Thursday, 16 November 2017

Reflections for the homily of 33rd Sunday in Ordinary Time  (19-11-2017) by Br Camrello D'Mekar. 






सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार




                             


                                                                                                                                           दिनांक: १९/११/२०१७
पहिले वाचन: नीतिसूत्रे: ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र: ५:१-६
शुभवर्तमान: मत्तय: २५:१४-३०


“तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास”

प्रस्तावना:
     आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपले मानवी जीवन व परमेश्वराने आपल्याला सोपविलेल्या महत्वाच्या जबाबदारीविषयी सांगत आहे.
आजचे पहिले वाचन नीतिसूत्रे ह्या पुस्तकातून घेतले आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे पार पाडावेत आणि नितीचे जीवन कसे जगावे इत्यादी बाबी स्पष्ट करण्यासाठी, उपदेशक एका आदर्श व सद्गुणी स्त्रीचे व्यक्तीमत्व आपल्यासमोर मांडत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल लोकांना प्रभू येशूच्या पुनरागमनाच्या वेळेची खात्री अपेक्षित नाही, ह्याविषयी बोध करीत आहे. मत्तयलिखीत शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त ‘रुपयांच्या दृष्टांताद्वारे’ आपणास विश्वासामध्ये राहण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
आजच्या ह्या पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना देवाने आपल्याला बहाल केलेल्या लहानशा लहान गोष्टीला प्रामाणिक राहून, ख्रिस्तसभेचे कार्य आपल्या कृत्याद्वारे आणि शब्दाद्वारे जगभर पसरावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: नीतिसूत्रे ३१:१०-१३, १९-२०, ३०-३१

‘नीतिसूत्रे’ आणि ‘ज्ञानसुत्रे’ ह्या पुस्तकांत शहाणपणाला, सुज्ञतेला (wisdom) व्यक्तीस्वरूप दिले आहे. निर्मितीच्या कार्यातही सुज्ञता देवाला सहकार्य करीत होती. इब्री भाषेत सुज्ञतेसाठी ‘Hokmah’ हा शब्द असून, ग्रीकमध्ये ‘Sophia’ हा शब्द आहे. हे दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत. नीतिसुत्रांच्या पुस्तकात स्त्रीरूप दिलेली ज्ञानसंपदा (Lady wisdom) मार्गदर्शन करते. पुस्तकाचा शेवट सुज्ञ अशा स्त्रीच्या उदाहरणाने होतो. नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचे श्रेय शलमोनला दिलेले आहे. कारण शलमोन हा सुज्ञतेचा प्रेमी म्हणून ओळखला जात होता.
पुढील उतारा हे एक गीत असून त्यामध्ये आदर्श स्त्रीचे वर्णन करण्यात आले आहे. येथे ही स्त्री आपल्या घरातील कुटुंबियांसाठी अन्न-वस्त्राची तरतूद करत आहे, असे दाखविण्यात आले आहे. तीची ही जबाबदारी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून,  घराबाहेर आणि इतर व्यवसायातही तिची जबाबदारी व सहभाग दिसून येत आहे. तसेच, ती गरजवंतांची काळजी घेते आणि निरक्षितांना सुशिक्षित करण्याची सेवा करते असे आदर्श जीवनाचे वर्णन नीतिसूत्रे ह्या पुस्तकात करण्यात आले आहे.

दुसरे वाचन: थेस्सलननीकाकरांस पहिले पत्र ५: १-६ 

     संत पौल थेस्सलननीकाकरांस पाठविलेल्या पहिल्या पत्रात सांगतो की प्रभूचा दिवस येणार आहे. हा दिवस एक दिवस नसून तो एक विशिष्ट काळ आहे. या काळात देव जगाचा न्याय करील व ख्रिस्ताद्वारे आशीर्वादित करेल. कोणाला कल्पना नसताना ख्रिस्त अंतराळात येईल व त्यानंतर लगेच या काळाची सुरुवात होईल. थेस्सलनीकाकरांस त्यांच्या विश्वासामुळे याविषयीचे शिक्षण मिळाले. म्हणून ते  अंधारात न राहता (अज्ञानी न राहता) ते प्रकाशात चालू लागले. त्यांना सत्याची जाणीव झाली.
येशूच्या दुसऱ्या आगमनाचा प्रश्न वाचकांच्या चिंतेतून पुढे आला आहे. ही घटना जेव्हा घडेल तेव्हा आपली तयारी असेल का? अशी शंका लोकांना सतावत होती. संत पौल लोकांना सांगतो की प्रभूचे येणे हे रात्री अचानक येणाऱ्या चोरासारखे असेल. हे त्यांना अनपेक्षित आणि न रुचणारे असेल.

शुभवर्तमान: मत्तय २५:१४-३०

     देवाने प्रत्येकाला त्याची सेवा करण्यासाठी शक्ती व निरनिराळी क्षमता दिली आहे. तसेच काही प्रमाणात संपत्तीसुद्धा दिली आहे. शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताने ‘रुपयांच्या दृष्टांताद्वारे’ विश्वासू व प्रामाणिक कसे राहायचे ह्याचे महत्व दाखवून दिले आहे.
परदेशी जाणाऱ्या मनुष्याने आपल्या दासांना आपली मालमत्ता वाटून दिली. एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. पाच हजार रुपये म्हणजे ५००० चांदीची नाणी. १००० चांदीच्या नाण्यांचे वजन सुमारे ३० किलो असे. प्रत्येक दासाची बुद्धी व क्षमता किती होती हे त्या मनुष्याला ठाऊक होते. ज्यांना ५००० व २००० चांदीची नाणी मिळाली त्यांनी चांगला व्यापार केला व प्रत्येकाचे भांडवल दुप्पट झाले. हे पाहून त्या धन्याला त्यांचा विश्वासूपणा समजला. त्यांनी आपल्या पैशाचा व वेळेचाही विश्वासूपणे उपयोग केला होता. त्यांच्या विश्वासूपणामुळे ते अधिक जबाबदारी घेण्यास पात्र ठरले. ज्याला १००० रुपये मिळाले होते त्याने व्यापार न करता जमिनीत लपवून ठेवले. ह्या कारणामुळे तो एकनिष्ठ व विश्वासू नव्हता हे दिसून येते. 
मनन चिंतन:

आपल्याला कोणीतरी बक्षीस आणले तर ते घेण्यासाठी आपण लगेच हात पुढे  करतो. हातात घेतल्याशिवाय ते बक्षीस आपल्या मालकीचे होत नाही. ते आपल्यासाठीच असेल, आपले नावही त्यावर लिहिलेले असेल, तरीदेखील ते स्वीकारल्याशिवाय आपल्याला मिळत नाही.
पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने आपले तारण झाले आहे. हे देवाचे आपल्यासाठी दान आहे. हे दान विश्वासाने स्वीकारले, तरच ते आपल्याला मिळेल आणि त्याबरोबरच सर्व आध्यात्मिक आशिर्वादही मिळेल. या दानाचा अव्हेर करणाऱ्या माणसाला तारणाची आशा नाही, कारण तारण दुसऱ्या परमेश्वराशिवाय इतर कोणाकडूनही होऊ शकत नाही. परमेश्वराशिवाय आपल्या तारणासाठी दुसरी व्यक्तीचे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
दररोजच्या जीवनात अनेक प्रसंगी आपण अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतो. आपण रात्री झोपतो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण उठणार या विश्वासाने आपण डोळे मिटतो. असा विश्वास नसता तर कोणालाही शांत झोप लागली नसती. एखाद्या नेमून दिलेल्या तारखेला वार्षिक परीक्षा सुरु होईल असे जाहीर झाले म्हणजे विद्यार्थी त्याप्रमाणे तयारी करू लागतात. ठरल्या दिवशी परीक्षा होणारच या विश्वासाने ते तयारीला लागतात. मनुष्याला विश्वास परका, अनोळखी आहे असे मुळीच नाही.
देवाचे अचूक पवित्र वचन या विश्वासाचा आधार आहे. विश्वासाचे दोन प्रकार आहेत: बौद्धिक विश्वास आणि अंतकरणापासूनचा विश्वास. पवित्र शास्त्रातील गोष्टी व तत्वे चांगली आहेत असे मानणे हा बौद्धिक विश्वास होय. अंतकरणापासूनचा विश्वास म्हणजे पवित्र शास्त्रातील गोष्टी व तत्वे यांचे सत्य स्वीकारून त्यावर अवलंबून राहणे होय.
विश्वासाचा उगम
     विश्वास हा त्रैक्य देवाचे दान आहे. ‘कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे’ (इफिस २:८). ‘आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे’ (इब्री १२:२). देवाचे वचन ऐकल्याने विश्वास वाढतो व बळकट होतो. केवळ  विश्वासामध्ये काही लाभ आहे असे नाही तर ख्रिस्त माझा तारणारा आहे असा विश्वास धरणे लाभाचे आहे. ख्रिस्ताशिवाय विश्वासाला किंमत नाही. विश्वासाने आपले तारण होते. विश्वासाने तारणाचे सर्व आशीर्वाद प्राप्त होतात. जो विश्वास ठेवीत नाही त्याला तारणाची आशा नाही.
परमेश्वराने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला लोकांचे तारण करण्यासाठी जगात पाठविले. आजच्या जगात माणूस इतका स्वार्थी झाला आहे की त्याच्याकडे देवाशी बोलायला दोन मिनटे सुद्धा नाही.
     जगात असे भरपूर लोक आहेत की ज्यांच्याजवळ पैसा, गाडी आणि बंगला आहे. तरीसुद्धा ते दुखी आहेत. ते आनंदी नाहीत. त्यांचाकडे एवढी संपत्ती असूनसुद्धा त्यांना पाहिजे ते मिळत नाही. तर हे सर्व का होते? ह्या सर्वांचे मूळ कारण म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही. माणूस संपत्तीच्या आहारी गेल्यामुळे त्याला देवाचा विसर पडला आहे. पती-पत्नीमध्ये भांडण, संशय, प्रियकर आणि प्रेयसीमध्ये ब्रेकअप, कुटुंबामध्ये भांडणे आणि मारामारी हे सर्व का होते? ह्या सर्व गोष्टींचे कारण म्हणजे त्याचा एकमेकांवर असलेला अविश्वास. प्रार्थनेत, मंदिरात, चर्चमध्ये लोक नेहमी काय मागत असतात हे तुम्हाला माहित आहे का? ते म्हणतात. ‘हे देवा, मला काहीच समस्या, अडचणी नको; मला सुख, शांती दे; पैसा  दे; मला कुठलाच आजार नको; नेहमी माझे चांगले होऊ दे. अशी आहे माणसाची वृत्ती.
     आजच्या शुभवर्तामानामध्ये आपण पाहतो की परदेशी जाणाऱ्या एका मालकाने आपल्या तीन नोकरांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवली. त्याने आपली मालमत्ता त्यांच्यावर का सोपवली असेल? कारण त्याला त्यांच्यावर विश्वास होता. त्याने एकाला पाच हजार, दुसऱ्याला दोन हजार आणि तिसऱ्याला एक हजार दिले होते. त्यांच्या योग्यतेप्रमाणे देऊन तो परदेशी गेला.

बोधकथा:

एक राहुल नावाचा मुलगा असतो. MBA पास होऊन सुद्धा त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. एक दिवस असाच वर्तमानपत्र वाचत असताना त्याला सरकारी नोकरीचा प्रस्ताव आढळून आला. त्याने ठरवले की आपण ह्या मुलाखतीसाठी जायचे. नेहमी प्रमाणे तो सकाळी उठला. देवासमोर उभा राहिला आणि देवाला बोलला की, हे देवा, खूप मेहनत करून आज मी इतपर्यंत पोहोचलो आहे. आज मला साथ दे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू माझा साथ देशील आणि तो मुलाखतीसाठी जातो. मुलाखतीला गेल्यावर त्याला समजते की तिकडे पुष्कळ विद्यार्थी लाच देवून आले होते. कोणी खासदाराच्या मदतीने, कोणी आमदाराच्या मदतीने आणि कोणी पोलिसांना लाच देऊन आले होते. पण राहुलने त्याचा देवावर असलेला विश्वास सोडला नाही. त्याने त्याच्या मनात विचार केला की ज्याचे कोणी नाही त्याचा परमेश्वर आहे. मुलाखत देऊन सर्व विध्यार्थी येत-जात होते. नंतर राहुलची मुलाखतीसाठी जाण्याची वेळ आली. तो मुलाखतीसाठी मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने मॅनेजरला स्वत:विषयी सांगितले आणि मॅनेजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे आणि अचूक दिली. नंतर शेवटी मॅनेजरने त्याला एक प्रश्न केला. ‘राहुल, मी मान्य करतो की तुझा MBA चा सर्व अभ्यासक्रम चांगला आहे. तू तर विज्ञानामध्ये (science) अव्वल दर्जाचा आहेस. पण तू कोणाला लाच देऊन ह्या मुलाखतीसाठी आला आहेस का? त्यावर राहुल थोडा शांत झाला आणि त्याने मॅनेजरला म्हटले, ‘मी कोणालाच पैशे किंवा लाच दिली नाही. मी सकाळी जेव्हा घरातून निघालो तेव्हा माझी आई बोलली, मुलाखतीला जाण्यापूर्वी देवाच्या पाया पड आणि देवाचा आशीर्वाद घे. मी तर फक्त देवाचे नाव घेऊन आलो आहे. माझ्याकडे लाच देण्यासाठी एकही पैसा नाही. आणि माझी कोणत्याही राजकीय मंत्र्यासोबत ओळख सुद्धा नाही. कारण मला माहित आहे की ज्याचं कोणीही नसते त्यांचा परमेश्वर असतो. त्यावर मॅनेजर त्याला म्हणाला, आजपर्यंत ह्या पंधरा वर्षात माझ्याकडे जेवढे मुलाखतीसाठी आले होते ते कुणाच्यातरी मदतीने आले होते. आज पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये असे झाले आहे की जो देवाच्या मदतीने आला आहे. मुलाच्या ह्या विश्वासामुळे मॅनेजरने त्याला नोकरी दिली.
देवाची मानवजातीवर असलेली प्रीती अपार आहे. त्याच्या प्रेमाला सीमा नाही. परंतु, जेव्हा आपण देवाच्या प्रेमाला अनुसरतो आणि जीवनात जास्तीत जास्त चांगले काम करण्याची जबाबदारी पार पाडत नाहीत, तेव्हा आपला देवावर असलेला विश्वास जणूकाही उन्हामध्ये ठेवलेल्या मेणासारखा विरघळत जातो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला विश्वासाचे वरदान दे.

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरु, व्रतस्थ जीवन जगणारे धर्मबंधू आणि धर्मभगिनी ह्यांनी स्वत:च्या जीवनाद्वारे लोकांच्या आध्यात्मिक आणि कौटुंबिक गरजा पूर्ण कराव्यात आणि देवाने सोपविलेले कार्य पूर्णत्वास न्यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या धर्मग्रामातील लोकांसाठी प्रार्थना करू या. आपण सर्वजण एकमेकांबरोबर शांततेने व प्रेमाने राहावे आणि आपल्या शेजाऱ्यावर निस्वार्थी मनाने प्रीती करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. आपले जीवन हे परमेश्वराची देणगी आहे. हे जीवन फुलविण्यासाठी परमेश्वराची उपासना करून त्याच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपले भाऊ-बहीण व नातेवाईक जे आपल्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात गेले आहेत, त्यांना देवाचा प्रकाश लाभावा व जे कोणी मरणाची वाट पाहत आहेत त्यांनी आपला आत्मा शुद्ध करून देवाच्या कृपेची याचना करावी म्हणून प्रार्थना करू या.  
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment