Thursday 19 October 2017

Reflections for the homily of 29th Sunday in Ordinary Time (22-10-2017) by Br Minin Wadkar.




सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार
‘मिशन रविवार’

दिनांक: २२/१०/२०१७
पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६
दुसरे वाचन: १ थेसलोनिकाकरांस १:१-५ब
शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१






जे कैसराचे आहे ते कैसराला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्या


प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार व त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहोत.
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया आपल्याला सांगतो की, आपला देव एकच आहे आणि तो आपल्याला नावाने हाक मारून कामगिरीसाठी सज्ज करत आहे. तर दुस-या वाचनात संत पौल थेसलोनिकाकरांस सांगतो की आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळविण्यात आली आहे. तसेच मत्तयलिखीत शुभवर्तमानात येशू, ‘जे कैसराचे आहे ते कैसराला द्या व जे देवाचे आहे ते देवाला द्याअसे सांगून कर देण्याचा प्रश्न सोडवतो.
     ‘मिशन’ हा ख्रिस्ती श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. ख्रिस्त हा प्रथम आणि सर्वश्रेष्ठ मिशनरी असून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देऊळमाता आपल्याला शुभवर्तमान जगभर पसरविण्यासाठी पाठवीत आहे. आज आपण मिशन रविवार साजरा करीत असताना जे मिशनकार्य करत आहेत त्यांना त्यांच्या नि:स्वार्थी सेवेत परमेश्वराची साथ मिळावी व सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण व्हावे व आपणसुद्धा मिशनकार्यात सहभाग घ्यावा म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ४५:१, ४-६

यशया संदेष्टा सांगतो की परमेश्वराने कोरेश (सायरस) ह्याला अभिषिक्त केले आहे. देवाच्या सामर्थ्याने राजा कोरेशने सर्व राजांना नमविले. त्याने बंदिवासात असलेल्या सर्व यहुदियांना मुक्त करून त्यांना त्यांच्या घरी पाठविले. देव हा सर्वसामर्थ्य आहे. तो आपला एकच परमेश्वर देव आहे जो आपल्याला नावाने हाक मारून आम्हांला कामगिरी सोपवीत असतो असे यशया संदेष्टा आपल्याला सांगत आहे.

दुसरे वाचन: १ थेस्सलोनीकाकरांस १:१-५ब

ह्या पत्रात संत पौल सुरवातीला थेस्सलोनीकाकरांची स्तुती करत आहे असे आपल्याला दिसून येते. पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे ह्यावरून त्याची प्रीती व आस्था स्पष्टपणे दिसून येते. ह्याद्वारे तो त्यांना त्यांचे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी धीर व उत्तेजन देत आहे. संत पौल थेसलोनिकाकरांस सांगतो की आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळविण्यात आली आहे.

शुभवर्तमान: मत्तय २२: १५-२१

येशू व परुशी ह्यांच्यात वादविवाद होत असे. परुशी येशूच्या विरोधात बोलत होते कारण येशूची शिकवण त्यांना पटत नव्हती. येशूला बोलताना पकडावे, त्याच्या तोंडाची उलट-सुलट विधाने त्याच्यावरच उलटवावी हा त्यांचा उद्देश होता. परुश्यांनी आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवून त्याला प्रश्न केला.

मनन चिंतन:

येशू ख्रिस्ताला कसेही करून नजरेआड करण्याचा यहुदी धर्मपुढा-यांनी निश्चय केला होता. कोणत्याही मार्गाचा उपयोग करण्याची त्यांची तयारी होती. ते रोमी लोकांना आपले कट्टर शत्रू मानत. मात्र, येशू ख्रिस्ताला ठार करण्यासाठी ते त्यांच्याशी तडजोड करण्यास तयार होते. येशू ख्रिस्ताला बोलण्यात पकडण्याचा डाव त्यांनी रचला. येशूला रोमी सरकारविरुद्ध बोलण्यास लावून आपणास आरोप ठेवण्यास चांगलेच कारण मिळेल असे त्यांना वाटले.
परुश्यांनी आपल्या शिष्यांना येशूकडे पाठविले. त्यांनी येशूची तोंडस्तुती करून आरंभ केला. नंतर त्यांनी एक प्रश्न विचारून आपला डाव टाकला. कैसराला कर देणे योग्य आहे किंवा नाही’, व त्याने होय म्हटले असले तर येशू इस्राएल राष्ट्राचा शत्रू आहे असं प्रचार त्यांनी केला असता. नाही म्हटले तर रोमी सरकारविरुद्ध अप्रचार करणारा आरोप ठेवता आला असता. येशूने त्यांचे ढोंग व दुष्टपणा ओळखले. सरकारला कर मागण्याचा हक्क आहे व त्याच वेळी देवाचे ऐकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे त्याने दाखवून दिले.

मिशन रविवार

“द्या शुभवार्ता जगताला आदेश माझा तुम्हांला असे प्रभू शिष्या वधला”.
आज आपण मिशन रविवार साजर करित आहोत. आजच्या ह्या महत्वाच्या दिवशी देऊळमाता आम्हां सर्वांना जगाला जागे करण्यासाठी ‘मिशनरी व्हा’ म्हणून प्रोस्ताहन देत आहे. मिशन म्हणजे काय? पोप फ्रान्सिस सांगतात, ‘मिशन म्हणजे येशू व त्याच्या लोकांसाठी असलेली आवड’. आपल्या मिशन कार्याद्वारे आपण येशू व त्याची शिकवण लोकापर्यंत पोहचवीत असतो. ह्या कृतीमुळे आपली येशू व त्याच्या लोकांवर असलेली प्रिती दिसून येते.
येशूचे मिशन हातात घेणे म्हणजे प्रेमाचा, शांतीचा व एकोप्याचा झेंडा हाती घेणे होय. मिशन कार्याला हात घालण्यापूर्वी आपल्याला येशूने केलेल्या कार्याची नितांत गरज आहे. आज येशूची शिकवण नजरेसमोर ठेऊन ख्रिस्तसभा चांगल्या शमरोनी प्रमाणे मानवतेच्या रक्तबंबाळ झालेल्या जखमांना मलमपट्टी करत आहे. त्यांच्या जखमांना मायेचा स्पर्श करून ख्रिस्तसभा त्यांना बरे करित आहे. तसेच उत्तम मेंढपाळाप्रमाणे ख्रिस्तसभा हरवलेल्या मेंढरांचा शोध करत असते. आपल्या जीवनांत प्रेषीत कार्याला महत्व देण्यासाठी संत फ्रान्सिस असिसीकर, संत डॉन बोस्को आणि मदर तेरेसा ह्यांनी केलेल्या नि:स्वार्थी सेवेची आठवण करण्याची फार गरज आहे. ह्यांनी केलेलं मिशनरी कार्य स्तुतीस्पद आहे.
आपण मिशनरी कशाप्रकारे होऊ शकतो? मिशनरी कार्य करण्यासाठी मी काय करावे? असे प्रत्येकाने स्वत:ला विचारले पाहिजे. मिशनरी कार्य करणाऱ्यांना प्रार्थना करणे, देऊळमातेला आर्थिक मदत करणे ऐवढेच पुरेसे नाही तर आपण आपल्या हातात प्रेमाचा, शांतीचा व बंधुत्वाचा झेंडा घेतला पाहिजे. आज जगभर प्रेषीत कार्य करताना बहुतेकांना त्रास सहन करावा लागत आहे. फादर टोम उझूनलील (भारतीय धर्मगुरू)मिशनरी कार्य करताना (Tom Uzhunnalil) ह्यांचे इस्लाम देशात मार्च २०१६ साली अपहरण करण्यात आले होते. आणि नंतर त्यांची सुटका झाली. त्यांना बऱ्याच हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागले. तसेच आपली धर्मभगिनी वाल्सा (Sister Valsa) हिचा खूण करण्यात आला. ह्यामागील कारण काय कसेल? कारण एकच ते म्हणजे तीने केलेलं मिशनरी कार्य हे प्रेमाने, न्यायाने, सत्याने व एकजुटीने भरलेले होते.
जसे कोमल, सुंदर गुलाबाला हात लावण्यासाठी काट्यांचा मार्ग मोकळा करावा लागतो, तसे येशूचे कार्य पुढे नेण्यासाठी काट्यांची वाट चालावी लागते. जसे येशूला अनेक दुख व संकटांना सामोरे जावे लागले तसे आम्हांला सुद्धा सामोरे जावे लागेल. भिती बाळगण्याची गरज नाही. कारण येशू म्हणतो, ‘तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
जगाला जागे करण्यासाठी हातात न्यायाची, शांतीची, प्रेमाची मशाल घेऊया आणि म्हणूया ‘Wake Up The World ! Wake Up The World!’ मिशन कार्य चांगले करण्यासाठी देवाची साथ आपल्याला लाभू दे म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो मिशन कार्य करण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. आपले पोप, कार्डीनल्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना त्यांच्या मिशन कार्यात प्रभूचा आशीर्वाद लाभावा व सर्व संकट व दु:खापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी जगात शांती, ऐकोपा, प्रेम प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराचे सामर्थ्य व मार्गदर्शन लाभावे व त्यांच्या कार्याद्वारे ह्या जगात शांतीमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपल्या डोळ्यासमोर न्याय, प्रेम, बंधुत्व ह्यांना प्राधान्य द्यावे व सर्व मतभेत विसरून ‘सर्व-धर्म समभाव’ ही संकल्पना आत्मसात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी लोकांना देवाने आरोग्यदायी स्पर्श करावा व त्यांना परत एकदा चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी माते मरियेच्या मध्यस्थी द्वारे प्रभूचरणी प्रार्थना करुया.

No comments:

Post a Comment