Wednesday, 13 July 2016

Reflection for the Homily of Sixteenth Sunday in Ordinary Time (17-07-2016) By Sadrick Dapki.





सामान्यकाळातील सोळावा रविवार

दिनांक: १७/०७/२०१६.
पहिले वाचन: उत्पत्ती : १८:१-१०.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र १:२४-२८.
शुभवर्तमान: लूक: १०:३८-४२.

“मरीयेने निवडलेला वाटा योग्य आहे”



प्रस्तावना:

आज आपण सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना प्रभूच्या सानिध्यात राहून परमेश्वराशी हितगुज साधण्यास आपल्याला पाचारत आहे.
     पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, आब्राहाम त्याच्याघरी आलेल्या तीन पाहुण्यांचे स्वागत करून त्यांची शारीरिक भूक भागवतो. अशा ह्या त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे पाहुणे आनंदित होवून आब्राहामास पुत्रप्राप्तीचे वरदान देतात. दुसऱ्या वाचनात संत पौल स्वत:च्या दु:ख सहनाबद्दल सागंत आहे; आणि हे दु:ख आपल्या जीवाचा एक भाग आहे व हेच आपल्या तारणाप्रती येशूने केले असे तो म्हणतो. तर शुभवर्तमानात, येशू ख्रिस्ताचे मार्था व मरिया ह्यांच्या घरी गेलेल्या भेटीचे वर्णन ऐकावयास मिळते.
येशू ख्रिस्त मरीयेने त्याच्या पायाजवळ बसून साधलेल्या हितगुजाची अधिक प्रशंसा करतो. म्हणून आज ह्या मिस्साबलीत भाग घेत असता, परमेश्वराच्या सानिध्यात आपण सदैव असावे ह्यासाठी कृपा मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पत्ती : १८:१-१०.

आब्राहामाच्या दारासमोर तीन प्रवासी आले तेव्हा आब्राहामाला कळले की, हे नक्कीच देवाकडून आले असावेत म्हणून तो म्हणतो की, ‘ह्या सेवकाकडे काहीवेळ तुम्ही रहा व मी तुम्हास काही खावयास आणतो’. आब्राहामाने पाहुण्यांचे फक्त स्वागतच केले नाही तर त्यांना काय सांगायचे आहे का म्हणून तो त्यांच्याबरोबरच राहिला, त्यांना निघेपर्यंत अब्राहम त्यांच्या सहवासात राहिला.
    आब्राहमास तीन पाहुण्यांची ही भेट, पावित्र्यमय व भाकीत करणारी भेट ठरली. ‘सारा’ च्या मदतीने जे आब्राहामाने जेवण बनवले होते ते खूप जणांसाठी पुरले असते. असे पौष्टिक जेवण बनवून आब्राहामाने जणू त्या तीन पाहुण्यांस मेजवानीच दिली होती.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र १:२४-२८.

     पौलाला येशूचे दर्शन झाल्यानंतर तो ख्रिस्तासाठी मरण स्वीकारण्यास तयार होतो. आजच्या वाचनात मानवाच्या तारणासाठी ख्रिस्ताने जे दु:ख सहन केले त्याचा तो उल्लेख करतो त्याचप्रकारे मंडळीचा जेंव्हा छळ होतो तेव्हा ख्रिस्ताला क्लेश होतो व या क्लेशात सहभागी होण्यास पौल तयार होतो असे समजते. देवाच्या वचनांत देवाची परिपूर्ण इच्छा व योजना प्रकट झाली आहे; हे सत्य इतरांना कळविण्याची सेवामय जबाबदारी देवाने पौलावर सोपविली. ती जबाबदारी पूर्ण करण्यास पौल आतूर झाला होता. ह्यास्तव तो मंडळीचा सेवक झाला.
ख्रिस्तामधील देवाची योजना त्या काळापर्यंत गुप्त ठेवली होती. ती आता ह्या कृपेच्या काळात देवाने प्रगट केली आहे. यहुदी व परराष्ट्रीय एक नवा गट कसे होतील हे रहस्य ख्रिस्त येईपर्यंत गुपित होते. आता सुवार्तेद्वारे देव गौरवी पराराष्ट्रीयांना केवढी संपत्ती देतो हे प्रगट झाले आहे.

शुभवर्तमान: लूक: १०:३८-४२.

     शुभवर्तमानात आपण बघतो की येशू ख्रिस्त हा एक दिवस मार्था व मरिया ह्या दोन बहिणींना भेट देतो. मार्था आदरातिथ्य करण्यास फार उत्सुक होती; तर मरिया शांतपणे येशूचे गोड शब्द तिच्या कानी पडावेत म्हणून त्याच्या पायाजवळ बसली होती. ह्यात मार्थाची येशूचा पाहुणचार कसा करावा ह्यास्तव तारांबळ उडाली कारण तिला एकटीला ते जमेनासे झाले होते. येशुसमोर आपली फजिती होणार ह्याची तिला भ्रांत पडली होती, म्हणून ती मरियेला दोष देत कुरकुर करू लागली.
प्रभू येशूने तिला शांतपणे उत्तर दिले कि, ‘हा जो गोंधळ उडाला होता त्यासाठी ती स्वत:च जबाबदार होती’. प्रत्येक गोष्टीविषयी काळजी करून धावपळ करणे व स्वत:ला त्रास करून घेणे हा मार्थाचा स्वभाव होता. या स्वभावाप्रमाणे ती वागत होती. यामुळे वैतागून तिने आपल्या बहिणीला किंबहुना येशूलाही दोष दिला कारण येशूही तिची चाललेली धावपळ लक्षात घेऊन मरीयेस मदत करण्यास सांगत नव्हता. प्रभू कदाचित म्हणाला असेल, ‘मला साधी भाजी-भाकर चालली असती, इतकी सारी धावपळ करून अशी पकवान्ने करण्याची गरज नव्हती. कशाची गरज आहे याचा विचार कर. विनाकारण डोक्यावरचा भार वाढवू नकोस’. देवाला त्याच्या आदरातिथ्याची नव्हे तर त्याच्या मुल्यांची जोपासना केलेली आवडते असे बहुधा येशूला तिला तेथे सांगायचे होते.

बोधकथा

     एकदा एक जोडपं त्यांच्या खोलीमध्ये बसलं होतं. पती मोबाइलवर ‘गेम्स’ खेळत होता व पत्नी मुलांचे पेपर तपासत होती, कारण ती शिक्षिका होती. पेपर तपासत असता ती सुस्कारे टाकायला लागली, रडायला लागली. ह्यावर पतीने तिला तिच्या रडण्याचे कारण विचारले, त्यावर ती म्हणाली की, ‘मी पहिलीच्या मुलाला ‘माझी इच्छा’ ह्या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला होता. तो वाचता वाचता मला रडू कोसळले’. ‘असा कोणता निबंध आहे ज्याच्याने तुला रडू आवरेनासे झाले’? पतीने विचारले.
त्यावर तिने निबंध वाचण्यास सुरुवात केली. मला एक ‘स्मार्ट फोन’ व्हायचं आहे. कारण माझे आई-वडील हे माझ्या पेक्षा स्मार्ट फोनवर जास्त प्रेम करतात. त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही परंतु स्मार्ट फोनमध्ये ते तासनतास गुंतलेले असतात. माझी काळजी घेण्याचे ते विसरून जातात. जरी माझे आई-वडील महत्वाच्या कामामध्ये गुंतलेले असले तरी एका रिंग मध्येच फोन उचलतात. पण मी रडत जरी असलो तरी माझ्या आवाजाला प्रतिसाद देत नाही. जेव्हा माझे वडील कामाहून घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे स्मार्ट फोनसाठी पुष्कळ वेळ असतो; पण माझ्यासाठी नाही. माझी आई आणि वडील दोघे फोनवर गेम्स खेळतात पण माझ्या बरोबर व्यवस्थित बोलतदेखील नाहीत. म्हणून माझी इच्छा आहे की मी एक ‘स्मार्ट फोन’ बनावं.
     निबंध संपल्यावर पती धीर देत म्हणाला आता रडू नकोस आपण त्या मुलाच्या आई-वडिलांना भेटून ह्या बद्दल विचारूया. पण हा मुलगा कोण आहे? त्यावर ती म्हणाली, ‘तो आपलाच मुलगा आहे’. दोघांना रडू आवरता आले नाही व ते अमर्याद रडू  लागले.  

मनन चिंतन

     आपण जीवनात प्रथम कशास प्राधान्य देतो हे महत्वाचे आहे. जीवनात दुसऱ्यासाठी वेळ देणे, त्यांचे जीवन घडवणे त्यांचे ऐकणे, त्यांची सेवा करणे फार महत्वाचे आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या घरी आर्थिक भूक भागवण्यासाठी जात नाही, तर त्याची आध्यात्मिक व मानसिक भूक भागवण्यासाठी जातो. काहीतरी बोलावं, गप्पा गोष्टी असे काही तरी उद्देश असतात जे मानवाला भावतात.
     कथा जी आपण ऐकली हि आपल्या रोजच्या जीवनातील आहे. आई-वडील संपूर्ण दिवस कामामध्ये, मुलगा शाळेमध्ये, शाळेतून आल्यावर शिकवणुकीचे क्लासेस आणि त्यामुळे रात्रीचा थोडा-फार वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालावयास भेटतो. जर तो पण वेळ आपण वाया घालवला, तर त्याला चांगले संस्कार कसे काय देऊ शकतो?. त्या मुलालासुद्धा त्यांच्या आई-वडीलांसमवेत राहायला वाटत असेल, काही तरी सांगावस वाटत असेल, काहीतरी ऐकावसं वाटत असेल अशा ह्या भावना जर प्रगट केल्या नाहीत तर माणूस माणसापासून दूर जाईल.
     शुभवर्तमानात आपण बघतो की मार्था हि येशुला सोडून कामामध्ये मग्न झाली आहे आणि तिला असे वाटते की तिच्या बहिणीने येऊन तिला मदत करावी. येशू ख्रिस्त असे म्हणत नाही की जे काम मार्था करत आहे त्यास किंमत किंवा महत्व नाही, परंतु येशू म्हणतो की शारीरिक आदरातिथ्यापेक्षा, धार्मिक आदरातिथ्य फार महत्वाचे आहे. मी तुम्हास काही तरी सांगावयास आलो आहे. जर आपण ९ वा अध्याय वाचला तर आपणास कळून येईल की स्वर्गीय पित्याकडे जाण्याअगोदर प्रथम आपण जवळच्या लोकांना भेट द्यावी म्हणून तो मार्था व मरिया ह्यांच्याकडे आला असावा. येशूला काहीतरी सांगावयाचे होते, बोलावयाचे होते आपली इच्छा व्यक्त करायची होती, म्हणून तो तिथे आला होता. माझे त्यांनी ऐकावे असा त्याचा उद्देश असेल म्हणूनच तो म्हणतो की, ‘मरीयेने जो वाटा निवडला आहे तो बरोबर आहे आणि तो तिच्याकडून हिरावून घेतला जाणार नाही’. ‘तू तुझे काम सोडून माझ्याकडे ये आणि माझे ऐक, कारण मी आता स्वर्गीय पित्याकडे जाणार आहे’.
     जो देवाच्या नावाने येतो त्याचे बोलणे, ऐकणे फार गरजेचे आहे कारण तो विशेष असा संदेश घेऊन येतो. जेव्हा आपण, जो देवाच्या नावाने येतो त्यास स्वीकारण्यास समर्थ असतो तेव्हाच आपण देवाच्या रहस्यामध्ये जगू शकतो असे दुसऱ्या वाचनात संत पौलाने लिहिले आहे. संत पौल हे रहस्य आपल्या ख्रिस्ती धर्माचा मुलभूत पाया आहे असे मानतो.
     देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्विकार करणेच खरे आदरातिथ्य होय, जणू काही येशू ख्रिस्त स्वत:च त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. जर आपण येशू ख्रिस्ताला दुसऱ्यामध्ये ओळखलं तर आपलंदेखील आदरातिथ्य आपोआप होईल. म्हणून आज एकत्रित जमले असताना देवाकडे विशेष प्रार्थना करूया, जेणेकरून आपण दुसऱ्यांमध्ये ख्रिस्ताला पाहू. तसेच त्यांचा स्विकार करून, त्यांच्या अडी-अडचणींत  त्यांना आपल्या परीने मदत कशी करता येईल हे जाणुन घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझी सेवा करावयास आम्हाला सहाय्य कर.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. उत्तम ख्रिस्ती ह्या नात्याने आपणास एक दुसऱ्यांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार करण्यास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. यंदाच्या वर्षी परमेश्वराने आपल्यावर चांगली पर्जन्यवृष्टी केली आहे; त्याबद्ल आपण परमेश्वराचे आभार मानत असता, जेथे वाजवीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होऊन पुराचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा ठिकाणच्या लोकांचे परमेश्वराने संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या आशिर्वादाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगली नोकरी मिळावी व त्याचा संसार सुखाने चालावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.





      


1 comment: