Wednesday 27 July 2016





 Reflection for the Homily of Eighteenth Sunday in Ordinary Time (31-07-2016) By Valerian Patil.





सामान्यकाळातील अठरावा रविवार

दिनांक: ३१/०७/२०१६.
पहिले वाचन: उपदेशक १:२;२:२१-२३.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-५; ९-११.
शुभवर्तमान: लुक १२:१३-२१.


"हे निर्बुद्धी ह्या रात्री तुझ्याजवळून तुझा जीव मागितला जाईल"



प्रस्तावना:

        आज देऊळमाता सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहे. आजचा विषय ‘सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका तर स्वर्गीय वैभव मिळविण्याचा प्रयत्न करा' असा आहे. (तसेच आज आपण पालकदिन साजरा करीत आहोत).
आजच्या पहिल्या वाचनात उपदेशक म्हणतो, ‘सर्व काही व्यर्थ आहे’. कारण माणूस एवढी मेहनत सुखासाठी करतो; तरी त्याला सुख भेटत नाही. संत पौल कलस्सैकरांस पाठवलेल्या पत्रात, स्वर्गातील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा व सर्व लोभी गोष्टींपासून दूर राहण्यास बोध करीत आहे. कारण ख्रिस्तच आपले जीवन आहे असे तो म्हणतो. तसेच संत लूककृत शुभवर्तमानात आपल्याला लोभामध्ये बुडालेल्या एका धनवान व्यक्तीचा दाखला ऐकावयास मिळतो.
     जेथे आपली संपत्ती असते तेथे आपले हृद्य असते. आपली संपत्ती येशू हीच होय. म्हणून ह्या मिस्साबलीदानात ऐहिक गोष्टींच्या लोभात न पडता येशूवर आपले लक्ष केंद्रित करण्यास परमेश्वराची कृपा मागुया.(आपल्या माता-पित्यांना परमेश्वराने सदोदित आशिर्वाद द्यावा व त्याच्या मनातील इच्छा पूर्ण कराव्यात म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया).

सम्यक विवरण:

पहिले वाचन: उपदेशक १:२;२:२१-२३.

उपदेशक ह्या पुस्तकात ‘आपण का जगतो’ ह्याचा अभ्यास केलेला आहे. उपदेशक ज्ञान, मनोरंजन, व्यवसाय, सत्ता, धन, धर्म, व इतर गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतो. या सर्व गोष्टींना विशिष्ट प्रसंगी किंवा वेळी काय महत्व आहे व त्या कशा उपयोगी आहेत; जर देव मानवाच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असेल तरच ह्या गोष्टींना टिकणारे मोल आहे. देवाविषयीचा आदर, देवाचा सन्मान व देवाची सेवा करण्यासाठी वाहिलेले आयुष्य यामुळेच एखाद्याच्या जीवनाचे सार्थक होते. देवावाचून सारे व्यर्थच आहे असे उपदेशक म्हणतो.
      या पुस्तकाचा लेखक शलमोन स्वत:ला म्हणतो, ‘सर्वकाही व्यर्थ आहे’. तो जे घडत आहे त्याकडे पाहून विचार करतो व या निराशेच्या उद्गारांनी तो सुरुवात करतो. "व्यर्थ" याचा अर्थ वाफ-समान, क्षणभंगुर, आयुष्यभर परिश्रम केल्यावर काही शिल्लक राहत नाही असा होतो.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-५; ९-११.

स्वर्गीय गोष्टींकडे मन लावा. विश्वासणारे ख्रिस्ताबरोबर मेले आहेत व ख्रिस्ताबरोबर जिवंत झाले आहेत; यास्तव ही सत्य स्थिती लक्षात ठेवून आपला जीवनक्रम बदला. आपले लक्ष आता स्वर्गात असलेल्या येशू ख्रिस्तावर केंद्रित करा. तो देवाच्या उजवीकडे आपला प्रमुख याजक आहे. हा त्याचा सर्वोच्च अधिकार आहे. त्याने विरोधी सत्तेवर व मरणावर विजय मिळविला आहे. स्वर्गीय शाही-सिंहासनाच्या उजव्या बाजूस आपला महापुरोहित विराजमान झालेला आहे. (हिब्रू ८:१) वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका: पृथ्वीवरील ज्या क्षणभंगुर गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न आपण करतो त्यासाठी दुष्टपणा आणि लबाडी केली जाते. ज्या दिसत नाहीत व सर्वकाळ टिकणाऱ्या आहेत त्या गोष्टींवर मन केंद्रित करा. आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष पुरवितो. कारण दृश्य गोष्टी क्षणभंगुर असतात आणि अदृश्य गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या असतात (२ करिंथ ४:१८).
म्हणून तुम्ही ख्रिस्तावर आपले लक्ष खिळवा. ख्रिस्त आज आपल्याला दिसत नाही, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जगतो. पृथ्वीवरील सर्वच गोष्टी वाईट आहेत असे नव्हे, त्या क्षणभंगुर आहेत. आत्मिक जीवनाकरीता आता त्यांचा काही उपयोग नाही हे लक्षात घ्या. आपले जीवन ख्रिस्तामध्ये व आपले लक्ष ख्रिस्तावर केंद्रित केले पाहिजे. या जगातील गोष्टी क्षणभंगुर व व्यर्थ आहेत. देवाच्या गोष्टी सार्वकालिक व सार्थ असतात त्या पवित्र असतात. त्याच्यावर आपले मन केंद्रित करणे स्वर्गीय लाभाचे आहे.

शुभवर्तमान: लुक १२:१३-२१.

“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा”. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. तक्रार घेऊन आलेल्या मनुष्याला प्रभूने हा इशारा दिला; ख्रिस्त असल्या तक्रारी सोडविण्यास आला नव्हता. या प्रसंगावरून ख्रिस्ताने वरील इशारा दिला. लोभ तुम्हांला देवावरील विश्वासापासून परावृत्त करील. देवामुळे नव्हे, तर धनाने आपले भले होईल हे तत्वज्ञान बाळगणारा दहाच्या मागे लागलेला आहे. तो तृप्त होत नाही. ‘आणखी, अधिक साठवू’ हाच विचार त्याच्या मनात घोळत असतो.
     धनावर त्याचे फार प्रेम असते, तो स्वत:साठी धनसंचय करतो. त्याचा देवावरील विश्वास फारच कमी असतो. जे लोक जगाच्या दृष्टीने दरिद्री आहे त्यांनाच देवाने निवडले आहे, का? तर ते श्रद्धेने श्रीमंत व्हावेत व देवावर प्रेम करणाऱ्या लोकांना, त्याने देऊ केलेल्या राज्याचे ते वारस व्हावेत (याकोब २:५).
     तसेच शुभवर्तमनात धनवान व त्याच्या संपत्तीवर लोभ असणाऱ्या व्यक्तीचा येशू दाखला सांगतो. तो धनवान, ‘देवाने मला इतके पिक दिले’! असे न म्हणता ‘माझे उत्पन्न, मी आपले धान्य, मी आपल्या जीवाला म्हणेन’ हे शब्द वापरतो. त्याला गरीबांची आठवण होत नाही. त्याने त्याच्या उत्पन्नकर्त्याला आपल्या योजनेने धिक्कारले. देवाने त्याला मूर्ख म्हटले. विश्वासणाऱ्यांनो धन वाढवत बसने हे पाप आहे.

बोधकथा:

एकदा एक माणूस राजाकडे आला व म्हणाला, ‘महाराज, मी खूप अडचणीत आहे’. मला तीन मुले आहे परंतु त्याचा सांभाळ मी करू शकत नाही. कारण मला काही काम नाही. तरी कृपाकरून मला काही काम द्या. तेव्हा राजाला त्याची द्या आली व राजाने त्याला काम दिले. जेंव्हा त्याला काम मिळाले, त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या, घरात आनंद झाला.
     परंतू ह्या माणसाच्या डोक्यात आता निरनिराळे विचार येऊ लागले. त्याला श्रीमंत होण्याचा लोभ झाला. त्याला राजासारखे व्हावे असे वाटले व तशी तो स्वप्नही पाहु लागला. स्वप्न पाहता पाहता, तो ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने राजवाड्यात चोरी करण्यास सुरुवात केली व चोरी केलेल्या सर्व गोष्टी घरामध्ये साठवून ठेवू लागला. उदा. सोने, चांदी इ. काही महिन्यानंतर सैनिकांनी त्याला पकडले व राजाच्या स्वाधीन केले. तेव्हा राजाने त्याला विचारले, ‘तुला मी सर्व काही दिले, माझ्या राजवाड्यात कामही दिले, तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या सर्व गरजा पुरवल्या; मग तू चोरी का केलीस’? तेंव्हा त्याने उत्तर दिले, ‘महाराज मला तुमच्या संपत्तीचा मोह लागला होता. मला तुमच्यासारखे व्हायचे होते. मी लोभामध्ये एवढा बुडालो की, मी चोरी करू लागलो’.

मनन चिंतन:

     प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आपण सर्वांनी देवविषयक बाबतीत धनवान बनावे म्हणून मूर्ख धनवानाचा दाखला देऊन शिकवण देत आहे. ह्या जगातील वैभव, संपती, सुख आणि सौंदर्य आपल्या सर्वांनाच मोहित करून आकर्षित करीत असते. म्हणूनच बहुतेक व्यक्ती जागतिक वैभव व सुख मिळविण्यासाठी खूप कष्ट उपसतात. अनेकदा स्वार्थी वृत्तीने, दुष्टपणा आणि लबाडी करून गरीब व असाह्य माणसांची फसवणूक केली जाते. धन-दौलतीलाच देव मानून अनेक जण अत्याचार व अन्याय करून संपत्ती बळकावतात. या विभागात फार महत्वाचे धडे दिलेले आहेत. आपल्या वतनाच्या भांडणात ख्रिस्ताने हस्तक्षेप करावा अशी ह्या माणसाची इच्छा होती. त्याची वृत्ती ख्रिस्ताला जरी माहित होती, तरी वरवर तो न्याय मागत होता. लोभ व  जगातील संपत्तीवरील भिस्त त्याच्या मनात होती. सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. एखाद्या  गोष्टीबद्दल लोभ सुटणे हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. संपत्तीमुळे आपण सुखी होऊ अशी कल्पना करणारे शेवटी मूर्ख ठरतात. या जगातील गोष्टी काही काळ शारिरिक सुख देतात तरी त्यांच्याद्वारे अत:करणाला शांती मिळत नाही.
     ख्रिस्ताने हा दाखला सांगितला कारण जगात शारीरिक सुखामागे लागणारे मरणानंतर दु:ख भोगतात असे त्याला पटवून सांगायचे होते. तेव्हा या धनवान माणसाने काय केले नाही. त्याने देवाचे आभार मानले नाहीत, त्याने आपल्या सुस्थितीचा विचार केला नाही. त्याने उलट भविष्य काळाचे नियंत्रण मीच करणार आहे अशी कल्पना केली. जगातल्या गोष्टींनी हवे ते मिळते असे त्याने मानले. तो स्वत:साठी द्रव्याचा संचय करण्यासाठी आपले आयुष्य गुंतवीत होता. देवाची सेवा करणाऱ्या बाबतीत तो दरिद्री होता.
     धन-संपत्ती, चांगली आहे ती सर्वांना हवी-हवीशी वाटते, परंतु त्याचा लोभ करणे हे वाईट आहे. आपण आपल्या जीवनात कोणत्यातरी गोष्टींचा लोभ करतो व ह्यामुळे आपण देवापासून दूर जातो. आपण आपल्या घरातील व्यक्तींवर ह्या लोभामुळे प्रेम करत नाही. जी व्यक्ती लोभाच्या मागे जाते त्याचा शेवट वाईट होतो. तो दुसऱ्याची फसवणूक करून संपत्ती व धनाच्या उपयोग करण्यासाठी तो राहत नाही.
     आज येशू ख्रिस्त आपल्याल सावधान आणि इशारा देता आहे, ‘सांभाळा सर्व लोभापासून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जीवन जगण्यासाठी देवाने मदत करावी व सर्व लोभापासून दूर ठेवावे. त्याने आपले रक्षण करावे म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो,आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, सर्व व्रतस्थ व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाद्वारे येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. युवकांना नोकऱ्या मिळाव्यात गरजवंतांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, आजाऱ्यांचा आजार दूर व्हावा, भरकटलेल्यांना मार्ग सापडावा, व्यसनाधीन झालेल्यांची व्यसनातून मुक्तता व्हावी तसेच सर्व लोभापासून आपला सांभाळ केला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. यंदाच्या वर्षात भरपूर पाउस मिळावा, शेतकऱ्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात आपण पालक दिन साजरा करत असता आपल्या माता-पित्यांना परमेश्वराने आशीर्वादित करून त्यांना दीर्घायुषी करावे आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या म्हातारपणाची काठी व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment