Reflection for the
Homily of Seventeenth Sunday in
Ordinary Time (24-07-2016) By Allwyn Gonsalves
सामान्यकाळातील सतरावा रविवार
दिनांक: २४/०७/२०१६.
पहिले वाचन: उत्पत्ती १८: २०-३२.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.
शुभवर्तमान: लूक ११:१-१३.
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय
आपल्याला प्रार्थनेचे महत्व पटवून सांगत आहे.
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, अब्राहम देवाकडे सदोम आणि गमोरा ह्या देशासाठी प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनेमुळेच परमेश्वर एका नितीमानासाठीसुद्धा पूर्ण
शहराचा नाश करणार नाही असे अभिवचन देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांस सांगतो कि तुमच्या बाप्तिस्माद्वारे
आणि देवावरील विश्वासामुळे तुम्हांला तारण प्राप्त झाले आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांच्या विनंतीस्तव त्यांना परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करण्यास शिकवतो.
प्रार्थना ही देवाने मानवाला दिलेली अमुल्य अशी
देणगी आणि शक्ती आहे. प्रार्थनेद्वारे आपण देवाच्या सानिध्यात जात असतो. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असता, आपल्या
प्रार्थनेत सातत्य असावे म्हणून परमेश्वराची कृपा मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या प्रस्तुत उताऱ्यात, आब्राहाम हा आपल्या देव पित्याकडे सदोम आणि गमोरा ह्या देशासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो व परमेश्वर त्याला म्हणतो कि ‘त्या देशात दहा माणसे जरी नीतिमान असली तरी मी त्यांचा नाश करणार नाही’. ह्या दोन्ही प्रांतामध्ये फार वाईट कृत्ये घडली होती, ते देवा पासून दूर गेले होते. त्यामुळे देवाला त्या देशांचा नाश करायचा होता. पंरतु आब्राहामाला त्या देशांचा नाश व्हावे असे वाटत नव्हते कारण त्याच्या भावाचे कुटुंब त्या देशात वस्ती करत होते म्हणून त्याने देवाची दया त्या प्रांतांवर व्हावी म्हणून
प्रार्थना केली. आब्राहामाने देवाशी साधलेल्या संवादामुळे त्या प्रांतांचे संरक्षण झाले.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र
२:१२-१४.
संत पौल कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो कि ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या सर्वाचा बाप्तिस्मा झाला तेंव्हाच आपण त्याच्याबरोबर पुरले गेले आहोत व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्याच देवाने आपल्यालादेखील आपल्या मरणातून उठविले आहे आणि आपल्या देवावरील विश्वासामुळे आपलेदेखील तारण झाले आहे. म्हणून देवाच्या सानिध्यात राहून त्याचे विश्वासू सेवक
होण्यास संत पौल आपणास सांगत आहे.
बोधकथा:
दिपक सहा वर्षानंतर अमेरिकेतून मुंबईला येणार होता, पंरतु दुर्दैवाने जेव्हा तो मुंबईच्या विमानतळावर पोहचला तेव्हा त्याला कळून चुकले कि, आज काही कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. त्याच्या एका मित्राचे घर विमानतळाजवळच होते हे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच आपल्या मित्राला आपली व्यथा फोनवरून सांगितली व काही क्षणातच त्याचा मित्र येऊन दिपकला त्याच्या घरी घेऊन गेला.
मित्राचे घर हे साधे होते. मित्राचा परिवार हा प्रार्थनामय होता. मित्राच्या घरी वरच्या मजल्यावर त्यांनी एक खोली खास पाहुण्यांसाठी तयार केली होती. आपले सर्व सामान जिन्यावरून वरच्या मजल्यावर घेउन जात असताना दिपकला आपले मनावरचे ओझे फार जड वाटत होते. तो जिन्याच्या वरच्या टोकावर पोहचला. तेथे त्याला एक पाटी टांगलेली दिसली. तिच्यावर लिहिलेले होते, “आज आपण प्रार्थना केली का?”, “आपण सर्वांसाठी प्रार्थना केली का?” दिपकला कबूल करावे लागले की तो शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक धापा सुध्दा टाकत आहे. आणि त्याच वेळी गुडघे टेकून प्रार्थनेद्वारे त्याने देवाशी संवाद साधला. दिपकला वाटले कि जणूकाही देवाने त्याचे सर्व ओझे घेतले होते व शांतीरूपी देणगीचे हलके ओझे त्यास बहाल केले. ‘प्रार्थनाहीन ख्रिस्ती म्हणजे शक्तीहीन ख्रिस्ती’. म्हणूनच प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने प्रार्थनेचे सातत्य जोपासले पाहिजे.
मनन चिंतन:
प्रार्थना ही देवाने
मानवाला दिलेली अमुल्य अशी देणगी आणि शक्ती आहे. प्रार्थना आपण कोणसाठीही
व कोणत्याही हेतुसाठी करू शकतो; मात्र हे हेतू देवाच्या
वचनाशी सबंधित असावेत. उदा: हेजिकिया याने दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. दानियलने सिंहाच्या पिंज-यामधून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना केली (दानियल; ६:२०-२३). दाविद राजाने दयेच्या
याचनेसाठी प्रार्थना केली (स्तोत्र; १७:१). संत पीटर ह्याने क्षमेसाठी प्रार्थना केली (लुक; २२:६१). प्रार्थनेला कधीच
वेळेचे आणि ठिकाणाचे बंधन नसते. उदा: माश्याच्या पोटातून योना संदेष्ट्याने आपल्या देवाकडे
प्रार्थना केली ( योना; १:१७). आपली मुलगी बरी व्हावी
म्हणून जायरस ह्या अधिपतीने ख्रिस्ताजवळ रस्त्यावर प्रार्थना केली (लुक; ५:२३-२५). दाविद राजाने गुहेमध्ये
प्रार्थना केली. पश्चातापी चोराने शेवटच्या क्षणी क्रुसावरून प्रार्थना
केली (लुक;२३:४०-४१). ख्रिस्ताने डोंगरावर, एकांतात, लोकांसमवेत, गेथसेमनीबागेमध्ये प्रार्थना केली (मत्तय; २६:३६).
आजच्या पहिल्या वाचनात
आपण ऐकले की, देवाने मोशेची प्रार्थना ऐकली. मोशे हा फक्त देवाचा
‘निवडलेला भक्त’ होता. परंतु येशूख्रिस्त
हा देवाचा ‘एकुलता एक’ पुत्र, आपल्या तारणासाठी, देवाने ह्या धरतीवर पाठवला. मग ख्रिस्त जो आपला तारणारा आहे, त्याच्या नावाने केलेली प्रार्थना देव कधीच नाकारू
शकत नाही. कारण ख्रिस्त ह्याविषयी स्वत:च साक्ष देताना म्हणतो, “पुत्राच्या ठायी
पित्याचा गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन” (योहान; १४:१३).
ह्यास्तव आपण ख्रिस्ताच्या
नावाने सातत्याने स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करणे अगत्याचे आहे. कारण प्रार्थना हि सुख-दु:खाचा आधार, अधंकारात
दिप, असाह्य लोकांचे सहाय्य, निराशितांची आशा, दुर्बळांचे बळ, थकलेल्या मनाचा विसावा, हृदयाची आस आणि दोन मनाचा-जीवाचा संगम असते. म्हणूनच प्रभू
येशू म्हणतो, ‘सातत्याने खचून न जाता, नित्य करावी आपण प्रार्थना’. त्यासाठी ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐकून घे.
१. हे स्वर्गीय पित्या, ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू,
धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांनी देवाच्या प्रेमाचा, मायेचा, क्षमेचा आणि प्रार्थनेचा संदेश जगजाहीर करत असताना त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला व अत्याचाराला धीराने सामोरे जावे व त्यासाठी त्यांना ईश्वरी कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार दूर व्हावा व जे लोक सातत्याने न्यायाची मागणी करत आहेत अशा लोकांच्या विनवणीकडे न्यायधिशांनी लक्ष दयावे व त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे युवक-युवती देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांनी येशू ख्रिस्त हा खरा ‘मार्ग, सत्य आणि जीवन आहे' हे सत्य त्यांच्या जीवनात स्विकारावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ‘जे कुटुंब एकत्र
प्रार्थना करते ते कुटुंब सदैव एकत्र राहते’ आपल्या सुख-दु:खात आपण प्रार्थनेचे सातत्य टिकवून ठेवावे व प्रार्थनेला महत्वाचे स्थान देऊन दररोज एकत्रित प्रार्थना करावी, म्हणून प्रभूकडे कृपा मागूया.
५. हे सर्वशक्तिमान पित्या, जे लोक आजारी, दु:खी-कष्टी आणि सकंटग्रस्त आहेत अशा सर्वांना प्रभूच्या दयेचा आणि मायेचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभूप्रेमाने बहरावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment