Reflection for the homily of 5th Sunday in Ordinary Times (07/02/2016) By: Xavier Patil.
दिनांक: ०७/०२/२०१६.
पहिले वाचन: यशया ६:१-८.
दुसरे वाचन: १करिंथ १५:१-११.
शुभवर्तमान: लूक ५:१-११.
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील पाचवा
रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय ‘पाचारण’ हा आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया
संदेष्टा त्याला देवाचे दर्शन आणि पाचारण कशाप्रकारे झाले ह्याचे वर्णन करतो.
दुसऱ्या वाचनात संत पौल त्याच्या सुवार्ता पसरविण्याच्या कार्याबद्दल सांगत आहे.
तर शुभवर्तमानात येशुख्रिस्त त्याच्या पहिल्या शिष्यांस पाचारण करून देवाच्या
राज्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रण करत आहे.
शिष्यांप्रमाणे येशूचे प्रेषितीय कार्य चालू ठेवण्यासाठी
आपण सर्वांनी तत्पर असावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये विशेष प्रार्थना
करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
प्रस्तुत उतारा हा दोन
भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिला भाग: देवाचे यशयाला झालेले दर्शन आणि दुसरा
भाग: यशयाचे पाचारण. पहिल्या भागामध्ये यशयाने देवाला उच्च सिंहासनावर बसलेले पाहिले,
त्याच्या भोवताली ‘सेराफिम’ उभे राहून आळीपाळीने ‘पवित्र पवित्र पवित्र’ सेनाधीश
परमेश्वर हे उच्चस्तरीय व अत्यंत आदरपूर्वक गाणे गात होते.
देवाचे वैभवशाली दर्शन पाहून यशया
घाबरून जातो, कारण त्यावेळी असे मानले जात असे कि, अशुद्ध मनुष्याने जर देवाला
पहिले तर त्याला मरण येणार हे निश्चित. यशया स्वत:ला अशुद्ध मानत होता. त्याचवेळी
एक सेराफदूत वेदिवरील इंगळ घेऊन यशयाच्या ओठांस लावून त्याची अशुद्धता दूर करतो.
त्याचाच मोबदला म्हणून दुसऱ्या भागात यशया ‘संदेष्टा’ बनून सुवार्ता लोकांपर्यंत
पोहोचवण्यास पुढे येतो.
दुसरे वाचन:
संत पौल, करिंथ ह्या प्रांतातील
बंधुजनांना, शिष्यांच्या मुख्य शिकवणुकीची आठवण करून देतो. ज्या शिकवणुकीवर आपला
ख्रिस्ती विश्वास आधारित आहे. ती शिकवणूक म्हणजे ‘शास्राप्रमाणे ख्रिस्त आपल्या
पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला व
तद्नंतर त्याने १२ शिष्यांना व इतर लोकांना दर्शन दिले आणि त्यांच्यामधील मी देखील
एक आहे’. पौल जरी प्रेषित बनण्यास तो योग्य नव्हता कारण त्याने देवाच्या मंडळींचा
द्वेष करून त्यांचा छळ केला होता; तरीपण देवाच्या कृपेने पौलाला देखील प्रेषितांमध्ये
गणण्यात आले. संत पौलाने शिष्यांना व आपल्याला सांगतो की, ‘त्याच्यावर जो विश्वास
ठेवतो त्याचे तारण होईल’.
शुभवर्तमान:
ख्रिस्ताने त्याच्या कार्याची
सुरुवात पहिल्या चार शिष्यांच्या पाचारणापासून केली; हे आपणाला मत्तय ४:१८-२२.,
मार्क १:१६-२०. लूक ५:१-११. मध्ये सापडते. पण संत लूक पहिल्या शिष्यांच्या पाचारणाअगोदर
येशूची गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्यावरील लोकसमुदायास शिकवणीने सुरुवात करतो.
तद्नंतर येशूने चमत्कार करून शिमोन व त्याच्या साथीदारांना आशिर्वादित केले.
संत लुक ह्याने प्रस्तुत
उताऱ्यामध्ये शिमोनाला मुख्य पात्र दिले आहे कारण शिमोनाला येशूच्या
चमत्काराद्वारे त्याच्या ‘पावित्र्याची’ ओळख झाली आणि म्हणूनच लूक शिमोनाच्या
पाचारणाला केंद्रस्थानी ठेवतो.
‘खोल पाण्यात मासे धरण्यासाठी जाळी खाली सोडा’.
आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला मचवा खोल पाण्यात हाकारण्यास
सांगितले व मासे पकडण्यासाठी जाळी खाली सोडण्यास सांगितले.
‘आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही’
रात्रीची वेळ हि मासे पकडण्यासाठी उत्तम वेळ आहे,
हे शिमोन व त्याच्या साथीदारांना माहित होते, कारण मासेमारी हा त्यांचा व्यवसाय
होता आणि त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. ‘रात्रभर कष्ट करून देखील जर
त्यांना काही सापडले नाही, तर दिवसा मासे कसे सापडतील’? हा प्रश्न शिमोनाच्या मनात नक्कीच आला असणार. तरीसुद्धा शिमोनाने स्वत:चा गर्व बाजूला ठेवून येशूच्या शक्तीवर व त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून म्हटले ..
‘तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो’.
ह्यावरून आपणाला कळते कि, शिमोन
अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याचा येशूवर विश्वास होता.
‘मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला’.
शिमोनाला त्याच्या विश्वासाचे प्रतिफळ भेटले. त्याने केलेले
श्रम वाया गेले नाहीत, तर त्यांना माशांचा एवढा मोठा घोळका सापडला कि, त्यांची जाळी
फाटू लागली म्हणून त्यांनी दुसऱ्या मचव्यातील साथीदारांस मदत करण्यास खुणावले.
‘मी पापी मनुष्य आहे’.
माशांच्या चमत्काराने शिमोनाला
येशूच्या पावित्र्याचा खुलासा झाला. त्याला काळून चुकले कि, येशुख्रिस्त हा देवाचा
जवळचा मित्र असणार. शिमोन स्वत:ला ‘पापी मनुष्य’ म्हणून लेखतो म्हणून पवित्र
माणसाच्या सानिध्यात राहणे, त्याला उचित वाटले तरीही तो येशूला त्याच्यापासून दूर
जाण्यास सांगत आहे.
याकोब आणि योहान
संत लूक ह्या उताऱ्यामध्ये जब्दीचे दोन मुले, याकोब आणि
योहान ह्यांचादेखील शिमोनाचे साथीदार म्हणून समावेश करतो; चौथ्या साथीदाराचे नाव येथे
दिलेले नाही.
‘येशूने पुढे म्हटले तू माणसे धरणारा होशील’.
येशु ख्रिस्ताने शिमोनाला व
त्याच्या साथीदारांना त्यांचे पुढील कार्य पाचारण काय आहे हे सांगितले. ह्यापुढे ते
मासे पकडणारे नव्हे तर माणसे पकडणारे होतील. येशूने त्यांच्यासाठी नवीन व्यवसाय
दिला ते आता स्वत: साठी नव्हे, तर देवासाठी जगणार होते. त्यांचे लक्ष संपत्ती
कमावण्यासाठी नव्हे, तर देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास ते कार्य करणार
होते.
‘सर्व सोडून ते त्यचे अनुयायी झाले’.
ह्या वाक्याद्वारे संत लूक ह्याने
येशूचे शिष्य बनण्यासाठी किती किंमत
मोजावी लागेल म्हणजे शिष्य बनण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज/पात्रता लागते
हे स्पष्ट करून दिले आहे. सर्व गोष्टींचा आणि व्यक्तींचा त्याग करणे, हीच येशूचे
शिष्य बनण्यासाठी एकमेव पात्रता आहे. सर्व प्रकारच्या बंधनापासून अलिप्त राहणे
देवाचे कार्य करण्यासाठी आपण मोकळे असायला हवे.
बोधकथा:
मनन चिंतन:
आज आपण पाचारण ह्या विषयावर मनन
चिंतन करत आहोत. आजची तिन्ही वाचने ‘पाचारण’ हा विषय हाताळत आहेत.
“Vocation”, ‘पाचारण’ म्हणजे एखाद्या विशेष
कार्यासाठी आपला जन्म झाला आहे, ही भावना. पवित्र शास्रामध्ये जीवितकार्य पाचारणविषयी
आपण अनेक वेळा ऐकतो. जुन्या करारात परमेश्वर आब्राहम, मोशे तसेच इतर संदेष्ट्याना
देवाचा संदेश त्याच्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी पाचारण करतो. नव्या करारामध्ये
येशुख्रिस्त त्याच्या शिष्यांना त्याचे मिशनकार्य चालू ठेवण्यास आमंत्रित करतो.
पवित्रशास्र पाचारणाची रचना चार
टप्प्यांमध्ये करतो १. जेव्हा कामाची गरज असते तेव्हाच परमेश्वर संदेष्ट्याना
पाचारण करतो २. परमेश्वर संदेष्ट्याना कामगिरी देतो. ३. संदेष्टा देवाच्या
पाचारणाला विरोध करतो. ४. देव पुन्हा पाचारण करतो.
उदा. मोशेचे पाचारण: देवाने इस्रायल लोकांचा इजिप्त देशात छळ होताना पाहिला
म्हणून फारोच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करणे गरजेचे होते. हि गरज भागवण्यासाठी
देवाने मोशेला निवडले. मिसऱ्यांच्या हातातून लोकांना सोडवावे, अशी परमेश्वर मोशेला
कामगिरी देतो; पण मोशे नाकारतो कारण तो स्वत:ला कमी लेखत होता व त्या कार्यासाठी
स्वत:ला लायक मानत नव्हता. मोशेने स्वत:ची अपात्रता दाखवून, देवाचे पाचारण नाकारले
पण पुन्हा देव त्यास पाचारण करतो. मोशे घाबरू नको मी तुझ्याबरोबर आहे आणि शेवटी
मोशे देवाचे पाचारण स्वीकारतो.
अशाच प्रकरणी स्थिती आपणाला
आजच्या तिन्ही वाचनात आढळते. ह्यावरून आपणाला कळते मी, परमेश्वर ज्ञानी,तज्ञ,
विद्वान लोकांची निवड न करता असाध्य सरळ आणि सामान्य दर्जाच्या लोकांची निवड करतो.
इंग्रजी मधे एक म्हण आहे ‘God doesn’t call
the qualified but he qualifies the called’ म्हणजे ‘परमेश्वर ज्ञानी
लोकांना बोलावत नाही तर ज्यांना तो बोलावतो त्यांना तो विद्वान ज्ञानी बनवतो’.
यशया स्वत:ला अशुद्ध समजत असे, संत पौल ह्याने तर ख्रिस्ती लोकांचा छळ केला होता
आणि शिमोन स्वत:ला पापी मनुष्य म्हणून समजत होता. ह्यावरून आपणाला समजते की, ‘पाचारण
हे परमेश्वरापासून मिळालेली देणगी आहे’. इथे परमेश्वरच पहिले पाउल उचलतो,
परमेश्वराला मानवी दुर्बलतेची जाणीव होती. जरी ते अपात्र असले तरीपण, परमेश्वराची
कृपा त्यांच्यावर सदैव असते. दैवी पाचारणात चमत्कारीक सामर्थ्य असते म्हणून त्या
हाकेने त्यांची दिशा बदलून जाते. त्यांचा व्यवसाय, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे
जीवनकार्य संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
आजच्या शुभवर्तमानातील चार शिष्य (शिमोन, आंद्रेय, याकोब
आणि योहान) त्यांचे सर्वस्व सोडून येशूचा पाठलाग करतात. त्यांनी उदयाचा विचार केला
नाही; त्यांनी फक्त वस्तूंचा आणि संपत्तीचाच नव्हे तर त्यांच्या जन्मदात्यांचा आणि
इतर नातेवाईकांचादेखील त्याग केला. येशूचे शिष्यत्व पुष्कळ आव्हानात्मक आहे. शिष्यांना
जुनी जीवनशैली सोडून नवीन जीवन पद्धती आत्मसात करावी लागते. देव जेथे पाठवील तेथे
जावे, जेव्हा बोलावेल तेव्हा यावे आणि जे सांगेल ते करावे ह्या अटी प्रत्येक
शिष्याला पूर्ण कराव्या लागत.
परमेश्वराने आपणा सर्वांना पाचारण
केले आहे, काहींना ‘व्रतस्थ जीवन’ जगण्यासाठी तर काहींना ‘वैवाहिक जीवन’
जगण्यासाठी. देवाने प्रत्येक मनुष्याला एक कामगिरी सोपवून ह्या भूतलावर पाठवले
आहे. पण आपल्या स्वत:च्या इच्छा गरजा पूर्ण करताना, आपण देवाने दिलेली कामगिरी
विसरून जातो. म्हणून देवाच्या शब्दाला आज्ञाधारक राहून व त्याच्या मार्गावर
चालण्यास परमेश्वराने आपणाला कृपाशक्ती आणि सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझी सुवार्ता प्रकट करण्यास आम्हाला कृपा दे.
१ ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स,
महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ या सर्वांनी त्यांच्या कार्याद्वारे व
शुभसंदेशाद्वारे येशु ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाची सुवार्ता
इतरांपर्यंत पोहचवण्यास त्यांना शक्ती-सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२.
‘पिक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत’ म्हणून अनेक तरुण
तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे, तसेच ज्या तरुण
तरुणींनी देवाच्या पाचारणाला होकार दिला आहे अशा सर्वांना ऐहिक मोहांपासून परमेश्वराने
अलिप्त ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
जे युवक युवती देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा
स्पर्श व्हावा व त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी नैतिक मार्गावर चालावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४.
ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने
चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताचे शिष्य खरे सेवक बनून देवाच्या इच्छेला
प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment