Wednesday 2 August 2017

Reflection for the Homily of Transfiguration (06-08-2017) by Br. Camrello D'Mekar.

येशू ख्रिस्ताचे रुपांतर


दिनांक: ०६-०८-२०१७
पहिले वाचन: दानिएल ७:९-१०, १३-१४
दुसरे वाचन: १ पेत्र १:१६-१९
शुभवर्तमान: मत्तय १७:१-९







‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे; ह्याविषयी मी संतुष्ट आहे’.


प्रस्तावना:

     ख्रिस्तसभा आज येशूच्या रूपांतराचा सण साजरा करीत आहे. आजचे पहिले वाचन आपल्याला दानिएलला झालेल्या प्रकटीकरणाबद्दल सांगत आहे. प्रकटीकरणाच्या दृष्टांतात पुराणपुरुषाचे वर्णन मानव-पुत्रा सारखे करण्यात आले आहे. त्याच्या हाती सर्व लोक, राष्ट्रे, प्रभुत्व, वैभव व राज्य देण्यात आली आहेत. दुसऱ्या वाचनात पेत्राने अनुभवलेल्या येशूच्या रुपांतराविषयीची शिकवण आपणास पहावयास मिळते. मत्तयलिखित शुभवर्तमानात आपल्याला येशूचे रुपांतर व आकाशातून झालेली दिव्यवाणी, याविषयी ऐकावयास मिळते.
     शिष्यांना प्रभू ख्रिस्ताचे महात्म्य कळले. शिष्यांप्रमाणेच आपल्याही जीवनाचे रुपांतर व्हावे व आपणास ईश्वराच्या दिव्यत्वाची अनुभूती यावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीत आपण मोठ्या श्रद्धेने प्रार्थना करुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: दानिएल ७:९-१०, १३-१४

     दानिएल या शब्दाचा अर्थ ‘देव न्याय करतो’ असा आहे. यहूदा प्रांतातील एका कुटुंबात दानीएलचा जन्म झाला. राजा नबूकटनेझर ह्याने त्याला युद्ध कैदी म्हणून  बाबीलोनात नेले होते. दानीएलला देवाने स्वप्न आणि त्याचा अर्थ स्पष्ट करण्याचा विशेष गुणधर्म दिला होता. दानीएलने पाहिलेल्या दृश्यापैकी पहिले दृश्य हे देवाच्या राजासनाचा दृष्टांत आहे. या दृश्यांत संथ शांतता आणि परम सार्वभौमत्व हेच स्पष्ट दिसते. या आणि पुढील दुसऱ्या दृश्याचा काही संबंध असल्याचे सांगितले नसले तरी श्वापदाचा विनाश आणि इतर श्वापदाची सत्ता मोडणे या मागे देवाचा न्यायनिवाडा असल्याचे स्पष्टपणे ध्वनित केले आहे. दानीएल एका पुराणपुरुषाचा उल्लेख करताना दिसतो. त्या पुराणपुरुषापुढे या जगातील राज्ये अल्पजीवी आहेत. तो पवित्र नीतिमान न्यायधीश आहे.
तिसऱ्या दृश्यात पुन्हा देवाच्या राजसनाचा उल्लेख करण्यात आला आहे. येशू मानव-पुत्रासारखा कोणाला एका पुराणपुरुषाकडे आणले आहे. त्याला त्याजपासून सार्वत्रिक, विश्वव्यापी अधिकार मिळाला. त्या श्वापदांच्या तुनलेत हा खरा मानव आहे. देवाची पवित्रता सहन करण्याची आणि त्याच्या समक्षतेमध्ये राहण्याची शक्ती त्याला आहे.

दुसरे वाचन: १ पेत्र १:१६-१९

    पेत्राला स्वत:च्या भवितव्याविषयीची खात्री होती आणि ह्यामुळे तो त्याच्या वाचकांची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून उत्तेजन देण्याचे कार्य करीत होता. प्रभू येशूच्या सामर्थ्य व समक्षेचा प्रत्यक्ष आलेल्या अनुभवामुळे मानवी कल्पनांनी ऐहिक ज्ञानाने रचिलेल्या गोष्टींचा त्यात काही संबंध नाही. काळ व अवकाश या परिमितीमध्ये येशू प्रकट झाला. येशूचे रुपांतर झाले त्यावेळी देवपित्याकडून आलेली वाणी समक्ष ऐकल्याची साक्ष पेत्राने दिली. येशू ख्रिस्त परत येईल तेव्हा त्याचे दिव्य गौरव पूर्णपणे प्रकट होईल, हे रुपांतराच्या प्रसंगावरून दाखवले आहे.

शुभवर्तमान: मत्तय १७:१-९

     येशूच्या प्रकटीकरणाद्वारे काही शिष्यांना येशूचे राजवैभव पाहण्याचे भाग्य मिळाले. हा सर्व वृत्तांत शिष्यांच्या दृष्टीकोनातून सांगितला आहे. येशू खरोखर कोण आहे ते येथे प्रथम त्यांनाच प्रकट केले आहे. मरणानंतर गौरव आहे आणि तात्पुरते बाजूस सारलेल्या आवरणाच्या पलीकडे डोकावून पाहण्याची विशेष संधी या तीन शिष्यांना मिळाली.
येशू केवळ मानवी ख्रिस्त नाही, तो त्याहून खूप अधिक आहे हे अदभूत प्रकारे पटवून देणारी तीन सूत्रे येथे आहेत. प्रथम येशूचे बदलेले स्वरूप: तेजस्वी, प्रकाशित आणि तेजस्वी मेघ यावरून तो केवळ देवाचा प्रवक्ताच नाही, तो स्वत:च्या ठायी इतर संदेष्ट्याहून वेगळा आहे. दुसरे असे की मोशे व एलिया यांच्याशी त्याचा दुवा जोडला आहे. गतकाळात देवाने आपल्या लोकांचा ज्यांच्याद्वारे उद्धार केला, ज्यांच्याद्वारे त्यांच्याशी भाषण केले अशा सर्वात थोरांपैकी हे दोघे होते. हे दोघे ख्रिस्तयुगाची स्थापना करण्यास पुन्हा परत येणार अशी सर्वांची अपेक्षा होती. तेव्हा येथे ते आल्याने येशू ख्रिस्त असल्याचेच जाहीर झाले आहे. तिसरे असे की, येशूच्या बाप्तीस्म्याच्या  समयी घडले तसे येथेही देवाने स्वत: येशू आपला पुत्र आहे असे ठामपणे सांगितले आहे. आणि त्याच्या शिष्यांनी त्याचे ऐकलेच पाहिजे.

बोधकथा:

     संत थोमस अक्वायनस एक फार मोठे तत्वज्ञानी आणि धर्मपंडित होऊन गेले. ते अतिशय बुद्धीमान व विद्वान होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके धर्मगुरूंच्या शिक्षणात वापरली जातात. मात्र एक दिवस मिस्सा करत असताना त्यांना एक दृश्य दिसले आणि ते इतके भारावून गेले की त्यानंतर त्यांनी आपले लिखाण बंद केले. कोणाशी जास्त वेळ न बोलता ते संपूर्ण वेळ मनन, चिंतन करत राहिले. एक दिवस त्यांना कोणीतरी विचारले की, ‘आपण एवढ चांगल लिहित होता. आपल्या लिखाणाचा अनेकांना आध्यात्मिक फायदा होत होता, तर आपण आता लिखाण बंद का केले?’ त्यावर ते म्हणाले, ‘मी जे स्वर्गीय वैभव पाहिले आहे त्यापुढे माझं लिखाण अगदी क्षुल्लक व सामान्य आहे. मी जे भव्य दिव्य वैभव पाहिले आहे त्याचं वर्णन करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. ते वैभव मी शब्दात सांगूच शकत नाही.

मनन चिंतन:

      स्वर्गीय गोष्टी, दैवी वैभव आपण शब्दाद्वारे व्यक्तच करु शकत नाही. आजच्या प्रभू रूपांतरात तीन शिष्यांनी प्रभूचे जे वैभव पाहिले व अनुभवले ते येशूचे भव्य दिव्य रूप पाहून ते अतिशय भारावून गेले. काय करावं आणि काय बोलावं हे त्यांना सुचलं नाही. त्यांनी पृथ्वीवरच स्वर्ग प्रत्यक्ष पाहिला. पेत्र म्हणाला, ‘प्रभो, आपण येथेच राहू या, हे स्थान चांगलं आहे. मी येथे तुमच्यासाठी, मोशेसाठी, व एलियासाठी तीन मंडप उभे करतो. आपण ह्या स्वर्गीय वैभवातच राहू या. त्यांना ते वैभव हवसं वाटलं.
रुपांतराद्वारे प्रभूला तीन गोष्टी सिद्ध करायच्या होत्या. येशू आपल्या शिष्यांबरोबर तीन वर्षे होता. तो त्यांना उपदेश करत होता व ते त्याचे चमत्कार पाहत होते. परंतु त्यांनी येशूला अजूनही ओळखले नव्हते. तो जिवंत देवाचा पुत्र आहे ह्याची त्यांना जाणीव नव्हती परंतु येशूच्या रुपांतरामध्ये त्याचे भव्य दिव्य रूप आणि स्वर्गीय वैभव त्यांना पाहायला मिळाले. तो दैवी आहे ह्याची त्यांना जाणीवच झाली नाही, तर आकाशातून त्यांनी वाणी ऐकली की, ‘हा येशू माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्या विषयी मी संतुष्ट आहे; तुम्ही त्याचे ऐका.’ तेव्हा त्यांना समजले की येशू हा देवाचा पुत्र आहे. येशू जगाचं तारण करण्यासाठी आला होता. परंतु हे तारण प्राप्त करण्यासाठी त्याला दु:ख व क्रूसावरील मरणाला सामोरे जायचे होते आणि हे सत्य स्वीकारण्याची त्याची तयारी नव्हती. येशू त्यांना ह्या गोष्टी वारंवार सांगत होता, परंतु हे कटु सत्य ते स्वीकारण्यास तयार नव्हते. पेत्र म्हणायचा, ‘तुझ्या ऐवजी मी मरेन, पण मी तुला मरू देणार नाही.’ प्रभूच्या रुपांतरानंतर मात्र पेत्राची मानसिकता बदलते. कारण काही दिवसांनी प्रभू त्यांना जेथसेमनी बागेत घेऊन जातो. तेथे येशूला रक्ताचा घाम फुटलेला ते बघतात आणि ते कटु सत्य स्वीकारण्याची त्यांची मानसिकता तयार होते.
     तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुपांतराद्वारे शिष्यांच्या मनात एक नवीन आशा, नवीन चैतन्य निर्माण होते. येशूचे भव्य दिव्य रूप बघून ते भारावून जातात. त्यांना ते हवेहवेसे वाटते. त्यावेळी येशू अप्रत्यक्षपणे त्यांना सांगतो की हे वैभव तुमचे होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला देखील दु:ख, संकटाना सामोरे जावे लागेल. प्रभूच्या रुपांतरामुळे आपल्या जीवनात देखील नवीन आशा निर्माण होते. आपल्याला ठावूक आहे की आपल्या जीवनात काही आशा असतील तर त्यासाठी आपण धैर्याने संकटाना सामोरे जाऊ शकतो. उदा: एखाद्या तरुण बाईचे पती अचानक अपघातात मरण पावतात. तिच्यावर दु:ख संकटाचा डोंगर कोसळतो. ती वेडीपीसी होते. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. परंतु अशा वेळेला तिच्याकडे लहान बाळ असते. ती त्या बाळाकडे पाहते. ते बाळ तिच्या जीवनात नवी आशा निर्माण करते आणि त्या आशेवर ती सर्व दु:खांना धैर्याने सामोरी जाते.
     प्रभूचे रुपांतर आपल्या जीवनात नवी आशा व नवं चैतन्य निर्माण करते. ते वैभव आपणाला मिळण्यासाठी दु:ख संकटाना धैर्याने सामोरे जायला सांगते. 
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. आपले पोपमहाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु, व धर्म बंधु-भगिनी ह्यांच्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ती भाविकांच्या श्रद्धेत वाढ व्हावी व त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. रुपांतरीत ख्रिस्ताच्या प्रकाशाने समाजातील अंधकार नाहीसा व्हावा व न्याय, प्रेम व शांतीचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करुया.
३. आमचे दु:ख, संकटे व अडीअडचणी ह्या सर्व गोष्टीचे रुपांतर मानसिक शांती, चांगले आरोग्य व सुखी जीवनात व्हावे म्हणून परमेश्वराची कृपा मागुया.
४. हे परमेश्वरा तुझे प्रतिनिधी म्हणून तुझी जबाबदारी तू आमच्या खांद्यावर सोपविली आहे. आम्हांला धैर्य, सामर्थ्य लाभावे तसेच प्रापंचिकांच्या सहकार्याद्वारे तुझ्या प्रेमाची ज्योत प्रत्येक मानवापर्यंत व कुटुंबापर्यत पोहोचविण्यासाठी त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. पीक उदंड आहे व कामगार थोडे आहेत. आजच्या तरुण पिढीला सत्य व प्रेमाचा दिव्य प्रकाश मिळावा, त्यांच्यामध्ये सेवेची भावना निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment