Monday 2 October 2017

Reflection for the feast of St. Francis of Assisi by Br. Rahul Rodrigues (04-10-2017).





संत फ्रान्सिस असिसिकर   

   
दिनांक: ०४-१०-२०१७
पहिले वाचन: बेनसिरा ५०:१,३-४,६-७
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ६: १४-१८
शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०

प्रस्तावना :

     आज अखिल ख्रिस्त सभा संत फ्रान्सिस असिसी ह्या महान संताचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस हे १२ व्या शतकातले असून हा काळ नैतिक, आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक अस्थिरतेचा होता. श्रीमंत व गरीब ह्यात फार मोठी दरी होती. श्रीमंत हे फार श्रीमंत होत जात होते तर गरीब लोक गरीबींनी त्रासलेले, अन्यायाला बळी पडलेले व आजाराला मुकलेले होते. असिसिकर संत फ्रान्सिसने ह्या सर्व लोकांची सेवा करून त्यांना देवाकडे आणण्याचा प्रयत्न केला. संत फ्रान्सिसने ख्रिस्तासारखे पवित्र जीवन जगले. ह्यामुळे ख्रिस्तासारखे त्याच्या शरीरावर पाच घाव आले व ते मरेपर्यंत त्याच्या अंगावर राहिले. म्हणून ह्या महान संताला आपण दुसरा ख्रिस्त मानतो. तसेच संत फ्रान्सीस हे पर्यावरणाचे आश्रयदाते आहेत. 
   आपणही संत फ्रान्सिसप्रमाणे सुंदर व पवित्र जीवन जगावे म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन : बेनसिरा  ५०:१,३-४,६-७

पहिले वाचन हे बेनसिरा ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. महापुरोहित सियोन ह्याने मंदिर दुरुस्त करून शहराची मजबुती केली व लोकांचा नाश होण्यापासून त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला.  

दुसरे वाचन : गलतीकरांस पत्र ६:१४-१८

यहुदी लोक आपली शिकवण तंतोतंत पाळत होते. त्यांच्या शिकवणुकीबाहेर ते कशाचाही स्वीकार करत नसत. परंतू संत पौल म्हणतात की आपण सर्वांनी प्रभू येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगला पाहिजे. कारण ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण आपल्या तारणासाठी परिपूर्ण आहे.

शुभवर्तमान : मत्तय : ११:२५-३०

     स्वर्गीय पित्याने सर्व काही ख्रिस्ताच्या स्वाधीन केले आहे. पिता व पुत्र एकमेकांना पूर्णपणे ओळखतात व ते एकमेकांना प्रगट करतात. यामुळेच जे ख्रिस्ताला ओळखतात तेच देवपित्याला ओळखू शकतात. जे लोक श्रमाने व कष्टाने थकून गेलेले आहेत, तसेच जे भाराखाली दडपलेले आहेत त्यांना येशू स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देतो. ख्रिस्ताकडे येताच लोकांना पापमुक्ती व विसावा मिळतो असे संत मत्तय सागतो.  येशूचे जू होणे म्हणजे त्याचे खरे शिष्य होणे व त्याच्यापासून शिकत राहणे कारण तो मनाचा सौम्य व लीन आहे.

बोधकथा :

एकदा गुबियो नावाच्या एका छोट्या शहरात एक भयानक लांडगा राहत होता. ह्या लांडग्या मुळे तेथील लोक व प्राणी त्रासलेले होते. तो लांडगा सतत त्यांचावर हल्ला करी व त्यांना जखमी करत असे. ही गोष्ट संत फ्रान्सिसला सांगण्यात आली व फ्रान्सिसला लोकांची फार द्या आली. त्यांनी त्या लांडग्याचे परिवर्तन करण्याचा विचार केला.
     दुसऱ्या दिवशी संत फ्रान्सिस त्या गावातून जात असता तो लांडगा अचानक त्याच्या पुढे आला. तो लांडगा फ्रान्सिसच्या दिशेने येत होता. संत फ्रान्सिसने त्या लांडग्यावर पवित्र क्रुसाची खुण केली व ‘ब्रदर वुल्फ’ म्हणजे ‘माझ्या भावा माझ्या कडे ये’ असे म्हटले. जो लांडगा अतिशय भयानक होता तो संत फ्रान्सिसकडे येताच मेढरु सारखा शांत बसला. हे पाहून त्या गावातील लोक चकित झाले. संत फ्रान्सिसने त्या लांडग्याला त्याच्या भयानक कृत्याची जाणीव करून दिली. मग संत फ्रान्सिस त्या लांडग्याला वचन दिले की जर तू ह्या लोकांना काही त्रास दिला नाहीस तर हे लोक तुला जेवण देतील. तसेच लोकांकडून सुध्दा वचन घेतले की ते लांडग्याला खावयास देतील. हे ऐकून त्या लांडग्याने आपल्या पुढच्या पायाने संत फ्रान्सिसला वचन दिले व त्याचे परिवर्तन झाले. तो लांडगा त्या दिवसा पासून लोकांच्या घरो घरी जाऊ लागला व लोक त्याला मोठ्या आवडीणे खाऊ घालू लागले. त्यानंतर तो लाडंगा अजून दोन वर्ष कोणालाही त्रास न देता मरूण गेला.

तात्पर्य: संत फ्रान्सिसने लोकांवर व प्राण्यांवर प्रेम केले. सदैव शांतीने, नम्रतेने जीवन जगण्याचा संत फ्रान्सिसने लोकांना बोध केला.

मनन चिंतन :

     संत फ्रान्सिस असिसिकर ह्याने संपूर्ण आयुष्य दिन-दुखीतांची सेवा केली. कृष्टरोग्यांना बाराव्या शतकात शहरा मध्ये येण्यास बंदी होती व त्यांना गावा बाहेर काढले जात असे. अशा ह्या कृष्ट रोग्यामध्ये संत फ्रान्सिस राहिला, वावरला व त्याची सेवा केली. कृष्ठारोग्यामध्ये प्रेमासाठी व्याकूळ झालेला ख्रिस्त त्याने पाहिला म्हणूनच त्याने स्वर्गीय पित्याची सेवा करण्याचा मार्ग पत्करला. संत फ्रान्सिस व त्याच्या अनुयायांनी घरोघरी जाऊन काम करून पोटासाठी अन्न मिळविले.
     असिसीकर संत फ्रान्सिस हे मनाने लीन, नम्र व दयाळू होते. त्याने लोकांना नम्र व लीन होण्यास सांगितले. माणसे, प्राणी, पक्षी, झाडे व डोंगर ह्यांच्यात फ्रान्सिसने देवाचे रूप पाहिले. म्हणूनच संत फ्रान्सिस ह्यांना निर्सगाचा आश्रय दाता मानला जातो.
सतं फ्रान्सिस सतत म्हणायचे “तुम्ही सर्व जग घ्या परंतू मला ख्रिस्त दया.” त्याने त्याच्या जीवनात ख्रिस्ताच्या शिकवणुकीला प्रथम स्थान दिले. संत फ्रान्सिसने ख्रिस्तासारखे पवित्र जीवन जगले. ह्यामुळे ख्रिस्तासारखे त्याच्या शरीरावर पाच घाव आले व ते मरेपर्यंत त्याच्या अंगावर राहिले. म्हणून ह्या महान संताला आपण दुसरा ख्रिस्त मानतो. आपले पोप महाशय आपल्याला सांगतात की आपणही ह्या असिसीच्या संत फ्रान्सिसप्रमाणे वागायला हवे. जसे त्याने ख्रिस्ताचे प्रेम व दया सर्वाना दिली तशी आपणही द्यावयाला शिकले पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो मला तुझ्या शांतीचे साधन बनव.

१. आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप, बिशप्स, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी सतत येशूच्या सानिध्यात राहून त्यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचे, क्षमेचे व शांतीचे प्रतिक बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व दुःखी, कष्टी व भाराक्रांती लोकांना त्यांच्या जीवनात देवाच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सिसप्रमाणे आपण देखील निसर्गाचे संवर्धन करावे  आणि त्याची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज जगात विविध कारणांमुळे अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण सर्वांनी शांती, प्रेम व बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपल्या ज्या काही इच्छा – आकांक्षा आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. 

No comments:

Post a Comment