Reflection for the Homily of 5th Sunday in Ordinary Time (05-02-2017) by Br. Glen Fernandes.
सामान्य
काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०५/०२/२०१७.
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र २:१-५.
शुभवर्तमान: मत्तय ५:१३-१६.
“तुम्ही पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश आहात”
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील पाचवा रविवार साजरा करीत
आहोत. जीवनात सदैव सत्कर्म करून इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्यासाठी आजची उपासना
आपल्याला बोलावत आहे.
यशया पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात उपवासाचे
महत्व पटवून दिले गेले आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास आपला विश्वास
प्रभूमध्ये दृढ ठेवण्यास आवाहन देत आहे. देवाच्या सामर्थ्यावर अढळ श्रद्धा
ठेवण्यास तो प्रोत्साहान देत आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशु पर्वतावरील दिलेल्या
प्रवचनात शिष्यांना मीठ व प्रकाश अशा उपमा देत आहे.
ख्रिस्ती जीवन म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाचे
ओळखपत्र काय? मी खरोखर ख्रिस्ती मूल्यावर जीवन जगतो का? ह्या पवित्र मिस्सा
बलिदानात सहभागी होता असताना आपल्या पापांची आठवण करूया व दैवी दयेसाठी
परमेश्वराची याचना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.
यशया प्रवक्ता आपले नैतिक जीवन अढळ राहण्यासाठी
चांगुलपणा अंगीकारण्यासाठी बोध करत आहे. चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहन करण्यासाठी
तो उपवासाचे महत्व सांगत आहे. उपवासाचे योग्य पालन म्हणून अन्न भुकेल्यांस वाटायला
हवे; लाचारांस व निराश्रीतांस घरी न्यायला हवे असे तो पटवून देत आहे.
उपवसाबाद्द्ल प्रबोधन करताना यशया सांगतो जर
आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगलो तर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रकाश
प्रभातीप्रमाणे फाकेल, आपल्या जखमा लवकर भरतील, आपली धार्मिकता आपल्या पुढे चालेल
व परमेश्वराचा गौरव आपला पाठीराखा होईल. ह्या शब्दांत प्रभूमय जीवन जगण्यास यशया
सांगत आहे.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र
२:१-५.
ह्या उताऱ्यात संत पौल वधस्तंभावरील ख्रिस्ताविषयी
बोध करत आहे. तसेच आपला विश्वास मनुष्याच्या बुद्धीमत्तेवर नव्हे, तर देवाच्या
सामर्थ्यावर उभारण्यास सांगतो. देवाची कृपा हि कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी
पुरेशी असते. संत पौलाला त्याच्या जीवनात नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.
परंतु तरीही संत पौल नम्रतेचा आदर्श त्याच्या शब्दांनी सर्वांसमोर पत्राद्वारे
व्यक्त करतो. संत पौल लोकांसमोर नम्र होऊन सांगतो कि, आपले तारण हे परमेश्वराच्या
कृपेने होते. तसेच संत पौल लीनतेचे उदाहरण म्हणून वधस्तंभावर खिळलेल्या येशू
ख्रिस्ताबद्दल लोकांस मार्गदर्शन करतो. व त्यांचा विश्वास दृढ व मजबूत ठेवून
देवाच्या वचनावर जीवन आधारण्यास बोध करतो.
शुभवर्तमान:
येशू पर्वतावरील प्रवचनात लोकांना जीवनावश्यक उपदेश
करीत आहे. समाजात अन्यायाला किळस आलेल्या दारिद्र्याला वैतागलेल्या परंतु
प्रभूच्या वचनांसाठी आतुर झालेल्या जनसमुहाला प्रभू ‘मीठ’ व ‘प्रकाश’ ह्या दोन
उपमा देत आहे. मत्तय लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त ह्या दोन्ही उपमांचा वापर
करून सांगतो कि, ‘तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो
खारटपणा त्याला कशाने आणता येईल’? पुढे ख्रिस्त म्हणतो, ‘डोंगरावर वसलेले नगर लपू
शकत नाही. दिवा लावून मापाखालाई ठेवीत नसतात तर दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो
घरातल्या सर्वाना प्रकाश देतो’.
बोधकथा:
पारसी लोक जेव्हा ईराण व पर्शिया देशामधून
भारतात आले तेव्हा त्यांनी भारतातील राजाला विनंती केली कि, ‘हे महाराज आम्ही संख्येने
जरी कमी असलो तरी खूप मेहनती व विश्वासू आहोत, म्हणून तुमच्या साम्राज्यात
आम्हांला समाविष्ट करा. राजा उत्तरला, ‘मी तुम्हाला समाविष्ट केले असते परंतु
माझ्या साम्राज्यात सर्व लोक अगोदरच समाविष्ट आहेत; माझे साम्राज्य म्हणजे दुधाने
भरलेले भांडे आहे, तर तुम्हांला कुठे स्थान देऊ?’ त्या लोकांच्या प्रमुखाने उत्तर
दिले, ‘हे राजा जरी तुमचे साम्राज्य भरलेले आहे तरी आम्हांला थोडेसे स्थान द्या ,
दुधाने भरलेल्या भांड्यात आम्ही साखर म्हणून राहू व आपल्या साम्राज्यासाठी झटू’.
अशा प्रकारे पारसी लोकांचा भारतात प्रवेश झाला. आज जेथे जेथे पारसी लोक आहेत ते
धन्य; ते देशाच्या उन्नतीसाठी झटत आहेत.
२. एका राजाला तीन मुली होत्या. आपल्या मुलीचे प्रेम जाणून
घेण्यासाठी त्याने त्यांची परीक्षा घेतली. मोठी म्हणाली, ‘माझे तुमच्यावर जगाच्या
सर्व सोने, हिरे, मोती यापेक्षाही जास्त प्रेम आहे.’ दुसरी म्हणाली, ‘जगातील सर्व
हुशारी व ज्ञानापेक्षा माझं तुमच्यावर अधिक प्रेम आहे.’ लहान मुलगी म्हणाली, ‘माझं
तुमच्यावर मीठप्रीय तसे प्रेम आहे.’ राजा लहान मुलीचे उत्तर ऐकून रागावला व तिला
हद्दपार करण्याचे व तिचे तोंड न पाहण्याचे आदेश दिले. प्रधानाने जेव्हा हि गोष्ट
ऐकली, तेव्हा त्याने राजाला आपली चूक कळवून देण्यासाठी राजाच्या सर्व मेजवानीतील
मिठ न टाकण्याची आज्ञा दिली. जेव्हा राजाने जेवण चाखले तेव्हा तो विस्मयीत झाला व
स्पष्टीकरण विचारल्यावर प्रधानाने राजाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. राजाला
आपल्या मुलीची खरी ओळख पटली व तिच्या कृतीची जाण झाली. मीठ जरी साधारण व कमी किमतीचे
असले तरी, मिठाशिवाय जेवणाला अर्थ नाही. प्रभू शिष्यांना मिठ व प्रकाश म्हणून
त्यांना नवी जबाबदारी देतो कि, ‘दुसऱ्याच्या जीवनाला रुचकरपणा आणा व त्यांचे
अंधारमय जीवन प्रकाशीत करा’.
मनन चिंतन:
आपण कोण आहोत कोठून आलो आहोत आपण कोठे जाणार
आहोत हे तीन प्रश्न मानवापुढे अगदी प्राचीन काळापासून पुन्हा पुन्हा उभे राहिले
आहेत. फक्त विचारवंत व्यक्तींनाच नाही, तर संस्थाना समाजांना आणि देशांना देखील
ह्या तीन मुलभूत मानवी प्रश्नांचा वेळोवेळी सामना करावा लागला आहे.
हल्लीच्या काळात
मात्र ‘मी कोण आहे?’ ह्या प्रश्नांचे उत्तर केवळ उच्च वैचारिक पातळीवर नाही, तर
रोजच्या सामान्य व्यवहारात अनेकदा द्यावं लागते. निवडणुकीत मत नोंदवायला, बँकेत
खाते उघडायला, गाडीसाठी कर्ज काढायला, रेल्वेचे आरक्षण करायला, आपण कोठेही काहीही
करायला गेलो तरी मी कोण आहे ह्याचा दाखला सादर करावा लागतो. मग प्रश्न असा उभा
राहतो कि, ख्रिस्ती म्हणजे कोण? ख्रिस्ती लोकांचे ओळखपत्र काय आहे? ख्रिस्ती
कोणाला म्हणायचे? विधर्मी आणि ख्रिस्ती ह्यात काय फरक आहे?
येरुशलेमाच्या मंदिरात परमेश्वराची पूजा-अर्चा
घेत असताना, देवाविषयी ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय पर्वतावर येशू जवळ आला होता.
येशूने फक्त शब्दाने उपदेशच केला नाही तर त्यांना नवीन ओळखपत्रही दिले. नाव व
सन्मान दिला. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रभूने त्यांना मीठ व
प्रकाश ह्यांची उपमा दिली. मीठ व प्रकाश ह्या दोन्ही आपल्याला दररोजच्या जीवनात
महत्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे मीठ आणि प्रकाश उपयोगी वस्तू आहेत त्याप्रमाणे
आपल्या जीवनाची सुद्धा उपयोगिता असावी. जर मिठाला खारटपणाच नसेल तर ते पायाखाली
वाया जाते. आपल्या जीवनाला, राहणीमानाला अर्थ नसेल तर आपलेही जीवन व्यर्थ ठरते.
ख्रिस्त आज प्रत्येक मनुष्याला दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश, रुची किंवा चव
आणण्यासाठी पाचारण करीत आहे. जिथे दु:ख आहे, तिथे आनंद; ज्यांच्या जीवनात निबिड
अंधार आहे, तिथे प्रकाशाचा दिप व गरिबांच्या जीवनात रुचकरपणा टिकवून ठेवण्यासाठी
ह्या पाचारणाचा उपयोग करायला हवा. येशूचे ठाम अनुयायी बनण्यास जीवनात मीठ व प्रकाश
बनायला हवे.
एके काळी
ख्रिस्ती शाळा, कॉलेज आणि दवाखाने ह्या पथदर्शक संस्था होत्या. त्यांचे कार्य
पाहून त्यांच्या सेवाभावाने प्रेरित होऊन इतर धर्मांतील समाजसुधारकांनी अशा
प्रकारच्या संस्था उभारल्या. ख्रिस्ती लोक जनसेवा करतात ती प्रभू सेवा समजून करतात
असे आपण भूतकाळात म्हणत असू आणि तेही काहीशा अभिमानानेच. पण तेच आजच्या काळात
म्हणण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. आपल्यापेक्षा अतिशय चांगल्या दर्जाची सेवा
ख्रिस्तीतर लोक आणि संस्था करत असल्याचे आपण सभोवती पाहतो.
आपल्याला ख्रिस्तासारखे व्हायचे असेल तर ख्रिस्त कसा होता
हे आपल्याला आधी पूर्णपणे माहित असले पाहिजे. ख्रिस्त आपल्या अंतरंगातून प्रकट
झाला पाहिजे. म्हणून खिस्ती जीवनात ख्रिस्ती सेवेस आपण अग्रक्रम दिला पाहिजे.
प्रत्येक कामात ख्रिस्ताला पुढे स्थान दिले पाहिजे. ख्रिस्त धर्म काय आहे? त्याची
मुलतत्वे काय आहेत? हे आपण जाणून घेतले पाहिजे.
आपल्या धर्माची मुल्ये इतर धर्मांहून निराळी
आहेत. तसेच आपल्या प्रभूने दिलेल्या आज्ञेचे पालन करीत राहायचे असेल आणि
ख्रिस्ताची लोकांना ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले
पहिजेत आणि ते आपण सर्वांनी केले पाहिजे.
येशू ख्रिस्त त्याच्या प्रकाशात आपणा सर्वांना
एकत्र करून घेतो व आपणास प्रती-ख्रिस्त होण्यास पाचारण करतो. आपल्या व
दुसऱ्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्यासाठी सत्कृत्ये करावी लागतात तरच
ख्रिस्ताप्रमाणे आपण सुद्धा जगाचे प्रकाश होऊ. येशूच्या अनुयायांनी प्रथम
स्वतःच्या जीवनातील अंधकार दूर करायला हवा. कदाचित आपणास फार मोठा प्रकाश होणे
शक्य नाही पण मिणमिणता प्रकाश होता येते. म्हणूनच जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश न
विझविता; आपल्या छोट्याश्या प्रकाशाने इतरांना साथ देऊन त्यांच्या जीवनात तेजमय व
आनंदमय प्रकाश झळकवण्यासाठी मदत करावी; हीच गरज आजच्या जगाची व समाजाची आहे हे आपण
समजून घेऊया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो द्या कर
आणि आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ
यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवीदयेचा अनुभव
घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने
स्पर्श करावा, त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने
दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले
आहेत त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून
जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या
समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व छळ सहन करावा लागत आहे, अशा सर्व
लोकांना त्यांच्यावर होत असलेला अन्याय व छळ सहन करण्यास प्रभूने शक्ती व सामर्थ्य
प्रदान करावे तसेच जुलूम करणाऱ्यांस क्षमा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगावे;
आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे आणि उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची
सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक
हेतूंसाठी प्रार्थना करूया.