Reflection for the Homily of 2nd Sunday of Lent (12-03-17) By Brendon Noon
उपवास काळातील दुसरा रविवार
दिनांक – १२-०३-१७.
पहिले वाचन – उत्पत्ती १२:१-४.
दुसरे वाचन – तिमथीला दुसरे पत्र
१:८-१०.
शुभवर्तमान – मत्तय १७-१-९.
"हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे."
प्रस्तावना:
आज आपण उपवास काळातील दुसरा रविवार साजर करीत आहोत. आजची उपासना
येशूचा संदेश जगाच्या काना-कोपऱ्यात पसरविण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
पहिल्या वाचनात आपण ऐकणार आहोत कि, अब्राहाम देवाच्या हाकेला
प्रतिसाद देतो व देवाने सांगितल्याप्रमाणे वागतो. दुसऱ्या वाचनात संत पौल तिमथीला
देवाची सुवार्ता पसरवण्याचे कार्य अखंड चालू ठेवण्यासाठी बोध करतो. तर प्रभू
येशूचे रुपांतर व शिष्यांना प्रभू येशूचे गौरवमय प्रकाशाचे दर्शन ह्याबाबत आजच्या
शुभवर्तमानात आपण ऐकतो.
देवाचे पाचारण हे आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर अवलंबून नव्हे तर ते
सर्वस्वी देवाच्या कृपेवर अवलंबून असते. अब्राहमाची देवावरील अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ता प्रसाराची
जिद्द आपल्यात निर्माण व्हावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन – उत्पत्ती १२:१-४.
सर्वसमर्थ परमेश्वर आब्राहामास सांगतो कि, तुझ्या
पूर्वजांची जमीन व तुझा देश सोडून मी दाखविन त्या देशात जा. परमेश्वराने
आब्राहामाला पटवून दिले होते कि, मी तुझा खरा देव आहे.
म्हणून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आब्राहम सर्व काही सोडून विश्वासाने दुसऱ्या
देशात निघून जातो. अब्राहाम आपल्या जीवन श्रद्धेद्वारे आपण कशाप्रकारे प्रभू
येशूचे अनुकरण केले पाहिजे याची साक्ष देतो.
दुसरे वाचन – तिमथीला दुसरे पत्र
१:८-१०.
तिमथीला हे दुसरे पत्र लिहित असताना पौल रोम येथे तुरुंगात होता.
यावेळी आपली सुटका होणार नाही व आपण लवकरच मरणार आहोत याची पौलाला खात्री होती
म्हणुन हे पत्र लिहिले आहे. ह्या पत्रात पौलाने, प्रभूचे कार्य पुढे चालू
ठेवण्यास तिमथिला उत्तेजन दिले आहे.
पौल तिमथीला आठवण करून
देतो कि, या
दानाचा उपयोग देवाची घोषणा करण्यासाठी कर व हे देवाचे पवित्र पाचारण तुला मोफत
मिळाले आहे म्हणून देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी मागे पडू नको. प्रभू येशू
ख्रिस्ताद्वारे देवाचा प्रकाश व सुवार्ता प्रकट झाली आणि ती पसरविण्यासाठी प्रभू
येशू प्रत्येकाला पाचारण करीत आहे.
शुभवर्तमान – मत्तय १७-१-९.
जुन्या करारात देवाने अब्राहामाबरोबर करार केला होता. ‘तुझी
संतती रेतीप्रमाणे वाढवीन, तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे
आशीर्वादित होतील.’ मत्तय शुभवर्तमानात येशूची वंशावळ थेट
अब्राहमापासून दाखवतो. म्हणजेच अब्राहामाला देवाने जे वचन दिले होते त्याची
पूर्तता शुभवर्तमानात झाली आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू प्रार्थना करीत
असताना त्याच्यात कायापालट होतो व त्याचा चेहरा प्रकाशित होतो. त्याचे कपडे पांढरे
शुभ्र होतात. त्या ठिकाणी प्रभू येशू ‘देव’ आहे ह्याचे चिन्ह ह्या रुपांतराद्वारे
स्पष्ट होते.
मनन चिंतन:
आजची
तिन्ही वाचने आपणा सर्वांना येशुची सुवार्ता पसरविण्यासाठी व इतरांची विश्वासात
वाढ करण्यास पाचारत आहे. आपणा सर्वांचा विश्वास बळकट व्हावा व आपल्या जीवनाद्वारे
आपणही इतरांना खिस्ती विश्वासात वाढवण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. आपणा सर्वांचा
विश्वास हा छोट्या झुडूपासारखा नव्हे तर मोठ्या वृक्षासारखा हवा जेणेकरून कितीही
पाउस किंवा वादळं आली तर वृक्ष पडणार नाही कारण विश्वासात वाढत असताना आपल्याला भरपूर
संकटाना तोंड द्यावे लागणार आहे.
आपण
पहिल्या वाचनात ऐकले आहे की, देवाने आब्राहामाला पाचारण दिले. देव आब्राहामाला
सांगतो कि, तू आपला देश आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या
देशात जा. आब्राहम देवावर विश्वास ठेवतो व देवाच्या वचनावर विश्वास ठेवूनच देवाने
सांगितल्याप्रमाणे वागतो.
आज आपण
पाहतो कि, कितीतरी धर्मबंधू, धर्मभगिनी व धर्मगुरु प्रभूच्या मळ्यात काम करत आहेत.
त्यांनीही देवाच्या पाचारणाला प्रतिसाद दिला आहे. त्यांनीही देवाची सुवार्ता
पसरवण्यासाठी आपले घर, नातेवाईक व देश सोडले आहेत व आज जगाच्या कानाकोपऱ्यात
देवाची सुवार्ता पसरवित आहेत. जेंव्हा त्यांना देवाचे पाचारण आले तेव्हा त्यांनाही
वाटले असेल कि, आम्ही का घर व नातेवाईक सोडावे? परंतु देवाच्या वचनावर विश्वास
ठेवला व आब्राहामासारखे सर्वकाही सोडून
प्रभूच्या मळ्यात येशूची सुवार्ता पसरविण्याचे काम करत आहेत. घर नातेवाईक व देश
सोडणे इतके सोपे नव्हते त्यांनीही खूप विचार केला असेल किंवा समस्यांना तोंड
द्यावे लागले असेल परंतु ते विश्वासात आब्राहामासारखे मजबूत होते म्हणून त्यांनी
देवाच्या पाचारणाला प्रतीसाद देऊन आब्राहामासारखे सर्व सोडून देवाने सांगितलेल्या
वचनाचे पालन करीत आहेत.
आजच्या शुभवर्तमानात
येशूच्या रुपांतराविषयी आपण ऐकलेच आहे. येशूने आपल्या बरोबर त्याचे जवळचे तीन शिष्य
एकत्र घेऊन डोंगरावर गेला. कोण आहे हे तीन शिष्य ? ते आहेत पेत्र, याकोब आणि त्यांचा भाऊ योहान.
येशु जेंव्हा कोठेही गेला तेव्हा हे तिघे येशु बरोबर होते. जेंव्हा येशूने त्यांना
डोंगरावर एकांती जागी नेले तेव्हा काय झाले हे आपल्याला ठाऊकच आहे. त्याची वस्त्रे शुभ्र झाली, मुद्रा सूर्यासारखी
तेजस्वी झाली व मोशे व एलिया त्याच्याशी संभाषण करीत असलेला त्याच्या दृष्टीस पडले
व त्यांनी येशूला विनंती केली कि आपण येथे तीन मंडप बांधू व येथेच राहू.
जेंव्हा आपल्याला देवाचा अनुभव येतो किंवा
देवाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला वाटते कि, आपण जिथे देवाच्या सहवासात
आहोत तिथेच रहावे. आपल्याला वाटत नाही कि, हे वृत्त दुसऱ्यांनाही कळावे किंवा याची
दुसऱ्यांनाही जाणीव व्हावी. परंतु येशु ख्रिस्त आपणा प्रत्येकाला सांगत आहे कि, जो
अनुभव तुम्ही घेतला. त्या विश्वासात तुम्ही इतरांनाही घेऊन या व दुसऱ्यांनाही त्याचा
अनुभव घेऊ दया.
आपण सर्वांनी ऐकले असेलच कि, पूर्वी मठवासी
मठामध्येच राहायचे; ते चार भींतींमधेच असायचे त्याचं ध्येय एकच होतं: “Ora Et
Labora” (प्रार्थना आणि काम). ते लोकांमध्ये मिसळत नव्हते. परंतु १२ व्या शतकात
असिसिकर संत फ्रान्सीसला देवाचे पाचारण मिळाले व जेंव्हा त्यांनी देवाचा अनुभव
घेतला तेव्हा त्यांनी मठवास्यांसारखे जीवन न जगता, लोकांमध्ये रममाण झाले व देवाची
सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली.
आपणही
आपल्याला दिलेल्या पाचारणाला प्रतिसाद दिलेला आहे व आपापल्या परीने आपण येशूची
सुवार्ता पसरवित आहोत. परंतु या उपवासकाळात आजची उपासना पुन्हा एकदा आठवण करून देत
आहे कि, जो विश्वास आपल्याला मिळाला आहे, जो देवाचा अनुभव आपल्याला मिळाला आहे, तो
आपल्यापर्यंतच न ठेवता तो आपण दुसऱ्यांनाही द्यावा. व आपापल्या परीने देवाची
सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवावी म्हणून देव बोलावीत आहे. हे देवाचे कार्य पूर्ण
करण्यासाठी लागणारी कृपा ह्या मिस्साबलीदानात मागुया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू दया
कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरू पोप
फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी त्यांच्यावर
सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत
ह्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या
पापांचा पश्चाताप करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची दया व कृपा अनुभवावी म्हणून
प्रार्थना करूया.
३. आपण सर्वांनी ह्या
जगातील ऐहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व
येशुप्रमाणे आपलेही रुपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. येथे जमलेल्या भाविकांनी
निःस्वार्थीपणे जीवन जगून आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे व उदार
मनाने आपल्या शेजाऱ्याची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या सामाजिक व
वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment