Monday, 27 February 2017

Reflection for the Homily of Ash Wednesday (01-03-2017) by Br. Amit D’Britto



राखेचा बुधवार

दिनांक: ०१/०३/२०१७.
पहिले वाचन: योएल २:१२-१८.
दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ५:२०-६:२.
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६,१६-१८.





मानवा, तू माती आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील


प्रस्तावना:
आज आपण राखेचा बुधवार साजरा करत आहोत. हा दिवस ख्रिस्तसभेत खूप महत्वाचा मानला जातो. कारण आजपासून आपण प्रायश्चित काळास सुरवात करत आहोत. आजची उपासना आपल्याला आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास आमंत्रित करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात योग्य पश्चातापासाठी लागणारा दानधर्म, उपवास व प्रार्थना कशी करावी ह्याचे वर्णन केले आहे.
देवाने आपल्याला हे चाळीस दिवस त्याच्या अधिक जवळ येण्यासाठी व जास्तीत जास्त प्रार्थना दानधर्म व अनेक चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे ह्या चाळीस दिवसाची सुरवात आपण योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न करूया.
 ह्या प्रायश्चित काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित करून देवाबरोबर समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा व शक्ती ह्या मिस्साबलिदानात परमेश्वराकडे मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: योएल २:१२-१८.

संदेष्टा योएल ह्याने ख्रिस्तपूर्व ४०० कालखंडात हे लेखन केलेले असावे. त्याच्या पुस्तकात अनेकदा मंदिराचा संदर्भ येतो, म्हणजेच मंदिराची पुनर्बांधणी त्याकाळी पूर्ण झाली असावी. शासन करणारा ‘प्रभूचा दिवस’ उगवेल हि त्याच्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
आजच्या वाचनात संदेष्ट्याने पश्चाताप करण्याचे आवाहन दिव्य संदेशातून केले आहे. संदेष्ट्याने आरंभीच मेंढ्याच्या शिंगाची तुतारी फुंकून सर्व उपासकांना मोठ्या उपवासासाठी पाचारण केले आहे. संदेष्टा लोकांना विलाप, शोक आणि उपवास करण्याचे त्रिविध आवाहन करत आहे; ते सर्व येथे या दिव्य पाचारणात एकवटले आहे. तसेच संदेष्ट्याने मनःपूर्वक पश्चाताप करण्याचे अगत्य, स्पष्टपणे सांगितले आहे. आध्यात्मिकता आत व बाहेर एकसारखी असावी हाच त्याचा आग्रह आहे.
योएलने ‘परत - फिरा’ असे आवाहन केले आहे कारण आपला देव हा कृपाळू, प्रेमळ व कनवाळू आहे. यासाठी आपण सतत देवाशी एकनिष्ठ असावे.  

दुसरे वाचन: करिंथकरास दुसरे पत्र ५:२०-६:२.

मानवाचा देवाशी समेट व्हावा हाच पौलाच्या सेवाकार्याचा हेतू आहे. देवाला माणवाची सर्वात जास्त कळवळा आहे. ख्रिस्ताचा वकील या नात्याने पौल जगातील सर्वच माणसांना हे कळकळीचे आवाहन करतो. आपण सर्व येशूचे दूत आहोत, म्हणून तोच आमच्याद्वारे इतरांनी देवाबरोबर समेट करावा असे आवाहन करत आहे. संत पौल करिंथकरांना येशूविषयी असे सांगतो कि, ख्रिस्ताला पापार्पण असे केले; म्हणजेच आमच्या पापांचा परिणाम त्याला भोगायला लावला.
तसेच संत पौल वाचकांना आवर्जून सांगतो, “तुम्ही देवाची कृपा व्यर्थ स्वीकारू नये”, व त्यांना, “आताच समय अनुकूल आहे” असे स्मरण करून देतो.

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६,१६-१८.

शुभवर्तमानामध्ये आपल्याला दान, धर्म व उपवास ह्या यहुदी धर्मातील तीन मध्यवर्ती सूत्रावर प्रभू येशू शिकवणूक देत आहे. हे सर्व येशूच्या शिष्यांना व आपणा सर्वांना लागू असल्याचे गृहीत धरले जाते. ह्या वाचनात आपण हे सर्व ‘करावे’ किंवा ‘का करू नये’ ह प्रश्न नसून ते ‘कसे’ व ‘का करावे’ हा महत्वाचा मुद्दा आहे.
आपण दानधर्म व उपवास करत असतांना प्रतिफळ मिळवण्याच्या हेतूने करू नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करू नये. तसेच प्रार्थना करताना निरर्थक बडबड न करता शांतपणे व एकांतात प्रार्थना करावी. तसेच आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा तो लोकांना न दाखवता एकांतात वास करणाऱ्या देवाला दिसला पाहिजे; म्हणजे आपला अदृश्य पिता आपणास उघडपणे त्याचे प्रतिफळ देईल. असे आजचा हा प्रस्तुत प्रतिपादन करत आहे.

बोधकथा :

एकदा विकी हा आपल्या आजोबा सोबत बागेत फिरत होता. फिरत असताना आजोबा विकीला समाजात होत असलेल्या अत्याचार व हिंसा ह्याविषयी सांगत होते. तेव्हा विकी आजोबांना प्रश्न विचारतो कि, “तुम्हाला ह्या हिंसा व अत्याचाराबद्दल काय वाटते?” तेव्हा आजोबा उत्तरतो, “मला असे वाटते कि, माझ्या हृदयात दोन वाघ भांडण करत आहेत. त्यामधील एक वाघ हा रागीट, खुन्नसी आणि हिंसक आहे; तर दुसरा वाघ हा प्रेमळ क्षमाक्षील आणि दयाळू आहे.” विकी परत विचारतो, “त्यामधील कोणता वाघ यशस्वी ठरेल.” आजोबा म्हणतो, “ज्या वाघाला मी अधिक प्रोस्ताहित करतो तोच यशस्वी होईल.”
प्रभू येशू म्हणतो, “आपल्या शत्रूवर प्रेम करा व त्यांना क्षमा करा.” तर ह्या उपवास काळात आपल्या हृदयातील प्रेमळ व दयाळू वाघाला अधिक प्रोस्ताहित करा व आपल्या सर्व दुर्गुनांवर मात करण्याचा प्रयत्न करा कारण हे यश आपल्या वरच अवलंबून आहे.
 
मनन चिंतन:

प्रायश्चित काळ किंवा उपवास काळाची सुरवात राखेच्या बुधवारी, राख कपाळावर फासून होते. हा चाळीस दिवसाचा आध्यात्मिक प्रवास आहे व तो पुनरुत्थानाच्या दिवशी समाप्त होतो. ह्या चाळीस दिवसाच्या कालावधीत ख्रिस्तसभा आपल्याला योग्य असा वेळ देऊन आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूकडे परत येण्यास संधी देत असते. येशूने सुद्धा ४० दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इथेच आहे, या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व पुनरुत्थानाची तयारी करत असतो.
कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंत:करणातून करायच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्यचिन्ह आहे. आज राखेला आशीर्वाद देऊन ती प्रत्येकाच्या कपाळावर फसली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू पापी आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील.”(उत्पती ३:१९), किंवा पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात. खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंस आणि नश्वरता! परंतु पास्काच्या (इस्टर) अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनाचं प्रतिक मानले गेलेले आहे.
राख हि आपल्याला, मानवी जीवन हे मर्यादित आहे ह्याची आठवण करून देते. म्हणूनच प्रायश्चित काळ आपल्याला तीन नाते बळकट करण्यास आमंत्रित करीत आहे. ते म्हणजेच: आपले देवाबरोबरचे सबंध, आपले स्वतःबरोबर असलेले सबंध आणि आपले दुसऱ्या बरोबरचे सबंध. आजची पवित्र शास्त्रातील वाचने आपल्याला हे सबंध मजबूत करण्यासाठी तीन मार्ग दाखवत आहे : प्रार्थना, उपवास आणि दानधर्म.
अ) प्रार्थना: प्रार्थना आपल्याला देवाबरोबर योग्य असे नाते प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. संत अंम्ब्रोस म्हणतात कि, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही देवाशी बोलता  आणि जेव्हा बायबल वाचता तेव्हा देव तुमच्याशी बोलतो.” प्रार्थना हि दुतर्फी वाहतूक होय. आपण ‘देवाशी बोलणे’ व ‘ऐकणे’ आवश्यक आहे. प्रायश्चित काळ हा परमेश्वराचा संदेश ऐकण्यास व त्याचाशी योग्य असे संभाषण करण्याचा काळ आहे. कारण प्रभू येशू हा आपल्याला त्याद्वारे पवित्र मार्ग दाखवून आपले तारण करण्यास प्राप्त करत असतो. आपल्याला जर वेळ नसेल किंवा आपण व्यस्त असाल तर देवाला सुद्धा आपल्यासाठी वेळ नसल्याचे आपणाला समजते. प्रार्थनेमुळे आपण कोण आहोत आणि देव कोण आहे ह्याची आपल्याला जाणीव होते. आपण ‘शारीरिक भूक’ व ‘धार्मिक भूक’ ह्या दोघांवर लक्ष देणे आवश्यक आहे.
आ) उपवास: उपवास हा आपल्याला स्वतःबरोबर असलेले सबंध चांगले करण्यास मदत करते. बिशप फुल्टन शीन पुढील तीन शब्दांमध्ये फरक स्पष्ट करतात: ‘उपवास’, ‘पथ्य’ आणि ‘उपासमार’. पथ्य म्हणजेच नेमुन दिलेला विशिष्ट आहार होय. उपासमार म्हणजे अन्नाची कमतरता. परंतु उपवास मात्र आपण स्वतः धार्मिक कारणास्तव आपले संबंध सुधारवण्यासाठी हाती घेतलेला निर्णय असतो. म्हणूनच बिशप फुल्टन शीन म्हणतात कि, जग पथ्य करत आहे; समाज उपाशी आहे परंतू ख्रिस्तसभा उपवास करत आहे.
इ) दानधर्म : दानधर्म आपल्याला दुसऱ्यांविषयी विचार करण्यास प्रोत्साहन देते. तसेच आपल्याला असे समजुन येते कि, या जगातील सर्व संपत्तीचा खरा हक्क देवाकडे आहे. प्रभू परमेश्वर हाच सर्व पृथ्वीवरील राजा आहे. त्यामुळे संपत्ती, मालमत्ता, सोने व धन हे स्वतःसाठी न ठेवता आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा वापरले पाहिजे. कारण ‘दिल्यानेच आपल्यास मिळते व अनंतकालीन आनंद प्राप्त होतो असे संत फ्रान्सिस असीसिकर म्हणतात.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.

१. आपले पोपबिशप्सधर्मगुरूधर्मभगिनी ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य दयावे तसेच ह्या उपवास काळामध्ये त्यांनी उपवासाचेप्रार्थनेचे व दानधर्माचे महत्व आपल्या दररोजच्या जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
३. या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण सर्वांनी ह्या प्रायश्चित काळात पापांपासून दूर राहून चांगले पवित्र जीवन जगावे व दुसऱ्यांना योग्य अशी मदत, प्रेम व क्षमा करावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी मांडूया.


No comments:

Post a Comment