Friday 6 October 2017

Reflections for the homily of 27th Sunday in Ordinary Time (08-10-2017) by Br Jackson Nato.







सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार


दिनांक: ०८-१०-२०१७
पहिले वाचन: यशया ५:१-७:
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:६-९:
शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३

प्रस्तावना:


     आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला मानवी कठोरता व परमेश्वराची अपार करुणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे.
    आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला द्राक्षमळ्याचा दृष्टांत देऊन परमेश्वराचा इस्राएल लोकांवर असलेला राग व्यक्त करतो. कारण इस्राएल लोक देवाच्या आज्ञेशी एकनिष्ठ नव्हते. दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पैकरांस परमेश्वराचे आभार व स्तवन करण्यास प्रोत्साहित करून सदोदित आनंदी राहण्यास सांगत आहे. तसेच आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ‘द्राक्षमळा व माळेकरी’ यांचा दाखला देत आहे. हा दाखला इस्राएल लोकांनी देवाच्या संदेष्ट्यांचा व ख्रिस्ताचा केलेला धिक्कार ह्यांचे वर्णन करतो. 
      आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण राग, मत्सर, द्वेष व कठोरपणा ह्यांना बळी पडत असतो. त्यामुळे आपल्याला दैवी करुणेचा व दयेचा अनुभव येत नाही. देवाचा अनुभव येण्यासाठी आपल्याला आपल्या अंगी असलेला कठोरपणा नाहीसा करून देवाची माया व करुणा आपण आत्मसात करण्याची गरज आहे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना परमेश्वराकडे मागूया.

सम्यक विवरण: 

पहिले वाचन: यशया ५:१-७

     हा छोटासा दाखला अतिउत्कृष्ट आहे. याचा आरंभ प्रेमगीतासारखा आहे. तो कर्णमधुर, कल्पक आहे. हा दाखला वाचत असताना आपण स्वतःचीच चौकशी करून घेत आहोत असे आढळते. तसेच ह्या दाखल्याद्वारे पापाचे खरे स्वरूप स्पष्ट होते व ते सर्वस्वी असमर्थनीय आहे हे जाणवते.

दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस पत्र ४:६-९:

     या पत्रामध्ये आनंद हा विषय मांडला आहे. प्रेषिताने आपल्या वाचकांना सदोदीत आनंद करण्यास सांगितले आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा हेच त्याचे आवाहन आहे. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन आणि नातेसबंध यातून जीवनाचा एक विशिष्ट गुण सर्वांना उघडपणे कळून यावा असे तो सांगतो. ख्रिस्ती लोकांच्या जीवनात चिंतेला अजिबात थारा नसावा कारण त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना, विनंती करता येते व ती करावी.
     ख्रिस्ती व्यक्तीचे विचार जीवनाला धरून असावेत अशा गोष्टीचा उल्लेख पौलाने येथे केला आहे. ह्या गोष्टींचे मनन केल्याने आपल्या वृत्ती-प्रवृत्तींना आकार मिळतो. आपले उच्चार व आचार-कृती सर्वांना चांगले वळण लावतील कारण या गोष्टी ख-या, प्रामाणिक, योग्य, शुद्ध, सन्माननीय आणि प्रिय अशा आहेत.

शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३

     या दाखल्यात द्राक्षमळा व माळेकरी यांचे उदाहरण दिले आहे. परगावी राहणारा जमीनदार व त्याचे माळेकरी ह्यांचा हा वृतांत आहे. मळ्याचा खंड म्हणून उत्पन्नाचा काही ठराविक हिस्सा मालकास देण्यास ते नकार देत होते व ह्याच कारणावरून त्यांना काढून टाकणे हे पुरेसे कारण होते परंतु जमीनमालकाच्या मुलाचा खून केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. या दाखल्याचे मर्म याजक आणि परुशी ह्यांना ताबडतोब उमजले कारण संदेष्ट्याचे पुस्तक माहीत असणा-या कोणालाही ते समजले असते. इस्राएल देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सर्वथा उणे पडले हे यशयाने त्या सर्वश्रुत द्राक्षमळ्याच्या दाखल्यातून प्रतिक रूपाने दाखवले आहे. हे पुढारी आता लवकरच देवाच्या पुत्राला ठार करणार होते. त्यातून गतकाळात त्यांनी देवाच्या संदेष्ट्याचा पुन्हा-पुन्हा अव्हेर केला होता. या वाचनातून या दाखल्याचा गर्भीव अर्थ स्पष्ट केला आहे; इस्राएलच्या पुढा-यांनी ज्याला नाकारले त्याला सन्मानाच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेले आहे, हे सिद्ध होते. द्राक्षमळा या चिन्हाचे दर्शविलेले राज्य त्यांचे नव्हे तर देवाचे आहे आणि देव ते जबाबदार व्यक्तीस सोपवून देईल.

मनन चिंतन

     आपले जीवन हे गोड-कडू अनुभवाच, चांगल्या आणि वाईट परिस्थितीच एक रांजण आहे. प्रकाश अंधकारच, दिवस रात्रीच एक चक्र आहे, समुद्र नदीच मिलन आहे. ह्या वास्तविकतेतून जीवन जगताना आपण काय निवडाव हे आपल्यावर अवलंबून आहे. पण ह्या वास्तविकतेतून आपण भरकटतो, जगातील गोष्टींना बळी पडतो आणि स्वत:ला अशा परिस्थितीला नेऊन ठेवतो जेथे आपले जीवन हे एका गीता प्रमाणे दिसू लागते आणि ते गीत आहे.
            ‘जीवनाचा घडा ठेविला उलटा, जीवनाचं पाणी राहीनारे,                              किती यत्न दुवा केला माझ्या देवा,                                              परि तुझी माया अव्हेरीली 
           कवाडे हृदीची घट्ट गा मिठीली,
         किती ठोकीता तू मी न उघडिली’

     वरील गीत आजच्या उपासनेचा विषय आपल्यासमोर मांडत आहे. आणि तो विषय आहे. “मानवाची कठोरता आणि देवाची अपार करुणा.” आजचे पहिले वाचन आणि शुभवर्तमान ह्याच विषयावर जोर देत आहे. आपला कठोरपणा नदीत वाहणाऱ्या गुळगुळीत दगडासारखा आहे. चहूबाजूने दैवी प्रेमाने व्यापला असूनसुद्धा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही. आपण प्रतिसाद स्तोत्रात ऐकतो की: परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हासाठी अजून काय करायला हवे होते? मी तुमच्यासाठी काय करण्यात कमी पडलो?” परमेश्वराने इस्राएल लोकांना त्याची जिवलग प्रजा म्हणून निवडली. त्यांना त्याने सर्व गोष्टी पुरवल्या. त्यांना मिसर देशाच्या गुलामगिरीतून सोडवले. त्यांना कनान देशात जागा दिली. त्यांचे परराष्टीयांपासून, सर्व शत्रूपासून रक्षण केले आणि ऐवढे करूनसुद्धा इस्राएल लोक परमेश्वरच्या आज्ञा पाळण्यात कमी पडले. परमेश्वरापासून दूर गेले. त्याला विसरले. ह्या गोष्टी इस्राएल लोकांकडून काही नवीन नव्हत्या. परमेश्वराने त्यांना कित्येकवेळा संदेष्ट्याद्वारे चेतावणी दिली तरीसुद्धा त्यांच्या कठोर मनाला पाझर फुटला नाही. म्हणून यशया संदेष्टा परमेश्वरचा राग एका मुलाला कंटाळलेल्या आईच्या कथेतून व्यक्त करतो. कितीही समजावून जेव्हा मुलगा वाया जातो. वाईट मार्ग तो कधी सोडत नाही. तेव्हा त्याच्या आईच्या भावना दुखावल्या जातात. त्याच भावना आज आपल्याला परमेश्वराच्या मुखातून दिसतात.    
     आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त दृष्ट माळ्यांचे उदाहरण देऊन शास्त्री आणि परुशांच्या दिशेने बोट दाखवत आहे. परमेश्वराने पाठविलेल्या संदेष्ट्यांचा त्यांनी मान राखला नाही. सरतेशेवटी परमेश्वराच्या पुत्रालासुद्धा नाकारण्यास ते कमी पडले नाहीत. ह्याचाच अर्थ म्हणजे परमेश्वराचे वचन आचरणात आणण्यास ते कमी पडले आणि परमेश्वराचे वचन लोकांपर्यंत पोहोचविण्यास पुढाकार घेतला त्यांचा त्यांनी धिक्कार केला.
     वरील काही दाखले आपल्याला आपल्या जीवनातील खऱ्या परिस्थितीचे दर्शन घडवतात. कठोरपणा आपल्याला जीवनातील खूप गोष्टीपासून दूर ठेवतो. दुसऱ्यांचे मत, दुसर्यांच्या भावना, त्यांचे विचार जाणून घेण्यापासून वंचित करतो. एवढेच नव्हे तर आपल्या जीवनात बदल घडविण्यास व नवीन जीवनापासून दूर ठेवतो. नवी मुल्ये आचरणात आणण्यास, देवाचे वचन पाळण्यास अडथळे आणतो. क्षमा करण्यास व दुसऱ्यांकडून क्षमा मिळविण्यासाठी अपात्र करतो. कारण ह्या दुर्गुणामध्ये आपण जीवनाकडे एकाच दृष्टीकोनातून बघतो. आपल्याला वाटेल व मनाला पटेल तेवढेच करतो. त्यापलीकडे देवाला अनुभवण्यास, देवाजवळ येण्यास कमी पडतो. आणि त्यामुळे आपले जीवन स्तब्ध होते. जसे आदी, तसे शेवटपर्यंत राहतो. ह्या कठोरपणामुळे आपण देवास राग आणण्यास पात्र करतो. परमेश्वराच्या दयेची आणि क्षमेची परीक्षा घेतो. परमेश्वराला संयम तोडण्यास भाग पाडतो. ह्याचे उदाहरण आपण वरील दोन्ही वाचनात ऐकले आहे. परमेश्वर पहिल्या वाचनात द्राक्षमळ्याचा म्हणजे इस्राएल लोकांचा नायनाट करण्याचे ठरवतो.
     शुभवर्तमानात दृष्ट माळ्यांना धूडकारून लावून तो मळा विश्वासू मळ्यांच्या हातात देण्याचा निश्चय करतो. ह्या दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त स्वत:च्या जीवनाबद्दल सांगत आहे. देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्रास स्वर्गीय राजा म्हणून प्रकट केले. अशाप्रकारे जो दगड बांधणाऱ्यानी नाकारला तो कोनशीला झाला” हे वचन पूर्णत्वास आणले. त्याच्या पुत्राद्वारे त्याने सर्व जगास एकत्र आणले, फक्त इस्राएलच नव्हे तर संपूर्ण मानवजात त्याने प्रिय मानली. कारण परमेश्वराचा कठोरपणा आपल्या सौम्यतेपेक्षासुद्धा सौम्य आहे.
     वरील गीताचे शेवटचे धृवपद सांगते, “धाव  देवा आता बुडालो मी पार”, तुझ्या सामर्थ्याने मज आता तर”.
     जगाच्या नियमाप्रमाणे सौम्यता एक दिवस कठोरपणाला भेगा पाडते. जसे पाणी कितीही सौम्य असले तरी ते एक दिवस खडकाळ डोंगराला सुद्धा भेगा पाडते. तशी परमेश्वराची करुणा आहे. त्याच्या दयेचा प्रवाहाला आपल्या खडकी कठोरपणाने कितीही आळा घातला तरी तो एक दिवस आपल्या कठोरपणाला छिद्र पाडेल. जेव्हा आपण पापांच्या सागरात बुडणार तेव्हा आपल्याकडे एकाच गोष्ट ती म्हणजे विनवणी. कारण संत पौल आपल्याला आज दुसऱ्या वाचनात उद्देशून सांगतो. तुमच्या विनवण्या, मागण्या परमेश्वराला सांगा, त्याला प्रार्थनेचे साकडे घाला म्हणजे तो ती ऐकेल व तो तुम्हांस तारील. ह्याच विश्वासाने परमेश्वराकडे आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यास प्रार्थना करूया जेणेकरून आपले खडकमय अंत:करण काळ्या माती प्रमाणे सौम्य होईल. 
    
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरु व धर्म भगिनी ह्या सर्वाना परमेश्वराची सुवार्ता व करूणा दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
२. जे लोक शारीरिक आणि मानसिक आजाराने त्रस्त आहेत, त्या सर्वाना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांचे आजार दूर होऊन त्यांचे दैनदिन जीवन आनंदात जावे म्हणून आपण परमेश्वराला विणवूया.
३. जे लोक जागतिक मोहास बळी पडले आहेत, देवापासून दूर गेले आहेत व परमेश्वराजवळ येण्यास नाकारत आहेत त्या सर्वाना दैवी करुणेचा अनुभव यावा व परमेश्वराकडे परतण्याचा व त्याच्या वचनावर संपूर्ण जीवन आधारण्यास शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ऑक्टोबर महिना हा जपमाळेचा महिना म्हणून अर्पण केला आहे. ह्या संपूर्ण महिन्यात सर्व कुटूंबे पवित्र जपामाळेसाठी एकत्र यावीत व त्याद्वारे त्यांच्यात एकमेका प्रित्यर्थ प्रेम व आपुलकीची भावना निर्माण व्हावी म्हणून परमेश्वराकडे विनंती करूया. 
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व आध्यात्मिक हेतूंसाठी प्रार्थना करुया.


No comments:

Post a Comment