Thursday, 17 August 2017

Reflection for the Homily of 20th Sunday in Ordinary Time (20-08-2017) By Minin Wadkar. 






सामान्य काळातील विसावा रविवार


दिनांक२०-०८-२०१७
पहिले वाचन: यशया ५६:१,६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५,२९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८





“बाई तुझा विश्वास खुप मोठा आहे”







प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला देवाजवळ येण्यासाठी जात व धर्म ह्यांचा मतभेद न बाळगता फक्त विश्वास व श्रद्धा असावी, म्हणून बोलावीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की, परराष्ट्रीय लोक देवाजवळ येण्यासाठी देवाने दिलेल्या आज्ञा पाळत आहेत. ते शब्बाथ पवित्र पाळतात. म्हणून देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. तसेच, पौल सांगतो की, देव हा केवळ यहुदियांचाच नसून तो परराष्ट्रीय लोकांचा देखील आहे. म्हणून देवाची सुवार्ता तो सर्वांना देत आहे असे आपण पाहतो. व मत्तयलिखीत शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशु कनानी बाईच्या विश्वासाचे प्रतिफळ म्हणून तो तिच्या भूतग्रस्त मुलीला बरे करतो.
     देव सर्वांचे तारण करतो. कारण तो प्रेमाळू व कृपाळू आहे. देवाचा आपणास स्पर्श व्हावा म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये धर्म व जात यांचा मतभेद आचरणात न आणता, केवळ श्रद्धा, प्रार्थना व विश्वास ह्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे, ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना मागुया.   
    
सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५६:१,६-७

देवाचा करार पाळल्यानंतर जे पारितोषिक मिळणार आहे त्याबद्दल यशया संदेष्टा आपल्याला सांगत आहे. न्यायत्वाचे दोन पैलू आहेत. एक आहे न्याय आणि दुसरे आहे तारण. देवाच्या न्यायत्वाचा हेतू केवळ चूक किंवा उणीवा दाखवण्याकडे नाही, तर त्या गोष्टी योग्य करण्याकडे आहे (पाहा रोम ३:२१-२६ आणखी भाष्य ४६:१२,१३). ह्याद्वारे परमेश्वर असे सांगतो की, न्यायाचे तुम्ही पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण व तारण होईल. यशया संदेष्टा विधर्मी किंवा विदेशी लोकांवर आपले लक्ष केंद्रित करतो. विधर्मी लोक देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात व त्याची सेवा करु इच्छितात. देवाने दिलेल्या सर्व आज्ञांचा तंतोतंत पालन करण्याचा ते प्रयत्न करतात. देवाच्या चरणाशी येऊन ते शब्बाथ पाळतात. अशा विधर्मी लोकांच्या भक्तीमुळे देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. हेच यशया संदेष्टा आपणाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.   
 
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५; २९-३२

     संत पौल यहुदी होता. तो आपल्या धर्माची शिकवण तंतोतंत पाळत असे. जेव्हा तो ख्रिस्ताचा बनला तेव्हा त्याने आणखी जोमाने प्रत्येक यहुदी ज्यांनी ख्रिस्ताला नाकारले होते त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गावात व शहरात जाऊन पौलाने प्रथम यहुदियांना भेट दिली व त्यांना ख्रिस्त स्वीकारण्यास सांगितले. परंतु त्यांनी त्याचा व ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. पौलाचा असा विश्वास होता की यहुदी राष्ट्र, ख्रिस्त व ख्रिस्ताची शिकवणुकीचा स्वीकार करणार. काळांतराने पुष्कळ यहुदी ख्रिस्ताचे अनुकरण करु लागले आणि शेवटी ते ख्रिस्ती झाले.
     पौल हा परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, असे तो सांगतो. हे प्रेषित कार्य ख्रिस्ताने पौलाला दिले आहे, याची तो कबुली देतो (पाहा प्रेषितांची कृत्ये ९:१५). हे ख्रिस्ताचे वचर्स्व पौल विसरलेला नाही (रोम १:५; गलतीकरांस पत्र २:७-१०; प्रेषितांची कृत्ये २२:२१). पौल स्वत: करत असलेले विधर्मियांसाठी सेवाकार्य सर्वांच्या दृष्टीस आणतो कारण त्याचे हे यश व कार्य इतर यहुदियांनी पाहावे ही पौलाची इच्छा होती. हे सर्व देवाच्या कृपेमुळे शक्य झाले असे पौल मान्य करतो.
     जेव्हा यहुदियांनी ख्रिस्त व त्याची शिकवण ह्यांना नकार दिला तेव्हा प्रेषित पौल ताबडतोब परराष्ट्रीय लोकांकडे वळला. ह्याचे कारण आपण मत्तयच्या शुभवर्तमानात पाहतो (मत्तय २८:१९-२० ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे’). पौलाच्या ह्या सेवा व कार्याद्वारे इतर धर्मियांचे देवाबरोबर समेट घडून आणला गेला. पौलाने असे गृहीत धरले होते की, यहुदी राष्ट्र ख्रिस्ताचा स्वीकार करेल कारण आब्राहामद्वारे देवाने त्यांना पाचारण केले होते. काळांतराने परराष्ट्रीय लोकांनी सुद्धा येशूकडे दुर्लक्ष केले होते. ख्रिस्ताची शिकवण व ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारले नाही. असे असूनही, देव ममताळू आहे व त्यांचा देव स्वीकार करतो, असे संत पौल आपल्या पत्राद्वारे नमूद करतो.   

शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

     पहिल्या वाचनात आपणाला यशया संदेष्ट्याचे भाकीत ऐकावयास मिळते. ते म्हणजे मसीहा हा केवळ यहुदियांनाच नाही तर, सर्व राष्ट्रांचा आहे. शुभवर्तमानात संत मत्तय सांगतो की, प्रभू येशू कनानी बाईचा विश्वास व श्रद्धा पाहून तीच्या भूतग्रस्त मुलीला बरे करतो. ही घटना आपल्याला मार्कच्या शुभवर्तमानात देखील पहावयास मिळते (मार्क सुद्धा ७:२४-३०). तसेच, आपण पाहतो (मत्तय ८:५-२३) की, येशू परराष्ट्रीय शताधिपतीच्या चाकराला सुद्धा बरे करतो. ‘भूतग्रस्त मुलीला बरे’ व ‘शताधिपतीच्या चाकरास बरे करणे’ ह्या दोन घटने व्यतिरिक्त येशूची शिकवण व त्याने केलेली चिंन्हे (चमत्कार) हे फक्त यहुदियांसाठी होती. पण शताधिपतीच्या विश्वासाने नंतर येशूने भाकीत केले की परराष्ट्रीय लोक हे स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील (मत्तय ८:१०-१२). याचा अर्थ असा होतो की, येशूचे मिशन कार्य हे केवळ यहुदियांसाठीच नसून तर ते परराष्ट्रीय लोकांसाठी सुद्धा उघडे आहे.
सोर व सीदोन: सोर व सीदोन ही दोन शहरे फोऐनेशियाच्या दशिनेकडे आहेत. येशू फोऐनेशिया प्रांतात आला होता.
कनानी बाई: संत मत्तय बाईला कनानी बाई म्हणून संबोधतो कारण ती बाई पेगन (परराष्ट्रीय व विधर्मीय) होती. कनानी लोक हे यहुदियांचे प्राचीन शत्रु होते पण आता ह्या गोष्टीला बरेच दिवस झाले आहेत. बराच काळ ओलांडून गेला आहे.
हे प्रभो, दाविदाचे पुत्र: ‘दाविदाचा पुत्र’ हे शिर्षक मसिहाला उद्देशून वापरले गेले आहे. फोऐनेशियातील लोकांनी येशूने केलेल्या चमत्काराबद्दल नक्कीच ऐकले असेल नाहीतर त्या बाईने येशूला चमत्कार करावयास भाग पाडले नसते व त्याला दाविदाचा पुत्र’ (मसीहा) ह्या नावाने संबोधले नसते. दाविदाचा पुत्र’ हे शिर्षक दावीदाला दिलेल्या वचनाशी एकरूप आहे (१ शमुवेल ७:१२).
हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भुताने फारच त्रासलेली आहे. कनानी बाईकडे येशूने सुरुवातीला लक्ष केंद्रित केले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली. येशूने उत्तर दिले, इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. येशू त्या बाईची विनवणी ऐकते.
मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे!
     बाईच्या मनात कोणतीच शंका नव्हती. तीची गरज येशूला पुढील शब्द बोलण्यास भाग पाडते: ‘मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे!’ ती येशूकडे हताश होऊन आली होती. तीच्या हाती काहीच नव्हते. देवाच्या चांगुलपणावर व दयेवर बाई कोणतीच शंका व्यक्त करत नाही.
मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे”, हे येशूने बाईला वापरलेले विधान कठोर आहे असे वाटते. परंतु, हे दैनंदिन जीवनातील ती सामान्य म्हण आहे. कनानी बाईला माहित होते की, येशूने जेव्हा ह्या म्हणीचा वापर केला तेव्हा हा तिच्यासाठी नव्हता. बाईने उत्तर दिले की, घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. याचा अर्थ असा की बाहेरची लोक सुद्धा धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात.
बाई तुझा विश्वास मोठा आहे: इस्राएलच्या प्रजेस मसिहाचे आगमनाचे भाकीत करण्यात आले होते आणि इस्राएलमधून सर्व राष्ट्रांना ह्या मसिहाचे शुभवर्तमान प्रकट होणार होते. म्हणून, येशू ख्रिस्त सर्वांसाठी ह्या भूतलावर आला होता. ख्रिस्त फक्त यहुदियांनाच नसून तर तो विधर्मियांसाठी सुद्धा आला होता. कनानी बाईने आपला येशुवरील असलेला विश्वास सिद्ध केला. ह्या विश्वासाची तुलना परराष्ट्रीय शताधिपती बरोबर करण्यात आली आहे.
त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली: येशूने बाईचा दृढ विश्वास पाहून तिच्या मुलीला आजारातून बरे केले व बाईची इच्छा पूर्ण केली.
     कनानी बाईचे उदाहरण आपल्याला सांगते की, आपण आपल्या जीवनात आपल्या गरजेविषयी जागृत राहिले पाहिजे. आपण कोण आहोत? आपली स्थिती काय आहे? हे सर्व आपण जाणून घेतले पाहिजे. संयमाने वाट पाहणे, विश्वासाने देवाजवळ येणे, ईत्यादी गोष्टी देवाच्याआशिर्वादाने भरून जातात. अशा तरेणे येशूने म्हटलेल्या शब्दाचे महत्व आपल्याला कळेल, ‘तुझा विश्वास मोठा आहे’.

बोधकथा:
            नुकतेच एक नवीन जोडपं लग्न होऊन आपल्या घरी एका लहान होडीने नदीपलीकडे जात होते. अचानक एक मोठे वादळ आले. पत्नीने जगण्याची सर्व आशा सोडली होती. पती योद्धा होता. त्यांची लहान होडी वादळाने पाण्यावर हेलकावे घेत होती. होडी कोणत्याही क्षणाला बुडणार होती. पण माणूस होडीमध्ये शांत बसला होता, जणूकाही काहीच घडत नव्हते. पत्नी पतीला म्हणाली, ‘तुम्हाला भीती वाटत नाही का’? हा आपल्या जीवनातील शेवटचा क्षण असेल. आपण कदाचित नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहचू शकणार नाही. आपल्याला फक्त दैवी चमत्कारच वाचवू शकतो. पती हसू लागला आणि त्याने आपली तलवार पत्नीच्या गळ्यावर ठेवली व म्हणाला, तुला भीती वाटते का? पत्नीने हसत उत्तर दिले, नाही ! कारण तू माझ्यावर प्रीती करतोस. मी तुझी पत्नी आहे. तू मला मारू शकणार नाही. हे मला ठाऊक आहे. पती म्हणाला, हेच माझे उत्तर आहे. त्याने तलवार बाजूला करून म्हणाला, ‘देव आपल्यावर प्रीती करतो. तो आपले रक्षण करील.
तात्पर्य: देवावर विश्वास ठेवा. 

मनन चिंतन:

     जगामध्ये दोन प्रकारची लोक असतात. पहिली म्हणजे ‘होकारार्थी’ आणि दुसरी ‘नकारार्थी’. होकारार्थी लोक कोणत्याही संकटाला घाबरत नाही. त्यांच्याहाती विश्वास, परिश्रम, चिकाटी, संवेदनशीलता, इत्यादींचे शस्त्र असते. दुसरीकडे, नकारार्थी लोक जीवनांत चिंतन करण्यापेक्षा चिंता फारच करतात. अशा लोकांचे जीवन निराशेने, दु:खाने, संकटाने व्यापलेले असते. आनंद नाही तर केवळ अल्प विश्वासच त्यांच्या पदरी असतो.  जीवनात काहीच साध्य त्यांना करता येत नाही.
     आजच्या उपासनेचा विषय आहे ‘विश्वास’. देवाजवळ येण्यासाठी धर्म, जात, भाषा, रूढी, परंपरा यांचीच केवळ गरज नसून, ‘विश्वासाची’ व श्रद्धेची अत्यंत गरज आहे. कनानी बाई यहुदी नसून, विधर्मी होती. असे असून देखील तीने होकारार्थी विश्वासाने येशूकडे आपली भूतग्रस्त मुलगी आजारातून मुक्त होण्यासाठी आणली होती. स्तोत्र २३:४ सांगतो, ‘मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस’. जात, धर्म, राष्ट्र ह्या सर्वाना सामोरे जाऊन बाई मोठ्याने म्हणाली, ‘हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा’. माझी मुलगी भुताने त्रासलेली आहे. येशू म्हणाला, ‘मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे’. ह्या येशूच्या शब्दाद्वारे असे वाटते की येशूने कठोर शब्द वापरून त्या बाईची अवहेलना केली.
     येशू दयेचा सागर आहे. तो करुणेने भरलेला आहे. तो आजारी व्यक्तींना बरे करण्यासाठी आला असून तो त्यांना तुच्छ लेखण्यासाठी आलेला नाही. असे असून देखील येशूच्या तोंडी असे कठोर शब्द का आले? येशूच्या काळामध्ये यहुदीयांचा विश्वास होता की देव फक्त त्यांच्यासाठी आहे. आपणच देवाची निवडलेली प्रजा आहोत असा त्यांचा दृढ विश्वास होता. असे असून, परराष्ट्रीय व विधर्मियांचा आपणामध्ये समावेश नाही. म्हणूनच, यहुदी लोक त्यांना आपल्यापासून दूर ठेवत. कधी-कधी त्यांना वाईट शब्दाने बोलून त्यांची अवहेलना करत असत.
     येशू यहुदियांच्याच भाषेमध्ये कनानी बाईला उत्तर देतो. ह्यामागे, येशूला त्या बाईचा विश्वास पहावयाचा होता. येशू, धर्म, राष्ट्र व जात ह्यांच्या पलीकडे जाऊन तो ‘देवावरील विश्वास’ किती आहे ह्यावर लक्ष केंद्रित करतो. येशूने त्या बाईला ‘कुत्रा’ या नावाने संबोधले नसून तो त्या बाईला परमेश्वराच्या दयेची शिकवण देत आहे. म्हणजे, देवाकडे जाण्यासाठी जात, पंथ, राष्ट्र इत्यादी महत्वाचे नसून केवळ ‘विश्वास’ किंवा ‘श्रद्धा’ मौल्यवान आहे हे सिद्ध होते.
     यहुदी लोक आतुरतेने मसिहा येण्याची वाट बघत होते. आणि यहुदी लोक परमेश्वराने निवडलेली प्रजा आहे. ह्या प्रजेस सर्व काही देवाने बहाल केले होते. परंतु, ह्याच प्रजेकडे विश्वास नसेल तर ती सर्व काही गमावून बसतील. जर आपण परराष्ट्रीय लोकांकडे (यहुदी नसलेली लोक) नजर टाकली तर, उदाहरणार्थ फोऐनेशियन बाई, जी परमेश्वराने निवडलेल्या प्रजेतली नव्हती, त्या बाईकडे विश्वासाचे दान मोठे होते. तिचे जीवन विश्वासाने भरलेले होते. येशूच्या सानिध्यात राहण्यासाठी धर्म, राष्ट्र, भाषा व जात इत्यादींची गरज नसून, फक्त विश्वासाची गरज आहे.
     आपण नव्या करारामध्ये पाहतो, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पिडलेली एक स्त्री येशूमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली. ती म्हणाली, मी केवळ वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन (मत्तय ९:२०-२१). ह्या विश्वासाने ती बरी झाली. तसेच, प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा’ (लूक १७:५). यावरून असे समजते की, खरोखर देवावरील विश्वास हा जीवनाला नवीन कलाटणी प्राप्त करून देतो. जीवनाला नवीन दिशा प्राप्त होते. विश्वासामुळे कोणत्याही व्यक्तीला देव व येशू प्राप्त होऊ शकतो. विश्वासाने केलेली देवाची आराधना व त्याने दिलेल्या आज्ञा चांगल्याप्रकारे आचरणात आणल्या तर खरोखर देव प्राप्त होऊ शकतो.
                 यशया संदेष्टा सांगतो, विधर्मी लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या. त्यांनी शब्बाथ मोडला नाही तर तो पाळला. त्यामुळे देव त्यांच्यावर संतुष्ट आहे. हे सर्व काही विश्वासामुळे शक्य झाले. संत पौल सांगतो की, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे. पौलाने यहुदी व परराष्ट्रीय लोकांना येशूची शिकवण देण्याचा प्रयत्न करत होता. देवाच्या राज्यामध्ये सर्वांचा समावेश होतो. जात, भाषा, पंथ व धर्म यांचा विचार करण्यात येत नाही. पररार्ष्टीयांचा देवावर विश्वास नव्हता, असे असूनही जेव्हा ती बाई येशू व येशूच्या कार्याबद्दल ऐकते, तेव्हा ती विश्वासाने येशूकडे येते. ‘हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा’ ह्या बाईच्या शब्दांनी येशूला चकित करून सोडले. बाई तुझा विश्वास मोठा आहे. विश्वासामुळे येशूने बाईची प्रार्थना ऐकली. व तिच्या मुलीला येशूने बरे केले. तसेच, आपण पाहतो (मत्तय ८:५-२३) की, येशू परराष्ट्रीय शताधिपतीच्या चाकराला सुद्धा बरे करतो. ही व्यक्ती सुद्धा परराष्ट्रीय होती.
     संत अगुस्तीन सांगतात, ‘तुमच्या विश्वासाची ज्योत पेटवू द्या, कारण सर्व काही शक्य आहे. श्रद्धा म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीमध्ये ठेवलेला विश्वास आणि ह्या श्रद्धेचे पारितोषिक विश्वास आहे’. ‘विश्वास Wi-Fi प्रमाणे आहे; जरी तो अदृश असला तरी त्याच्याकडे जोडण्याची भरपूर क्षमता आहे’. ख्रिस्ती श्रद्धेत वाढ होण्यासाठी विश्वासाची फार गरज आहे. जीवनात धर्म, जात, राष्ट्र इत्यादींची लाट येणार आहे. तरीसुद्धा आपण आपल्या ख्रिस्ती धर्मात खचून न जाता, विश्वासाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. विश्वासाची, श्रद्धेची साथ मिळाली तर खरोखर आपण ह्या जगातील तंटे, वादविवाद, अशांती मिटवू शकतो. भारत व इतर देशात धर्म, जात, राष्ट्रांवरून विश्वासाला तडा गेलेली आहे. धर्माच्या नावाखाली अनेक भाविकांना आपला प्राण द्यावा लागत आहे. आपल्या मनात ‘सर्व-धर्म, जात, भाषा ह्यांचा समभाव’ तसेच  ‘ऐकमेका कडून सहाय्य, हे रुजविण्याची फार गरज आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.

१. आमचे पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करीत असताना, त्यांनी सदैव धर्म, जात, भाषा इत्यादींचा मतभेद न करता, सर्व भाविकांची विश्वासात वाढ करून त्यांना प्रभूजवळ आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.                                                                                                                                                   २. परमेश्वराने आपल्याला जीवनाची मौल्यवान देणगी दिली आहे, म्हणून आपल्या जीवनात सतत देवाला प्राधान्य देऊन त्याची सेवा करावी व त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. इराकमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांवर अत्याचार होत आहेत व ते दडपणाखाली आहेत. त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे व आपला धर्म त्यांना स्वतंत्रपणे पाळता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचे आजार, दुःख हलके व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.   

  


No comments:

Post a Comment