Reflection for the homily of 1st Sunday of Lent (14/02/2016) By: Dominic Brahmane.
उपवासकाळातील पहिला रविवार
उपवासकाळातील पहिला रविवार
दिनांक: १४/०२/२०१६.
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.
शुभवर्तमान: लूक ४:१-१३.
“अरण्यात सैतानाने येशूची
परीक्षा केली”
प्रस्तावना:
आज आपण उपवास काळातील पहिला रविवार
साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूवरील विश्वासात वाढ करून आपणांस मोहांवर
विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.
अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना
मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधामाधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत
सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ‘जो अंत:करणात येशूवर विश्वास
ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल’ असे सांगत आहे.
तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने
मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.
‘येशूवर विश्वास ठेवणारा कधीही
फजित होणार नाही’. येशू, त्याने मोहावर मिळविलेल्या विजयाने आपल्याला एक आदर्श बनला आहे. म्हणून
त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह
आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी
ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.
पुरातन इस्रायलमध्ये परमेश्वराची केली जाणारी
पूजा-अर्चना ही देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आणि मिसऱ्यांपासून
त्यांच्या सुटकेबद्दल दिलेली उपकार स्तुती व धन्यवादाचा भाग होता. ह्या ऋणानिर्देशात
त्यांना जमिनीच्या देणगीहूनही अधिक प्रिय होते ते म्हणजे देवाची आठवण व
उपकारस्तुती. निर्गमाच्या पुस्तकात आपणांस वाचावयास मिळते की, परमेश्वराने
इस्रायली लोकांचा देश गुलाममुक्त बनवून त्यांना स्वातंत्र्य बहाल केले ह्या
त्यांच्या देवपुजनात दोन परंपराचा उगम आहे. एक म्हणजे देवाने मिसऱ्यांच्या हातून
केलेली सुटका व त्यांना मिळवून देलेल्या स्वातंत्र्याबद्दल धन्यवाद आणि दुसरे
म्हणजे त्यांच्या पूर्वजांची परत मिळवून दिलेली जमीन ह्याबद्दलची आस्था.
(ओवी ५-१०) हा
अनुवाद २४ ह्या अध्यायातील महत्वाचा गाभा आहे. ह्या उताऱ्यात इस्रायली लोकांनी
परमेश्वराच्या पुढ्यात मांडलेली अर्पणे ही त्यांच्या प्रायश्चिताचे प्रतिक आहे.
कारण पूर्वजांच्या जमिनीशिवाय त्यांचे अस्तित्व शून्य आहे असे ते मानात. देवाने
त्यांच्यावर त्यांच्या पूर्वजांकरवी केलेल्या ह्या महत्कृत्यामुळे त्यांनी देवाला
उत्पन्नाचा दशांस भाग अर्पण केला. एक परिवार म्हणून केलेले सहभोजन हासुद्धा त्यांच्या
आनंदोत्सवाचा व ऋणानिर्देशाचाच भाग होता.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.
प्रस्तुत उताऱ्यात
संत पौलाचा यहुद्यांविषयीचा कठोरपणा दिसून येतो, परंतु ह्यामागचा हेतू हाच होता
की, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा व त्यांच्याद्वारे यहुद्यांचे तारण
व्हावे. परंतु हे सत्य जरी पौलाने मायेने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी
त्यात कटुता आणि ताठरपणा अनुभवला. यहुद्यांना देवाबद्दल आस्था व लगाव आहे, ह्याची
जरी पौलाला जाणीव होती, तरी त्यांची ही आस्था चुकीचे मार्गक्रमण करत होती हे
त्याला ठाऊक होते. यहुदी पंत हा नियम व रूढी पाळण्यात अतिशय चाणक्ष होता. ह्या
नियमांनी त्यांचे जीवन विस्कळीत झाले होते. कारण लहान सहान नियम पाळणे त्यांना
यथायोग्य वाटे, ज्यामध्ये मृत पावलेल्या मनुष्यास स्पर्श करण्यास व त्यास पुराण्यासही
त्यांना मुभा नव्हती. त्यांची अशी खात्री होती की, हे सर्व नियम कटाक्षाने
पाळल्याने त्यांना देवाची कृपावरदाने लाभेल व ते देवाच्या अगदी जवळ जातील.
यहुद्यांनी नियमानुसार, लोकांनी केलेल्या
चांगल्या वाईट वर्तणुकीवरून त्यांची वर्गवारी केली होती. ह्या सर्वांना अंत म्हणून
संत पौल सांगतो, की, येशू ह्या नियमांचा शेवट किंवा अंत असा आहे. तो म्हणतो, ‘ख्रिस्तानुमते
देवाला समाधानी करण्यासाठी अशा नियमांचे पालन करणे रास्त नाही तर देवाचे प्रेम, दया
आणि कृपा ह्यांचे अंत:करणात जतन करून कृतीत उतरविणे योग्य आहे’. संत पौल येथे,
संदेष्ट्याने परमेश्वरावरील प्रकट केलेल्या विश्वासाची पुनरुजळणी करण्यास सांगतो
आणि देवावरील विश्वासाने आपले तारण होईल असे म्हणतो.
शुभवर्तमान: लूक ४:१-१३.
ह्या परीच्छेदात शुभवार्तिक
संत लूकने येशूची जनसमुदयासमोर कामगिरी करण्यापूर्वीची तयारी लिखित केली आहे.
ह्याचीच तयारी/पुनरावृत्ती आपल्याला मार्क आणि मत्तय च्या शुभवर्तमानात संक्षिप्त
स्वरुपात वाचावयास मिळते. यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतल्यानंतर
नभातून झालेल्या पित्याच्या वाणीने त्यास त्याचा परमप्रिय पुत्र व मसीहा म्हणून
घोषित केले. हाच यशया ४०-५३, मधील देवाचा सहनशील सेवक होता. तद्नंतर पवित्र
आत्म्याने त्यास यार्देन जवळील अरण्यात परीक्षा घेण्यास नेले. तेथे येशूने चाळीस
दिवस रात्र उपवास केला आणि नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. हा मोहप्राय
प्रसंग येशूनेच त्याच्या शिष्यांना कथित केला असावा कारण तेव्हा अरण्यात त्याच्याबरोबर
१२ शिष्यांपैकी कोणीही हजर नव्हते. पहिल्या ख्रिस्ती समूहाने ह्या प्रसंगाचे
गांभीर्य लक्षात घेता हा प्रसंग तीनही शुभवर्तमानात मुख्य स्वरुपात मांडलेला आहे.
ही घटना विशेष आणि महत्वाची आहे कारण ह्यात येशूचा मानवी स्वभाव दिसून येतो.
त्यामुळेच येशूला एक देवपुत्र म्हणून नव्हे तर एक साधारण मनुष्य म्हणून शारीरिक
भूक आणि मानसिक छळ किंवा अपमानास्पद वागणूकीला सामोरे जावे लागले.
ह्याद्वारे येशू
आपल्या सर्व मानवजातीसाठी आदर्श बनला आहे. ह्यातून येशू स्वर्गराज्य - जे येशू
ह्या पृथ्वीतलावर प्रस्थापित करण्यासाठी आला होता ते कसे असावे ह्याविषयीची कल्पना
देतो.
तो भुकेला होता : येथे येशू खरोखर मानव होता हे स्पष्टपणे
मांडण्यात आले आहे व ते ‘तो भुकेला होता’ ह्या वाक्यावरून दिसून येते. कारण तो जर
मानवी रूपातील देव असता तर त्यास भूक लागणे असाधारण व असामान्य असे होय.
चाळीस दिवस : परमेश्वराकडून कराराची वचने (दहा आज्ञा)
स्वीकारण्यापूर्वी मोशेने सिनाय पर्वतावर चाळीस दिवस रात्र उपवास केला (निर्गम
३४:२८). होरेब पर्वतावर पोहोचण्यापूर्वी एलिया ह्या अत्युच्च मानल्या जाणाऱ्या
संदेष्ट्याने चाळीस दिवस व रात्र उपवास केला (१राजे १९:८). अगदी त्याचप्रमाणे नवीन
आज्ञा घालून देणारा प्रभू व अत्युच्यातील उच्च, प्रेम व करुणेचा संदेष्टा प्रभू
येशू ख्रिस्त ह्याने तारणकार्यास सुरुवात करण्यापूर्वी अरण्यात चाळीस दिवस व रात्र
उपवास केला.
सैतानाने त्याची परीक्षा घेतली : सैतानाने केलेल्या
परीक्षेत येशू खालील तीन विशेष मोहांवर विजय मिळवितो.
१) स्वार्थासाठी दैवी शक्तीचा वापर. २) ऐहिक (एैश्वर्य)
गोष्टींचा मोह. ३) स्वत:ला महान ठरवून इतरांना गुलाम बनविण्यासाठी दैवी शक्तीचा
दुरुपयोग
परंतु येशू उचित बायबल मधील ओव्यांनी किंवा देवाच्या
वचनांद्वारे ह्या सर्वांवर मात करतो व त्यावर विजय मिळवतो. उदा: अनुवाद ८:३; ६:१३;
६:१६.
सैतान परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत तेथून निघून गेला: सैतान येशूला मोहात
पाडण्यात अपयशी ठरला परंतु तो पुन्हा काहीतरी अशाच गोष्टींची संधी शोधत होता.
सैतानाला खोटे बोलणाऱ्यांचा पिता संबोधतात म्हणूनच येशूला क्रुसावर मारण्यासाठी
त्याने त्याच्या दुष्ट गुलामांचा वापर केला.
बोधकथा:
१. एक राजा त्याच्या संपत्तीवर अतिशय गर्विष्ठ
होता. तो एकदा शहरातून फेरफटका मारत असता, वाटेत त्याला एका ऋषीने अडवले आणि
त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी म्हणून त्याला कटोरीमध्ये काहीतरी
टाकायला सांगितले. परंतु एक अट घातली. ऋषी म्हणाले की, ‘राजे तुम्ही ह्यात असे
काहीतरी टाका ज्याने ती पुर्णत: भरेल’. त्यावर राजाने होकारात्मक मान हलवून, त्यात
काही मोहरा टाकल्या; परंतु ती कटोरी अपूर्णच राहिली. राजा एका ऋषीबरोबर हरला, असे
लोकांना वाटू नये, म्हणून अधिकाधिक त्याची संपत्ती त्याने त्या कटोरीत ओतली, परंतु
ती काही भरेना. शेवटी राजाने त्या ऋषीला विचारले, ‘महाराज मी तुमच्या आव्हानापुढे
हरलो; पण मला एक सांगा ही कटोरी भरत का नाही’? त्यावर ऋषी म्हणाले, ‘महाराज ही
कटोरी मानवाची कवटी आहे, तुम्ही ह्यात कितीही जरी टाकले, तरीही ते अपूर्णच आहे ती
कधीही भरत नाही’. राजाला त्याची चूक कळली आणि तेथे त्याचा संपत्तीवर असलेला
गर्विष्ठपणा संपुष्टात आला.
तात्पर्य: मानव कधीही असलेल्या गोष्टींवर संतुष्ट नसतो.
त्याला अधिकाधिक मिळविण्याची हाव असते आणि त्यामुळेच तो मोहाला बळी पडतो. परंतु
येशूने मोहावर मात करून, ‘धनाची’ नव्हे तर देवाची चाकरी करणे पसंत केले’.
२. राजाच्या राजवाड्यात त्याच्या प्रजेतील एक सैन्य कायम
राजाविरुद्ध तक्रार करायचा की, राज्यासाठी आम्ही आमचा जीव अर्पण करतो परंतु येथे
आम्हांला इतक्याश्या घरात सर्व सुख मुरडून राहावे लागते’. राजाच्या हे कानावर गेल्यावर
राजाने राज्यात दवंडी पिटवली कि, ‘ज्यांना कुणाला अधिक संपत्ती पाहिजे असेल
त्यांनी उद्या राजदरबारात हजार राहावे’. दुसऱ्या दिवशी सगळे आल्यावर सदा तक्रार
करणारा सैन्य पुढे आला. राजाने त्याला सांगितले की, ‘तुला जितकी जमीन तू
पादाक्रांत करशील किंवा जेवढ्या जमिनीला तुझ्या पायांचा स्पर्श होईल, तेवढ्या
जमिनीवर तुझा हक्क असेल’. तो सर्वप्रथम चालू लागला, त्याने विचार केला असा मला फार
थोडक्या जमिनीवर कब्जा मिळेल; म्हणून तो धावायला लागला, हळूहळू त्याने त्याची गती
वाढवली. त्याच्या मोहामुळे त्याची मती धुंद झाली होती. शेवटी अन्न-पाण्यावाचून
धावल्याने तो मरण पावला. त्याला तेथेच ६x३ ची खाच खोदून पुरण्यात आले.
तात्पर्य: कधी कधी माणसाचा मोह त्याच्या जीवाचा अंतही करू
शकतो. म्हणून अधिक मोह करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानायला शिकले पाहिजे.
मनन चिंतन:
येशूचे चाळीस दिवस उपवास आणि मोहप्राय परीक्षा
हा येशूच्या आत्मपरीक्षणाचा काळ होता. ‘Docetism’ विचारसरणीचे तत्ववेत्त्यांची
येशू पूर्ण मानव आहे, ह्यावर शंका होती. ते म्हणतात, ‘येशू फक्त दिसण्यात मानव
होता, परंतु अस्तित्वात नाही’. आजचा संत लुक शुभवर्तमानलिखित उतारा त्यांस उत्तर
असे होईल, कारण अरण्यात झालेली येशूची परीक्षा तो पुर्णत: मानव होता, ह्याची
पोचपावती होय. त्याचा मानवी स्वभाव येथे प्रत्यक्षात स्पष्टपणे दिसून येतो. जर तो
मानव नसून फक्त देव असता तर त्याला भूक लागलीच नसती व तो तेथून त्याच्या दैवी
शक्तीने सैतानाच्या परीक्षेपूर्वीच निसटला असता.
·
पवित्र आत्म्याने येशूला अशा एकांतात (अरण्यात)
का नेले असावे?
अ) शुभवर्तमान अभ्यासक म्हणतात की, येशू हा देवाचा परमप्रिय
पुत्र आहे असा बाप्तीस्म्याने व नभोवाणीने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला होता.
दुसरे म्हणजे, तो काळ त्याच्या मिशन कार्याच्या सुरुवातीचा काळ होता, म्हणून
त्याने जुन्या करारातील एलिया, मोशे (चाळीस दिवस रात्र उपवास) ह्या संदेष्ट्यांप्रमाणे
चाळीस दिवस उपवास करून पवित्र आत्म्याने परिपक्व होऊन, अरण्यात परीक्षेसाठी गेला. मोशे
आणि एलिया हे एकांतात असता, देवाने त्यांना त्यांचा देवावरील असलेला विश्वास आशा
आणि प्रेम ह्यांत अधिकाधिक दृढ केले व त्यांना सोपविलेल्या कार्यात सुदृढ बनविले.
अगदी त्याच प्रमाणे येशूनेही केले असावे.
ब) येशूला प्रत्येकवेळी, क्षणोक्षणी पवित्र आत्म्याचा सहवास
लाभला, कारण येशूने सर्वदा पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिले. म्हणून
बाप्तीस्मेवेळी, येशूच्या रुपांतराच्या वेळी आणि त्याच्या कार्याच्या सुरवातीला
पवित्र आत्म्याने त्याच्याबरोबर असल्याची शाश्वती दिली होती. अरण्यात सुद्धा तो एकटा
नसून पवित्र आत्म्याचा सहवास त्याला लाभला. पुष्कळदा आपण देवापासून दूर जातो,
परंतु देव आपल्याला एकटे सोडत नाही तर तो आपली सदैव पाठराखण व संरक्षण करत असतो.
ह्याचीच प्रचिती आपल्याला पहिल्या वाचनात येते. इस्रायल जनतेच्या पुजार्पणाचा महत्वाचा
हेतू म्हणजे देवाला धन्यवाद देणे व देवाशी ऋणानुबंध जोडणे हा होता. कारण देव सदैव त्यांच्या
दु:खात ते गुलामगिरीत असताना त्यांच्या बरोबर होता.
येशूही त्याच्या पित्याशी संलग्न होता. त्याचा
पिता सदैव त्याच्याबरोबर आहे ह्याची त्याला जाणीव होती. म्हणूनच सैतानाला दिलेल्या
त्याच्या प्रत्येक उत्तरातून पित्यावरील प्रेम
व विश्वास प्रकट होतो (father-son relationship). ‘मानव जेंव्हा
दुर्बळ असतो तेंव्हा सैतान सबळ असतो’ असे म्हणतात; जेंव्हा येशू शारीरिकदृष्ट्या
दुर्बळ होता तेंव्हा सैतानाने त्याच्यावर झडप घातली.
१) सैतानाने येशूला दगडाचे रुपांतर भाकरीत करावयास
सांगितले. कारण येशू भुकेला होता. आपल्या मनात प्रश्न उद्भवेल, ‘पवित्र आत्म्याने
अरण्यात येशूला मारावयास नेले होते का’? नाही. जुन्या करारातील इस्रायली जनता
वाळवंटातून इजिप्त मधून इस्रायलच्या वाटेवर जात असता, भुकेने व्याकूळ झाली होती,
तेंव्हा देवाने त्यांस ‘मान्ना’ खावयास दिला, हे येशूस ठाऊक होते. येशूचे अन्न हे
परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे हेच होते. म्हणूनच तो उत्तरला, ‘मनुष्य केवळ भाकरीने
नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वाणीने जगेल.
२) सैतानाने येशूला ऐश्वर्याचा मोह घातला. येशूचे एैश्वर्य
खुद्द त्याचा पिताच होता. तोच ह्या सर्वांचा निर्माता आहे, मग निर्माण केलेल्या
गोष्टींपेक्षा निर्मात्याला जास्त महत्व द्यायला हवे. ‘जेथे आपला खजिना असतो, तेथे
आपले संपूर्ण हृद्य असते’. म्हणून येशूने सैतानापुढे मान झुकविण्याऐवजी, देवाची
सेवा करणे योग्य मानले.
रविंद्रनाथ
टागोरलिखित गीतांजली मध्ये ते म्हणतात, ‘वस्तू वापरण्यासाठी आणि प्रियजन प्रेम
करण्यासाठी असतात. परंतु आजच्या चंगळवादाच्या (Consumerism) युगात ‘प्रियजनांचा
उपयोग केला जातो आणि वस्तूंवर प्रेम केले जाते’. संत
फ्रान्सिस असिसिकरने पैसा, धनसंपत्ती, एैश्वर्य, ह्याला लाथाडले आणि तो प्रभू येशूस्तव
दीन झाला. त्याने ‘सेवकाची नव्हे तर मालकाची चाकरी करणे पसंत केले’.
३) सैतानाने येशूला परमेश्वराची परीक्षा पाहण्यास आवाहन
केले. कारण स्तोत्र ९१:११-१२ मध्ये आपण वाचतो, ‘परमेश्वर तुझे संरक्षण
करावयास दूत पाठवील, ते तुला त्यांच्या तळहातावर ठेवतील व ठेच लागण्यापासून
वाचवतील. येथे सैतान येशूला ‘देवपुत्राला’ ‘मरण नाही’, असे सिद्ध करण्यास सांगतो.
परंतु येशूला त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करायची होती सैतानाची नव्हे. देवाची
त्याच्यासाठी असलेली योजना तो जाणून होता.
जुन्या करारात निर्गम १७:७ मध्ये,
जेंव्हा इस्रायल जनता वाळवंटात तान्हेने व्याकूळ होऊन मरणप्राय यातना सोसत होती,
तेंव्हा देव त्यांच्याबरोबर असल्याचा त्यांचा विश्वास डळमळीत झाला आणि देवाविषयी
ते दुर्भाष्य करून त्यांनी देवाची परीक्षा पाहिली की, खरोखर देव त्याचे तारण करील
की त्यांना शाप देईल. येशू हा नवीन इस्रायल म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याचा देवावरील
विश्वास डळमळला नाही. दुसऱ्या वाचनात संत पौल असाच अढळ विश्वास आत्मसात करण्यास
सांगतो. अशाप्रकारे येशूने देवाची परीक्षा घेण्यास नाकारले. हा मोह येशूचे ‘देवपुत्रत्व’
सिद्ध करण्याचा होता, परंतु येशूने हे सैतानासमोर सिद्ध करणे गौण मानले.
येशूने मोहांवर मिळवलेल्या विजयावरून आपण आपल्या जीवनासाठी
काही निष्कर्ष काढू शकतो.
A. अरण्य किंवा वाळवंट (जेथे
सैतानाने येशूची परीक्षा पाहिली) हि ऐतिहासिक जागा, ठिकाण नसून ते सर्व येशूच्या
मनातील बऱ्या-वाईटचा संघर्ष किंवा चलबिचल होती. त्याचे ते आत्मपरीक्षण होते.
प्रत्येक व्यक्ती अशा ह्या वळणावर येत असत जेथे त्या व्यक्तीची द्विधावस्था होत
असते. ह्यात आपण सैतानाचा मार्ग निवडायचा की देवाचा, ह्याचे स्वातंत्र्य देवाने
आपल्याला दिलेले आहे.
B. येशू आपल्या
सर्वांचा एक मानव म्हणून आदर्श आहे. जर तो देवपुत्र असूनही एक सर्वसाधारण
मानावाप्रमाणे, त्याच्या मोहांवर, देवावर असलेल्या विश्वासामुळे मात करू शकतो, तर मी का नाही? देव आपल्याबरोबर
सदैव असतो पण आपण कितपत देवाबरोबर राहतो ह्याची जाणीव असायला हवी. ‘देव
आपल्यापासून नव्हे तर आपण देवापासून दूर जातो’. तसेच आपण निवडलेल्या पर्यायांमुळेच
स्वत:वर दु:ख ओढवून घेत असतो. म्हणून देवाच्या सानिध्यात राहणे कधीही योग्यच असते.
C. येशू ख्रिस्त हा ‘पुर्णत:
मानव’ व ‘पुर्णत: देव’ होय. तो देवपुत्र असुनही मानव होऊन त्याने आपल्या भावना,
त्रास, वेदना, कमकुवतपणा स्वत: ने अनुभवला व जाणला. म्हणून तोच आपल्याला ह्याबाबत
योग्य मार्गदर्शन करू शकतो. तो प्रेमळ पित्याचा सदृश चेहरा व पृथ्वीवरील
अस्तित्वात असलेले स्वर्गराज्य आहे.
आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, मोहांवर मात करण्यास आम्हाला सहाय्य कर.
१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना
ख्रिस्ताशी व ख्रिस्तसभेशी विश्वासू राहण्याचा जो वारसाहक्क प्राप्त झाला आहे, तो
त्यांनी इतरांसमोर त्यांच्या जीवनाद्वारे आदर्श म्हणून ठेवावा ह्यासाठी आपण
प्रार्थना करूया.
२. ‘पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे’, ह्या आजच्या नवीन
पिढीच्या धारणेमुळे अनेक लोकांचा देवावरील व येशूवरील विश्वास लयास जात आहे, अशांना
नव्याने प्रभूने त्यांच्या सानिध्यात आणून त्यांचा विश्वास बळकट करावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. ‘देव आपल्यापासून नव्हे, तर आपण देवापासून दूर
जात असतो’. ह्याची जाणीव आंम्हा प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आम्ही
सर्वांनी देवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. आपल्या समाजातील, धर्मग्रामातील जे लोक व्यसनाधीन झाले
आहेत, त्या सर्व लोकांना प्रभूच्या आशेचा किरण दिसावा व देवाने सोपवलेली त्यांच्या
कुटुंबाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशा आणि बऱ्याच
व्याधींनी पिडलेल्या
आहेत ह्या सर्वांनी हताश किंवा हतबल
न होता दैवीदयेवर विसंबून
प्रभूच्या
सानिध्यात रहावे व
त्यांचे जीवन प्रभूप्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. ‘पापांस बळी पडणे म्हणजे देवापासून विभक्त होणे’, म्हणून आपल्या मोहांवर
विजय मिळवता यावा ह्यासाठी प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ‘प्रार्थना’ व
‘बायबल वाचन’ ह्यामध्ये सातत्य राखावे म्हणून प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment