सामान्य काळातील सहावा रविवार
दिनांक: १२/०२/२०१७.
पहिले वाचन: बेनसिराची
बोधवचने १५:१५-२०.
दुसरे वाचन: करींथकरांस
पहिले पत्र २:६-१०.
शुभवर्तमान: मत्तय
५:१७-३७.
“मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला नाही तर
परिपूर्ण करायला आलो आहे”
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या उपासनेत येशुख्रिस्त त्याचा 'दैवी अधिकार' सिद्ध करत आहे.
बेनसिराची बोधवचने ह्या पुस्तकातून घेतलेल्या
पहिल्या वाचनात प्रत्येक मानवाला देवाने स्वातंत्र्य दिले आहे असे लेखक म्हणतो.
आणि त्या स्वातंत्र्यातून त्याने चांगले आणि वाईट यांमधील योग्य ते निवडावे. दुसऱ्या
वाचनात संत पौल येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व जगातील ज्ञानाच्या तुलनेत
अधिक आहे असे म्हणतो. तर शुभवर्तमानात येशू नियमशास्र व संदेष्ट्ये ह्यांची
परिपूर्ती आहे हे स्पष्ट होते.
अंत:करणाचे काही गहन नियम असतात जे तर्कशक्तीच्या समजण्यापलीकडे असतात. म्हणून ह्या
मिस्साबलीत भाग घेत असतांना परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांचे पालन आत्मियतेने
करण्यास कृपा मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिराची बोधवचने
१५:१५-२०.
हे पुस्तक बुद्धी प्रामाण्यवादाचे एक पुस्तक
म्हणून गणले गेले आहे (जुन्या करारातील शहाणपण). हे नैतिकता आणि धार्मिक तत्वज्ञान
जपण्यास व अंगीकारण्यास मदत करते. १८० इ. स. पूर्व सालात हे पुस्तक हिब्रू ह्या
भाषेत लिहिले होते. ह्या पुस्तकाचा लेखक म्हणून यहोशवा बेन एलीयाझ/ बेनसिरा ह्यास
संबोधण्यात येते. असे म्हटले जाते कि ह्या पुस्तकाचे भाषांतर ग्रीक भाषेत
लेखकाच्या नातेवाईकाने केले होते. त्याचा उद्देश हाच होता कि, जे ज्यू-पंथीय आपली
मातृभाषा (हिब्रू) विसरले होते, त्यांना परत एकदा मोशेने दिलेल्या नियमांचे पालन
करता यावे आणि त्याद्वारे व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे.
ह्या वाचनाचा संदर्भ आजही ख्रिस्ती लोकांच्या
व्यावहारिक ज्ञानासाठी उपयुक्त ठरतो म्हणून त्यास कालबाह्य म्हणता येणार नाही.
ह्या पुस्तकाचा मतितार्थ आपणास सांगू इच्छितो कि, मानव हा स्वतंत्र प्राणी आहे,
म्हणूनच तो त्याच्या स्वत:च्या कृत्यांना कारणीभूत ठरतो. देवाने मोशेद्वारे दहा
आज्ञा दिल्या. ह्या दहा आज्ञा कोणावर लादल्या गेल्या नव्हत्या. परंतु ज्यांना त्या
माहित होत्या त्यांच्या त्या भल्यासाठी होत्या. जे ह्या आज्ञा व नियम पाळत त्यांस
देवाचे एकनिष्ठ असे गणले जाई. म्हणून देवाशी एकनिष्ठ राहायचे कि नाही हे त्यांच्या
स्वत:वर अवलंबून होते.
परमेश्वराने स्वेच्छेने केलेली सेवा पसंत
पडते. ‘पाणी’ आणि ‘अग्नी’ हे विध्वंस, विनाशाचे प्रतिक मानले जाते. पाप आणि जे
चांगले व उपयुक्त असे आहे; सद्गुण. देव प्रत्येकाला योग्य ते निवडण्याचे
स्वातंत्र्य देतो.
‘जीवन’ आणि ‘मरण’ हि एक उपमा येथे वापरण्यात
आली आहे. जीवन हे अस्तित्वाचे प्रतिक तर मरण हे सर्वनाशाचे प्रतिक मानले जाते.
येथे लेखक कदाचित सार्वकालिक जीवन व अनंतकाळाचे मरण ह्यास संबोधत नसून पृथ्वीतलावर
स्वेच्छेने केलेली निस्वार्थी सेवा होय. आणि ह्याच्याविरुद्ध देवाशी एकनिष्ठ न
राहणे म्हणजे मरण होय. व्यर्थ गेलेले जीवन. देवाशी शहाणपण हे मानवी आकलनापलीकडे
आहे. त्याद्वारे त्यास सर्वकाही शक्य करण्याचे सामर्थ्य आहे. देवभिरू व्यक्तींवर त्याच्या
करुणामय दृष्टी असते. देवभिरू असणे (जुन्याकारारात) म्हणजे देवाच्या
बुद्धीचातुर्याचा (शहाणपणाचा) आदर सन्मान करते. देवापासून काहीही लपून राहत नाही
तो सर्वकाही जाणतो; त्यामुळे कोणीही अनैतिकतेने वागावे अशी देवाची इच्छा मुळीच
नाही. किंवा त्यासाठी देवाला जबाबदारही ठरवता येणार नाही. देवाला ते कदापि पसंत
नाही. देवाने कोणालाही पाप किंवा पापात मुक्तविहार करण्याची मुभा दिलेली नाही.
प्रत्येक पाप्याने त्याच्या गैरवर्तुणूकीसाठी
स्वत:ला दोषी धरावे/मानावे. देवही त्यालाच दोषी मानील कारण देवाने त्याला पाप व
पुण्य असे दोन पर्याय त्याच्यापुढे ठेवलेले आहेत आणि योग्य ते निवडण्याची संधी
त्याला दिली होती.
दुसरे
वाचन: करींथकरांस पहिले पत्र २:६-१०.
हा
प्रस्तुत उतारा गेल्या रविवारच्या वाचनाचा उर्वरित भाग आहे. ह्यात संत पौल
त्याच्या करिंथ येथील अनुयायांना सांगतो कि, ‘तुम्हाला मिळालेला विश्वास हि
ख्रिस्ताकडून प्राप्त झालेली एक देणगी होय’. त्यांनी स्वीकारलेला ख्रिस्ती धर्म
पौलाच्या प्रवचनामुळे किंवा मानवी बुद्धी प्रमाण्यावादामुळे किंवा त्यांच्या
तत्वाज्ञानांमुळे नव्हता, तर एक दैवी दयेचा आविष्कार होता. देव त्याचे खरे शहाणपण,
बुद्धी हि त्यांनाच देतो जे त्यासाठी लायक किंवा योग्य असतात. दैवी शहाणपण
त्यांनाच लाभते जे ते शिकण्यासाठी स्वेच्छेने तयारी दर्शवितात.
ह्या उताऱ्यात आलेली ‘प्रगल्भता’ म्हणजे फक्त
वयोमानाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर ख्रिस्ती विश्वासात झालेली वाढ व धार्मिक
व्यक्ती भौतिकवादाच्या, चंगळवादाच्या मोहातून बाहेर पडणे असे होय. हा संदेश त्या
काळातील विधर्मी आणि ज्यू धर्माधिकाऱ्यांना उद्देशून लिहिण्यात आला आहे. त्यांचे
बुद्धिचातुर्य (शहाणपण) हे ह्या जगाचे आहे त्यांच्या ह्या जागतिक प्रामाण्यवादामुळे
ते तारणारा देव येशु ख्रिस्त ह्याला ओळखू शकले नाहीत. म्हणून संत पौल म्हणतो
त्यांच्या शहाणपणाचा, अधिकाराचा सर्वनाश होईल (इ.स. ७० मध्ये ज्यू साम्राज्य लयास
गेले आणि रोमन साम्राज्याचा देखील खातमा झाला).
देवाची
मानवाच्या गौरवासाठी असलेली सार्वकालिक योजना आणि त्यांचे वारस होण्याचे भाग्य,
येशु ख्रिस्ताच्या मानवी रूपाने पूर्णत्वास आली आहे. हि दैवी योजना ख्रिस्ती
धर्मामध्ये ख्रिस्ताद्वारे उलगडण्यात आली. आणि हे संत पौल व त्याच्या साथीदारांनी
त्यांच्या प्रवचनातून सर्वश्रुत केले.
शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७.
शुभवर्तमानातील
उतारा प्रभू येशूने पर्वतावरील दिलेल्या प्रवचनातील एक आहे. ह्यात आपण पाहतो कि,
येशु जुन्या करारात मोशेने दिलेल्या आज्ञांचा संदर्भ देतो आणि त्यालाच जोडून नवीन
स्पष्टीकरण देतो. हे तो त्याच्या स्वत:स प्राप्त झालेल्या अधिकाराने करतो: “मी
तुम्हांस सांगतो”. ह्यावरून तो देव आहे हे
स्पष्ट करु इच्छितो. कारण नियम देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार फक्त देवालाच होता.
शास्री आणि परुशी हे बाह्यांगातील नियम
पाळण्यास अगदी कठोर होते. जे त्यांना मोशेने घालून दिले होते. परंतु ह्यात अंतःकरणातील
प्रामाणिकपणाची आणि सेवा करण्याची उमेद ह्याची उणीव भासत होती. स्वत:ची इतरांकडून
स्तुती करवून घ्यावी किंवा इतरांनी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे हा ह्यामागचा
हेतू होता. म्हणून ख्रिस्त त्याच्या अनुयायांना सक्त ताकीद देऊन सांगतो कि, त्यांची
वर्तणूक, नियमांचे पालन आणि त्यांचा धर्म हा शास्री-परुशांसारखा नसावा तर
त्याहूनही अधिक प्रामाणिक सत्य अंत:करणातून यावे; फक्त बाह्यांगातील फुशारकी
नसावी. तरच ते स्वर्गराज्यासाठी पात्र ठरतील. येशु मोशेने दिलेल्या आज्ञेची
पुर्नुजाळणी करत नाही तर त्यालाच जोडून नवीन आज्ञाही मांडतो.
खुनाचा
सूड प्रथमत: मनामध्ये चालू होतो. अशा ह्या वाईट विचारांना बंधन घातले नाही तर
त्याचे रुपांतर वास्तविक खुनामध्ये होते. येशु मनावर संयम ठेवण्यास सांगत आहे.
संभोगात्मक विचार, नजर आणि कामवासना हे प्रत्यक्षात कृतीत उतरलेच असे नाही परंतु
ख्रिस्तानुमते हे विचारच पाप करण्याबरोबर आहेत. म्हणून पापकृती करण्यापेक्षा त्याचा
विचार मनात आणने देखील पाप आहे असे येशु सांगतो. ह्यात नियमशास्राचा अचूक,
काटेकोरपणा शब्दशः पाळण्यावर नव्हे तर नियमशास्रामध्ये अभिप्रेत असलेली देवाची खरी
इच्छा मार्मिकपणे जाणून घेण्यावर भर दिला आहे. ह्या बाह्यकृत्यांच्या मागे द्वेष व
कामवासना या मुलभूत प्रवृत्ती अंतःकरणात घर करून बसल्या आहेत. अंतःकरण योग्य नसेल
तर त्यातून पापाचे फळ बाहेर पडण्यापूर्वीच ते सुधारण्यासाठी कृती केली पाहिजे.
बोधकथा:
साने गुरुजी ह्यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ ह्या
पुस्तकातील ही एक सुप्रसिद्ध कथा आहे.
लहान असताना स्नानगृहातून बाहेर येण्यापूर्वी
साने गुरुजींनी अचानक आईला हाक मारली व तिला तिचा साडीचा पदर त्यांच्यासमोर
पसरावायला सांगितले. ह्या सर्वाचे कारण विचारले असता ते उत्तरले, कि, ‘मी माझ्या
स्वच्छ धुतलेल्या पायांना घाण लागू नये म्हणून तुला असे करावयास सांगितले’. त्यावर
स्मितहास्य करत आई म्हणाली, ‘छान, पण बाळा आज जसे तू तुझे पाय मलीन होण्यापासून
वाचवतोस, अगदी तशाच प्रकारे तुझ्या अंतःकरणाला देखील घाण लागणार नाही ह्याची काळजी
घे’.
मनन
चिंतन:
ख्रिस्ती
धर्मानुसार जर ‘हृद्य’ ह्या शब्दाची व्याख्या सांगायची झाली, तर, ती पुढीलप्रमाणे
असू शकेल. ‘हृद्य’ म्हणजे जेथे ज्ञानाच्या तुलनेत प्रेम, स्वतंत्रता किंवा मुक्त
विचारांना अधिक वाव दिला जातो. कदाचित हीच समजूत जुन्या करारातही असावी जेंव्हा
परमेश्वर म्हणतो, ‘मी माझ्या आज्ञा तुमच्या ह्र्दयपटलावर कोरील’. म्हणजेच
परमेश्वराच्या आज्ञा पाळताना त्यात स्वातंत्र्य व प्रिती ह्यांचा अंतर्भाव असणे
अगदी गरजेचे आहे. त्याला फक्त कर्मठपणाची किनार असून जमणार नाही.
आजच्या
शुभवर्तमानात प्रभू येशू शास्री, परुशी ह्यांच्या कर्मठपणाचा निषेध करतो व
मोशेद्वारे देवाने दिलेल्या आज्ञांची पुर्नुजळणी करतो. तो त्यांस ममतेची झालर देत
आहे. शास्री लोक जे नियमावली व आज्ञांचे काटेकोरपणे पालन करण्यात पटाईत होते, त्यांना
‘नियमशास्र’ आणि ‘संदेष्ट्ये’ ह्याबद्दल फार लगाव होता. ह्या दोन शब्दांतच त्यांचा
संपूर्ण जुना करार सामावलेला होता. परंतु येशुमध्ये ह्या दोनही (नियमशास्र आणि
संदेष्ट्ये) गोष्टींचा कळस गाठला होता. तरीही शास्री-परुशी ह्यावर विश्वास ठेवण्यास
असमर्थ होते. म्हणून येशू त्याच्या ‘दैवी अधिकाराने’ त्यांना नवीन अर्थ प्राप्त
करून देतो. उदा. ‘तुम्ही जुन्या करारात असे ऐकले होते... पण आता मी तुम्हांस हे
सांगतो...’.
‘येशू
नियमशास्राचे उल्लंघन करावयास नव्हे, तर त्याची पूर्तता करावयास आला होता’. त्याने
शास्री परुशी ह्यांनी धर्माच्या नावाखाली मांडलेला बाजार मोडकळीस आणला. येशूने
बाह्यांगापेक्षा आंतरिक शुद्धीला प्राधान्य दिले. कारण देव चेहऱ्याची सुंदरता नाही
तर अंत:करणाची शुद्धता पारखतो. पापकृती हृद्यातून येते; आणि तेच शरीराला पाप
करण्यास भाग पाडते; हेच पाप आपल्याला देवापासून, शेजारप्रीतीपासून दूर ठेवत असते.
पहिल्या
वाचनात बेनसिराची बोधवचने आपल्याला देवाने स्वातंत्र्य दिले आहे असे सांगते. ह्याच
स्वातंत्र्यात देव आपल्याला बरे आणि वाईट ह्यामधून योग्य ते निवडण्यास सांगतो. जे
आपण निवडतो त्यावरच आपले भविष्य ठरते. म्हणून त्याबद्दल देवाला दोष देणे अयोग्य
आहे. कारण आपण ते स्वेच्छेने निवडलेले असते. येथेही आंतरिक शुद्ध गुणांवर भर दिला गेला आहे. येशू त्याच्या वक्तव्यातून पापाचा समूळ नाश करू इच्छितो असे स्पष्ट दिसून येते. खून,
कामवासना ह्यांची सुरुवात हृदयात/ अंत:करणात होत असते. म्हणून बाह्यकृतींपेक्षा
त्यांचा समूळ नाश करणे येशूला योग्य वाटले. येशू त्याच्या अधिकाराने व परिपूर्ण
ज्ञानाने जुन्या नियमशास्राची वर्तमान काळाच्या गरजेनुसार अंशत: सांगड घालण्याचा
प्रयत्न करतो.
येशु सांगतो कि, नियमशास्र हे मुळातच आपल्या
पंचांद्रियांना मार्गदर्शक असे होते. येथे येशूला लोकांच्या अंत:करणाबरोबरच मानसिकतेचाही विकास करायचा आहे. अशाप्रकारे येशू आपल्याला प्रत्येक विधी-नियम पाळत
असता करुणामयतेची जाणीव ठेवण्यास सांगत आहे. फक्त बाह्यांगच स्वच्छ न ठेवता
हृदयाची मलीनता दररोजच्या प्रार्थनेने, बंधूप्रीतीने आणि शेजारप्रीतीने शुद्ध केली
जावी अशी आजची उपासना आपणास आवर्जून सांगू इच्छिते. कारण देव आपली अंत:करणे पारखतो.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या कृपेचे वरदान दे.
१. ख्रिस्ताने
स्थापन केलेली ख्रिस्तमंडळी, संत पेत्राचे उत्तराधिकारी व तिचे इतर धर्माधिकारी,
ह्यांना परमद्यामयी परमेश्वराचा आशिर्वाद लाभावा व त्यांना त्यांच्या कार्यातून
ख्रिस्त प्रकट करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. नियमावली, अटी हे
समाजाच्या उन्नतीसाठी व भल्यासाठी असतात, परंतु त्यांना आंतरिक ममतेची झालर असावी;
त्यांनी आपल्याला कर्मठ बनण्यास प्रवृत्त करू नये म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या भावी
ख्रिस्ती समाजाचे भक्कम आधारस्तंभ असणारे युवक-युवती ह्यांनी देवाच्या अधिकाधिक
सानिध्यात राहून ख्रिस्ती समाजबांधणी करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. वयोवृद्ध, अबाल,
विधवा, अनाथ अशा ह्या समाजातील अन्यायाची झळ सोसत असणाऱ्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी, उदार
व्यक्तीमत्वांनी हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. वैयक्तिक व
कौटुंबिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment