Reflection for the Homily of 3rd Sunday of Lent (19-03-2017) By Br Camrello Dimekar
उपवास
काळातील तिसरा रविवार
दिनांक: १९-०३-१७.
पहिले वाचन: निर्गम १७:३-७.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र
५:१-२,५-८.
शुभवर्तमान: योहान ४:५-४२.
“सार्वकालिक
जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा”
प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा उपवास
काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. देवावर संपूर्ण मनाने आणि अंत:करणाने
विश्वास ठेवल्यास आपण देवाने दिलेल्या दानांचे वाटेकरी होतो.
पहिल्या वाचनात देव
लोकांसोबत प्रत्यक्ष राहून व मोशेच्या मध्यस्थीने दगडातून पाणी काढून लोकांची तहान
भागवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस सांगत आहे कि, ख्रिस्ताच्या मरणाद्वारे
आपण नीतिमान झालो आहोत. तर शुभवर्तमानात शमरोनी स्री व येशू ह्यांच्यातील
सार्वकालिक जीवनावश्यक संवाद ऐकावयास मिळतो.
जेव्हा देवावरील आपला
विश्वास वाढतो तेव्हा आपल्याला दैवी दानांची प्राप्ती होत असते. देवावरील विश्वास
आणि श्रद्धा आपल्याला देवाचे मिशनरी किंवा प्रचारक बनवतात आणि अनेक लोकांना
देवाच्या प्रेमाचे स्मरण करण्यास सहाय्यक ठरतात. आजच्या ख्रिस्तयागामध्ये आपणास
दैवी दानांची देणगी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन – निर्गम १७:३-७
इस्त्रायली लोक जे देवाने
निवडलेले होते, ते मिसर देशात दुःख सहन करत होते. देव मोशेच्या नेतृत्वाखाली
त्यांना कनान देशात आणतो पण देवाने केलेल्या ह्या कृत्यांची त्यांना आठवण राहत
नाही आणि ते देवाविरुद्ध कुरकुर करू लागतात कारण त्यांना प्रवासात पिण्याच्या
पाण्याचा अभाव असतो. हि जनता जेव्हा मोशेकडे पाण्यासाठी तक्रार करते. तेव्हा मोशे
देवाकडे विनवणी करून त्यांना खडकातून पाणी काढून देतो. ह्या ठिकाणाला ‘मस्सा आणि
मरीबा’ हे नाव ठेवले गेले. कारण इस्त्रायली लोकांनी ‘देवाच्या उपस्थितीची’ परीक्षा
घेतली. हि गोष्ट आपल्याला इस्त्रायली लोकांचा देवावर पोकळ विश्वास आहे असे
दर्शवतो.
दुसरे वाचन – रोमकरांस पत्र ५:१-२,५-८
प्रस्तुत उताऱ्यात संत पौल
लोकांना त्यांनी स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धा आणि विश्वास ह्याकरीता धैर्य
देतो. कारण त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. देवाचे प्रेम
त्यांच्यासाठी आशेचा पाया ठरणार आहे. जेव्हा आपण पापी होतो तेव्हा स्वर्गीय पित्याने
ख्रिस्त आपल्यासाठी भूतलावर पाठवला व ख्रिस्ती जीवनाचा स्वीकार करून आपल्या पापांची
क्षमा झालेली आहे असे संत पौल आपल्याला सांगत आहे.
आपण देवाचे प्रिय लेकरे
झालेलो आहोत. देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ख्रिस्ती जीवन प्राप्त करून
दिले आहे. म्हणून आपण आनंद केला पाहिजे. आपल्याला अभिवचन दिले गेले आहे कि, आपण येशूसोबत
सार्वकालिक जीवनात प्रवेश करू. अगदी योग्य वेळेला ख्रिस्त मनुष्य झाला म्हणून आपण
ख्रिस्ताद्वारे उंचावले जाणार आहोत.
शुभवर्तमान – योहान ४:५-४२.
यहुदियांमधून गालीलात
जाण्यासाठी दोन वाटा होत्या. यार्देनच्या पूर्व बाजूने विदेशी यांच्या देशातून
जाणारी वाट लांब पल्ल्याची होती. जवळची वाट शोमरोनातून होती. तरी ह्याच वाटेने
लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात चालू असे. सामाजिक रितीनुसार एखाद्या स्रीने
विहरीवर एकटेच येणे जगावेगळे होते. कदाचित समाजात तिला नाकारले जात असावे. शोमरोनी
व्यक्तीशी भाषण करणे व एखाद्या स्रीशी भाषण करणे हे यहुदी लोकांच्या दृष्टीने
निषिद्ध होते. येशू आणि शोमरोनी स्री ह्यांच्यामध्ये चर्चासत्र सुरु होते.
शारीरिक तहान भागवण्यासाठी
पाणी ह्या विचारातूनच संभाषण, साहजिकच देवाच्या दानाकडे वळले आणि त्यातून एक
आध्यात्मिक मुद्दा पुढे आला. येशू हा चार चौघांसारखा एक यहुदी आहे असे त्या स्रीला
वाटत होते. पण येशूने तिचा हा समज दूर केला. ‘जर देवाचे दान तुला कळले असते तर तु
मला पाण्यासाठी मागणी केली नसती’. या शब्दांना दुहेरी अर्थ आहे १. झऱ्याचे वाहते
पाणी. २. आत्म्याशी संबंधित असे आध्यात्मिक पाणी. रब्बीच्या (यहुदी धर्मगुरू)
दृष्टीने तोटा (नियमशास्त्र) हेच जिवंत पाणी होते.
मनन चिंतन:
आजच्या पहिल्या वाचनात
इस्त्रायली लोकांच्या सुटकेवेळी घडलेल्या एका महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ दिला गेला
आहे. आपल्या सुटकेच्या प्रवासामध्ये इस्रायली प्रजा तहानेने व्याकूळ होते. अशा
कठीण वेळी मोशे दगडातून पाण्याचा झरा निर्माण करतो आणि त्यांची तहान भागवतो. देव
नेहमी त्याच्या लोकांची काळजी वाहतो याची साक्ष हि घटना देते. मोशेने दगडातून
निर्माण केलेले पाणी हे इस्रायली प्रजेसाठी जीवनाचे प्रतिक होते. आम्हां ख्रिस्ती
बांधवासाठी हेच पाणी स्नानसंस्काराचे प्रतिक होय. ख्रिस्त हा जिवंत पाण्याचा झरा
आहे व स्नानसंस्काराद्वारे आम्ही ह्या जिवंत पाण्याच्या झऱ्यामध्ये न्हाऊन शुद्ध व
परिपूर्ण होत असतो.
आजच्या दुसऱ्या वाचनात आपण
पाहतो कि, देवाचे आम्हावरील प्रेम हे ख्रिस्ताच्या मुक्तीकार्याद्वारे प्रकट झाले
आहे. प्रभू येशूचे दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्याद्वारे देवाने हे प्रेम सिद्ध
केले आहे. हे प्रेम पवित्र आत्माच्या आशीर्वादाने कार्यरत आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू
येशू व शमरोनी स्त्री यांच्यामधील अर्थपूर्ण संवाद प्रस्तुत केला आहे. येथे प्रभू
येशू ख्रिस्त हा आपला मुक्तिदाता आहे याचा अनुभव त्या शमरोनी स्त्रीबरोबरच आपल्या
प्रत्येकाला येतो. ती शमरोनी स्त्री हि साऱ्या भ्रष्ट मानवतेची प्रतिक होती. ती
चुकीच्या मार्गाने प्रेमाचा शोध करत होती. परंतु तिची तहान अतृप्तच राहते. या
स्त्रीला आपल्या बिनशर्त प्रेमाने जीवनदान
देण्यासाठी येशू निर्मळ पाण्याचा झरा बनला. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्याने त्या
स्त्रीला शाश्वत प्रेमाचा अनुभव येतो. आपल्या प्रेमळ आणि सहिष्णू स्वभावाने येशू
त्या स्त्रीच्या हृदयामध्ये परिवर्तनाचे बीज रोवतो. आपल्या जीवनातील ह्या आगळ्या-वेगळ्या
प्रेमळ अनुभवाने ती इतकी भारावून जाते कि, ख्रिस्त प्रभू हे फक्त संदेष्टेच नव्हे
तर साक्षात आपले मुक्तिदाते आहेत याची शुभवार्ता ती आपल्या समाजामध्ये घोषवते.
यानंतर ती स्वतःला संपूर्णपणे देवाच्या स्वाधीन करते. आणि एक आदर्श व नैतिक जीवन
जगते.
उपवासकाळातील ह्या तिसऱ्या
रविवारी प्रभू येशू प्रत्येक श्रद्धावंतासाठी जिवंत व निर्मळ पाण्याचा झरा आहे हे
स्पष्ट होते. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्याशी एकनिष्ठ राहतो त्याला
नक्कीच शमरोनी स्त्री प्रमाणे नवजीवन प्राप्त होते. आपल्या दैनंदिन जीवनातील
अडी-अडचणींवर व मोहावर मात करण्याची शक्ती मिळते. त्या स्त्रीप्रमाणे आपणही प्रभूच्या
शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू हा आमचा तारणकर्ता आहे, हे मान्य करून
स्वतःला संपूर्णपणे त्याच्या स्वाधीन करावे. आपल्या जीवनातील सर्व प्रकारची
तहानभूक भागवण्यात आपले सर्व सुख सामावलेले आहे आणि ते सुख आपल्याला फक्त येशू
ख्रिस्तच देऊ शकतो.
“स्वतःकडे पाहाल तर शंकित
व्हाल, परिस्थितीकडे पाहाल तर निरुत्साही व्हाल, परंतु येशूकडे पहाल तर तुम्ही
सर्वत्र सुरक्षित व समाधानी व्हाल.”
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे
नवजीवन दे.
१. पवित्र मिस्साबालीदान
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपल्या विश्वासाची वाढ होण्यासाठी प्रेरणादाई ठरावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी पवित्र
मिस्साबालीदान व प्रायश्चित संस्कार नम्रपणे स्विकारावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. जे एकांकी आहेत अशांच्या
जीवनात परमेश्वराचा शब्द प्रेरणादायी व सांत्वनकारी ठरावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. ज्यांना स्नानसंकराच्या
पवित्र आत्म्याच्या स्पर्श झाला अशा सर्वांना विनयतेचा आणि सहिष्णुतेचा स्पर्श
व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ज्यांचे अंत:करण आंतरिक
वेदनेने व्याकूळ झाले आहे त्यांनी परमेश्वराच्या शब्दावर अधिक विश्वास ठेवावा व
प्रेमपूर्वक असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया
No comments:
Post a Comment