Wednesday 6 July 2016

  Reflection for the Homily of Fifteenth Sunday in Ordinary Time           (10-07-2016)  By Minin Wadkar.









 सामान्य काळातील पंधरावा रविवार


दिनांक: १०-०७-२०१६.
पहिले वाचन: अनुवाद ३०:१०-१४.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र १: १५-२०.
शुभवर्तमान: लूक १०: २५-३७.


"जशी स्वत:वर तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर" 


प्रस्तावना:

      आज आपण सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना जात-पात, धर्म व मतभेद विसरून खऱ्या अंत:करणाने शेजाऱ्यावर प्रीती करण्यास आमंत्रित करत असून, शाश्वत जीवनप्राप्ती करून घेण्यासाठी बोलावीत आहे.
     अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, मोशे लोकांना परमेश्वराने दिलेल्या आज्ञांची आठवण करून देतो आणि आज्ञेशी प्रामाणिक राहण्यासाठी आवाहन करत आहे. संत पौल कलस्सैकरांस सांगतो की, प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश देवाचे सदृश रूप आहे. तो उत्पत्तीपासून महान आणि सर्व काही त्याच्यामध्ये निर्माण झाले आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानामध्ये ‘चांगल्या शमरोनीच्या’ दाखल्याद्वारे  शाश्वत जीवनाची पूर्तता, प्रेम व बंधुत्वामुळे होते असे समजून येते. कारण प्रेमामुळे आपुलकी निर्माण होते व निस्वार्थी प्रेमापोटी केलेल्या कार्याला चांगले फळ लाभते.
ह्या पवित्र मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण सुद्धा एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करून व बंधुत्वाचे नाते निर्माण करून शाश्वत जीवनात सहभागी होण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असावे म्हणून प्रभूचे कृपासामर्थ्य मागुया.  

सम्यक विवरण

पहिले वाचन: अनुवाद ३०:१०-१४

     अनुवाद ह्या पुस्तकाला ‘मोशेचे नियमशास्त्र’ म्हटले जाते. हे पुस्तक ६ व्या किंवा ५ व्या शतकामध्ये लिहिलेले आहे. ह्या वाचनामध्ये मोशे इस्रायल लोकांना देवाने त्यांच्याबरोबर केलेल्या करारात एकनिष्ठ व प्रामाणिक राहण्यासाठी सांगत आहे. कारण ते देवापासून दूर जात होते व त्यांचा देवावरील विश्वास कमी होत होता. सिनाय पर्वतावर तसेच वाळवंटात भरकटत असताना, परमेश्वर देव त्यांच्याशी बोलला होता. देव त्यांच्याशी वतनभूमीपर्यंत होता. जर त्यांनी देवाच्या वचनावर संपूर्ण मनाने विश्वास ठेवला असता तर त्यांची उन्नती झाली असती. देवाच्या वचनांचे पालन देखाव्यासाठी न करता संपूर्ण अंत:करणाने केले पाहिजे; कारण दैनंदिन जीवन सुलभ होण्यासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याची फार गरज आहे असे लेखक सांगतो. असे केल्याने त्यांना वतनभूमी पाहण्याचे भाग्य निर्माण होईल.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र १: १५-२०  

 संत पौल येशूच्या देवत्वाची व मानवी स्वभावाचे वर्णन करतो. मानवी स्वभावामुळे देवाच्या पुत्राने संपूर्ण सुष्टी व सृष्टीचा निर्माता यामध्ये समेट घडवून आणला आहे. येशू देव आहे. तो देव असुनही मानव झाला व तो आम्हांमध्ये राहिला आणि अदृश देवाची प्रतिमा आपल्या जीवनाद्वारे प्रगट केली.

शुभवर्तमान: लूक १०: २५-३७

     शास्त्री लोकांनी मोशेच्या नियमशास्त्रांचा सखोलतेने अभ्यास केला होता. त्यांना ‘कायदेप्रमुख’ म्हटले जात असे. शास्त्री लोक, परुशी लोकांसमवेत येशू व त्याच्या शिकवणुकीला विरोध करत असे. ते सातत्याने येशूला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याला रोमन अधिकाऱ्यांच्या व लोकांच्या विरोधात जाण्यासाठी भाग पाडत असे.
     त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने आदराने येशूला विचारले, ‘गुरुजी सार्वकालीक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे’? शास्त्री लोकांचा पुनरुत्थानावर व शाश्वत जीवनावर विश्वास होता. तरीसुद्धा येशूचे उत्तर ऐकण्यासाठी तो आतुरला होता. येशू म्हणतो, ‘तुला नियम माहित आहेत’. प्रभू येशू शास्र्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ‘चांगल्या शमरोनीच्या’ दाखल्यावरून देतो. या दाखल्यावरून असे समजते की, जेव्हा आपण शेजाऱ्यावर निस्वार्थीपणे कसलाही मतभेद न पाळता प्रेम व सेवा करतो तेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळत असतो. असे केल्याने शाश्वत जीवनाची पूर्तता होते.

बोधकथा:

     संध्याकाळ झाली होती. ख्रिस्ती भाविक मोठ्या संख्येने चर्चमध्ये मिस्सासाठी एकत्र जमले होते. मिस्सा अपर्ण करण्यासाठी दुसऱ्या धर्माग्रामातील धर्मगुरू येणार होते. परंतु ते वेळेवर पोहचले नाही, म्हणून लोक तक्रार करू लागले. एका तासाने धर्मगुरू चर्चमध्ये हजर झाले. त्यांनी लोकांच्या कुजबुजीला दुजोरा दिला नाही. लोकांना फादरांची शांतता आवडली नाही. लोकांनी नम्रपणे फादरांना उशिरा येण्याचे कारण विचारले असता फादर काहीच न बोलता मिस्सा करण्यासाठी गेले. शुभवर्तमान वाचून झाल्यानंतर धर्मगुरूंनी प्रवचनाची सुरुवात मिस्सा सुरु होण्याआधी जे काही घडले होते त्याद्वारे केली. फादर म्हणाले, ‘मी मिस्सा करण्यासाठी वेळेवर निघालो होतो. वाटेत अपघात होऊन पडलेला एक युवक माझ्या नजरेस आला. कुणीही त्याच्या कडे न पाहता तिथून निघून जात होते. लोकांच्या तोंडातून ‘डॉक्टर ला बोलवा’ व पोलिसांना बोलवा’ असे शब्द वारंवार येत होते. पण कोणीही त्याला इस्पितळात नेण्यासाठी धजत नव्हते. मी गाडी थांबवली, कोणताही विचार न करता त्याला माझ्या गाडीत घातले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही क्षणातच डॉक्टरांचे शब्द ‘घाबरू नका, त्यांचा जीव वाचेल’ माझ्या कानी पडले, आणि मी देवाचे आभार मानत सुटकेचा नि:श्वास सोडला.

मनन चिंतन:

     चांगल्या शमरोनीचा दाखला आपल्याला कृतीला महत्व देण्यासाठी प्रेरित करत आहे. ‘जा आणि तुही तसेच कर’. याजक व लेवी या दोन व्यक्तींकडून त्याला मदतीची अपेक्षा होती. पण असे काही झाले नाही; ते दोघेही मदत न करता दुसऱ्या वाटेने निघून गेले. त्यांचे हृदय माणुसकीच्या नात्याने त्या जखमी माणसाकडे का गेले नाही? त्यांची माणुसकी हरपली होती का? हि बाब आजच्या जगातसुद्धा आपल्या दृष्टीस पडते. उत्पत्ती पुस्तकात ‘काईनच्या क्रूरपणाची आठवण येते: ‘मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे’?
     आपल्याला माहीतच असेल की, समाजामध्ये दलितांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते. त्यांना आपण चांगला शमरोनी बनून मदत करू शकतो का ?
     येशू साऱ्या सृष्टीचा तारणारा आहे. त्याचे पृथ्वीवरील जीवन व कार्य हे समाज बांधीलकीसाठी होते. ‘चांगल्या शमरोनीचा’ दाखला आपल्यासमोर मतभेद, अन्याय, प्रेम, काळजी इत्यादी वेगवेगळे घटक किंवा गोष्टी स्पष्ट करून देतो.
     माणूस जीवनामध्ये सुख, शांती, आनंद व पैसा मिळविण्यासाठी धडपडत असतो. चांगल जीवन जगून तो समाजापुढे एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो. असे करत असताना तो एक महत्वाची गोष्ट विसरून जातो ती म्हणजे ‘माणुसकी’.
     यहुदी आणि शमरोनी लोक एकमेकांचे शत्रू होते. तसेच लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला असे आढळते की, जेव्हा येशू व त्याचे शिष्य येरुशलेमला जात असतात त्यांना समारीया गावातून जावे लागे. शमरोनी लोकांनी त्यांना विरोध केला व त्यांचे स्वागत केले नाही. तरीसुद्धा येशू त्यांच्यावर दया दाखवून तिथून निघून जातो. येशूला वाईट वाटलं असेल पण त्याने त्यांच्यावर वाईट नजरेने पाहिलं नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये शास्त्री येशूला विचारतो की, ‘माझा शेजारी कोण’? येशूला शमरोनी लोकांच्या वाईट वागणुकीची कल्पना असूनदेखील तो शास्र्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चांगला शमरोनीचा दाखला देतो. येथे येशू त्यांची स्तुती करतो. त्यांच्यावर सदासर्वदा प्रेम करतो. कारण तो दीनांचा कैवारी होता.
     प्रत्येक धर्मातील रिती-रिवाज महत्वाचे असतात. कारण भक्तिमय व प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी ती उपयोगी असतात. परंतु जेव्हा रिती-रिवाज चांगले काम करण्यास प्रवृत्त करत नाही, तर त्यांचा उपयोग शून्य होतो. याजक व लेवी जखमी माणसाला मदतीचा हात देऊ शकले नाहीत. गणना पुस्तकामध्ये (१९:११), “एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध रहावे” असे लिहिलेले आढळते. ह्या कारणामुळे याजक व लेवी जखमी माणसाला मदत न करता निघून गेले; कारण जर तो मनुष्य मरण पावला असता तर ते दोघे ‘अशुद्धेला’ बळी पडले असते. शमरोनीची शिकवणसुद्धा ह्याच प्रकारची होती. पण शमरोनी माणसाने ह्या मर्यादेचे चांगल्या कामासाठी उल्लंघन करून, जखमी माणसाला मदत केली व त्याचा प्राण वाचविला. शमरोनी माणसाला जखमी माणसाची जात किंवा धर्म नव्हे तर प्रेम, माणुसकी व बंधुत्व महत्वाचे वाटले.
     शाश्वत जीवनाविषयी देवाचे वचन आपल्याला सांगते की, ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर’. यहुद्यांच्या मतानुसार शेजारी म्हणजे यहुदीच आणि जवळचे मित्र ज्यांनी देवाच्या करारावर विश्वास ठेविला ते (लेवीय १९:३४). इतर लोकांचा ह्यामध्ये समावेश केला जात नसल्यामुळे त्यांच्यावर प्रेम करण्याची व मदत करण्याची गरज भासत नव्हती.
     येशूच्या मते शेजारी म्हणजे, ‘ज्याला मदतीची, प्रेमाची, बंधुत्वाची गरज आहे तो’. जो गरजवंताना प्रेमाची व मदतीची साक्ष देतो व त्याची पूर्तता करतो तो खरोखर शेजारी म्हणून ओळखण्यास पात्र ठरतो. येशू हा प्रेमाचा सागर आहे ज्यामधून आपुलकी, प्रीति, क्षमा, बंधुत्व, नम्रता हे ओसंडून वाहते. ह्या सर्व गुणांची नि:स्वार्थीपणे जोपासना आपण केली तर खरोखरच शाश्वत जीवनाचा आनंद आपल्या मोकळ्या हातात देवाचे दान म्हणून पडेल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो शेजाऱ्यावर प्रेम करण्यास आम्हाला सहाय्य कर.

१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स व ब्रदर्स व इतर सर्व मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास देवाची प्रेरणा, त्याचे सामर्थ्य व कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सुखदुःखात सह्भागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या पॅरीशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशातील अन्याय-अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व सर्वांनी भेदभाव विसरुन आपल्या कुटुंबात, समाजात आणि देशात शांतीचे वातावरण प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तीक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.






         


1 comment: