Friday 11 August 2017

Reflection for the Homily of 19th Sunday in Ordinary Time (13-08-2017) By Lavet Fernandes. 





सामान्य काळातील एकोणिसावा रविवार


दिनांक: १३/०८/२०१७
पहिले वाचन: १राजे १९:११-१३
दुसरे वाचन: रोमकरास पत्र ९:१-५
शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३






“मनी नाही भाव मग देव पावणार कसा”










प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून, दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटावर व भीतीवर मात करून, विश्वासात दृढ होण्यासाठी आमंत्रण देत आहे.
राजाच्या पहिल्या पुस्तकात आपण पाहतो की, एलिया भीतीमुळे देवापासून दूर जातो, परंतु देव त्याला दर्शन देऊन त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. तसेच, दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, यहुदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले होते. त्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी यासाठी संत पौल कार्यरत आहे. व मत्तयलिखीत शुभवर्तमानात ‘येशू समुद्रावरून चालतो’ ह्या घटनेद्वारे येशूचे सामर्थ्य व शिष्यांच्या श्रद्धेत झालेली वाढ आपणास दिसून येते. 
आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला धैर्य व प्रभूवरील श्रद्धेची अत्यंत गरज आहे. ही गरज पूर्ण व्हावी म्हणून, आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात आपण मोठ्या विश्वासाने व श्रद्धेने परमेश्वराकडे प्रार्थना करूया.


सम्यक विवरण: 

पहिले वाचन: १ राजे १९:११-१३

एलिया पर्वतावर उभा होता. तेव्हा परमेश्वर जवळून जात असताना वारा, वादळ, भूमिकंप आणि अग्नी इत्यादी गोष्टी एकामागोमाग घडल्या. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर देव देव नव्हता असे सांगण्यात आले आहे. ह्या सर्व गोष्टी नंतर एक वेगळेच अदभूत घडले. ते म्हणजे अचानक शांत, मंद वाणी झाली. तेव्हा एलीयाला ही वाणी ऐकू आली. वाणी ऐकताच त्याने आपले तोंड झग्याने झाकून घेतले.
देव नेहमीच स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टीमध्ये कार्य करीत नाही तर तो अदृश्य गोष्टीमध्ये किंवा स्तब्धपणे सुद्धा कार्यरत असतो, याचे उचित दृश ह्या घटनेद्वारे वर्णन केले आहे. सर्व काही त्याच्या मर्जीनुसार होते. देवाच्या ह्या भेटीने एलिया अतिशय घाबरून गेला. एलिया परिस्थितीला भिऊन पळाला.

दुसरे वाचन: रोमकरास पत्र: ९: १-५

पौल स्वतः यहुदी होता. पौलच्या मते इस्राएल लोकांनी देवाचे नियमशास्त्र पाळले नव्हते. इस्राएल लोकांनी म्हणजेच यहुदी लोकांनी ख्रिस्ताला नाकारले होते व  त्यांना ख्रिस्ताची ओळख व्हावी यासाठी पौल कार्यरत होता.

शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

      संत मत्तय ‘येशू समुद्रावरून चालतो’ ह्या घटनेद्वारे येशूचे निसर्गावर असलेले सामर्थ्य व शिष्यांच्या विश्वासाला कारणीभूत ह्या दोन गोष्टी प्रकट करतो.
     लोकसमुदायाला निरोप देत येशू ख्रिस्त एकटाच प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. शिष्यांना त्याने तारवात बसून पलीकडे जाण्यास सांगितले होते. त्याने डोंगरावर रात्रभर प्रार्थना केली.
     इकडे वाऱ्याचा जोर वाढला व शिष्यांना पुढे जाता येईना. ते हैराण झाले. योग्य वेळी, येशू चालत त्यांच्याकडे आला. ते घाबरले. प्रभुने ताबडतोब त्यांना धीर दिला. प्रभूने त्यांना या कठीण अनुभवातून का जाऊ दिले? पेत्राने ख्रिस्तावर विश्वास ठेवला व तो पाण्यावरून चालू लागला. त्यासमयी तो ख्रिस्तावरील विश्वासाने चालत होता. त्याने वाऱ्याचा जोर पाहिला. त्याचा विश्वास कमी झाला वो तो लगेच बुडू लागला. पण त्याने हाक मारताच, प्रभूने हात पुढे करून त्याला धरले. जेव्हा विश्वास कमी होतो तेव्हा संशय वाढतो. येशू हा देवाचा पुत्र आहे; याची शिष्यांना अधिकच खात्री पटली. या अनुभवाने त्यांना ख्रिस्ताची अधिक ओळख झाली.

बोधकथा:

     एका गावात अनेक वर्षे पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता. लोक हैराण झाले होते. शेवटी सर्वजण त्या गावातील मंदिरामधील पुरोहिताकडे याचना करू लागले. पुरोहित म्हणाले, “उद्या सकाळी तुम्ही सर्वजण गावाबाहेरील मोकळ्या मैदानात जमा. आपण सर्वजण त्या दयाळू परमेश्वराची प्रार्थना करू. तो आपली प्रार्थना नक्की ऐकेल. माझा तरी तसा विश्वास आहे. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी गावातील लहानपासून थोरापर्यंत सर्व जमा झाले. सगळे रिकाम्या हाताने आले होते. मात्र पुरोहिताने आपल्याबरोबर छत्री आणली होती. ते उंच जागी सर्वांना संबोधून म्हणाले, “मित्रांनो, आपण कितीही जोरात प्रार्थना केली तरी पाऊस पडणार नाही.” पुरोहिताची ती घोषणा ऐकून सर्वजण सुन्न झाले. मोठमोठ्याने विचारू लागले. “काल तर तुम्ही म्हणालात की, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल. तुमच्या सांगण्यावरून आज आम्ही आमचा कामधंदा सोडून येथे आलो आणि आपण सांगत आहात, पाऊस पडणार नाही, असे का?”
     आज येताना तुम्ही किती लोकांनी आपल्याबरोबर छत्र्या व रेनकोट आणलेले आहेत?” पुरोहित धीरगंभीर आवाजात म्हणाले, “तुमचा स्वत:चाच तुमच्या प्रार्थनेवर विश्वास नाही. कारण तो जर असता तर तुम्ही सर्वांनी येताना छत्र्या व रेनकोट आणले असते. “मनी नाही भाव मग देव पावणार कसा? प्रार्थना करताना मुखातील शब्दा इतकाच हृदयातील भावही पवित्र हवा.

मनन चिंतन:

     आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघतो की येशूने शिष्यांना तारवात पाठवल्यानंतर, तो प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती जातो आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा राहतो. त्यानंतर येशू ख्रिस्त रात्रीच्या चवथ्या प्रहरी समुद्रावरून चालत शिष्यांकडे येतो. ते पाहून सर्व शिष्य घाबरून गेले व म्हणाले भूत आहे आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना म्हणाला, धीर धरा मी आहे; भिऊ नका. येशूबरोबर पाण्यावरून चालण्यास पेत्राने आपली इच्छा व्यक्त केली. हे असामान्य तसेच विशेष लक्षणीय आहे. केव्हा केव्हा पेत्र अगदी उतावीळ स्वभावाचा दिसतो. कदाचित येथे मोठ्या विश्वासाचे नव्हे तर खुलेपणाचे निसर्गावर असलेलेल्या येशूच्या सामर्थ्यात सहभागी होण्याच्या अंहकारी इच्छेचे उदाहरण दिले आहे. अखेरीस पेत्र अल्प विश्वासाचा व संशययाचा एक उदाहरण बनला.
     जर येशुवरील आपली नजर फिरवून आजूबाजूच्या परिस्थितीकडे लक्ष लावण्याचा मोह झाला तर आपण आपल्या जीवनात बुडून जाणार आहोत. त्यासाठी आपले संपूर्ण लक्ष येशूवर केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कोणाची भिती वाटणार नाही व आपला विश्वास बळकट होऊन जाणार. आपल्या जीवनात देखील भीतीचे, चिंतेचे, आजाराचे, अडी-अडचणीचे वादळ येत असते, परतु आपण ह्या वादळांना सामोरे जाण्याची फार गरज आहे. ह्या समस्यांवर मात करण्यासाठी आपणाला येशूची गरज आहे. आपली श्रध्दा व विश्वास बळकट असेल तर आपण आपल्या जीवनात येणाऱ्या वादळांना शांतपणे तोंड देऊ शकतो.
     पवित्र मरियेच्या जीवनात देखील अनेक प्रसंग येऊन गेले, परंतु तीने धैर्याने त्या प्रसंगाना तोंड दिले. तीचा पुत्र येशू क्रुसावर मरताना पाहून तिच्या मनात विचार आला असेल की, त्याने काय वाईट केलं होते की त्याला क्रुसावरचे मरण आले. हे तर सर्वांत मोठे वादळ तिच्या जीवनात आले होते. तरीसुद्धा ती खचली नाही, तीचा देवावर प्रचंड असा विश्वास होता. त्यांमुळे तीने ह्या सर्व गोष्टी तिच्या मनात व अंत:करणात आत्मसात करून घेतल्या.
     कधी कधी आपण एखादी गोष्ट देवाकडे मागत असतो, परंतु आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही तर आपण निराश होऊन जातो. उदा. आपण भक्ती भावाने प्रार्थना केली आणि आपल्याला उत्तर मिळाले नाही तर आपण बैचेन व निराश होऊन जातो. आपण जी गोष्ट मागतो त्याच्या विरुद्ध घडते व देव असा का वागतो, हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. अशावेळी आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वराची इच्छा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. पवित्र मरीयेप्रमाणे आपला ही विश्वास भक्कम असला पाहिजे.
     विश्वास म्हणजे केवळ आपल्याला दिसणाऱ्या, आपल्याला समजणाऱ्या, आपल्या बुद्धीला पाहणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणे अंस नसून, कधी कधी न दिसणाऱ्या, आपल्याला न समजणाऱ्या, आपल्या बुद्धीला व विचाराला न पटणाऱ्या गोष्टीवर भरवसा ठेऊने ह्याला म्हणतात विश्वास. आजच्या दिवशी आपण ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना, प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया की हे देवा आमची भिती दूर करून आम्हांला विश्वासाचे व श्रद्धेचे जीवन जगण्यास मदत कर.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थाना करूया.
२. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. जगात सर्व ठिकाणी अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवाद वाढला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी अशांतता निर्माण झाली आहे. जीवन जगणे फार धोक्याचे झाले आहे. त्यासाठी जगात शांतीचे वातावरण निर्माण व्हावे व सर्वांनी ऐक्याने राहावे. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. येथे उपस्थित असलेल्या आम्हां सर्वाची श्रद्धा वाढावी. ख्रिस्ताच्या श्रद्धेमुळे आम्ही ह्या जगातील संपत्तीवर, वस्तूवर व व्यक्तिवर अवलंबून न राहता तुझ्यावर अवलंबून राहायला शिकावे व आमचा विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी विशेष प्रार्थना करूया.
    


No comments:

Post a Comment