतःकरणाने पापक्षमा मागून, देवाशी एकनिष्ठ रहावे म्हणून
आजच्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ.
१३-१५
प्रस्तुत उताऱ्यात इस्रायल
लोकांना इजिप्तमधून बाहेर नेण्याची जबाबदारी देव मोशेवर सोपवतो. देव आणि मोशे ह्यांची
भेट महत्त्वाची असल्याने, तिचे वर्णन या भागात विस्ताराने केले आहे. देव आणि मोशे
ह्यांच्या या भेटीतील अनेक मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. मोशेला देव सर्वप्रथम
जळत्या झुडूपामधून दर्शन देतो हे आपल्याला सांगण्यात आले आहे. दुसरा मुद्दा असा
की, देव पवित्र आहे, हे जाणून मोशेने आपले जोडे काढले. दिव्य पावित्र्यतेचा हा
विचार निर्गमच्या पुस्तकात एक प्रमुख विषय म्हणून सादर केलेला आहे.
मोशेला एक शंका होती कि, ‘मला
देवाने पाठवले आहे, हे फारो राजाला व इस्रायल लोकांना कसे पटवून दयायचे’? म्हणून (vv.
१३-१५) मधून देव स्वतःची ओळख स्पष्ट करून देतो. मोशेने देवाचे नाव विचारले कारण
नावामधून व्यक्तीचे मूळ तत्व व्यक्त होते, असे इस्रायल लोक मानत असे. येथे देवाने
‘यहोवा’ या व्यक्तिवाचक नामाने स्वतःची ओळख करून दिली. ह्याचा अनुवाद बहुधा ‘देव’
असा केला आहे (v.१५). ‘यहोवा’, हे हिब्रू भाषेतील ‘देवाचे नाव’ होय. त्याचाच
उल्लेख वचन १४ मध्ये ‘मी जो आहे तो आहे’, या शब्दांनी केला आहे.
दुसरे वाचन: १ करिंथ १०:
१-६, १०-१२
ख्रिस्ताद्वारे आपल्याला
महान आशिर्वाद मिळालेले आहेत, यामुळेच सर्व ठीक आहे; आमचे पतन होणार नाही किंवा
देवासमोर आम्ही अपात्र ठरणार नाही, असे कोणी मानू नये असा इशारा संत पौल ह्या
विभागात आपणास देत आहे.
जरी देवाने इस्रायल लोकांना
इजिप्त देशातील गुलामगिरीतून सोडविले तरी देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता.
म्हणून त्यांच्या पापांमुळे (त्यांचा लोभ, मूर्तीपूजा, त्यांची कुरकुर) व
त्यांच्या अविश्वासामुळे देवाने त्यांचा नाश केला. संत पौल आपल्याला आठवण करून
देतो कि, आपण सर्व पापी आहोत. आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे.
माझ्याकडून पाप घडणार नाही अशी घमेंड करू नका, ह्याविषयी संत पौल आपल्याला इशारा
देत आहे.
शुभवर्तमान: लुक १३: १-९
एखादा अपघात झाला किंवा
अन्यायाने कोणी ठार झाला तर जखमी झालेल्या अगर मेलेल्या व्यक्तीच्या पापांमुळे असे
घडले असा त्या काळातही लोकांचा गैरसमज असे. येशु ख्रिस्ताने हि समजूत खोडून काढली.
काही गालिलीकर येरुशलेमेस यज्ञ करावयास गेले असता, पिलाताने त्यांचा तेथेच वध
करविला व त्यांचे रक्त यज्ञाच्या रक्तात मिसळले, यावरून येशू ख्रिस्ताने जमलेल्या
लोकांना पश्चाताप करण्याचे महत्व सांगितले (v.६).
प्रभू येशु अंजिराच्या
दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की, जो पश्चाताप करतो तो स्वतःचे पाप ओळखतो,
स्वतःचे पातके व मलीन स्थिती पाहतो व त्यापासून देवाकडे वळतो व ख्रिस्ताकडे
पापाक्षमेची याचना करतो. ख्रिस्त त्याला पापक्षमा देतो आणि तो मनुष्य बदलतो. ‘फळ
नाही, ते तोडून टाक’ असे मालक म्हणाला (v.७), म्हणून प्रत्येकाने पश्चाताप करावा ह्यासाठी
प्रभू आज कृपापूर्ण संधी देत आहे (v.८).
बोधकथा:
एकदा एका नवीन धर्मगुरूची
नेमणूक एका गावातील पॅरीशमध्ये झाली. त्या धर्मगुरूने एका रविवारी चर्चमधील सर्व
युवक-युवतींची सभा घेतली. तेव्हा त्यांच्या निर्दशनास आले की, डेवीड नावाचा तरुण
हा चर्चला येत नाही. गावामध्ये लोकांना शिवीगाळ देऊन त्यांच्याशी विनाकारण भांडण
करतो. कधी-कधी चोरी करतो. आई-वडीलांच्या आज्ञेविरुद्ध वागतो, वैगेरे. म्हणून गावात
त्याच्याबरोबर कोणीही बोलत नाही.
त्या धर्मगुरूने धाडस करून
डेवीडला आपल्याकडे बोलावले व त्याला विचारले, ‘माझं एक लहानसं काम करणार का?’
डेवीड हसला आणि म्हणाला, ‘फादर तुम्ही कायपण बोला आपण करावयास तयार आहोत.’
फादरांनी म्हटले, ‘ह्या घे तीन मेणबत्त्या, आणि रात्री झोपण्याअगोदर तुझ्या पलंगाच्या
बाजूला लाव आणि तीन वेळा बोल, “जर आज मी मेलो तर नरकात जाईन.” डेवीडने फादरांना
तसे करण्याचे आश्वासन दिले आणि निघून गेला.
त्या रात्री डेवीडने
मेणबत्त्या लावल्या व चाचरत का होईना त्याने ते शब्द, एक वेळा शांतपणे उद्गारले.
दुसऱ्यावेळी तो घाबरला आणि तिसऱ्यावेळी त्याच्या तोंडातून ते शब्दच निघेनात.
त्याला आता उमगले, त्याने त्याच्या जीवनामध्ये काय केले होते. मी एक पापी माणूस
आहे, अशी त्याला जाणीव झाली. तो घाबरला. दुसऱ्या दिवशी पहाटे लगेच त्याने फादरांची
भेट घेतली व सांगितले, फादर ‘मला नरकात जायचे नाही, मला स्वर्गात जायचे आहे. मी एक
पापी माणूस आहे. मला सांगा त्यासाठी मी काय करु’? फादरांनी त्याला संगितले, ‘तू
केलेल्या पापांची आठवण करून देवाकडे क्षमा माग व पश्चाताप कर.’ आपला देव दयाळू आहे,
तो तुझ्या पापांची नक्कीच तुला क्षमा करील फक्त त्याला तुझे शुद्ध अंत:करण हवे आहे.
त्यादिवसापासून डेविडचे परिवर्तन झाले.
मनन चिंतन:
पोप फ्रान्सिस म्हणतात,
‘प्रायश्चित काळ हा अखिल ख्रिस्तसभा आणि स्थानिक ख्रिस्ती समूह, तसेच हरेक विश्वासूजन
यांच्या आध्यात्मिक नूतनीकरणाचा काळ आहे’. विशेषकरून तो “कृपेचा कालावधी आहे” (२
करिंथ ८:२).
आजची तिन्ही वाचने आपल्याला
एकच संदेश देतात तो म्हणजे, ‘पश्चाताप करा आणि प्रभूच्या प्रेमामध्ये, दयेमध्ये नव्याने
जन्म घ्या. येशु, योहान ३:३ मध्ये आपल्याला म्हणतो, ‘नव्याने जन्मल्याशिवाय
कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही.’ ह्याचा अर्थ, ‘नव्याने जन्म घेणे म्हणजे
पश्चाताप करणे व पवित्र आत्मामध्ये नव्याने जन्मणे’.
पश्चाताप म्हणजे काय?
पश्चाताप म्हणजे दिव्य
योजनेद्वारे अंतःकरणात पटलेली पापांची जाणीव. देवासमोर आपण दोषी आहोत म्हणून
पापापासून मागे वळून देवाच्या कृपेचा स्वीकार करणे म्हणजे पश्चाताप करणे. आपण पापी
आहोत हे मान्य करून, पापांचा त्याग करणे आणि पवित्र कृपेचे जीवन जगण्यासाठी,
पवित्र आत्माच्या सहाय्याचा स्वीकार करणे म्हणजे पश्चाताप होय.
आपल्याला ठाऊक आहे कि,
मनुष्य ही देवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती असली तरी देवाने आपल्याला ‘शरीर’, ‘मन’
आणि ‘आत्मा’ अशा तीन गोष्टी दिलेल्या आहेत. शरीराद्वारे आपण जगाशी संपर्क साधतो.
आपल्या मनाद्वारे आपण स्वतःशी सुखसंवाद करतो आणि आपल्या आत्म्याद्वारे आपण देवाच्या
अधिक जवळ येत असतो. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा परिणाम या तीनही
पैलूंवर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण सर्वजण अशक्त आहोत, दुर्बल आहोत. वारंवार
आपल्या हातून चुका, अपराध आणि पापे होत असतात आणि त्या सर्वांचा परिणाम आपल्या
शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावर होत असतो.
ख्रिस्ती जीवन सुरक्षित
चालावे म्हणून परमेश्वराने आपणाला दहा नियम दिलेले आहेत. हे नियम पाळले नाहीत तर
आपले आध्यात्मिक जीवन विकसित होणार नाही. उपवास काळात प्रभू येशु आपल्याला आठवण
करून देतो की, ‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’. या प्रायश्चित
काळामध्ये आपण केलेल्या पापांची आठवण करून त्याबद्दल दुःख व्यक्त करावे व प्रायश्चित
संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, दयेचा अनुभव आपण प्रत्येकांनी घ्यावा म्हणून
आज येशु आपणा प्रत्येकाला अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे बोलावीत आहे.
आपले जीवन हे परमेश्वराचे
महान दान आहे. प्रत्येकाला परमेश्वराने कला, गुण आणि बुद्धिमत्ता दिलेली आहेत.
परमेश्वराची आपल्याकडून एकच अपेक्षा असते आणि ती म्हणजे आपण सर्वांनी चांगली ,गोड,
रसाळ फळे द्यावीत. तसेच आपल्याला प्राप्त झालेल्या वरदानांचा योग्य तो वापर करून
स्वतःचे तसेच इतरांचे जीवन फुलविण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर सोपवलेली
आहे. मात्र आपण आपल्या स्वार्थी आणि अहंकारी स्वभावामुळे, प्रभूची आज्ञा धुडकावून
लावतो आणि पापास प्रवृत्त होतो. पापामुळे आपले जीवन त्या निष्फळ अंजिराच्या
झाडासारखे होते. आपण आपल्या दुराग्रही वृत्तीमुळे चांगले व गोड फळे इतरांना देऊ
शकत नाही. पाप म्हणजे सर्वनाश! म्हणूनच प्रभू येशु म्हणतो, ‘जर तुम्ही पश्चाताप
केला नाही, तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’.
पहिल्या वाचनात आपण ऐकले
की, देव इस्रायल लोकांना इजिप्त देशातील फारो राजाच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी
मोशेची निवड करतो. इथे देव ‘यहोवा’ या नावाने स्वतःची ओळख करून देतो. ‘यहोवा’ म्हणजे
‘मी जो आहे तो आहे’. ह्याच देवाची (यहोवाची) उपासना अगोदरच्या सर्व पिढ्यांनी केली
(आब्राहमाचा देव, इसहाकचा देव, याकोबाचा देव).
मात्र इस्रायल लोक या यहोवाबरोबर
अविश्वासूपणे वागले. ते त्याच्यापासून दूर गेले व मूर्तिपूजा करु लागले. त्यांनी
देवाची परीक्षा पाहिली व देवाविषयी कुरकुर केली, म्हणून त्यांच्या सर्व पापांमुळे
देवाने त्यांचा नाश केला असे संत पौल आपल्याला दुसऱ्या वाचनात सांगतो. देव इस्रायल
लोकांविषयी संतुष्ट नव्हता, कारण त्यांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप केला
नाही.
आपणच आपल्या जीवनाचे
शिल्पकार आहोत. बोधकथेत सांगितल्याप्रमाणे आपण इच्छुक असलो तर आपल्या प्रत्येकाला स्वत:च्या
जीवनात बदल घडवून आणता येईल. येशु ख्रिस्त किंवा देव नव्हे तर आपणच आपल्या स्वत:च्या
पापांमुळे नाश ओढवून घेत असतो. ह्या उपवास काळामध्ये येशु ख्रिस्त आपल्याला
पश्चातापासाठी आणखी एक संधी देत आहे. कारण येशु नितीमानांचे नव्हे तर पाप्यांचे
तारण करावयास आला आहे.
बेनसिरा १७:२५ मध्ये आपण वाचतो, “पाप सोडून प्रभूकडे परत या, त्याच्या सान्निध्यात
प्रार्थना करा म्हणजे तुमचे अपराध कमी होतील.” ह्या उपवास काळातील तिसऱ्या
रविवारी, आपण आपल्या पापांची आठवण करु या. आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल मनात
दुःख व्यक्त करून, यापुढे पाप न करण्याचा निश्चय करुया. सरते शेवटी परमेश्वराने
दिलेल्या संधीचा फायदा घेऊन प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, क्षमेचा,
दयेचा व कृपेचा अनुभव ह्या करुणा वर्षात आपण घेऊया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची
प्रार्थना ऐकून घे.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस ह्यांना प्रभूने
शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना
पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा
प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप
करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची करुणा व दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. जे देवापासून दूर गेले आहेत त्यांना
प्रभूच्या दया, क्षमा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये
आनंदाचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे बेरोजगार आहेत अशांना त्यांच्या
कला-कौशल्यावर आधारित योग्य ती नोकरी मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाचा
उदरनिर्वाह करता येईल, म्हणून आपण प्रार्थना करूया.