Reflections for the homily of 22nd Sunday in Ordinary Time (03-09-2017) by Br Jameson Munis.
सामान्य काळातील बाविसावा रविवार
दिनांक: ३-९-२०१७
पहिले वाचन: यिर्मया २०:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२
शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२७
“स्वत:चा वधस्तंभ घेणे म्हणजे, ख्रिस्ताला स्वत:चे समर्पण करणे”
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला स्वत:चा त्याग करा व आपला वधस्तंभ घेऊन येशूचे अनुकरण करण्यासाठी बोलावीत आहे.
पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संदेष्टा यिर्मया देवाची सुवार्ता पसरविताना त्याला दु:खांना सामोरे जावे लागते, म्हणून तो शोक करीत देवाकडे तक्रार करत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस मनाचे नवीकरण करुन, आपली शरीरे जिवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावी आणि त्यांनी आयुष्यभर देवाच्या गौरवासाठी जगावे याविषयी सांगत आहे. तसेच, मत्तयलिखीत शुभवर्तमानात येशू शिष्यांना स्वत:चा त्याग करून, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे.
म्हणून आजच्या मिस्साबलीदानात आपण सहभाग घेत असताना दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटावर मात करून देवाची सुवार्ता सातत्याने पसरवित राहावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया २०:७-९
यिर्मया संदेष्टा जीवनाला कंटाळून स्वत:च्या मनातली भावना व्यक्त करतो. देवाचे कार्य करत असताना निराशून गेलेला यिर्मया देवाकडे तक्रार करतो: “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो; तू मजहून प्रबळ असल्यामुळे विजयी झालास; मी दिवसभर हसण्याचा विषय झालो आहे; जो तो माझा उपहास करितो” (यिर्मया २०:७). देवाच्या वचनानुसार यिर्मया लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या चुका दाखवितो. याच कारणास्तव यिर्मयाला मारहाण होते. व त्याची निंदा होते. म्हणून यिर्मयाला वाटते की, देवाने आपल्याला संरक्षणाचे आश्वासन दिले असूनही आपल्याला विनाकारण संकटांना सामोरे जावे लागते. हे सर्व त्याच्या मनाविरुद्ध चालले आहे. ह्यासर्व कारणांमुळे तो इतरांपासून अगदी एकाकी पडला आहे. लोकांची कुजबुज ऐकून त्याला वाईट वाटत आहे. म्हणून तो शोक करीत देवाकडे तक्रार करत आहे. असे संदेष्टा आपल्या वचनाद्वारे नमूद करत आहे.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२
संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात लोकांना मनाचे नवीकरण करुन व आपली शरीरे जिवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावी या विषयी सांगत आहे. याचा अर्थ असा की, आयुष्यभर आपण देवाच्या गौरवासाठी जगावे. तसेच, देवाच्या आज्ञांचे पालन करून चांगले कार्य व ऐकमेकांची सेवा करावी म्हणून तो त्यांना उत्तेजित करत आहे. पौलाच्या मते आपण सर्व ख्रिस्तामध्ये जिवंत झालो आहोत. आपले संपूर्ण ख्रिस्ती जीवन एक उपासनाच आहे असे समजावे व त्याप्रमाणे चालावे हाच पौलाने येथे बोध केला आहे.
आपण स्वतःला देवासाठी अर्पण कसे व्हावे, हेच संत पौल पत्राद्वारे सविस्तरपणे सांगत आहे. आता आपण नव्या राज्याचे आहोत, जेथे नितीमत्व, जीवन आणि आत्म्याची सत्ता आहे. आपण या दृष्टीनेच जीवनाकडे पाहावे. ‘तू त्यांना जगातून काढून घावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना सत्यांत समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे’ (योहान १७:१५-१६).
आपल्या मनाचे नवीकरण करणे हेच यशस्वी ख्रिस्ती जीवनाचे सर्वस्व आहे. यामुळेच देवाची इच्छा काय आहे ते आपणाला समजून घेता येईल. देवाची इच्छा समजून घेणे म्हणजे आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देणे व त्यामधून बोध घेणे होय. त्यासाठी देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे, जो आपले अंतकरण शुद्ध करत असतो व आपल्या हातून देवाचे आज्ञापालन स्वाभाविकपणे व्हावे म्हणून मार्गदर्शन करत असतो.
शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२२
मत्तयलिखित शुभवर्तमानात दोन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. पहिली बाब म्हणजे ‘येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान’ आणि दुसरी ‘आत्मत्यागाचे आमंत्रण.’
येशू ख्रिस्त शिष्यांना आपले दु:खसहन व पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. परंतू हे मात्र शिष्यांना समजत नाही. येशूचे बोलणे ऐकून पेत्राला मोठा धक्काच बसतो. पेत्राने ख्रिस्ताच्या बोलण्याचा विरोध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दय असो, असे आपल्याला होणारच नाही. येशूने पेत्राला सांगितले की, “सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, तर माणसाच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय १६:२२).
ख्रिस्त आपला वधस्तंभ उचलून घेऊन जाणार होता. शिष्यांनी सुध्दा आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे अशी येशूची इच्छा होती. स्वत:ची इच्छा व ध्येय यांचा त्याग करून देवाची इच्छा मान्य करणे हे सोपे नसते. परंतू, येशू शिष्यांना त्यांच्या त्यागाद्वारे त्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे न करता जो जगातील गोष्टी मिळविण्याच्या मागे लागतो तो सर्वच गमावून बसतो. म्हणून सैतानाच्या विचारांचा त्याग करून ख्रिस्ताच्या इच्छा अनुसरणे योग्य आहे.
बोधकथा:
एकदा एका श्रीमंत माणसाच्या मुलाला त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता नव्हती. त्याच्या सर्व इच्छा त्यांचे श्रीमंत वडील पूर्ण करीत असे. जीवनात तो नेहमी आनंदी असे. मुलाला दुःखापासून दूर रहायचे होते. दुःख त्याच्या जीवनात येऊ नये त्यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले. परंतू वडिल आपल्या मुलाला दु:खापासून दूर करू शकले नाही. त्याने खूप कष्ट केले परंतू त्याच्या हाती निराशाच आली. वडिलांनी मुलाला सांगितले की, ज्याप्रमाणे आपण आपल्या सावलीपासून दूर जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपण दुःखाला सुखापासून काढू शकत नाही. जर आनंद हवा असेल तर दुःख सुध्दा अनुभवले पाहिजे. हे ऐकल्यावर त्या मुलाला त्यांची चूक समजली आणि त्या दिवसापासून त्याने कधीही दुःखाचा तिरस्कार केला नाही.
तात्पर्य: सुंदर जीवन हे सुख-दु:ख ह्यांनी भरलेले आहे.
मनन चिंतन:
आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात दु:खाच्या सावलीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. सुख व दु:ख ह्या दोघांचा अर्थ आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात पहावयास मिळतो. जर यश मिळवायचे असेल तर आपल्याला ख्रिस्ताच्या दु:खमय प्रसंगात उभे राहायला पाहिजे. एका कवीने सुंदर रितीने म्हटले आहे: “सर्वजण सुखात तुमच्या बरोबर असतील, पण दु:खात ते तुम्हाला ओळखणार सुद्धा नाहीत.” सांगण्याचा तात्पर्य म्हणजे, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपले मित्र खूप असतात. पण जेव्हा दु:ख आपल्या सोबत असते तेव्हा आपले मित्र आपल्यापासून दुरावतात कारण त्यांना आपले दु:ख नको पण सुख पाहिजे. असे दृश्य आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात पहावयास मिळते.
जीवनात जर आनंद हवा असेल तर दु:खाला सुद्धा स्वीकारले पाहिजे कारण ज्याप्रमाणे रात्रीनंतर पहाट येते त्याचप्रमाणे दु:ख आणि आनंद एकत्र जोडलेले आहेत. दु:खाशिवाय जीवन नाही. हे आपण कधीच नाकारू शकत नाही. म्हणून दु:खाना सामोरे जाणे हेच ह्या दु:खाचे उत्तर किंवा मार्ग आहे. ज्याला ख्रिस्ताचा शिष्य व्हायचे आहे, त्याने स्वत:च्या इच्छा, मार्ग व हक्क यांचा त्याग करावा व ख्रिस्त ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने जावे.
स्वत:चा वधस्तंभ घेणे म्हणजे, ख्रिस्ताला स्वत:चे समर्पण करणे, त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याचे प्रभुत्व स्वीकारणे व ख्रिस्तासाठी निंदा व छळ सोसणे असे होय. ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणणे होय. असे केले नाही तर कदाचित आपण स्वत:साठी जगलेले जीवन निरुपयोगी ठरेल.
पहिल्या वाचनात आपण यिर्मया संदेष्टा विषयी ऐकले आहे. यिर्मया त्याच्या जीवनात निराश झालेला होता. तो दु:खाला घाबरलेला होता. तो देवावर नाराज होता. असे असूनही त्याचा देवावरील दृढ विश्वासामुळे देव त्याचे दु:ख आणि अडी-अडचणी दूर करतो. तसेच, दुसऱ्या वाचनात सुद्धा अशाच प्रकारचा संदेश आपण ऐकला आहे. तो म्हणजे, संत पौल लोकांना मनाचे नवीकरण करण्यासाठी सांगतो. ते म्हणजे, देवावर विश्वास ठेवून आपल्या दु:खाना सामोरे जाण्यास सांगत आहे. शुभवर्तमानात सुद्धा येशू ख्रिस्त आपल्याला अशाच प्रकारचा उपदेश करीत आहे. येशू शिष्यांना स्वत:चा त्याग करून, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे.
आपला देव तारणारा आहे. जीवनात येणाऱ्या सर्व संकटांची त्याला माहिती आहे. म्हणून, आपण सर्व ख्रिस्ती भाविक येशूच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्याची फार गरज आहे. येशूला अनुसरणे म्हणजे स्वत:ला येशूच्या चरणी समर्पित करणे होय.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभू, आमचा वधस्तंभ उचलण्यास आम्हांला सहाय्य कर.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी देवाच्या शिकवणुकीद्वारे सर्व भाविकांना त्यांचा वधस्तंभ उचलण्यासाठी सहाय्य करावे व त्यांना अधिक देवाकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या लोकांचे जीवन संकटांनी व अडी-अडचणींनी ग्रासलेले आहे, ज्यांच्या जीवनात नेहमी आत्महत्येचा प्रश्न निर्माण होतो; अशा सर्व लोकांना देवाचा आशिर्वाद मिळावा, जेणेकरून परमेश्वराच्या प्रेरणेने त्यांचे जीवन सुखमय व आनंदी होईल, म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आपल्या धर्मग्रामातील सर्व ख्रिस्ती लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व ते स्वत:ला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जगातील मोह मायेचा त्याग करून शुभवर्तमानाच्या मुल्याप्रमाणे जगावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाही तसेच जे कोणी देवापासून दूर जात आहेत अशा सर्व लोकांची प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी आणि त्यांनी देवाच्या सानिध्यात परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. लोकांची घरे-दारे उध्वस्त झालेली आहेत. ह्या बिकट परिस्थितीमध्ये अशा लोकांना उदार लोकांचे सहाय्य मिळावे व सरकारने त्यांना आर्थिक मदत करून त्यांना सुखरूप ठेवावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
६. सर्व युवक-युवतींनी जगातील केवळ आनंद, संपत्ती, मालमत्ता व प्रसिद्धीकडे न धावता शुभवर्तमानातील ख्रिस्ताने दिलेल्या मुल्यांप्रमाणे त्यांनी जीवन जगून, आपले भवितव्य उज्वल करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
७.आता आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.