Reflection for the Homily of Seventh Sunday in Ordinary Time (19-02-2017) by Br. Ashley D’monte.
सामान्य
काळातील सातवा रविवार
दिनांक: १९/०२/२०१७.
पहिले वाचन: लेवीय १९:१-२,
१७-१८.
दुसरे वाचन : करिंथकरांस
पहिले पत्र ३:१६-२३.
शुभवर्तमान: मत्तय ५:३८-४८.
“आपल्या
शेजाऱ्यावर आणि आपल्या वैऱ्यावरही प्रिती करा”
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील
सातवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास शेजारप्रिती व शत्रूप्रिती
ह्याविषयी सांगत आहे.
पहिल्या वाचनात परमेश्वर
म्हणतो, कि आपल्या शेजाऱ्यावर प्रिती करा व एक पावित्र्याचे जीवन जगा. दुसऱ्या वाचनात
संत पौल करिंथकरास आपले शरीर हे देवाचे पवित्र मंदिर आहे असे सांगतो. तर शुभवर्तमानात
पर्वतावरील प्रवचनात येशू शेजारप्रिती व शत्रूप्रिती संबधी बोध करतो. आपल्या
वैऱ्यावर प्रिती करा व जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
ख्रिस्ती जीवन परिपूर्णतेने
कसे जगावे हे आजच्या उपासनेत आपणास सांगण्यात आले आहे. असे परिपूर्ण जीवन जगण्यास
लागणारी कृपा ह्या पवित्र मिस्साबलीत आपण मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: लेवीय १९:१-२, १७-१८
मोशे इस्त्रायली जनतेस
पावित्र्य व न्याय ह्यासबंधी नियम सांगत आहे. इस्त्रायली जनतेने पावित्र्यतेचे व
शुद्धतेचे जीवन जगले पाहिजे व हे जीवन जगण्यास खुद्द परमेश्वर स्वतःहाचे उदाहरण
सादर करीत आहे. परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही पवित्र असावे कारण मी तुमचा परमेश्वर
पवित्र आहे.’ परमेश्वराने इस्त्रायली जनतेसोबत करार केला होता, ‘मी तुमचा देव आहे
व तुम्ही माझी प्रजा आहात’. प्रजेने आपल्या राजाप्रमाणे (देवाप्रमाणे) वागले
पाहिजे. इस्त्रायली जनता हि निवडलेली होती व ह्या जनतेद्वारे साऱ्या लोकांचा
उद्धार परमेश्वराला करायचा होता.
मोशेच्याकाळी तेथे अनेक
जाती-जमातीचे लोक होते. त्यांचा असा नियम होता कि, कुणी आपल्या कुटुंबातील एखाद्या
व्यक्तीचा खुण केला तर त्या खुणी व्यक्तीला, संधी साधून जीवे मारावे. इस्त्रायली
लोकही ह्या नियमास अपवाद नव्हते. मोशेने खुद्द आपल्या लोकांस हा नियम दिला कारण
त्याकाळी आपल्या कुटुंबाचा बचाव करणे हि काळाची गरज होती. काही काळानंतर ह्या
सूडभावनेत बदल झाला. मारेकऱ्यास जीवे मारण्याऐवजी इतर शिक्षा देण्यात येऊ लागली.
त्यामुळे आजच्या वाचनात आपण ऐकतो, ‘आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको,
सूड उगवू नको किंवा आपल्या भावाबद्दल कोणाचा दावा धरू नको.’ कारण सूडभावनेने
पावित्र्यतेचे जीवन जगण्यास मुश्कील होईल. मोशे आपल्या लोकांस एक नवीन आज्ञा देत
आहे, आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करा. परमेश्वर आपल्या प्रजेस
इतरांपेक्षा अलग बनण्यास सांगत आहे. जेणेकरून जेव्हा इतर लोक इस्त्रायली लोकांकडे
पाहतील, त्यांच्यातील बदल अनुभवतील तेंव्हा ते आपले दगडाचे देव बाजूला सारून जिवंत
देवाकडे परत येतील.
दुसरे वाचन: १करिंथ ३:१६-२३.
पौल करिंथकरास म्हणतो,
परमेश्वराचे विचार हे माणसाच्या विचारापेक्षा अलग आहेत. क्षमा हे त्यातील एक
उदाहरण आहे. क्षमा करणे हे जरी माणसाच्या दृष्टीकोनातून मूर्खपणा असला, तरीही तो
परमेश्वराच्या दृष्टीने नव्हे. परमेश्वराच्या नजरेत ते एक शहाणपणाचे लक्षण होय.
म्हणून पौल म्हणतो, ‘ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. कारण तो
ज्ञानास त्याच्याच धूर्तपणाने धरतो.’ (ओवी १९) परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे जो
वागेल तोच स्वर्गराज्यास पात्र ठरेल. जगात त्यास मूर्ख ठरवतील परंतु स्वर्गराज्यात
त्याचा गौरव केला जाईल.
जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागतो, तेव्हा आपण
परमेश्वराचे मंदिर बनतो. पवित्र आत्मा आपणामध्ये खरोखरच वास करील. हा ज्ञानाचा
आत्मा, शहाणपणाचा आत्मा आपणास परिपूर्ण बनवेल. पण आपण जर ह्या पवित्र आत्म्याचा
स्वीकार केला नाही, आपण आपल्याच ज्ञानात अडकून राहिलो तर आपला नक्कीच नाश होईल.
शुभवर्तमान: मत्तय ५:३८-४८.
मत्तयलिखित शुभवर्तमानात
येशू शेजारप्रिती व शत्रूप्रिती कशी करावी हे सांगत आहे. येशू आपल्या शिकवणुकीत
पुढे जाऊन म्हणतो कि, आपल्या शत्रूवरही प्रीती करा. जे छळ करतात त्याच्यासाठी
प्रार्थना करा. कारण परमेश्वराच्या दृष्टीने सर्व समान आहे. ह्यासाठी पाऊस व उन
ह्याचे मार्मिक उदाहरण येशू त्याच्या श्रोत्यांपुढे मांडतो. हि शेजारप्रिती व
शत्रुप्रिती कशाप्रकारे करावी हे येशू पाच वेगवेगळ्या प्रसंगामार्फत सांगत आहे:
१. ‘डोळ्यासाठी डोळा’
म्हणजे सूड घेण्याचा हा नियम जरी रानटी स्वरूपाचा वाटत असला तरीही तो मानवतावादी
दृष्टीकोनातून दिलेला होता. तुमचा एक डोळा फोडला, तर विरोधकाचाही एकच डोळा फोडावा
दोन नव्हे! जितकी तुमची हाणी झाली, तितकीच संबधिताची हानी करावी अन त्यापेक्षा अधिक
नव्हे! अमर्याद सूडाला आळा घालण्यासाठी हा नियम दिला होता.
२. ‘दुष्टाला अडवू नका’ म्हणजे
त्याला रान मोकळे करून द्या असा या वाचनाचा अर्थ नसून त्याला शारीरिक इजा करू नका,
असा आहे. मानसशास्त्रीय किंवा नैतिक प्रतिकार करण्यास हरकत नाही. निष्क्रीय किंवा
उदासीन न राहता दुष्ट्शक्तीला जिंकून घ्यावे, असे येशूला सांगायचे होते. विरोधकामध्ये
किमान सद॒भावना आहे असे गृहीत धरलेले आहे.
३. ‘उजव्या गालावर मारले, तर
त्याच्यापुढे डावा गालही करा.’ वास्तविक येथे अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केला आहे.
समोरच्याच्या उजव्या गालावर मारण्यासाठी मारणाऱ्याला एकतर डावा हात वापरावा लागेल
किंवा उजव्या तळव्याचा मागच्या बाजूचा वापर करावा लागेल. इजा करण्यापेक्षा अपमान
करण्यासाठी तसे केले जात असे. वाईटाचा प्रतिकार वाईटाने केला तर वाईटपणात वाढ होते.
दुष्टपणावर प्रेम हे एकमेव जालीम औषध आहे.
४. जुन्या करारातील नियमानुसार
फिर्याद करण्यास मनुष्य आरोपीकडून त्याची ‘बंडी’ किंवा ‘अंगरखा’ (सदरा) गहाण
म्हणून घेऊ शकत असे. ‘अंगरखा’ हे बाह्यवस्त्र होते व ते एकदिवसाठीच गहाण म्हणून
ठेवता येत असे. त्यामुळे बंडीची मागणी केली जात असे. बंडी घेणाऱ्याला अंगरखा किंवा
सदरा देऊन लाजवावे म्हणजे वाईटाची भरपाई चांगल्याने करावी.
५. इस्त्राएलमध्ये रोमन राज्य
होते. रोमन सैनिक कुणाही वाटसरूला आपले ओझे एक कोस वाहून नेण्याची सक्ती करू शकत
असे. त्याला ‘अंगारीया’ म्हणत असत. शत्रूने एक कोस जाण्याची शक्ती केली तर
स्वच्छेने दोन कोस जावे. त्यामुळे वैर नष्ट होऊन मैत्रभाव निर्माण होईल.
आपल्या वैऱ्याला देवाने
शासन करावे, अशी प्रार्थना ज्यू लोक करीत असत. (स्तोत्र १३७:७-९ व १३९: १९-२४)
शत्रूवर दया करू नये (अनुवाद ७:२) असे त्यांना सांगितले गेले होते. परंतु ‘त्यांचा
द्वेष करावा’ असे कुठेही सांगितले नव्हते, तो गैरसमज येशूने प्रथम दुरुस्त केला.
‘शत्रूवर प्रेम करा’ असा आगळावेगळा उपदेश येशूने शिष्यांना केला हा भाबडा आशिर्वाद
नव्हता. तर वैऱ्याला जिंकून घेण्याची सुज्ञ युक्ती होती. वैर संपवण्याचा प्रेम
एकमेव उपाय आहे.
बोधकथा:
एकदा एका तरुणाचा आपल्या गावात खूप अपमान झाला होता. ख्रिस्ती असल्यामुळे त्याला आपल्या धर्मगुरूकडे जाणे उचित वाटले. पण त्याने मनाशी ठरवले होते कि, ‘ज्यांनी माझा अपमान केला, त्यांचा बदला मी नक्कीच घेणार’. त्याने सगळी हकीकत धर्मगुरूंना सांगितली. ते त्या तरुणास म्हणाले, ‘मित्रा, प्रथम आपल्या घरी जा.’ तरुणाने उत्तर दिले, ‘मी कसा जाऊ घरी सुडाची भावना माझ्या अंत:करणात उफाळून येत आहे’. ‘त्यामुळेच तू आता घरी गेले पाहिजे, अपमान हा मातीसारखा असतो.’ धर्मगुरू म्हणाले. तरुणाने उत्तर दिले, ‘हो मला ठाऊक आहे. त्यामुळेच मला ती घाण साफ करायची आहे.’ शेवटी धर्मगुरु म्हणाले, ‘ मित्रा, एक गोष्ट अजून लक्षात घे. माती जेव्हा सुकून जाते तेव्हा सहजपणे साफ होते.’
मनन चिंतन:
विश्वास, आशा व प्रिती हि
ख्रिस्ती जीवनाची महत्वाची मुल्ये आहेत. ह्यापैकी ‘प्रिती’ ह्या मूल्यावर आपण आज
चिंतन करीत आहोत. जिथे प्रेम आहे, तिथे क्षमा आहे व जिथे प्रेम नाही तिथे उगवतो
फक्त तिरस्कार, द्वेष. मोशेच्या नियमात आपण पाहिले जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावरही
प्रिती कर. येशू शुभवर्तमानात म्हणतो, ज्याप्रमाणे तुम्ही देवावर प्रिती करता
त्याचप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावरही प्रिती करा. इतकेच बोलून येशू थांबत नाही तर
आजच्या शुभवर्तमानात तो म्हणतो शेजाऱ्यावर प्रिती करा व आपल्या शत्रूवरही प्रिती करा.
त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे आपला छळ करतात त्यांच्याबद्दल सुडाची भावना ठेवू
नका तर त्यांना क्षमा करा. संत पौल सांगतो, ह्यातच खरे ज्ञान व शहाणपणा आहे, आणि
देवाच्या दृष्टीने ते योग्य आहे.
सूडाचा अवलंब करु नये, तर शत्रूप्रेम करावे, हाच संदेश आज येशू
वेगवेगळ्या प्रसंगांमार्फत सांगत आहे. ख्रिस्ती ह्या नात्याने स्वर्गराज्याचा
स्वीकार करणार असल्याने सूड भावनेचा आपण विचार करणेही चुकीचे आहे. कोणत्याही
दुष्टकर्माची परतफेड दुष्टकर्म करून देणे चुकीचे आहे. जगातील चांगुलपणात आपण भर
पाडली पाहिजे कारण दुष्कर्म तर जगात भरपूर आहे. ख्रिस्ती असल्यामुळे प्रेम, क्षमा,
आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. हे
सर्व करीत असताना आपणास खूप तोटा होईल, अपमान सहन करावा लागेल; परंतु हे सर्व आपण
स्वखुशीने व स्वेच्छेने केले पाहिजे. लोक आपल्याकडे पाहून हसतील, वेडे ठरवतील
परंतु आपलं आचरण हे मूर्खपणाचं नाही कारण आपला हेतू हा परमेश्वराचे राज्य
प्रस्तापित करण्याचे व सर्वांना देवाची लेकरे बनविण्याचे आहे. शेवटी परमेश्वराचे
राज्य वाढत जाईल व वाईटाचा नाश होईल.
चांगुलपणाची प्रत्येक कृत्य जे आपण करतो, ते आपणास परमेश्वरासाठी व
त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तासारखी बनवत असते. परमेश्वराठायी कुणीही त्याचे
शत्रू नाहीत; प्रत्येक व्यक्ती हे त्याचे मुल आहे व त्यांच्या तारणासाठी तो सदैव झटत
असतो. परमेश्वर सर्वांवर सारखच उन व पाउस पाठवतो. त्याची इच्छा फक्त इतकीच कि, जे
त्याच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांनी परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घ्यावा व ते
त्याच्याठायी परत यावेत.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला क्षमा व
प्रेम करण्यास धैर्य दे.
१. हे प्रभो
परमेश्वरा, जेथे लोकांच्या मनात जातियतेचा वणवा पेटला आहे; तो वणवा विझवून
तेथे ख्रिस्ताने माणुसकीचे मंदिर सजवावे व आपल्या समाजात शांतीचे, प्रेमाचे
वातावरण निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. धर्मगुरू, राज्यकर्ते, कलाकार, अभिनेते आणि
प्रशासकीय अधिकारी यांनी ख्रिस्ताच्या शांतीसाधन बनावे व ख्रिस्ताचा
प्रेममय संदेश आपल्या शब्दांद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. जे तरुण तरुणी
देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श होऊन येशुख्रिस्त हाच
खरा मार्ग, प्रकाश व जीवन
आहे हे सत्य त्यांनी स्वीकारावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण आपले दैनंदिन
जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या अपराध्यांना क्षमा करावी
व ख्रिस्ती धर्माची क्षमेची शिकवण आपल्या अंगीकारावी, म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment