Thursday 12 October 2017

 Reflections for the homily of 28th Sunday in Ordinary Time (15-10-2017) by Br Robby Fernandes.






सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार


दिनांक: १५-१०-२०१७
पहिले वाचन: यशया २५:६-१०
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र ४:१२-१४
शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४


"बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे."


प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा सांगतो की, प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रासाठी मिष्टान्नाची मेजवानी करणार आहे. म्हणजे परमेश्वर दुःखांच्या जागी आनंद भरणार आहे. दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल सांगतो की, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या कडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला लग्नाच्या जेवणावळीचा दाखला देत आहे.
परमेश्वर आम्हां सर्वाना ह्या स्वर्गीय मेजवानीचे आमंत्रण देत आहे. जेणेकडून आपण सर्वजण परमेश्वराच्या आनंदामध्ये सहभागी होऊ. या आमंत्रणाचा स्विकार करावा किंवा नकार द्यावा हे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. देवाने दिलेल्या या आमंत्रणाचा आपण योग्य तो प्रतिसाद द्यावा म्हणून लागणारी कृपा व शक्ती या पवित्र भोजनामध्ये मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन : यशया २५: ६-१०

आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया देवाच्या आमत्रंणास होकार दिलेल्या लोकांसाठी कशाप्रकारे देवाने मिष्टान्नाचे टेबल सज्ज ठेवले आहे याचे अप्रतिमतेणे वर्णन करतो. देवाच्या डोंगरावर त्याच्या शब्दाने तारलेल्या लोकांसाठी सर्व प्रकारच्या वस्तूची विपुलता आहे. देवाने सज्ज केलेले हे मिष्टान्नाने टेबल ज्यांनी-ज्यांनी त्यांच्या आमंत्रणाचा स्विकार केला आहे त्या सर्वांसाठी खुले आहे.

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र ४: १२-१४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की दैन्य अवस्थेत व संप्पनतेमध्ये कसे राहावे हे मला उमगले आहे. तृप्त व अतृप्त यामधील फरक मी समजलेलो आहे. परंतु या सर्व अवस्थेमध्ये परमेश्वर सर्व काही पुरवितो याचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे.

शुभवर्तमान: मत्तय २२:१-१४

मत्तय आपणा समोर लग्नाच्या आमंत्रणाचा दाखला मांडत आहे. जो परमेश्वराच्या आमंत्रणाला होकार देतो त्याला देवाच्या राज्याचा आनंद व सर्वकालीन जीवनाचा अनुभव त्याच्या पदरी येतो. आजच्या दाखल्यात दोन भाग आहेत. पहिल्या भागात – देव भोजणासाठी सर्वांना आमंत्रित करतो. हे आमंत्रण परमेश्वर त्याच्या सेवकांद्वारे सर्व लोकांना तारणाचे आमंत्रण कळवितो. परंतु निवडलेल्या लोकांनी त्या आमंत्रणाचा मान राखला नाही. येशू ख्रिस्त, परमेश्वराचा संदेश फक्त निवडलेल्या लोकांनाच नाही तर सर्व जगाला पसरवण्यात तो शिष्यांना पाठवतो. दुसऱ्या भागामध्ये आपणास आढळते की, प्रत्येक ख्रिस्ती माणसाला शुद्धतेचे, न्यायाचे व विश्वासाचे नवे वस्त्र घालण्यास परमेश्वर आमंत्रण देत आहे, जेणेकरून आपल्या ख्रिस्ती जीवनाद्वारे इतरांचे मन-परिवर्तन होइल.

बोधकथा:

     एका गावामध्ये एक सावकार राहत होता. त्याच्याजवळ अमाप अशी धन-दौलत होती. त्या धन-दौलतीप्रमाणे त्याचे हृदय हे सुद्धा खूप मोठे होते. त्या सावकाराला एकच मुलगा होता. त्यामुळे त्याने त्याची चांगल्याप्रकारे जोपासना केली, चांगले संस्कार दिले. तसेच त्याचे उच्च शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून त्याला परदेशात पाठवले. जेणेकरून तो मोठा उद्योगपती होईल. सावकाराचा मुलगा दहा-पंधरा वर्षे परदेशी होता. त्याचे फक्त फोनवरच बोलणे व्हायचे. सावकाराला त्याच्या मुलाला भेटण्याची खूप इच्छा होती पण तो काहीही करू शकत नव्हता.
     एकदा असाच तो अंगणामध्ये बसला असता मुलाचा फोन येतो व त्याला कळते की त्याचा मुलगा शुक्रवार किंवा शनिवारी मायदेशी येणार आहे. पण सावकाराला अचूक माहित नव्हते की त्याचा मुलगा कुठल्या दिवशी येणार. पण उत्साहाच्या भारामध्ये त्याने गावच्या सर्व लोकांना जेवायला आमंत्रित केले आणि सांगितले की माझा मुलगा शुक्रवार किंवा शनिवार येणार आहे, तेव्हा तुम्ही ह्या दोन दिवशी तुमच्या कामाला जाऊ नका. मला माझ्या मुलाची येण्याची बातमी समजल्यावर माझे सेवक तुम्हाला जेवायला आमंत्रित करतील. असे सांगून तो निघून गेला. सावकाराला कळले की त्याचा मुलगा शनिवारी येणार, तेव्हा त्याने त्याचे सेवक लोकांना आमंत्रित करण्यासाठी पाठवले. पण सावकाराच्या आमंत्रणाला न जुमानता थोडे लोक कामाला गेले. थोड्यांनी वेगवेगळी कारणे सांगून त्यांची थट्टा केली. पण थोडे हातावर मोजण्या इतके लोक आले होते. ज्या लोकांनी सावकाराच्या आमंत्रणाला होकार दिला नव्हता त्यांनी भरपूर काही गमावले होते, ह्याची त्यांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. जे थोडे आले त्यांना सावकाराचा सन्मान होता कारण त्यांना त्याची चांगली ओळख झाली होती.  

मनन चिंतन:

आपल्या जीवनामध्ये आपल्याला आमंत्रण मिळत असते. आपण ज्या ठिकाणी, ज्या समाजात राहतो त्याचा आपण एक मुलभूत घटक होतो, जो कधीही आपण विभाज्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे आमंत्रण हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होतो. आपण जेथे राहतो, वाढतो, लहानाचे मोठे होतो त्या समाजामध्ये सोहळे व समारंभ असतात व त्या समारंभासाठी किंवा सोहळ्यासाठी आपल्याला आमंत्रण असते. जेव्हा आपल्या घरामध्ये लग्न सोहळा असतो तेव्हा आपण कशी तयारी करतो हे आपणा सर्वांना उत्तमच ठाऊक आहे. आपण पहिले घर सजवतो, साफ-सफाई करतो, नवीन कपडे शिवतो, जेवण करतो. अशाप्रकारे आपण सर्व तयारी करतो व नंतर आपण सर्वांना आमंत्रण करतो की, ‘या आणि आमच्या आनंदामध्ये सहभागी व्हा!’ असच काही दृश आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला व ऐकायला मिळते.
     राजाने त्याच्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि पुष्कळ असे लोकही आमंत्रित केले होते. त्यांना बोलाविण्यासाठी राजा त्याचे दास पाठवितो. पण ते ऐकत नाहीत. परंतु राजा निराश होत नाही. तो पुन्हा त्याचे सेवक पाठवतो, तेव्हा ते लोक त्यांना वाईट वागणूक देतात, अपमान करतात. थोड्यांना तर जीवे मारतात. राजाच्या आज्ञेचे ते पालन करत नाही. परंतु शुभवर्तमान आपणाला राजाच्या उदारतेचा धडा देत आहे. हा राजा जो आपल्याला आमंत्रण करतो तो दयाशील व सहनशील आहे, दयेचा अथांग सागर आहे हे समजावून सांगतो. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रतिष्टीत व्यक्तीचे आमंत्रण मिळते, तेव्हा आपण किती पूर्वतयारी करतो. त्यांच्या आमंत्रणाला आपण नाकारत नाही. तर आवर्जून त्यांच्या सोहळ्यात सहभागी होतो.
आपणासमोर हा जो उतारा प्रभू परमेश्वर ठेवत आहे तो पूर्णपणे त्याच्या जीवनाशी निगडीत आहे. आमंत्रित करणारा राजा हा खुद्द परमेश्वर आहे. त्याचा पुत्र हा येशू ख्रिस्त आहे. आणि लग्नाच्या मेजवानीसाठी ख्रिस्तसभा आहे. पहिले आमंत्रित लोक हे परमेश्वर राजाने निवडलेली प्रजा आहे, आणि नंतर बोलाविलेले ते सर्व लोक हे पापी, अशुद्ध, समाजामध्ये प्रतिष्ठा असलेले आहेत. राजाच्या सेवकांस ज्या लोकांनी  वाईट वागणूक दिली व तसेच थोड्यांना जीवे मारले ते प्रवक्ते, संदेष्टे, ज्ञानी लोक इद्यादी होते आणि तसेच लग्नाचा पोषाक न घालणारा माणूस हा ख्रिस्ती बांधव जो स्वत:ची आध्यात्मिक तयारी न करता ख्रिस्ताला स्विकारण्यासाठी पुढे येतो असे  दर्शवितो. आपल्या समाजामध्ये सकुंचीत बुद्धीचे लोक तसेच चांगल्या माणसाविषयी द्वेष, मत्सर असलेले लोक आढळतात. त्यांना कोणी समाजामध्ये चांगले कार्य केलेले आवडत नाही. चांगल्या लोकांचा ते कधीच स्वीकार करत नाही. परंतु स्वत:च्या स्वार्थापोटी ते त्यांचा नायनाट करतात. हे सर्व ख्रिस्ताठायी झाले असे आपल्याला पाहावयास मिळते. स्वत:च्या स्वार्थासाठी सर्वानी निष्पाप माणसाचा बळी घेतला.
  गेल्या रविवारच्या उपासनेमधील शुभवर्तमानामध्ये (मत्तय २१:३३-३४) आपण “द्राक्षमळ्याचा दृष्टांत ह्या विषयी ऐकले होते. या दाखल्याद्वारे सुद्धा परमेश्वर निवडलेल्या इस्रायेली प्रजे विषयी संबोधित आहे. पण त्याच्या त्या बोलवण्याजवळ निवडलेल्या लोकांनी कानडोळा केला. त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला त्यांनी क्रुसावर खिळले. स्वत:च्या स्वार्थापायी लोकांनी देवाने पाठवलेल्या प्रवक्त्यांना व संदेष्ट्यांना ठार केले. आणि आजचे शुभवर्तमान (मत्तय २२:१-४) “लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत” आपल्या समोर ठेवत आहे. ह्या दोन्ही दृष्टांतामध्ये खूप साम्य दिसून येते. ते म्हणजे खुद्ध परमेश्वर, इस्राएल प्रजा, परमेश्वरचा पुत्र, तसेच सेवक, दास इत्यादी.
      “बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत” (मत्तय २२:१४). परमेश्वर सर्वांना आमंत्रण करतो कारण आपण सर्वजण त्यांची मुले आहोत. त्याची कृपा आपल्यावर सदासर्वदा असते. पण काही लोक परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालत नाहीत. त्यामुळे परमेश्वराची कृपा त्यांना लाभत नाही. आपण सर्वजण आजच्या दृष्टांतामध्ये दाखवलेल्या त्या व्यक्तीप्रमाणे होतो, जो लग्नाची वस्त्रे परिधान न करता लग्नमंडपात येऊन बसतो. पण त्याला लग्नमंडपातून बाहेर घालवण्यात आले. कारण त्याने स्वत:ची तयारी केली नव्हती, तो अध्यात्मिक व शारिरीक दृष्ट्या पात्र नव्हता, शुद्ध नव्हता, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, पुष्कळांना आमंत्रित केले आहे परंतु निवडलेले थोडे आहेत. आता आपण आपला विचार करायला पाहिजे. त्या निवडलेल्या लोकाप्रमाणे आपली गणना होऊ शकते का? त्या निवडलेल्या लोकांत बसण्यास मी पात्र आहे का? हे आपण सर्वानी स्वत:ला विचारायला हवं.
     परमेश्वर आपणा सर्वांना फक्त चांगले जीवन जगण्याचे आमंत्रण करत नाही तर ते आपल्या कृतीमध्ये, आपल्या आचराणामध्ये आणण्यास प्रवृत्त करत आहे. आपण आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये, आपल्या घरामध्ये पाहिलं तर  आपल्याला काय दिसून येते? फक्त भ्रष्टाचार, माजलेली गुन्हेगारी, दादागिरी इत्यादी. एखादा माणूस, रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडलेला आहे, आपण काय करतो? काही नाही. फक्त एकमेकांची तोंड बघतो. आपण घाबरतो! जर मी या माणसाला मदत केली तर उलट, ऐकायला मिळते. विशेष म्हणजे “दहशदवाद”. आपण सर्वजण नारे गातो की दहशदवाद नष्ट करा. त्याचा विचार न करता आपण मोठ-मोठी कार्य करायला पाहतो.
प्रभू परमेश्वर आपणा सर्वांना आमंत्रण देत आहे की जे समाजामध्ये, घरामध्ये होत आहे त्यास पूर्णविराम दिला पाहिजे. जे अत्याचार आहेत ते नष्ट करून त्या ठिकाणी प्रेम, शांती व आपुलकी वसावी. हेच आपले आमंत्रण डोळ्यासमोर असणे गरजेचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : प्रभू तुझ्या आमंत्रणाला होकार देण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांनी देवाची सुवार्ता घोषविताना सर्व ख्रिस्ती भाविकांना परमेश्वराच्या जवळ आणावे ह्यासाठी त्यांना कृपा व सामर्थ्य प्रभुने द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देवाच्या आमंत्रणाला होकार देऊन आपण सर्वांनी पापांचा मार्ग धिक्कारून सत्य, प्रेम आणि शांतीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. बरेच युवक युवती त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहेत, ह्या युवकांची हाक प्रभूच्या कानी पोहोचावी व त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील सर्व वयस्कर, आजारी, वयोवृध्द आजी-आजोबांना प्रभूच्या दैवी हातांचा स्पर्श व्हावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती प्रदान करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. लग्न होऊन बऱ्याच विवाहित जोडप्यांना मुलबाळ झालेले नाही. अशा ह्या सर्व विवाहित जोडप्यांना प्रभुने आशिर्वादीत करावे व त्यांच्या जीवनात सदैव सुख, शांती आणि प्रेम आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतू प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment