Monday, 27 February 2017

Reflection for the Homily of Ash Wednesday (01-03-2017) by Br. Amit D’Britto



राखेचा बुधवार

दिनांक: ०१/०३/२०१७.
पहिले वाचन: योएल २:१२-१८.
दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ५:२०-६:२.
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६,१६-१८.





मानवा, तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील


प्रस्तावना:
आज आपण राखेचा बुधवार साजरा करत आहोत. हा दिवस ख्रिस्तसभेत खूप महत्वाचा मानला जातो. कारण आजपासून आपण प्रायश्चित काळास सुरवात करत आहोत. आजची उपासना आपल्याला आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आमंत्रित करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात योग्य पश्चातापासाठी लागणारा दानधर्म, उपवास व प्रार्थना कशी करावी ह्याचे वर्णन केले आहे.
देवाने आपल्याला हे चाळीस दिवस त्याच्या अधिक जवळ येण्यासाठी व जास्तीत जास्त प्रार्थना दानधर्म व अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे ह्या चाळीस दिवसाची सुरवात आपण योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न करूया.
 ह्या प्रायश्चित काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा व शक्ती ह्या मिस्साबलिदानात परमेश्वराकडे मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: योएल २:१२-१८.

संदेष्टा योएल ह्याने ख्रिस्तपूर्व ४०० कालखंडात हे लेखन केलेले असावे. त्याच्या पुस्तकात अनेकदा मंदिराचा संदर्भ येतो, म्हणजेच मंदिराची पुनर्बांधणी त्याकाळी पूर्ण झाली असावी. शासन करणारा ‘प्रभूचा दिवस’ उगवेल हि त्याच्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
आजच्या वाचनात संदेष्ट्याने पश्चाताप करण्याचे आवाहन दिव्य संदेशातून केले आहे. संदेष्ट्याने आरंभीच मेंढ्याच्या शिंगाची तुतारी फुंकून सर्व उपासकांना मोठ्या उपवासासाठी पाचारण केले आहे. संदेष्टा लोकांना विलाप, शोक आणि उपवास करण्याचे त्रिविध आवाहन करत आहे; ते सर्व येथे या दिव्य पाचारणात एकवटले आहे. तसेच संदेष्ट्याने मनःपूर्वक पश्चाताप करण्याचे अगत्य, स्पष्टपणे सांगितले आहे. आध्यात्मिकता आत व बाहेर एकसारखी असावी हाच त्याचा आग्रह आहे.
योएलने ‘परत - फिरा’ असे आवाहन केले आहे कारण आपला देव हा कृपाळू, प्रेमळ व कनवाळू आहे. यासाठी आपण सतत देवाशी एकनिष्ठ असावे.  

दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ५:२०-६:२.

मानवाचा देवाशी समेट व्हावा हाच पौलाच्या सेवाकार्याचा हेतू आहे. देवाला माणवाची सर्वात जास्त कळवळा आहे. ख्रिस्ताचा वकील या नात्याने पौल जगातील सर्वच माणसांना हे कळकळीचे आवाहन करतो. आपण सर्व येशूचे दूत आहोत, म्हणून तोच आमच्याद्वारे इतरांनी देवाबरोबर समेट करावा असे आवाहन करत आहे. संत पौल करिंथकरांना येशूविषयी असे सांगतो कि, ख्रिस्ताला पापार्पण असे केले; म्हणजेच आमच्या पापांचा परिणाम त्याला भोगायला लावला.
तसेच संत पौल वाचकांना आवर्जून सांगतो, “तुम्ही देवाची कृपा व्यर्थ स्वीकारू नये”, व त्यांना, “आताच समय अनुकूल आहे” असे स्मरण करून देतो.

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६,१६-१८.

शुभवर्तमानामध्ये आपल्याला दान, धर्म व उपवास ह्या यहुदी धर्मातील तीन मध्यवर्ती सूत्रावर प्रभू येशू शिकवणूक देत आहे. हे सर्व येशूच्या शिष्यांना व आपणा सर्वांना लागू असल्याचे गृहीत धरले जाते. ह्या वाचनात आपण हे सर्व ‘करावे’ किंवा ‘का करू नये’ ह प्रश्न नसून ते ‘कसे’ व ‘का करावे’ हा महत्वाचा मुद्दा आहे.
आपण दानधर्म व उपवास करत असतांना प्रतिफळ मिळवण्याच्या हेतूने करू नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करू नये. तसेच प्रार्थना करताना निरर्थक बडबड न करता शांतपणे व एकांतात प्रार्थना करावी. तसेच आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा तो लोकांना न दाखवता एकांतात वास करणाऱ्या देवाला दिसला पाहिजे; म्हणजे आपला अदृश्य पिता आपणास उघडपणे त्याचे प्रतिफळ देईल. असे आजचा हा प्रस्तुत प्रतिपादन करत आहे.

बोधकथा :

एकदा विकी हा आपल्या आजोबा सोबत बागेत फिरत होता. फिरत असताना आजोबा विकीला समाजात होत असलेल्या अत्याचार व हिंसा ह्याविषयी सांगत होते. तेव्हा विकी आजोबांना प्रश्न विचारतो कि, “तुम्हाला ह्या हिंसा व अत्याचाराबद्दल काय वाटते?” तेव्हा आजोबा उत्तरतो, “मला असे वाटते कि, माझ्या हृदयात दोन वाघ भांडण करत आहेत. त्यामधील एक वाघ हा रागीट, खुन्नसी आणि हिंसक आहे; तर दुसरा वाघ हा प्रेमळ क्षमाक्षील आणि दयाळू आहे.” विकी परत विचारतो, “त्यामधील कोणता वाघ यशस्वी ठरेल.” आजोबा म्हणतो, “ज्या वाघाला मी अधिक प्रोस्ताहित करतो तोच यशस्वी होईल.”
प्रभू येशू म्हणतो, “आपल्या शत्रूवर प्रेम करा व त्यांना क्षमा करा.” तर ह्या उपवास काळात आपल्या हृदयातील प्रेमळ व दयाळू वाघाला अधिक प्रोस्ताहित करा व आपल्या सर्व दुर्गुनांवर मात करण्याचा प्रयत्न करा कारण हे यश आपल्या वरच अवलंबून आहे.
 
मनन चिंतन:

प्रायश्चित काळ किंवा उपवास काळाची सुरवात राखेच्या बुधवारी, राख कपाळावर फासून होते. हा चाळीस दिवसाचा आध्यात्मिक प्रवास आहे व तो पुनरुत्थानाच्या दिवशी समाप्त होतो. ह्या चाळीस दिवसाच्या कालावधीत ख्रिस्तसभा आपल्याला योग्य असा वेळ देऊन आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूकडे परत येण्यास संधी देत असते. येशूने सुद्धा ४० दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इथेच आहे, या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व पुनरुत्थानाची तयारी करत असतो.
कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंत:करणातून करायच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्यचिन्ह आहे. आज राखेला आशीर्वाद देऊन ती प्रत्येकाच्या कपाळावर फसली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू पापी आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”(उत्पती ३:१९), किंवा पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात. खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंस आणि नश्वरता! परंतु पास्काच्या (इस्टर) अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनाचं प्रतिक मानले गेलेले आहे.
राख हि आपल्याला, मानवी जीवन हे मर्यादित आहे ह्याची आठवण करून देते. म्हणूनच प्रायश्चित काळ आपल्याला तीन नाते बळकट करण्यास आमंत्रित करीत आहे. ते म्हणजेच: आपले देवाबरोबरचे सबंध, आपले स्वतःबरोबर असलेले सबंध आणि आपले दुसऱ्या बरोबरचे सबंध. आजची पवित्र शास्त्रातील वाचने आपल्याला हे सबंध मजबूत करण्यासाठी तीन मार्ग दाखवत आहे : प्रार्थना, उपवास आणि दानधर्म.
अ) प्रार्थना: प्रार्थना आपल्याला देवाबरोबर योग्य असे नाते प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. संत अंम्ब्रोस म्हणतात कि, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाशी बोलता  आणि जेव्हा बायबल वाचता तेव्हा देव तुमच्याशी बोलतो.” प्रार्थना हि दुतर्फी वाहतूक होय. आपण ‘देवाशी बोलणे’ व ‘ऐकणे’ आवश्यक आहे. प्रायश्चित काळ हा परमेश्वराचा संदेश ऐकण्यास व त्याचाशी योग्य असे संभाषण करण्याचा काळ आहे. कारण प्रभू येशू हा आपल्याला त्याद्वारे पवित्र मार्ग दाखवून आपले तारण करण्यास प्राप्त करत असतो. आपल्याला जर वेळ नसेल किंवा आपण व्यस्त असाल तर देवाला सुद्धा आपल्यासाठी वेळ नसल्याचे आपणाला समजते. प्रार्थनेमुळे आपण कोण आहोत आणि देव कोण आहे ह्याची आपल्याला जाणीव होते. आपण ‘शारीरिक भूक’ व ‘धार्मिक भूक’ ह्या दोघांवर लक्ष देणे आवश्यक आहे.
आ) उपवास: उपवास हा आपल्याला स्वतःबरोबर असलेले सबंध चांगले करण्यास मदत करते. बिशप फुल्टन शीन पुढील तीन शब्दांमध्ये फरक स्पष्ट करतात: ‘उपवास’, ‘पथ्य’ आणि ‘उपासमार’. पथ्य म्हणजेच नेमुन दिलेला विशिष्ट आहार होय. उपासमार म्हणजे अन्नाची कमतरता. परंतु उपवास मात्र आपण स्वतः धार्मिक कारणास्तव आपले संबंध सुधारवण्यासाठी हाती घेतलेला निर्णय असतो. म्हणूनच बिशप फुल्टन शीन म्हणतात कि, जग पथ्य करत आहे; समाज उपाशी आहे परंतू ख्रिस्तसभा उपवास करत आहे.
इ) दानधर्म : दानधर्म आपल्याला दुसऱ्यांविषयी विचार करण्यास प्रोत्साहन देते. तसेच आपल्याला असे समजुन येते कि, या जगातील सर्व संपत्तीचा खरा हक्क देवाकडे आहे. प्रभू परमेश्वर हाच सर्व पृथ्वीवरील राजा आहे. त्यामुळे संपत्ती, मालमत्ता, सोने व धन हे स्वतःसाठी न ठेवता आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा वापरले पाहिजे. कारण ‘दिल्यानेच आपल्यास मिळते व अनंतकालीन आनंद प्राप्त होतो असे संत फ्रान्सिस असीसिकर म्हणतात.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.

१. आपले पोपबिशप्सधर्मगुरूधर्मभगिनी ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य दयावे तसेच ह्या उपवास काळामध्ये त्यांनी उपवासाचेप्रार्थनेचे व दानधर्माचे महत्व आपल्या दररोजच्या जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
३. या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण सर्वांनी ह्या प्रायश्चित काळात पापांपासून दूर राहून चांगले पवित्र जीवन जगावे व दुसऱ्यांना योग्य अशी मदत, प्रेम व क्षमा करावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी मांडूया.


Wednesday, 22 February 2017

Reflection for the Homily of 8th Sunday in Ordinary Time (26-02-2017) by Br. Baritan Nigrel.









सामान्यकाळातील आठवा रविवार

दिनांक: २६/०२/२०१७.
पहिले वाचन: यशया ४९:१४-१५
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ४:१-५
शुभवर्तमान: मत्तय ६:२४-३४




“देवपित्यावर अवलंबून राहा”




प्रस्तावना:

प्रभू परमेश्वर आपला पिता व आपण त्याची लेकरे आहोत. प्रभूने आपल्या सर्वांना जीवनाची मौल्यवान देणगी दिली आहे. म्हणून आपण सर्वांनी सदैव आपल्या देवपित्यावर विश्वास ठेवावा व त्याच्यावर अवलंबून रहावे असे प्रभू येशु आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे.  
कोणीही दोन धन्यांची चाकरी करु शकत नाही. देवाची सेवा करणे हाच आपला परमधर्म आहे. प्रभू येशु आपल्याला आपल्या लोभीपणातून बाहेर येऊन, देवपित्यावर आपल्या सर्व गरजांसाठी अवलंबून राहण्यास आवाहन करत आहे. त्याच्या नजरेमध्ये आपण आकाशातील पाखरांपेक्षा, रानातील गवत व फुलांपेक्षा अधिक मौल्यवान आणि श्रेष्ठ आहोत.
आजच्या या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना, आपण आपल्या सर्व चिंता, गरजा, आपले हेतू व आपले सर्वस्व परमेश्वराच्या हाती सोपवूया व त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यास कृपादान मागुया.

पहिले वाचन: यशया ४९:१४-१५ 

प्रस्तुत उताऱ्यातील १४ व्या ओवीमध्ये सियोनच्या उध्वस्त स्थितीची तुलना पती व मुले यांचा वियोग झालेल्या स्त्रीशी केली आहे. १५, १६ येथे देवाचे उत्तर सूचक आहे. एक म्हणजे ती अनाथ नाही कारण तो तिला विसरणार नाही. दुसरे असे की तिचे उत्तम दिवस तिच्यापुढे आहेत, तेव्हा तिची नवी मुले बाळे, संख्येने एवढी असतील कि तिच्या सीमांच्या बाहेर दूरवर त्यांचा विस्तार होईल.

दुसरे वाचन: १करिंथ ४:१-५.

प्रभू आपल्या सर्वांचा न्याय करतो, असे संत पौल आजच्या या वाचनामध्ये सांगत आहे. जे देवाचे वचन शिकवितात ते देवाच्या रहस्याचे, म्हणजे ख्रिस्ताविषयीच्या शिक्षणाचे कारभारी आहेत व ते ख्रिस्ताचे सेवकही आहेत (१). त्यांनी आपल्या सेवेत विश्वासू राहिले पाहिजे (२). प्रत्येकाचा न्याय प्रभू स्वतः करणार आहे (४). तो सर्व उघड करील. आपण ख्रिस्ताविषयी किती खरे शिक्षण दिले याची परीक्षा होणार आहे. जे या सेवेत विश्वासू राहतील त्यांनाच देवापासून शाबासकी मिळेल (५).

शुभवर्तमान: मत्तय ६:२४-३४

धन भरपूर मिळविणे म्हणजे देवाचा आशीर्वाद, असे हे परुशी मानत. या जगात भरपूर धन साठविण्यासाठी त्यांची धडपड होती. धनावर त्यांचे लक्ष होते. यामुळे ते आत्मिक अंधारात होते. ते या लोभाचे गुलाम बनले होते. त्यामुळे ते देवाची सेवा करु शकत नव्हते. साहजिकच, ते देवाशी एकनिष्ठेने वागत नव्हते किंवा देवावर प्रीतीही करीत नव्हते (२४). म्हणून प्रभू शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, ‘आपल्या जीवाविषयी चिंता करीत बसू नका. आपल्या गरजेसाठी देवपित्यावर अवलंबून राहा. कारण तो आपल्या सर्व गरजा पुरवतो, त्याला आपल्या सर्व गरजा ठाऊक आहेत (३२).

बोधकथा:

एका महिलेच्या घरी तीन अज्ञात इसम येऊन उभे ठाकले. त्यांची दयनीय अवस्था पाहून त्या स्रीने त्या तिघांना आत येउन जेवण घेण्यास विनंती केली. त्यावर त्या तिघांपैकी एकाने तिला तिच्या पतीविषयी विचारणा केली. महिलेच्या उत्तरांती त्या अज्ञात इसमांनी सांगितले कि, ‘तुमचे पती घरी आले कि, आम्हाला आत बोलवा. थोडा वेळ उलटून गेला. त्या महिलेचा पती घरी परतला असता, त्या स्रीने घडलेली हकीकत तिच्या पतीला सांगितली. पतीने होकारात्मक उत्तर देऊन त्यांना आत येण्यास सांगितले. परंतु तिघांपैकी एकालाच घरात येता येईल असे त्यांनी तिला म्हटले. त्यांनी त्यांचे नाव ‘प्रेम’, ‘धन’ आणि ‘यश’ असे सांगितले. ह्यावर आश्चर्य व्यक्त करता, नवऱ्याने ‘यशासाठी’ तर बायकोने ‘धनासाठी’ होकार दर्शविला. ह्याचा मागोवा घेत त्यांच्या सुनेने ‘प्रेम’ प्रथमत: घरात यावे असा आग्रह धरला. त्यांच्या चर्चेअंती ‘प्रेम’ ह्या व्यक्तीस त्यांनी आत येण्यास विनंती केली. परंतु आश्चर्य ते काय! प्रेम ह्या व्यक्तीस घरात आणत असता त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन व्यक्ती म्हणजेच यश आणि धन ह्यांनीही त्याला साथ दिली. त्यावर त्या पती-पत्नीने ह्याचे निरसन विचारले. तेंव्हा त्यांनी सांगितले कि, ‘यश किंवा धन ह्यापैकी कोणत्याही एकाला जर तुम्ही आत बोलवले असते तर प्रेम आणि त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती बाहेर उभी राहिली असती; परंतु जेंव्हा प्रेम ह्याला आत पाचारण केले तेंव्हा त्याच्याबरोबर आम्हां दोघांना जाणे भागच पडते’.
जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश सदैव टिकून असते. भौतिकवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या लोकांनी प्रितीपेक्षा धनसंपत्तीस अधिक प्राधान्य दिले आहे. फक्त धनसंचयच यशप्राप्ती देऊ शकतो असा प्रामाण्यवाद आपल्या मनात घर करून बसला आहे. परंतु प्रिती किंवा प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे. तेच सर्व यश आणि धनाचे मूळ आहे.

मनन चिंतन:

देवावर प्रीती करणे आणि त्याची मात्र सेवा करणे,
ह्यावाचून, “व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ!” (उपदेशक १:२).
एखादया वस्तूविषयी मनुष्याला अनावर वासना उत्पन्न झाली की त्याच्या मनाची शांती नष्ट होते. कारण गर्विष्ठाला आणि लोभ्याला विश्रांती कधीच नसते. पण जे मनाचे गरीब व लीन असतात त्यांच्या जीवनात सदा शांतीच असते. ते देवाची एकनिष्ठेने सेवा करत असतात.
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की जे लोभाचे गुलाम बनलेले आहेत, ते देवाची सेवा करू शकत नाही. ते देवावर प्रीती करु शकत नाही. देवासाठी त्यांच्या जीवनामध्ये जागा नाही. धनलोभ माणसाला देवापासून दूर नेत असतो. लोभी माणूस खऱ्याखुऱ्या आनंदाचा व देवाच्या प्रेमाचा अनुभव येऊ शकत नाही. तोच त्याला मिळालेला मोठा शाप असतो. “We are not punished for our sins, but by them”. या वचनानुसार लोभी वृत्ती हीच माणसाला मिळालेली जबर शिक्षा आहे. म्हणून देवाची सेवा व देवावर प्रिती करण्यासाठी प्रभू आपल्याला लोभी वृत्तीमधून बाहेर पडण्यासाठी सांगत आहे. कारण कोणीही दोन धन्यांची चाकरी करु शकत नाही; तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रिती करील.
आपण लूकच्या शुभवर्तमानामध्ये येशूचा दाखला ऐकतो, “एका धनवान मनुष्याच्या जमिनीला चांगल पिक येतं. तेव्हा तो मनात म्हणतो, मी काय करु? कारण माझं पिक साठवायला माझ्याजवळ जागा नाही. मी माझं कोठार मोठ्ठ बांधीन, आणि त्यात मी माझं सर्व धान्य आणि माझा माल साठवीन आणि माझ्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षांसाठी पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी आणि आनंद कर. पण देव त्याला म्हणाला, ‘हे निर्बुद्धी, ह्या रात्री तुझ्याजवळून तुझा जीव मागितला जाईल, मग तू जे काही साठवलं आहेस ते कोणाचं होईल?’” (लूक १२:१६-२१).  
     येशू कधीही म्हणाला नाही की, माणसाकडे मालमत्ता असणे चुकीचे व गैर आहे. कारण धन भरपूर मिळविणे हा देवाचा आशीर्वाद आहे. पण यदाकदाचित आपलं संपूर्ण लक्ष धनावर राहिलं तर ते पाप आहे, कारण आपण लोभाचे गुलाम बनतो. आपल्या जीवनात आपण पाहतो की, आधी आपण गोष्टी मिळवतो, मग आपण त्यांच्यावर अवलंबून राहू लागतो. नंतर त्यांचा आपल्याला गर्व वाटू लागतो. आपल्याला आणखी संपत्ती मिळवावीशी वाटते. दुसऱ्यांबरोबर आपण ती वाटू इच्छीत नाही. संपत्तीशी आपले नाते इतके घनिष्ठ होते की, शेवटी आपली संपत्तीच आपल्यावर मालकी हक्क गाजवू लागते. देवासाठी आपल्या जीवनात जागाच उरत नाही.  
होय, आपले जीवन हे आपल्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. पण याची कधी आपल्याला जाणीव नसते. कारण धनलोभ व लालसा आपल्याला अस्वस्थ करते. ती लालसा कधीच आपल्या जीवनात तृप्त होत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाविषयी चिंताग्रस्त होतो व जे आहे त्याच्यात समाधान मानण्याऐवजी जे नाही त्याच्या प्राप्तीसाठी सतत धडपडत असतो. तसं पाहिलं तर आपण वर्तमानकाळात कधी वावरतच नाही. एकतर आपण भूतकाळातील आकडेमोडीत गुंतलेलो असतो किंवा भविष्यकाळातील संकल्पात हरवलेलो असतो. म्हणून आज देऊळ माता आपल्याला वर्तमानकाळाचं पूर्ण भान ठेऊन देवावर विसंबून राहण्यासाठी सांगत आहे. येशु ख्रिस्त सांगतो, “आपल्या जीवाविषयी चिंता करीत बसू नको. तर आपल्या गरजेसाठी देवपित्यावर अबलंबून राहा. कारण आपल्या देव पित्याला आपल्या सर्व गरजा ठाऊक आहेत व तो त्या गरजा पुरवितो.”
ज्याला परमेश्वराचे पूर्ण भान असते, तोच जीवाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतो. आणि असा माणूस कधीही धनाच्या लोभाचा गुलाम बनत नाही. उलट देवाशी निष्ठेने वागतो व देवावर संपूर्ण मनाने प्रिती करतो. कारण देवावर प्रिती करणे, आणि त्याची मात्र सेवा करणे, ह्यावाचून ‘व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ!’ (उपदेशक १:२).  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. 

१. आपल्या ख्रिस्तसभेचे पोप महाशय फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. परमेश्वराने आपल्याला जीवनाची मौल्यवान देणगी दिली आहे, म्हणून आपल्या जीवनात सतत देवाला प्राधान्य देऊन त्याची सेवा करावी व त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जगामध्ये जे धनलोभी आहेत त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी त्यांच्या लोभीपणातून बाहेर येऊन, देवपित्यावर आपल्या सर्व गरजांसाठी अवलंबून रहावे म्हणून प्रार्थना करुया.
४. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचे आजार, दुःख हलके व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. लवकरच दहावी, बारावीचे विदयार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. परमेश्वराचा कृपा-आशीर्वाद सर्वांना मिळावा व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना चांगली स्मरणशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.


Wednesday, 15 February 2017

Reflection for the Homily of Seventh Sunday in Ordinary Time (19-02-2017) by Br. Ashley D’monte.



सामान्य काळातील सातवा रविवार

दिनांक: १९/०२/२०१७.
पहिले वाचन: लेवीय १९:१-२, १७-१८.
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र ३:१६-२३.
शुभवर्तमान: मत्तय ५:३८-४८.


“आपल्या शेजाऱ्यावर आणि आपल्या वैऱ्यावरही प्रिती करा”


प्रस्तावना:

      आज आपण सामान्यकाळातील सातवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास शेजारप्रिती व शत्रूप्रिती ह्याविषयी सांगत आहे.
पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो, कि आपल्या शेजाऱ्यावर प्रिती करा व एक पावित्र्याचे जीवन जगा. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास आपले शरीर हे देवाचे पवित्र मंदिर आहे असे सांगतो. तर शुभवर्तमानात पर्वतावरील प्रवचनात येशू शेजारप्रिती व शत्रूप्रिती संबधी बोध करतो. आपल्या वैऱ्यावर प्रिती करा व जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
ख्रिस्ती जीवन परिपूर्णतेने कसे जगावे हे आजच्या उपासनेत आपणास सांगण्यात आले आहे. असे परिपूर्ण जीवन जगण्यास लागणारी कृपा ह्या पवित्र मिस्साबलीत आपण मागुया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: लेवीय १९:१-२, १७-१८

      मोशे इस्त्रायली जनतेस पावित्र्य व न्याय ह्यासबंधी नियम सांगत आहे. इस्त्रायली जनतेने पावित्र्यतेचे व शुद्धतेचे जीवन जगले पाहिजे व हे जीवन जगण्यास खुद्द परमेश्वर स्वतःहाचे उदाहरण सादर करीत आहे. परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही पवित्र असावे कारण मी तुमचा परमेश्वर पवित्र आहे.’ परमेश्वराने इस्त्रायली जनतेसोबत करार केला होता, ‘मी तुमचा देव आहे व तुम्ही माझी प्रजा आहात’. प्रजेने आपल्या राजाप्रमाणे (देवाप्रमाणे) वागले पाहिजे. इस्त्रायली जनता हि निवडलेली होती व ह्या जनतेद्वारे साऱ्या लोकांचा उद्धार परमेश्वराला करायचा होता.
      मोशेच्याकाळी तेथे अनेक जाती-जमातीचे लोक होते. त्यांचा असा नियम होता कि, कुणी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा खुण केला तर त्या खुणी व्यक्तीला, संधी साधून जीवे मारावे. इस्त्रायली लोकही ह्या नियमास अपवाद नव्हते. मोशेने खुद्द आपल्या लोकांस हा नियम दिला कारण त्याकाळी आपल्या कुटुंबाचा बचाव करणे हि काळाची गरज होती. काही काळानंतर ह्या सूडभावनेत बदल झाला. मारेकऱ्यास जीवे मारण्याऐवजी इतर शिक्षा देण्यात येऊ लागली. त्यामुळे आजच्या वाचनात आपण ऐकतो, ‘आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको, सूड उगवू नको किंवा आपल्या भावाबद्दल कोणाचा दावा धरू नको.’ कारण सूडभावनेने पावित्र्यतेचे जीवन जगण्यास मुश्कील होईल. मोशे आपल्या लोकांस एक नवीन आज्ञा देत आहे, आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा. परमेश्वर आपल्या प्रजेस इतरांपेक्षा अलग बनण्यास सांगत आहे. जेणेकरून जेव्हा इतर लोक इस्त्रायली लोकांकडे पाहतील, त्यांच्यातील बदल अनुभवतील तेंव्हा ते आपले दगडाचे देव बाजूला सारून जिवंत देवाकडे परत येतील.

दुसरे वाचन: १करिंथ ३:१६-२३.

      पौल करिंथकरास म्हणतो, परमेश्वराचे विचार हे माणसाच्या विचारापेक्षा अलग आहेत. क्षमा हे त्यातील एक उदाहरण आहे. क्षमा करणे हे जरी माणसाच्या दृष्टीकोनातून मूर्खपणा असला, तरीही तो परमेश्वराच्या दृष्टीने नव्हे. परमेश्वराच्या नजरेत ते एक शहाणपणाचे लक्षण होय. म्हणून पौल म्हणतो, ‘ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. कारण तो ज्ञानास त्याच्याच धूर्तपणाने धरतो.’ (ओवी १९) परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गराज्यास पात्र ठरेल. जगात त्यास मूर्ख ठरवतील परंतु स्वर्गराज्यात त्याचा गौरव केला जाईल.
     जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागतो, तेव्हा आपण परमेश्वराचे मंदिर बनतो. पवित्र आत्मा आपणामध्ये खरोखरच वास करील. हा ज्ञानाचा आत्मा, शहाणपणाचा आत्मा आपणास परिपूर्ण बनवेल. पण आपण जर ह्या पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही, आपण आपल्याच ज्ञानात अडकून राहिलो तर आपला नक्कीच नाश होईल.

शुभवर्तमान: मत्तय ५:३८-४८.

मत्तयलिखित शुभवर्तमानात येशू शेजारप्रिती व शत्रूप्रिती कशी करावी हे सांगत आहे. येशू आपल्या शिकवणुकीत पुढे जाऊन म्हणतो कि, आपल्या शत्रूवरही प्रीती करा. जे छळ करतात त्याच्यासाठी प्रार्थना करा. कारण परमेश्वराच्या दृष्टीने सर्व समान आहे. ह्यासाठी पाऊस व उन ह्याचे मार्मिक उदाहरण येशू त्याच्या श्रोत्यांपुढे मांडतो. हि शेजारप्रिती व शत्रुप्रिती कशाप्रकारे करावी हे येशू पाच वेगवेगळ्या प्रसंगामार्फत सांगत आहे:
१. ‘डोळ्यासाठी डोळा’ म्हणजे सूड घेण्याचा हा नियम जरी रानटी स्वरूपाचा वाटत असला तरीही तो मानवतावादी दृष्टीकोनातून दिलेला होता. तुमचा एक डोळा फोडला, तर विरोधकाचाही एकच डोळा फोडावा दोन नव्हे! जितकी तुमची हाणी झाली, तितकीच संबधिताची हानी करावी अन त्यापेक्षा अधिक नव्हे! अमर्याद सूडाला आळा घालण्यासाठी हा नियम दिला होता.
. ‘दुष्टाला अडवू नका’ म्हणजे त्याला रान मोकळे करून द्या असा या वाचनाचा अर्थ नसून त्याला शारीरिक इजा करू नका, असा आहे. मानसशास्त्रीय किंवा नैतिक प्रतिकार करण्यास हरकत नाही. निष्क्रीय किंवा उदासीन न राहता दुष्ट्शक्तीला जिंकून घ्यावे, असे येशूला सांगायचे होते. विरोधकामध्ये किमान सद॒भावना आहे असे गृहीत धरलेले आहे.
. ‘उजव्या गालावर मारले, तर त्याच्यापुढे डावा गालही करा.’ वास्तविक येथे अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केला आहे. समोरच्याच्या उजव्या गालावर मारण्यासाठी मारणाऱ्याला एकतर डावा हात वापरावा लागेल किंवा उजव्या तळव्याचा मागच्या बाजूचा वापर करावा लागेल. इजा करण्यापेक्षा अपमान करण्यासाठी तसे केले जात असे. वाईटाचा प्रतिकार वाईटाने केला तर वाईटपणात वाढ होते. दुष्टपणावर प्रेम हे एकमेव जालीम औषध आहे.
. जुन्या करारातील नियमानुसार फिर्याद करण्यास मनुष्य आरोपीकडून त्याची ‘बंडी’ किंवा ‘अंगरखा’ (सदरा) गहाण म्हणून घेऊ शकत असे. ‘अंगरखा’ हे बाह्यवस्त्र होते व ते एकदिवसाठीच गहाण म्हणून ठेवता येत असे. त्यामुळे बंडीची मागणी केली जात असे. बंडी घेणाऱ्याला अंगरखा किंवा सदरा देऊन लाजवावे म्हणजे वाईटाची भरपाई चांगल्याने करावी.
. इस्त्राएलमध्ये रोमन राज्य होते. रोमन सैनिक कुणाही वाटसरूला आपले ओझे एक कोस वाहून नेण्याची सक्ती करू शकत असे. त्याला ‘अंगारीया’ म्हणत असत. शत्रूने एक कोस जाण्याची शक्ती केली तर स्वच्छेने दोन कोस जावे. त्यामुळे वैर नष्ट होऊन मैत्रभाव निर्माण होईल.
आपल्या वैऱ्याला देवाने शासन करावे, अशी प्रार्थना ज्यू लोक करीत असत. (स्तोत्र १३७:७-९ व १३९: १९-२४) शत्रूवर दया करू नये (अनुवाद ७:२) असे त्यांना सांगितले गेले होते. परंतु ‘त्यांचा द्वेष करावा’ असे कुठेही सांगितले नव्हते, तो गैरसमज येशूने प्रथम दुरुस्त केला. ‘शत्रूवर प्रेम करा’ असा आगळावेगळा उपदेश येशूने शिष्यांना केला हा भाबडा आशिर्वाद नव्हता. तर वैऱ्याला जिंकून घेण्याची सुज्ञ युक्ती होती. वैर संपवण्याचा प्रेम एकमेव उपाय आहे.

बोधकथा:

एकदा एका तरुणाचा आपल्या गावात खूप अपमान झाला होता. ख्रिस्ती असल्यामुळे त्याला आपल्या धर्मगुरूकडे जाणे उचित वाटले. पण त्याने मनाशी ठरवले होते कि, ‘ज्यांनी माझा अपमान केला, त्यांचा बदला मी नक्कीच घेणार’. त्याने सगळी हकीकत धर्मगुरूंना सांगितली. ते त्या तरुणास म्हणाले, ‘मित्रा, प्रथम आपल्या घरी जा.’ तरुणाने उत्तर दिले, ‘मी कसा जाऊ घरी सुडाची भावना माझ्या अंत:करणात उफाळून येत आहे’. ‘त्यामुळेच तू आता घरी गेले पाहिजे, अपमान हा मातीसारखा असतो.’ धर्मगुरू म्हणाले. तरुणाने उत्तर दिले, ‘हो मला ठाऊक आहे. त्यामुळेच मला ती घाण साफ करायची आहे.’ शेवटी धर्मगुरु म्हणाले, ‘ मित्रा, एक गोष्ट अजून लक्षात घे. माती जेव्हा सुकून जाते तेव्हा सहजपणे साफ होते.’

मनन चिंतन:

      विश्वास, आशा व प्रिती हि ख्रिस्ती जीवनाची महत्वाची मुल्ये आहेत. ह्यापैकी ‘प्रिती’ ह्या मूल्यावर आपण आज चिंतन करीत आहोत. जिथे प्रेम आहे, तिथे क्षमा आहे व जिथे प्रेम नाही तिथे उगवतो फक्त तिरस्कार, द्वेष. मोशेच्या नियमात आपण पाहिले जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावरही प्रिती कर. येशू शुभवर्तमानात म्हणतो, ज्याप्रमाणे तुम्ही देवावर प्रिती करता त्याचप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावरही प्रिती करा. इतकेच बोलून येशू थांबत नाही तर आजच्या शुभवर्तमानात तो म्हणतो शेजाऱ्यावर प्रिती करा व आपल्या शत्रूवरही प्रिती करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे आपला छळ करतात त्यांच्याबद्दल सुडाची भावना ठेवू नका तर त्यांना क्षमा करा. संत पौल सांगतो, ह्यातच खरे ज्ञान व शहाणपणा आहे, आणि देवाच्या दृष्टीने ते योग्य  आहे.   
     सूडाचा अवलंब करु नये, तर शत्रूप्रेम करावे, हाच संदेश आज येशू वेगवेगळ्या प्रसंगांमार्फत सांगत आहे. ख्रिस्ती ह्या नात्याने स्वर्गराज्याचा स्वीकार करणार असल्याने सूड भावनेचा आपण विचार करणेही चुकीचे आहे. कोणत्याही दुष्टकर्माची परतफेड दुष्टकर्म करून देणे चुकीचे आहे. जगातील चांगुलपणात आपण भर पाडली पाहिजे कारण दुष्कर्म तर जगात भरपूर आहे. ख्रिस्ती असल्यामुळे प्रेम, क्षमा, आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. हे सर्व करीत असताना आपणास खूप तोटा होईल, अपमान सहन करावा लागेल; परंतु हे सर्व आपण स्वखुशीने व स्वेच्छेने केले पाहिजे. लोक आपल्याकडे पाहून हसतील, वेडे ठरवतील परंतु आपलं आचरण हे मूर्खपणाचं नाही कारण आपला हेतू हा परमेश्वराचे राज्य प्रस्तापित करण्याचे व सर्वांना देवाची लेकरे बनविण्याचे आहे. शेवटी परमेश्वराचे राज्य वाढत जाईल व वाईटाचा नाश होईल.
     चांगुलपणाची प्रत्येक कृत्य जे आपण करतो, ते आपणास परमेश्वरासाठी व त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तासारखी बनवत असते. परमेश्वराठायी कुणीही त्याचे शत्रू नाहीत; प्रत्येक व्यक्ती हे त्याचे मुल आहे व त्यांच्या तारणासाठी तो सदैव झटत असतो. परमेश्वर सर्वांवर सारखच उन व पाउस पाठवतो. त्याची इच्छा फक्त इतकीच कि, जे त्याच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांनी परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा व ते त्याच्याठायी परत यावेत.
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला क्षमा व प्रेम करण्यास धैर्य दे.

१. हे प्रभो परमेश्वरा, जेथे लोकांच्या मनात जातियतेचा वणवा पेटला आहे; तो वणवा विझवून तेथे ख्रिस्ताने माणुसकीचे मंदिर सजवावे व आपल्या समाजात शांतीचे, प्रेमाचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. धर्मगुरू, राज्यकर्ते, कलाकार, अभिनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ख्रिस्ताच्या शांतीसाधन बनावे व ख्रिस्ताचा प्रेममय संदेश आपल्या शब्दांद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श होऊन येशुख्रिस्त हाच खरा मार्ग, प्रकाश व जीवन आहे हे सत्य त्यांनी स्वीकारावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या अपराध्यांना क्षमा करावी व ख्रिस्ती धर्माची क्षमेची शिकवण आपल्या अंगीकारावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी आपण प्रार्थना करूया.