Thursday 24 August 2017

Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (27-08-2017) by: Br Sadrick Dapki. 






सामान्य काळातील एकविसावा रविवार


दिनांक: २७-०८-२०१७
पहिले वाचन: यशया २२:१९-२३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र  ११: ३३-३६
शुभवर्तमान: मत्तय १६: १३-२०









“आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहात”


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना ही येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून देत आहे. येशू ख्रिस्ताने बारा प्रेषितांची निवड केली होती, परंतू येशूला पहावयाचे होते की, शिष्य आपल्याला कोण म्हणून ओळखत आहेत.
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणराजा हिल्कीया ह्याचा पुत्र एल्याकिम हा आपल्याला दिलेली राज्यसत्ता कशी चालवेलह्याविषयी ऐकतो. दुस-या वाचनात संत पौल आपल्यासमोर देवाच्या प्राविण्याचे व वैभवाचे गीत सादर करतो.
आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताला कोणत्या प्रकाचे स्थान देतो? आपण ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखतो? अशा महत्वपूर्ण प्रश्नांवर मनन चिंतन करण्यास आजची पवित्र उपासना आपल्याला आमंत्रण देत आहे, ह्यासाठी आपल्याला शक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून परमेश्वर पित्याकडे ह्या मिस्साबलीदानात मागुया.  

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

     इझ्राएल हे देवाने तारणासाठी निवडलेले राष्ट्र होते; आणि ह्या राष्ट्रावर अनेक अशा राज्यांनी राज्य केले. ह्यातील काही राजे स्वदेशी तर काही राजे परदेशी होते. काही राजे चांगले तर काही वाईट.
     यशया संदेष्टा हा ‘शेबना’ नावाच्या वरिष्ठ कारभारी ह्या विषयी सांगत आहे. ‘शेबना’ हा ‘हिल्कीया’ राजाचा प्रमुख होता व इजिप्तची बाजू घेणाऱ्या पक्षातील एक नेता होता. यशया संदेष्टा हा देवाने सांगितल्याप्रमाणे राजा झडकाया ह्याचं पश्चाताप करावयास व देवावर विश्वास ठेवावयास सांगतो. असे केल्यास प्रभू देव त्याच्या राज्यास विजय प्राप्त करून देईल. परंतू शेबान, देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून यशया सांगतो की शेबनाची अधोगती होईल आणि त्याच्या जागी चांगला व विश्वासू वरिष्ठ सल्लागार निवडला जाईल आणि ज्याचे नाव एल्याकीम असणार आणि तो येरुशलेमकरांचा व यहुद्यांच्या घराण्याचा पिता होईल.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र  ११: ३३-३६

संत पौलाने रोमकरांस पाठविलेल्या पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला देवाच्या चांगुलपणाविषयी, दये विषयी व ममतेविषयी भास होतो. जरी देव आपल्याहून कितीही पटीने महान, श्रेष्ठ असला व त्याचे मन कितीही अदभूत असले तरी त्याच्या चांगुलपणाचा व दयेचा हात सदोदित आपल्यावर असतो असे संत पौल आपल्याला येथे पटवून देतो.
मानवाच्या तारणाचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर आपल्याला दिसून येईल की; तारणासाठी निवडलेल्या लोकांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, ते त्याच्या प्रेमाविरुध्द गेले. यहुदी लोकांनी तर देवाचा व ख्रिस्ताचा धिक्कार केला. तरी देखील देवाने मानवावर अखंड प्रिती केली व त्यांच्या तारणासाठी स्वतःच्या पुत्राला खंडणी  म्हणून पाठविले. ह्यास्तव; संत पौल देवाच्या अनंत उपकाराबद्द्ल, देणगीबद्द्ल व महान हृदयाबद्द्ल देवाची स्तुतिगीत गात म्हणतो, “देवाची बुद्धी, ज्ञान व संपती किती प्रचंड आहे. तो जे काही ठरवितो ते मनुष्यांच्या ठरावापेक्षा श्रेष्ठ व अचूक आहे. देवाने आपले मार्ग आम्हांला समजावून सांगितल्याशिवाय आपल्याला कधीच ते समजणार नाहीत.

शुभवर्तमान : मत्तय १६: १३-२०

आजच्या शुभवर्तमानात पेत्राने ख्रिस्त हा जीवंत देवाचा पुत्र आहे ह्या विषयी कबुली देतो. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला संपूर्णरित्या ओळखले नव्हते. त्याच्या मते त्याचा तारणारा हा एक वैभवशाली व बलवान राजा असेल. त्यांना राजकीय व धार्मिक स्वतंत्र्य प्राप्त करून देईल व सर्व दृष्ट राजांच्या बंदिसातून सर्वांची सुटका करील.
     आपल्या चांगल्या कार्यामुळे ख्रिस्त प्रेमळ, दयाळू, ममताळू व चांगला आहे, तो थोर व अनेक संदेष्ट्यापैकी एक थोर संदेष्टा आहे असे मानले, परंतु तो सर्व मानवजातीत श्रेष्ठ व सर्वोच्य संदेष्टा व खुद्द देवाचा परमप्रिय पुत्र आहे असे यहुदी लोकांनी मानले नाही.
     येशू ख्रिस्ताने पेत्राला व सर्व शिष्यांना केलेला प्रश्न हा एक परीक्षेचा भाग होता. येशूचे शिष्य हे त्याच्या बरोबर किमान दोन वर्षे राहिले, शिकले व येशू ख्रिस्तास जाणून घेतले. आता येशू ख्रिस्तास पहावयाचे होते की हे मला किती खोल पर्यंत ओळखतात. हा प्रश्न त्यांच्या मदतीसाठी होता पण खाली पाडण्यासाठी नव्हे. म्हणून प्रभू त्यांना कार्य पद्धतीने म्हणजेच पायरीने प्रश्न विचारतो. येशू ख्रिस्ताने विचारले, ‘मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात?’ त्यावर त्यांनी अनेक प्रकारची उत्तरे दिली. काहीजण योहान, काहीजण यिर्मया तर काही जण संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणून ओळखतात. येशू ख्रिस्ताला शिष्यांकडून माहिती करून घ्यायचे होते की ते त्यांस काय समजतात? म्हणून आपल्या शिष्यांना आपली खरी ओळख झाली आहे की नाही ह्यासाठी येशू दुसरा प्रश्न विचारतो, ‘तुम्ही मला कोण म्हणून ओळखतात?’ तेव्हा पवित्र आत्म्याच्या शक्तीने प्रेरित होऊन पेत्र म्हणतो, “तुम्ही ख्रिस्त जीवंत देवाचे पुत्र आहात”. ज्या पेत्राने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ख्रिस्त कोण आहे त्याची जाणीव करून दिली तोच पेत्र देऊळ मातेचा मुख्य खडक बनून ख्रिस्त सभेचा आधारस्तंभ बनला, ज्यावर ख्रिस्ताने आपली संपूर्ण ख्रिस्तसभा उभारली.
     पुढे शुभवर्तमानात नमूद केल्याप्रमाणे ख्रिस्ताने पेत्राला स्वर्गाच्या किल्ल्या बहाल केल्या. ह्याचा अर्थ असा होतो की “ख्रिस्ताने आपल्या राज्याची संपूर्ण जबाबदारी पेत्रावर सोपवली”. ख्रिस्ताला ठाऊक होते की, त्याला ह्या जगातून निघून आपल्या पित्याकडे परतायचे होते. ह्यास्तव; पेत्राला आपल्या राज्याचा उचित अधिकारी बनवून, जगात देवाचे कार्य पुढे चालवण्यासाठी व सुवार्तेची घोषणा जगभर पसरविण्यासाठी ख्रिस्ताने त्याला मानवी मध्यस्थिचा व मदतीचा उगमस्थान बनवले.

बोधकथा :

     कल्याण येथे  ताबोर आश्रमामध्ये दर आठवड्यात तीन दिवसाची शिबीर भरली जाते व शिबीरच्या शेवटच्या दिवशी ‘आरोग्यदानाची प्रार्थना’ होत असते. ह्या शिबिरामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक येत असतात. कारण त्यांना येशू ख्रिस्ताचा स्पर्श झालेला असतो, त्यांना येशूची जाणीव झालेली असते.
     काही वर्षा अगोदर ह्या ताबोर आश्रमामध्ये शिबीर चालू होती. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी ‘आरोग्यदानाची प्रार्थना’ झाल्यानंतर ज्या लोकांनी मानसिक, शारिरीक व वैयक्तिक हिलिंग अनुभवली त्या लोकांनी साक्ष दिली. असे चालू असतांना प्रवक्त्याने म्हणजेच शिबीर घेणाऱ्या फादराने  लोकांसमोर एक प्रश्न मांडला. ख्रिस्ताच्या दैवी शक्तीने आपण हिलिंग अनुभवली आहे. परंतु हा ख्रिस्त कोण आहे? त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे? हे कोण सांगू शकते का? ह्या प्रश्नाने हॉलमध्ये थोडावेळ शांततेचे वातावरण पसरले. सर्वजण थक्क झाले व काय उत्तर द्यावे ह्यावर विचार करू लागले. तेवढ्यात एक परधर्मीय बांधवाने ज्याने मानसिक हिलिंग अनुभवली होती त्याने उद्गारून म्हटले “प्रभू येशू हा खरा देवाचा पुत्र आहे”, जो मानवाच्या उद्धारासाठी व तारणासाठी धरतीवर आला व आपल्या पापांकरिता मरण पावला. तो माझा परमप्रिय देव आहे. ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा उगम व अंत आहे ही ख्रिस्ताची ओळख परधर्मीय बांधवाने सर्वापुढे मांडली.

मनन चिंतन :

येशू ख्रिस्त हा देव आहे. आपला राजा आहे, तो आपले सर्वस्व आहे. तो देवाचा पुत्र आहे. “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्यावर मी संतुष्ट आहे” (मत्तय:३-२७). येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांस प्रश्न केला की, ‘लोक मला काय म्हणून समजतात?’ तेव्हा सर्वाचा आवाज आला की तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात, तुम्ही  यशया संदेष्टा आहात किंवा तुम्ही काही संदेष्ट्यापैकी कुणी एक आहात. असे म्हणत सर्वांनी गोंधळ घातला होता. परंतू, येशू ख्रिस्त म्हणतो, “आता तुम्ही मला कोण म्हणून समजता”? हे ऐकल्यावर शिष्यांमध्ये शांततेचे वातावरण पसरले. कारण दुसरा प्रश्न खूपच अवघड होता. काय उत्तर द्यावे हे कुणालाच समजत नव्हते सर्व ठिकाणी शांतता होती. ही शांतता बघून येशू ख्रिस्तास किती वाईट वाटले असेल की, जे शिष्य माझ्याबरोबर राहिले, शिकले त्यांनी माझं जीवन बघितलं तरी सुद्धा त्यांना मी कोण आहे हे माहित नाही. अशी परिस्थिती आपण सुद्धा अनुभवली असेल, जेव्हा आपल्याच व्यक्तीने ज्याच्यासाठी आपण सर्व काही केले आणि तीच व्यक्ती आपण त्याच्या जीवनात कोण आहोत हे ओळखले नसेल. येशू ख्रिस्ताला सुद्धा मनुष्याप्रमाणे अशा भावना निर्माण झाल्या असतील. तेव्हा काही वेळाने पेत्र समोर येतो व येशूला सांगतो, “आपण ख्रिस्त, जीवंत देवाचे पुत्र आहात”. तेव्हा येशू म्हणतो की,
“मांस आणि रक्ताने तू हे सांगत नाही तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने सांगतोस” असे म्हणून येशूने स्वर्गाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली.
     हाच येशू ख्रिस्त आपणास तोच प्रश्न विचारतो जो दोन हजार वर्षापूर्वी आपल्या शिष्यांस केला होता. “तुम्ही कोण म्हणून मला ओळखतात?” म्हणजेच ‘तुमच्या जीवनात माझ्यासाठी काय स्थान आहे?’ खूप कठीण प्रश्न वाटतो. कारण आपण तसा विचारच केला नाही. आपण रोज मिस्सासाठी येतो. थोडा वेळ जास्त झाला की घडाळ्याकडे पाहतो, मिस्सामध्येच दुसऱ्या कार्यक्रमाची नियोजन करतो. कधी मिस्साकडे लक्ष नसते. प्रवचनामध्ये काय संदेश दिला ठाऊक नाही अशा ह्या वातावरणात प्रभू आपणास प्रश्न विचारतो की “तुमच्या जीवनात माझ्यासाठी काय स्थान आहे?”
     येशू ख्रिस्त आपणासाठी सर्वकाही आहे. प्रत्येकाने ह्या प्रश्नावर विचारविनिमय केला पाहिजे. तो आपल्या तारणासाठी स्वत:चा गौरव सोडून ह्या धरतीवर आला. आपल्याबरोबर वावरला. शेवटी जाता जाता आपणास पाप मुक्त केले. तो आपला प्रभू आहे म्हणून आपल्या जीवनात आपण त्याला प्रथम स्थान दिले पाहिजे. आपण आजपासूनच विचार करूया की आपण येशू ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखतो?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परम गुरुस्वामी फ्रान्सिस व महागुरूस्वामी यांना त्यांच्या कामात प्रभूचा सतत आधार लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल ख्रिस्तसभेची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. संत पेत्राने जसे प्रभू ख्रिस्त हा खऱ्या जीवंत देवाचा पुत्र आहे, ह्याविषयी सर्व मानवजाती समोर साक्ष दिली त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या कार्यातून व कृतीतून जगापुढे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत व त्याचे आपल्या जीवनात काय स्थान आहे ह्याची ग्वाही द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.                       
३. ख्रिस्ताचे अनुयायी जे मिशन कार्यात येशूची सुर्वाता काना कोपऱ्यात पसरवत आहेत  व ज्यांचा येशूच्या नावाने छळ होत आहे अशा मिशनरी लोकांना शक्ती व सामर्थ्य मिळावे व त्यांचे कार्य न डळमळता पुढे न्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४. आपल्या धर्मग्रामातील तरुण-तरुणी प्रभूच्या कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी स्व:खुशीने पुढाकार घेऊन आपले धर्मग्राम सुरळीत चालविण्यासाठी त्यांना येशू ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.      



No comments:

Post a Comment