Reflection for the homily of 31st Sunday in Ordinary Time (05-11-2017) by Br. Jameson Munis.
सामान्य काळातील ऐकतिसावा रविवार
दिनांक: ०५-११-२०१७
पहिले वाचन: मलाखी १:१४ब, २:२, ८:१०
दुसरे वाचन: १ थेस्सलनिकाकरांस २:७ब–९:१३
शुभवर्तमान: मत्तय २३:१-१२
"देवाचे वचन व नम्रता ह्या गोष्टी महान आहेत"
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील ऐकतीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाच्या
वचनावर विश्वास ठेऊन नम्रता अंगीकारण्यास बोलावीत आहे.
मलाखी
ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सेनाधीश परमेश्वर, इस्राएल
लोकांना म्हणतो की, “तुम्ही माझा मार्ग सोडून दिला आहे म्हणून मी तुम्हाला तुच्छ
व नीच केले आहे”. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलनिकाकरांस लिहिलेल्या पहिल्या
पत्रात म्हणतो की, तुम्ही स्वीकारलेले वचन हे माणसाचे वचन नव्हे, तर देवाचे वचन
होय. जो कोणी देवाचे वचन स्वीकारतो त्याच्या जीवनात देवाचे वचन कार्य करते. तसेच
आजचे मत्तयलिखित शुभवर्तमान शास्त्री व परुशी ह्यांचे उदाहरण देऊन आपल्याला
देवाच्या वचनावर अवलंबून राहण्यास व नम्रता अंगीकारण्यास आमंत्रित करीत आहे. येशू
म्हणतो, ‘जो कोणी स्वतःला मोठा समजतो त्याला कमी समजले जाईल व जो स्वतःला लहान
समजतो त्याला मोठे गणले जाईल.’
देवाचे
वचन व नम्रता ह्या गोष्टी महान आहेत. आपणा सर्वाना देवाचे वचन स्वीकारण्यासाठी व
नम्र होण्यासाठी देवाची कृपा व सामर्थ्य लाभावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: मलाखी १:१४ब, २:२, ८:१०
इतर
संदेष्टयाप्रमाणे मलाखी संदेष्ट्याने देवाचा संदेश लोकांपर्यत पोहोचवला. त्याने हा संदेश बंदिवासानंतर सुटलेल्या यहुदी
राष्ट्राला सांगितला आहे. सेनाधीश परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणतो की, “तुम्ही
माझा मार्ग सोडून दिला आहे म्हणून मी तुम्हाला तुच्छ व नीच केले आहे”. येथे
आपल्याला समजते की बाबिलोन येथील बंदिवासातून परत आलेले इस्त्राएल व यहुदी लोक
धार्मीकतेचा मार्ग विसरलेले होते. त्यांच्याठायी असलेला उत्साह नाहीसा झाला होता.
लोक धार्मिक आचरणात थंडावलेले होते. त्यांच्या नैतिक आचरणात शिथिलता आली होती.
त्यांची अंतकरणे खचली होती आणि त्यांचा देवावरील विश्वास कोमजला किंवा नाहीसा झाला
होता.
तसेच याजकवर्गाची
वागणूक चांगली नव्हती. याजक लोक पैशाशिवाय सेवा करत नव्हते व ते देवाची आज्ञा पाळत
नव्हते. ह्या सर्व कारणास्तव सेनाधीश परमेश्वर मलाखी संदेष्टाच्याद्वारे याजक
लोकांना सांगतो की, तुम्ही माझा मार्ग व
आज्ञा पाळली नाही, ह्यास्तव मी तुम्हाला सर्व लोकांपुढे तुच्छ आणि नीच करणार. याजक
लोकांना मान-सन्मान देत होते पण देवाला ते अयोग्य नव्हते. म्हणून मलाखी आपल्या
संदेशाद्वारे याजकांना देवाचे वचन पाळा असे बजावून सांगत आहे.
दुसरे वाचन: १ थेस्सलनिकाकरांस २:७ब–९:१३
संत पौल आपल्या पत्राद्वारे थेस्सलनिकाकरांस “विश्वास
ठेवणाऱ्यात देवाचे वचन कार्य करते”, या विषयी सांगत आहे. कारण, पौलाने थेस्सलनीका
शहरात ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली व नंतर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना त्यांने
शिक्षण दिले. हे देवाचे वचन त्यांनी आनंदाने स्विकारले होते. पौल जे सत्य सांगत
होता ते सर्व मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे नसून देवापासून आले आहे असा लोकांनी
विश्वास ठेवला होता.
आपण सुवार्ता सांगतो तेव्हा सुवार्तेविषयी
आपले मत आपण सांगू नये, किंवा मनोरंजनासाठी बोलू नये. तर देवाने प्रकट केलेल्या
सत्याची, म्हणजेच देवाच्या वचनांची घोषणा करावी व देवाचे कार्य करीत राहावे असा
त्यांचा हेतू होता. मनुष्यांचे अंत:करण बदलण्याचे सामर्थ्य देवाच्या वचनांत आहे.
म्हणून देवाच्या वचनावर आपण जर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येईल असे संत पौल आपल्याला उद्देशून सांगत आहे.
शुभवर्तमान: मत्तय २३: १-१२
आजचे शुभवर्तमान आपल्याला देवाच्या वचनावर
विसंबून राहण्यास आमंत्रित करीत आहे. देवाचे वचन हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात
कार्यरत असते. आजच्या पवित्र शुभवर्तमानात आपण शास्त्री व परुशी ह्यांच्या विषयी
ऐकतो. त्यांना मोशेचे नियमशास्त्र शिकविण्याचा अधिकार होता. ते लोकांना
नियमशास्त्राप्रमाणे शिकवीत असत पण ते आपल्या आचरणात कधीच आणत नसे. समाजात
आपल्याला सन्मान कसा मिळेल याची या पुढाऱ्यांना अधिक चिंता होती. ते इतरांची सेवा
करीत नसत, उलट, इतरांना स्वतःसाठी राबवीत व त्यांच्या कडून सेवा करून घेत. हे सर्व
बघून, प्रभू येशूने या पुढाऱ्यांच्या वृत्तीचा विरोध व निषेध केला आणि
लोकसमुदायांना सांगितले की, “शास्त्री आणि परुशी जे काही तुम्हाला सांगतील ते सर्व
आचरणात आणा आणि पाळत जा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका”.
प्रभू
येशू पुढे म्हणतो, देव आपला स्वर्गीय पिता आहे. आपण सर्व एकमेकांचे भाऊ व बहिणी
आहोत. येशू म्हणतो, ‘जो कोणी स्वतःला मोठा समजतो त्याला कमी समजले जाईल व जो
स्वतःला लहान समजतो त्याला मोठे गणले जाईल.’ म्हणून इतरांची सेवा करण्यास आपण सदैव
झटत राहावे ह्यामध्ये आपला हाच खरा मोठेपणा आहे.
बोधकथा:
दिवस
उन्हाळ्याचे होते. एक मुलगा शाळेतून घरी येत होता. वाटेत त्याला एक तळ दिसलं. त्या
तळ्यातील पाणी खूप सुंदर होते. गरमीने मुलगा घामाने भिजलेला होता. म्हणून त्याने
पाण्यात पोहण्याचा विचार केला. त्याने कपडे व पुस्तके काठावर ठेवली आणि तो अंघोळीसाठी
तळ्यात उतरला. तळ्यातील पाणी खूप खोल होते म्हणून मुलाला भीती वाटली. त्याचा अंदाज
चुकला व तो पाण्यात बुडू लागला. जोरजोराने ओरडू लागला. तेवढ्यात तेथे दोन परुशी जे
शाळेत मुलांना शिकवत होते त्यांनी मुलाचा आवाज ऐकताच ते मुलाकडे धावून आले. त्यांनी
मुलाला पाण्यात बुडताना पाहिले आणि त्या
मुलाला मदत करण्याऐवजी, ते त्या मुलाला म्हणाले, “अरे वेड्या पाण्याला काय भितोस.
माणूस पाण्यापेक्षा हलका असतो. पाण्याचे विशिष्ट गुरुत्व एक असते. माणसाचे त्याहून
कमी असते. म्हणून माणूस पाण्यावर तरंगतो. असा शास्त्राचा सिद्धांत आहे. तर तू आता
श्वास बंद कर आणि पाण्यात आडवा हो”. असा सल्ला परुशींनी त्या बुडत्या मुलाला दिला. परंतु मुलगा
काही ऐकत नव्हता. तो पाण्यातून बाहेर येण्यासाठी आक्रोश करत होता. तेवढ्यात उलट
बाजूने एक शेतकरी आला. त्यांने त्या मुलाला बुडतांना पहिले. त्याने तलावाच्या
काठावरून मुलाला हात धरून मुलाला बाहेर खेचले आणि त्यांचा प्राण वाचवला.
मनन चिंतन:
परमेश्वराने
मनुष्यास स्वतःचे प्रकटीकरण करण्यासाठी नम्रतेने लहानपण स्विकारले. परंतु ही नम्रता
नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी तसेच देवाचे आवडते लोक इस्त्राएल ह्यांच्यात नव्हती.
ते सर्वजण बोलायचे एक आणि करायचे दुसरे. असे म्हणतात की, “बोले तैसा चाले, त्यांची वंदावी
पाऊले”, म्हणजे समाजात आश्वासन देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले व अजून येत
आहेत. वायफळ बडबड करणारे सुध्दा पण खूप आहेत. पण हे सर्वजण सांगतात त्यानुसार ते वागतात
असे आपल्याला दिसून येत नाही.
आजच्या
पहिल्या वाचनात सेनाधीश परमेश्वर म्हणतो की, “तुम्ही माझा मार्ग सोडून दिला आहात
म्हणून मी तुम्हाला तुच्छ व नीच केले आहे”. कारण इस्त्राएल व यंहुदी लोक
धार्मिकतेचा मार्ग विसरलेले होते.
दुसऱ्या
वाचनात संत पौल थेस्सलनिकाकरांस म्हणतो की, तुम्ही स्वीकारलेले वचन हे माणसाचे वचन
नव्हे, तर देवाचे वचन होय. जो कोणी स्वीकारून आत्मसात करतो त्यांच्या जीवनात
देवाचे वचन कार्य करते.
तसेच
आजचे शुभवर्तमान सांगते की, समाजात मानासाठी धडपणारे शास्त्री व परुशी लोकांनी
पाहावे म्हणून ते आपली कामे करीत असत. प्रत्येक समारंभात अधिक मान कसा मिळेल याचा
ते प्रयत्न करीत. लोकांनी त्यांना गुरु म्हणून नमस्कार केला तर ते खुष होत असत. ते
ढोंगी होते व त्यांचा धर्म दिखाऊ होता. ते लांब प्रार्थना करून समाजाला फसवीत असत.
त्यांनी ख्रिस्ताला स्विकारले नव्हते. ते देवाच्या वचनाचा खोटा अर्थ सांगत. ते
देवाची थट्टाच करीत असत. न्याय, द्या व विश्वास यांचा त्यांनी त्याग केला होता.
म्हणून प्रभू येशू आपल्याला सांगतो की, आपण स्वतःला शास्त्री व परुशीसारखे गुरुजी,
पिता व मालक म्हणू नका, कारण आपला पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. प्रभू येशू
आपल्याला नम्रता अंगीकारण्यास सांगतो. असे म्हणतात की “आधी नम्रता मग मान्यता”,
म्हणजे जो कोणी स्वतःला कमी लेखतो त्याला मोठा गणला जाईल असे प्रभू येशू आपल्याला
आजच्या शुभवर्तमानात सांगतो. कारण आपण सर्वजण रिकाम्या
हातांनी ह्या भूतलावर प्रवेश केला आहे. आपण काहीच घेऊन आलो नाही. आपल काहीच नाही व
या भूतलावरून जाताना सुध्दा आपण काहीच घेऊन जाणार नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे,
आपलं, माझं व आमचं असे सांगायला व म्हणायला काहीच राहणार नाही. देवाच्या
आशिर्वादाने आपणाला सर्वकाही लाभत आहे. आपण जर नम्रता अंगिकारली तर आपण देवाचे
आवडते बनु.
म्हणून
आपण जे काही करतो ते दुसऱ्यांनी पहावे म्हणून करतो का? आपण जे बोलतो त्यांची
दुसऱ्यांनी स्तुती केली पाहिजे का? आपण जे काही कपडे घालतो त्याची दुसऱ्यांनी आपली वाहवा केली पाहिजे का?
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला प्रामाणिक व विश्वासू राहण्यास
मदत कर.
१. आपल्या
ख्रिस्तसभेची दुरा वाहणारे पोप, कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ लोक ह्यांनी
आपले आयुष्य प्रभूच्या कार्यासाठी अर्पण केले आहे, अशा सर्व लोकांना पवित्र आत्म्याच्या
कृपेने त्यांच्या प्रामाणिक व विश्वासू जीवनात वाढ व्हावी, त्यांना प्रभू परमेश्वराचे
प्रेम, कृपा व आनंद मिळावा तसेच त्यांच्या सुवार्ता कार्यामध्ये यश मिळावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या
धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व त्यांच्या जीवनात देवावर
असलेला विश्वासात वाढ व्हावी. त्यांनी देवाची वचने व आज्ञा पाळाव्यात व जागतिक
मोह-मायेचा त्याग करून शास्त्री व परुषी सारखे न होता शुभवर्तमानाच्या
मूल्याप्रमाणे जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशातील
सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय भष्ट्राचार व वाईट मार्ग सोडून प्रामाणिकपणाचा मार्ग
स्विकारावा व लोकांची व देशाची सेवा विश्वासुपणे करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी आजारी
आहेत, अशा सर्वाना देवाचा व पवित्र मातेचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक
हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment