सामान्यकाळातील आठवा रविवार
दिनांक: २६/०२/२०१७.
पहिले वाचन: यशया ४९:१४-१५
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ४:१-५
शुभवर्तमान: मत्तय ६:२४-३४
“देवपित्यावर अवलंबून राहा”
प्रस्तावना:
प्रभू परमेश्वर
आपला पिता व आपण त्याची लेकरे आहोत. प्रभूने आपल्या सर्वांना जीवनाची मौल्यवान
देणगी दिली आहे. म्हणून आपण सर्वांनी सदैव आपल्या देवपित्यावर विश्वास ठेवावा व
त्याच्यावर अवलंबून रहावे असे प्रभू येशु आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे.
कोणीही
दोन धन्यांची चाकरी करु शकत नाही. देवाची सेवा करणे हाच आपला परमधर्म आहे. प्रभू
येशु आपल्याला आपल्या लोभीपणातून बाहेर येऊन, देवपित्यावर आपल्या सर्व गरजांसाठी
अवलंबून राहण्यास आवाहन करत आहे. त्याच्या नजरेमध्ये आपण आकाशातील पाखरांपेक्षा,
रानातील गवत व फुलांपेक्षा अधिक मौल्यवान आणि श्रेष्ठ आहोत.
आजच्या
या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना, आपण आपल्या सर्व चिंता, गरजा, आपले हेतू व
आपले सर्वस्व परमेश्वराच्या हाती सोपवूया व त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यास कृपादान
मागुया.
पहिले वाचन: यशया ४९:१४-१५
प्रस्तुत
उताऱ्यातील १४ व्या ओवीमध्ये सियोनच्या उध्वस्त स्थितीची तुलना पती व मुले यांचा
वियोग झालेल्या स्त्रीशी केली आहे. १५, १६ येथे देवाचे उत्तर सूचक आहे. एक म्हणजे
ती अनाथ नाही कारण तो तिला विसरणार नाही. दुसरे असे की तिचे उत्तम दिवस तिच्यापुढे
आहेत, तेव्हा तिची नवी मुले बाळे, संख्येने एवढी असतील कि तिच्या सीमांच्या बाहेर
दूरवर त्यांचा विस्तार होईल.
दुसरे वाचन: १करिंथ ४:१-५.
प्रभू
आपल्या सर्वांचा न्याय करतो, असे संत पौल आजच्या या वाचनामध्ये सांगत आहे. जे
देवाचे वचन शिकवितात ते देवाच्या रहस्याचे, म्हणजे ख्रिस्ताविषयीच्या शिक्षणाचे
कारभारी आहेत व ते ख्रिस्ताचे सेवकही आहेत (१). त्यांनी आपल्या सेवेत विश्वासू
राहिले पाहिजे (२). प्रत्येकाचा न्याय प्रभू स्वतः करणार आहे (४). तो सर्व उघड
करील. आपण ख्रिस्ताविषयी किती खरे शिक्षण दिले याची परीक्षा होणार आहे. जे या
सेवेत विश्वासू राहतील त्यांनाच देवापासून शाबासकी मिळेल (५).
शुभवर्तमान: मत्तय ६:२४-३४
धन
भरपूर मिळविणे म्हणजे देवाचा आशीर्वाद, असे हे परुशी मानत. या जगात भरपूर धन
साठविण्यासाठी त्यांची धडपड होती. धनावर त्यांचे लक्ष होते. यामुळे ते आत्मिक
अंधारात होते. ते या लोभाचे गुलाम बनले होते. त्यामुळे ते देवाची सेवा करु शकत
नव्हते. साहजिकच, ते देवाशी एकनिष्ठेने वागत नव्हते किंवा देवावर प्रीतीही करीत
नव्हते (२४). म्हणून प्रभू शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, ‘आपल्या जीवाविषयी चिंता
करीत बसू नका. आपल्या गरजेसाठी देवपित्यावर अवलंबून राहा. कारण तो आपल्या सर्व
गरजा पुरवतो, त्याला आपल्या सर्व गरजा ठाऊक आहेत (३२).
बोधकथा:
एका महिलेच्या घरी
तीन अज्ञात इसम येऊन उभे ठाकले. त्यांची दयनीय अवस्था पाहून त्या स्रीने त्या
तिघांना आत येउन जेवण घेण्यास विनंती केली. त्यावर त्या तिघांपैकी एकाने तिला
तिच्या पतीविषयी विचारणा केली. महिलेच्या उत्तरांती त्या अज्ञात इसमांनी सांगितले
कि, ‘तुमचे पती घरी आले कि, आम्हाला आत बोलवा. थोडा वेळ उलटून गेला. त्या महिलेचा
पती घरी परतला असता, त्या स्रीने घडलेली हकीकत तिच्या पतीला सांगितली. पतीने होकारात्मक
उत्तर देऊन त्यांना आत येण्यास सांगितले. परंतु तिघांपैकी एकालाच घरात येता येईल
असे त्यांनी तिला म्हटले. त्यांनी त्यांचे नाव ‘प्रेम’, ‘धन’ आणि ‘यश’ असे
सांगितले. ह्यावर आश्चर्य व्यक्त करता, नवऱ्याने ‘यशासाठी’ तर बायकोने ‘धनासाठी’
होकार दर्शविला. ह्याचा मागोवा घेत त्यांच्या सुनेने ‘प्रेम’ प्रथमत: घरात यावे असा
आग्रह धरला. त्यांच्या चर्चेअंती ‘प्रेम’ ह्या व्यक्तीस त्यांनी आत येण्यास विनंती
केली. परंतु आश्चर्य ते काय! प्रेम ह्या व्यक्तीस घरात आणत असता त्याच्यासोबत
असलेल्या इतर दोन व्यक्ती म्हणजेच यश आणि धन ह्यांनीही त्याला साथ दिली. त्यावर
त्या पती-पत्नीने ह्याचे निरसन विचारले. तेंव्हा त्यांनी सांगितले कि, ‘यश किंवा
धन ह्यापैकी कोणत्याही एकाला जर तुम्ही आत बोलवले असते तर प्रेम आणि त्याच्याबरोबर
आणखी एक व्यक्ती बाहेर उभी राहिली असती; परंतु जेंव्हा प्रेम ह्याला आत पाचारण
केले तेंव्हा त्याच्याबरोबर आम्हां दोघांना जाणे भागच पडते’.
जेथे प्रेम असते तेथे धन आणि यश सदैव टिकून असते.
भौतिकवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या लोकांनी प्रितीपेक्षा धनसंपत्तीस अधिक प्राधान्य
दिले आहे. फक्त धनसंचयच यशप्राप्ती देऊ शकतो असा प्रामाण्यवाद आपल्या मनात घर करून
बसला आहे. परंतु प्रिती किंवा प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे. तेच सर्व यश आणि धनाचे मूळ
आहे.
मनन चिंतन:
देवावर प्रीती करणे
आणि त्याची मात्र सेवा करणे,
ह्यावाचून, “व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ!”
(उपदेशक १:२).
एखादया वस्तूविषयी
मनुष्याला अनावर वासना उत्पन्न झाली की त्याच्या मनाची शांती नष्ट होते. कारण
गर्विष्ठाला आणि लोभ्याला विश्रांती कधीच नसते. पण जे मनाचे गरीब व लीन असतात
त्यांच्या जीवनात सदा शांतीच असते. ते देवाची एकनिष्ठेने सेवा करत असतात.
आजच्या
शुभवर्तमानामध्ये प्रभू आपल्याला सांगत आहे की जे लोभाचे गुलाम बनलेले आहेत, ते
देवाची सेवा करू शकत नाही. ते देवावर प्रीती करु शकत नाही. देवासाठी त्यांच्या
जीवनामध्ये जागा नाही. धनलोभ माणसाला देवापासून दूर नेत असतो. लोभी माणूस
खऱ्याखुऱ्या आनंदाचा व देवाच्या प्रेमाचा अनुभव येऊ शकत नाही. तोच त्याला मिळालेला
मोठा शाप असतो. “We are
not punished for our sins, but by them”. या वचनानुसार लोभी वृत्ती हीच माणसाला मिळालेली जबर शिक्षा आहे.
म्हणून देवाची सेवा व देवावर प्रिती करण्यासाठी प्रभू आपल्याला लोभी वृत्तीमधून
बाहेर पडण्यासाठी सांगत आहे. कारण कोणीही दोन धन्यांची चाकरी करु शकत नाही; तो
एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रिती करील.
आपण
लूकच्या शुभवर्तमानामध्ये येशूचा दाखला ऐकतो, “एका धनवान मनुष्याच्या जमिनीला
चांगल पिक येतं. तेव्हा तो मनात म्हणतो, मी काय करु? कारण माझं पिक साठवायला
माझ्याजवळ जागा नाही. मी माझं कोठार मोठ्ठ बांधीन, आणि त्यात मी माझं सर्व धान्य
आणि माझा माल साठवीन आणि माझ्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षांसाठी पुरेल
इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी आणि आनंद कर. पण देव त्याला म्हणाला, ‘हे निर्बुद्धी, ह्या रात्री तुझ्याजवळून तुझा जीव
मागितला जाईल, मग तू जे काही साठवलं आहेस ते कोणाचं
होईल?’” (लूक १२:१६-२१).
येशू
कधीही म्हणाला नाही की, माणसाकडे मालमत्ता असणे चुकीचे व गैर
आहे. कारण धन भरपूर मिळविणे हा देवाचा आशीर्वाद आहे. पण यदाकदाचित आपलं संपूर्ण
लक्ष धनावर राहिलं तर ते पाप आहे, कारण आपण लोभाचे गुलाम बनतो. आपल्या जीवनात आपण
पाहतो की, आधी आपण गोष्टी मिळवतो, मग आपण त्यांच्यावर अवलंबून राहू
लागतो. नंतर त्यांचा आपल्याला गर्व वाटू लागतो. आपल्याला आणखी संपत्ती मिळवावीशी
वाटते. दुसऱ्यांबरोबर आपण ती वाटू इच्छीत नाही. संपत्तीशी आपले नाते इतके घनिष्ठ
होते की, शेवटी आपली संपत्तीच आपल्यावर मालकी
हक्क गाजवू लागते. देवासाठी आपल्या जीवनात जागाच उरत नाही.
होय, आपले जीवन हे आपल्या संपत्तीपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. पण
याची कधी आपल्याला जाणीव नसते. कारण धनलोभ व लालसा आपल्याला अस्वस्थ करते. ती
लालसा कधीच आपल्या जीवनात तृप्त होत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाविषयी
चिंताग्रस्त होतो व जे आहे त्याच्यात समाधान मानण्याऐवजी जे नाही त्याच्या
प्राप्तीसाठी सतत धडपडत असतो. तसं पाहिलं तर आपण वर्तमानकाळात कधी वावरतच नाही.
एकतर आपण भूतकाळातील आकडेमोडीत गुंतलेलो असतो किंवा भविष्यकाळातील संकल्पात हरवलेलो
असतो. म्हणून आज देऊळ माता आपल्याला वर्तमानकाळाचं पूर्ण भान ठेऊन देवावर विसंबून
राहण्यासाठी सांगत आहे. येशु ख्रिस्त सांगतो, “आपल्या जीवाविषयी चिंता करीत बसू
नको. तर आपल्या गरजेसाठी देवपित्यावर अबलंबून राहा. कारण आपल्या देव पित्याला
आपल्या सर्व गरजा ठाऊक आहेत व तो त्या गरजा पुरवितो.”
ज्याला परमेश्वराचे पूर्ण भान असते, तोच जीवाचा पुरेपूर आस्वाद घेऊ
शकतो. आणि असा माणूस कधीही धनाच्या लोभाचा गुलाम बनत नाही. उलट देवाशी निष्ठेने
वागतो व देवावर संपूर्ण मनाने प्रिती करतो. कारण देवावर प्रिती करणे, आणि त्याची मात्र
सेवा करणे, ह्यावाचून ‘व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ!’ (उपदेशक १:२).
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. आपल्या ख्रिस्तसभेचे
पोप महाशय फ्रान्सिस, सर्व
बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य
करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या
अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. परमेश्वराने
आपल्याला जीवनाची मौल्यवान देणगी दिली आहे, म्हणून आपल्या जीवनात सतत देवाला
प्राधान्य देऊन त्याची सेवा करावी व त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक बळकट
व्हावा म्हणून आपण प्रार्थना
करुया.
३. जगामध्ये जे
धनलोभी आहेत त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी त्यांच्या लोभीपणातून
बाहेर येऊन, देवपित्यावर आपल्या सर्व गरजांसाठी अवलंबून रहावे म्हणून प्रार्थना
करुया.
४. आपल्या
धर्मग्रामातील आजारी, दुःखी
व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचे आजार, दुःख हलके व्हावीत
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. लवकरच दहावी,
बारावीचे विदयार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. परमेश्वराचा कृपा-आशीर्वाद
सर्वांना मिळावा व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना चांगली स्मरणशक्ती
लाभावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
GOOD STORIES
ReplyDelete