Reflection for the Homily of 5th Sunday of Lent (02-04-2017) by Minin Wadkar.
उपवास काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०२/०४/२०१७.
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.
शुभवर्तमान : योहान ११:१:४५.
'मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो
तो मेला असेल तरी जगेल.'
प्रस्तावना:
आज आपण उपवास
काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूच्या पुनरुत्थानावर
मनन चिंतन करण्यासाठी बोलावीत आहे.
पहिल्या वाचनात
आपण ऐकतो कि, इस्रायल लोकांची पापे व वाईट जीवन बाजूला सारून परमेश्वर देवाने
त्यांची पाठराखण केली व चांगले जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित केले. संत पौल
सांगतो कि बाप्तीस्म्यामुळे आपण सारे ख्रिस्ती भाविक ख्रिस्तामध्ये जीवन जगत आहोत.
हे ख्रिस्ती जीवन आपल्याला नवीन जीवन देते. तर शुभवर्तमानात येशूने लाजरसला
मरणातून उठवून त्याला पुनरुत्थित जीवन प्राप्त करून दिले ह्याचा वृतांत ऐकतो.
लाजरसला मरणातून
उठूवून येशू ख्रिस्त स्वत:च्या पुनरुत्थानाबद्दलचे भाकीत करत आहे. जर आपण
येशूमध्ये राहिलो, येशू सारखे जीवन जगलो तर आपले जीवन फलदृपी होऊ शकते. ह्यासाठी
लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होत असताना परमेश्वराकडे
मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४
जेव्हा
यहेज्केलने राजा जोकिम बरोबर बाबीलोनला हद्दपार केले तेव्हा यहेज्केल येरुशलेम
मंदिराचा याजक होता. बाबिलोनमध्ये असताना त्याने लोकांची पापे, वाईट कृत्ये
नजरेसमोर आणली व त्यांच्या जीवनात सुदैवाचे सावट येईल असे भाकीत करतो. येरुशलेम व
तिचे मंदिर बाबिलोनच्या हाती नष्ट होणार व शिल्लक राहिलेले सर्व काही साहित्य,
मालमत्ता ते त्यांच्या ताब्यात नेतील. याचे कारण म्हणजे, इस्रायल लोकांनी देवाला
नाकारले होते. असे असूनही, यहेज्केल यिर्मया संदेष्टाप्रमाणे लोकांना स्फूर्ती
देतो. परमेश्वर देव त्यांचा पुन्हा एकदा स्विकार करणार व त्यांच्यामध्ये वास्तव्य
करणार असे तो सांगतो (३६:२५).
यहेज्केलच्या
पुस्तकातून घेतलेले हे वाचन किंवा ओव्या प्रोस्ताहन व आशेने भरलेले आहे. यहेज्केल संदेष्ट
देवाचे शब्द बोलतो. देवाचे वर्णन करीत असताना तो म्हणतो इस्रायल लोकांना
पुनरुत्थित करून नवीन जीवन देणार आहे. इस्रायल लोक नैराश्याने जीवन जगत होते.
परंतु परमेश्वर देव म्हणतो कि, मी तुम्हांला नवीन जीवन देईन. सर्व गुलामगिरीचे
जीवन नष्ट करीन. जरी इस्रायल लोकांनी देवाला नाकारले तरीदेखील ते देवाने निवडलेली
लोक होती. परमेश्वराचा आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करील आणि त्यांच्या जीवनाला
नवीन दिशा प्राप्त होईल. बंदिवासातील जीवन नष्ट होऊन त्यांना परमेश्वर देव त्यांची
भूमी त्यांना परत मिळवून देणार आहे. शेवटी लोकांना जाणीव होणार कि देवाने
आम्हासाठी महत्कृत्ये केलेली आहेत.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.
संत पौल
सातत्याने मानवी देहाचा उल्लेख करतो. जे देहस्वभावाचे आहेत त्यांना देवाला प्रसन्न
करता येत नाही. कारण हे देहस्वभावी लोक पापांत गुरफटून जातात. त्यांना धार्मिक
जीवनाचा किंवा देवाचा विसर पडत असतो. अशावेळी ते देवाचा अपमान करतात.
ख्रिस्ती
लोकांना उद्देशून पौल सांगतो कि तुम्ही ख्रिस्तामध्ये स्नानसंस्काराद्वारे तुमच्या
पापाला मेलेले आहात. पौल सांगतो (रोम ६:३-४) कि, “तुम्हांला माहित नाही कि, ज्या
आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे त्याच्या मरणातही आपला समावेश
करण्यात आला आहे. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तीस्म्याने त्याच्याबरोबर पुरले
गेलो यासाठी कि, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे
आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
बाप्तीस्माद्वारे
आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळाले आहे. म्हणूनच देवाचा आत्मा आम्हांमध्ये
वास्तव्य करतो व आम्ही देहाचे नसून आत्म्याचे होतो. परंतु जर कोणाला ख्रिस्ताचा
आत्मा नसेल तर तो ख्रिस्ताचा होऊ शकत नाही. संत पौल येथे ‘देवाचा आत्मा’, ‘आत्मा’,
ख्रिस्ताचा आत्मा’, आणि ‘ख्रिस्त’ अशी वेगवेगळी परिभाषा (शब्द) वापरतो. या
सर्वांचा अर्थ म्हणजे बाप्तिस्मा स्वीकारलेल्या लोकांमध्ये देवाचे अस्तिव. पाप,
अप्रामाणिकपणा व इतर दुष्कर्मे इत्यादी मुळे आपण देवापासून दूर जात असतो. तरी
देखील आपल्याला येशू ख्रिस्त स्वत:मध्ये स्वीकारून आपलं जीवन फलद्रूपी करत असतो.
कारण देवपित्याने येशूला मरणातून उठवून ख्रिस्ती लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ती जीवन
जगण्याचे आश्वासन देतो. आपल्याला नवीन जीवन मिळेल.
शुभवर्तमान: योहान ११:१:४५
संत योहान येथे येशूचे
शेवटचे व सर्वात महान कृत्य दर्शवितो. ह्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे येशू हा ‘मसीहा’
असून तो ‘देवाचा पुत्र’ आहे आणि दुसरे म्हणजे मुख्य याजक आणि परुशी ह्यांना
त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देणे. हे येशूचे महान कृत्य येरुशलेमपासून थोड्याच
अंतरावर घडून आले. ह्यामुळे ह्याची चाहूल परुशी ह्यांना लागली होती (११:४६). त्यांनी
आपली बैठक घेऊन येशूला कसे जीवेशी मारायचे ते ठरवले. येशूला व्हलांडन सणाच्यावेळी
मारले जावे अशी देवपित्याची इच्छा होती. येशूने पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही
केले होते. येशूने प्रामाणिकपणे देवपित्याचे कार्य केले होते.
देवाच्या गौरवासाठी आजार
या अध्यायात येशू ख्रिस्ताचे ‘देवत्व’ दाखविणारे
एक अति महत्वाचे चिन्ह आहे. ‘लाजरस’ या
नावाचा अर्थ ‘देव
मदत करतो.’ येशूची
लाजरसच्या कुटुंबावर प्रीती होती. येशू सर्वसमर्थ आहे हे
ह्या घराण्यातील सर्वांना ठाऊक होते म्हणूनच येशू ख्रिस्ताचे अधिक गौरव या
कुटूंबात प्रकट झाले. लाजरस जेव्हा आजारी पडला तेव्हा लाजरसाच्या
बहिणींनी येशु ख्रिस्ताकडे निरोप पाठविला, “प्रभुजी
ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. त्याच्या आजाराविषयी ऐकताच
येशु ख्रिस्ताने आश्चर्यचकीत विधान केले: या आजाराचा शेवट मरण नसून देवाच्या
पुत्राचा गौरव व्हावे ह्यासाठी आहे”.
मी पुनरूस्थान
आहे
येशू ख्रिस्त आला तेव्हा लाजरसला मरून चार दिवस
झाले होते व यहुदी लोक शोक करीत होते. असे कोणालाच वाटत नव्हते कि येशु लाजरसला
मरणातून पुन्हा उठवेल. ख्रिस्ताला फक्त माहित होते. म्हणूनच येशु मार्थाला
उद्देशून म्हणतो, “तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्थाला खात्री होती कि जर येशु ख्रिस्त
तेथे असता तर तिचा आजारी भाऊ मेला नसता. प्रभू त्या समयी तेथे नव्हता याचे तिला
अतोनात दु:ख झाले होते. तिचा भाऊ पुनरुत्थान दिवशी नक्की उठेल याची तिला खात्री
होती कारण ‘पुनरुत्थानाचा प्रभू’ प्रत्यक्ष तिच्या समोरच उभा होता.
येशू
रडला
मार्था येशूला भेटली. व येशु
येताच मरियासुद्धा धावत येऊन येशूच्या पाया पडली. या भावाच्या आजारात त्या दोघींनी
येशूची खूप वाट बघितली होती. तिचे रडणे पाहून इतरही रडू लागले. येशु सुद्धा
त्यांच्याबरोबर रडला. हे येशूचे रडणे हे त्याचे प्रेम होते. येशु ख्रिस्ताने जे
प्रेम वधस्तंभावर प्रकट केले ते सर्व जगावर असलेले प्रेम दिसून आले. त्या प्रेमाने
येशूने पापाची व मरणाची सत्ता मोडली.
विश्वास
ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील
या प्रभूच्या शब्दांनी मार्था
व मारियाच्या मनाची तयारी झाली. येशु
ख्रिस्ताने धोंड काढलेल्या गुहेसमोर प्रार्थना केली; देवपित्याने येशूची प्रार्थना
ऐकली त्याबद्दल येशूने पित्याचे आभार मानले. तेही जमलेल्या लोकांनी विश्वास धरावा
ह्यासाठी येशूने हे अदभूत कार्य केले. ‘लाजरस बाहेर ये’ हे ऐकताच त्या मेलेल्या माणसाने
त्याची हाक ऐकली व तो जिवंत होऊन बाहेर आला. त्याला पूर्वीचे शरीर होते.
मनन चिंतन:
मेलेल्यांतून
पुन्हा जिवंत व्हावे असे साहजिकच प्रत्येकाला वाटत असते. जेव्हा एखादी आवडती,
प्रिय किंवा घरातील व्यक्ती मरण पावते, तेव्हा आपल्याला फार दु:ख होते. ‘देवा तू
त्याला वाचवले असते तर खूप बरे झाले असते’ असे आपण खऱ्या अंतकरणाने देवाकडे विनवणी
करत असतो.
येशुचे मार्था, मारिया
आणि लाजरसवर अपार प्रेम होते. लाजरसच्या मरणावर
मार्था व मारिया ह्यांनी खूप शोक केला. ह्या कारणामुळे त्यांना खूप वाईट
वाटले होते. येशू जर तेथे असता तर लाजरस मेला नसता असा त्यांचा विश्वास होता.
परंतु लाजरसच्या मरणाला चार दिवस झाले होते. येशू चार दिवसानंतर मार्थाच्या घरी
आला होता. लोकांनी लाजरस मेला आहे असे गृहीत धरले होते. लाजरसच्या शरिराला वास येत
होता. देवाचे वाचन आपल्याला सांगते, ‘देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ (लुक
१:३७). ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल’
(योहान ११:२५). हे शब्द जेव्हा मार्था व मारियाने ऐकले तेव्हा त्यांचा विश्वास
वाढला. व येशूने लाजरसला नवीन जीवन म्हणजेच पुनरुत्थान दिले. ‘लाजरस बाहेर ये’ असे
जेव्हा येशूने मोठ्याने म्हटले तेव्हा मरण पावलेला लाजरस खडग्यातून बाहेर आला व
त्याला नवीन पुनरूत्थानाचे जीवन प्राप्त झाले. मार्था, मारिया व इतर लोकांचा
येशुवरील विश्वास वाढला व त्यांनी देवाचे गौरव गायले.
ख्रिस्तीधर्मात
पुनरुत्थानाला फार महत्व आहे. येशू म्हणतो, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो
माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल” (योहान ११:२५). याचा अर्थ असा कि आमच्या
मरणानंतर आमचे पुनरुत्थान हे येशूच्या सानिध्यात आम्हांला प्राप्त होईल. मरण हि
अशी बाब आहे कि तिला कोणीही पाठ फिरवू शकत नाही. मरण हे सर्वांना येणार आहे. परंतु
मरणानंतर काय? असा प्रश्न जेव्हा व्यक्तीला पडतो तेव्हा ती व्यक्ती देवाकडे विनवणी
करते कि हे देवा मला स्वर्गात ने. माझ्या विश्वासाला तुझ्या स्वर्गाचे दार उघडे कर
जेणेकरून मला सदैव तुझ्या संगतीत राहावयास मिळेल.
संत अगुस्तीन
म्हणतात, ‘ज्या परमेश्वर देवाने मला निर्माण केले आहे तो देव माझ्या सहकार्याशिवाय
माझे तारण करू शकणार नाही’. याचा अर्थ असा कि मी स्वत: काहीतरी केले पाहिजे. ‘तर
पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नितीमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे
त्या बरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील (मत्तय ६:३३).’ जेव्हा आम्ही
देवाच्या आज्ञेप्रमाणे चालतो तेव्हा आमचे पुनरुत्थान होत असते. म्हणजेच आपल्याला
देवाचा खरा अनुभव येत असतो.
इस्रायल लोक
त्यांच्या वाईट कृत्यामुळे देवापासून दूर जात होते. यह्ज्केल संदेष्ट त्यांना प्रभूचे
वचन देतो. ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हांला त्यातून बाहेर काढल्यावर
त्यांना कळेल कि मीच परमेश्वर आहे. मी तुमच्यात माझा आत्मा ओतीन म्हणजे तुम्ही
पुन्हा जिवंत व्हाल’ (यहेज्केल ३७:१२-१४). पुन्हा जिवंत होणे म्हणजे प्रभूचा मार्ग
स्वीकारणे होय. संत पौल सांगतो कि, “तुम्हाला माहित नाही का कि ज्या आपण प्रभू
येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होतात त्या आपल्या त्याच्या मरणातही
बाप्तिस्मा झाला. म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तीस्म्याने त्याच्या बरोबर
पुरले गेलो यासाठी कि, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला
तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे (रोम ६:३-४).
येशूचे ‘लाजरसला
मरणातून उठवणे’ हे त्याचे मोठे कार्य त्याच्या स्वत:च्या पुनरुत्थानाबद्दल सुद्धा
आपल्याला सांगते. येशू सुद्धा मरणार व तिसऱ्या दिवशी मरणातून उठणार असे देवाचे वचन
आपल्याला सांगते. आपले पुनरुत्थान हे देवाच्या हाती आहे. देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी
प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला देवावर विश्वास ठेवण्याची अत्यंत गरज आहे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे
प्रभो, आमची
प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु, महागुरू, सर्व धर्मगुरू व
व्रतस्थांनी आपल्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास
मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित
काळात आपण सर्वांनी आपल्या पापांना मरून प्रभूठायी पुनरुत्थित जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे तरुण-तरुणी नोकरीच्या
शोधात आहेत त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर
परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ज्या व्यक्ती आजारी, निराशीत आणि दु:खी कष्टी आहेत अशा सर्वांना प्रभू-प्रेमाचा स्पर्श
व्हावा व त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू
या.
६. थोडा वेळ शांत
राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना
करूया.