Sunday, 7 February 2016

Reflection for the Homily of Ash Wednesday (10/02/2016) By: Alfred Rodrigues.









राखेचा बुधवार



दिनांक: १०/०२/२०१६.
पहिले वाचन: योएल २:१२-१८.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२.
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८.


‘पापांपासून पळा, देवाकडे वळा’

प्रस्तावना:
     आज आपण आपल्या कपाळाला राख लावून प्रायश्चित काळाला सुरुवात करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपण केलेल्या पापांबद्द्ल योग्यप्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास विनवणी करीत आहे.
     योएलच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात परमेश्वर आपणांस आपली वस्त्रे न फाडता आपली हृदये फाडून पश्चाताप करण्यास आवाहन करीत आहे. तो आपल्यापासून कधीही दूर जात नाही, तर आपणच प्रत्येक वेळी त्याच्यापासून दूर जात असतो. म्हणूनच संत पौल आपणास दुसऱ्या वाचनात परमेश्वराबरोबर समेट घडवण्याचा सल्ला देत आहे.
     पश्चाताप करण्याचे तीन पैलू आहेत: अ) दानधर्म, ब) उपवास व क) प्रार्थना.
आजच्या शुभवर्तमानात योग्य पश्चाताप करण्यासाठी लागणाऱ्या ह्या तीन पैलूंचे वर्णन केले आहे. ह्या प्रायश्चित काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा व शक्ती ह्या मिस्साबळीत मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: योएल २:१२-१८.
     जुन्याकरारात आपल्याला परमेश्वर वारंवार इस्त्रायल लोकांना शिक्षा करताना दिसून येतो. इस्रायल लोक परमेश्वरापासून दूर जात असताना आपण पाहतो. तरीही परमेश्वर प्रेम करण्याच्या उद्देशाने इस्त्रायल लोकांना शिक्षा करीत असतो जेणेकरून ते पापांना बळी पडू नयेत. परमेश्वर आपले प्रेम दर्शविण्यासाठी अनेक संदेष्ट्यांना पाठवतो, जेणेकरून इस्रायल लोकांनी पश्चाताप करावा. परमेश्वर योएल ह्या संदेष्ट्याची निवड करतो जो इस्त्रायल लोकांना पापापासून मुक्त करून देवाकडे वळण्याचा संदेश देत आहे. 

दुसरे वाचन: करिंथ ५:२०-६:२.
     ह्या उताऱ्यात संत पौल स्वत:ची तुलना ख्रिस्ताच्या राजदुताशी करतो. राजाने दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम जो मनुष्य करतो त्याला राजदूत म्हणतात. पौल करिंथ लोकांना सांगत आहे कि, ‘मी, तुम्हांला एक महत्वाचा संदेश देत आहे. संदेश म्हणण्याऐवजी विनंती करीत आहे, ती म्हणजे देवाबरोबर समेट करा, म्हणजेच देवाबरोबर शांती प्रस्थापित करा. कारण परमेश्वर आपण पापी असूनही आपणांवर प्रेम करतो.

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८.
राखेचा बुधवार हा प्रायश्चित काळातील पहिला दिवस आहे. हा दिवस पुनरुत्थानाच्या (इस्टर) सणाच्या ४० दिवसाअगोदर येतो. मत्तय, मार्क व लुक लिखित शुभवर्तमानांनुसार येशूने ४० दिवस वाळवंटात उपवास केला व सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्याचा सामना केला. उपवास काळाचा उगम घेऊन आपण ४० दिवस उपवास काळ पाळतो आणि येशूच्या पुनरुत्थानाची तयारी  करीत असतो.
     कॉन्स्तनटाईन राजाने ख्रिस्ती धर्मप्रसाराला परवानगी दिल्यानंतर रोम शहरात पश्चातापांना जाहीर रित्या पश्चाताप देण्याची प्रथा सुरु झाली. जुन्या करारात अशा प्रकारच्या पश्चातापाची प्रथा प्रचलित असल्याचे विविध वचनांमध्ये आपल्याला आढळते: “म्हणून मी आधार घेऊन धुळराखेत बसून पश्चाताप करीत आहे” (ईयोब ४२:६). “हे वर्तमान मदन्याच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणताट नेसून राख फासली आणि नगरच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले...... बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले” (एस्तर ४:१-३). “माझ्या लोकांच्या कन्ये, कमरेला गोणताट गुंडाल, राखेत लोळ.....” (यीर्मया ६:२६). “तामारेने आपल्या डोक्यात राख घातली आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकीला व डोक्यावर हात ठेऊन ती ओरडत चालली” (२ शमुवेल १३:१९). “ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दु:खाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालीत आहेत आणि धुळीत लोळत आहेत” (येहेज्केल २७:३०). “हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणपाट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली” (दानियेल ९:३).
     कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंत:करणातून करावयाच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्य चिन्ह आहे. ह्या बायबल वचनांचा आधार घेऊन अशा लोकांसाठी उपवासकाळाच्या पहिल्या दिवशी राख फासणे, गोणपाट नेसणे व पवित्र गुरुवारी समेट होईपर्यत पापांपासून दूर राहणे ह्या गोष्टी जाहीरपणे कराव्या लागत. आठव्या ते दहाव्या शतका दरम्यान ही प्रथा बंद पडली आणि केवळ कपाळाला राख लावण्याची प्रथा सुरु झाली. ह्या दिवशी राखेला आशीर्वाद देऊन ती प्रत्येकाच्या कपाळाला लावली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील (उत्त्पती ३:१९) किंवा “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात.

     खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंश आणि नश्वर्त! परंतु इस्टरच्या अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीलं जात.

बोधकथा
 १. केरळ येथील मल्लापुरम शहरातील सी. नारायण यांच्या हॉटेल सबरीनामध्ये एक व्यक्ती जेवणासाठी आली. जेवत असताना अचानक त्याचं लक्ष हॉटेलच्या खिडकीतून खाणाऱ्यांच्या ताटाकडे आशेने पाहणारे, दारिद्र्याचे चटके सोसणाऱ्या एका चिमुकल्या बहीण भावाकडे जाते. हे पाहून ती व्यक्ती त्या दोघांना आत बोलावते त्यांना काय खायचे आहे असे विचारल्यावर त्याच्या ताटाकडे चिमुकले बोट दाखवितात त्याप्रमाणे ऑर्डरही दिली जाते.
     चिमुकल्याचे पोट भरल्यावर ती व्यक्ती बिलाची मागणी करते आणि बिल पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण त्या बिलावर पैश्याच्या आकड्याऐवजी मानवतेची पावती देणारा संदेश लिहिला होता. तो असा, ‘आमच्याकडे मानवतेची किंमत मोजता येईल अशी मशीन किंवा आकडा नाही. तुमचं भले होईल’.

२. एकदा एका धर्मग्रामात एक धर्मगुरू प्रायश्चित काळात लोकांना ‘तप’ देण्यासाठी आलेले होते. तपासाठी त्यांनी ‘प्रार्थना’ हा विषय निवडला. ह्या विषयावर बोलताना व प्रार्थनेचे महत्व पटवून देतांना, त्यांनी मध्येच लोकांना प्रश्न केला, ‘तुम्हाला प्रार्थनेमुळे आजपर्यंत काय लाभ झाला आहे?’ ह्या प्रश्नावर विचार करून अनेक लोकांनी उत्तरे दिली, ती अशी, प्रार्थनेमुळे कोणाला घर मिळाले, कोणाला चांगली नोकरी मिळाली, तर कोणाला चांगला जोडीदार मिळाला, तसेच काहीना मुलं-बाळ प्राप्त झाली; परंतु त्यापैकी एक जण उठला व म्हणाला, ‘मला प्रार्थनेमुळे अशा प्रकारचा काहीही लाभ झाला नाही परंतु एक गोष्ट मी निश्चित सांगु शकतो कि, मी माझ्यात असलेला क्रोध, मत्सर, हेवा, मीपणा, चिंता, लोभ, मरणाविषयी माझ्या मनात असलेले भय ह्यांपासून परावृत्त झालो आणि ह्या सर्वांमुळे मला मनशांती लाभली आहे’.

मनन चिंतन:
अनेक वेळा आपण प्रार्थना, आपल्याला काही फायदा किंवा लाभ होईल ह्या उद्देशाने करीत असतो. प्रार्थनेचा हेतू आपल्याला काय उत्तर मिळेल ह्यात नसतो; तर प्रार्थनेद्वारे आपल्या जीवनातील दुष्कृत्यांचा, वाईट विचारांचा किंवा पापांवर विजय मिळवून आपल्या जीवनात आपण कशाप्रकारे बदल घडवून आणला ह्यात असते. हेच आपल्याला वरील पहिल्या घटनेद्वारे कळून येते. हा प्रायश्चितकाळ आपल्याला आपण केलेल्या वाईट गोष्टींचा प्रार्थनेद्वारे त्याग करण्यास शिकवतो.
     ‘प्रार्थना’ हा प्रायश्चित काळाचा एक महत्वाचा पैलू आहे. प्रार्थनेमुळे आपण आपल्या पापांशी सामना करण्यास समर्थ ठरत असतो. प्रायश्चित काळात आपला अधिक वेळ आपण प्रार्थनेला दिला पाहिजे. नेहमी करीत असलेल्या प्रार्थनेमध्ये जास्त वेळ आपण परमेश्वराला द्यायला हवा. ह्या काळात येशूच्या दु:ख सहनावर मनन चिंतन करण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही प्रार्थना महान असू शकत नाही. प्रार्थनेबरोबरच क्रुसाच्या वाटेची भक्ती करून येशूबरोबर आपण कालवारीची वाट चालायला ह्या काळात आपणास सांगण्यात येते.
     पहिल्या घटनेवरून आपल्याला दानधर्म करण्याचा बोध होत आहे. ह्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्या व्यक्तीने चिमुकल्या भावा-बहिणीच्या डोळ्यातील अश्रू जाणून घेतले व तो मनुष्य त्यावर न थांबता किंवा बघून फक्त विचार न करता त्याने कृतीही केली. त्याच्या हृदयाला पाझर फुटला. थोडक्यात, त्याने भुकेल्यांची भूक भागविली. होय हा प्रायश्चितकाळ आपल्याला गरजवंताना मदत करण्यास पुढे बोलावत आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यास बोलावत आहे.
     आज आपल्या कपाळावर राख लावली जाणार आहे व ह्याद्वारे आपल्याला आपल्या पापांची व अपराधांची आठवण करून दिली जाईल व पश्चाताप करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आवाहन केले जाईल. आपल्या कपाळावर काढलेला ‘राखेचा क्रूस’ आपल्याला प्रभू येशुचे क्रुसावर प्राण समर्पून केलेल्या त्यागाची आठवण करून देते. तसेच आपली पापे व दुष्कर्मे माफ केली जातील ह्याचा दिलासा देते. राखेच्या बुधवारी कपाळावर राख लावण्याची प्रथा आपण काटेकोरपणे पाळतो. जेव्हा आपण कपाळाला राख लावतो, तेव्हा अंत:करणातून आपल्याला आपल्या पापांची जाणीव होऊन पूर्ण अंत:करणाने पश्चाताप करण्याची गरज भासली पाहिजे.

     कपाळावर लावलेल्या राखेचा संपूर्ण अर्थ समजून घेतल्यानंतर व आपल्या पापांचा पश्चाताप करीत असताना, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, जरी राखेच्या बुधवारी आपण उपवास काळाला सुरुवात करीत असलो तरीही हा दिवस दु:ख पाळण्याचा किंवा उदास राहण्याचा नसून आपला जीवनात एक नवीन चैतन्य निर्माण करण्याचा आहे. कारण ह्या दिवसापासून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताचे स्वागत करण्यास तयार होत असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडव.
१. सर्व धार्मिक पुढाऱ्यांनी प्रभूच्या पावलावर पाउल टाकून आपल्या जिअवनद्वरे पश्चाताप समेटाचे व ऐक्याचे धडे सर्व लोकांस ह्या प्रायश्चित काळात द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या प्रायश्चित काळाद्वारे प्रभूने आपल्याला आपल्या पापांचा धिक्कार करून प्रभूकडे येण्याची एक अनमोल संधी दिली आहे. ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन देवाबरोबर, इतरांबरोबर व स्वत:बरोबर समेट घडवून आणण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. धर्माच्या नावाखाली जे लोक हिंसेचा वापर करून समाजात असंतोष व दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. २०१६ हे वर्ष पोप महाशयांनी दयेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. ह्या प्रायश्चित काळात आपण आपल्या शत्रूंवर दया दाखवून त्यांना क्षमा करावी व त्याद्वारे प्रभूच्या दयेचा आदर्श इतरंसमोर ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment