Reflection for the Homily of the Solemnity of Christ the King (26-11-2017) By Lavet Fernandes.
ख्रिस्त राजाचा सण
दिनाक: २६/११/२०१७
पहिले वाचन:
यहेज्केल ३४:११-१२,१५-१७
दुसरे वाचन:
करिंथकरांस पहिले पत्र १५:२०-२६
शुभवर्तमान: मत्तय
२५:३१-४६
प्रस्तावना :
आज ख्रिस्तसभा ‘ख्रिस्त राजाचा’ सण साजरा करीत आहे. देऊळमाता आपल्याला आठवण करून देत आहे की,
येशु ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या हृदयाचा, आत्म्याचा, शरीराचा
आणि कुटुंबाचा राजा आहे. ख्रिस्ताचे राज्य हे अंनतकाळचे राज्य आहे.
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यहेज्केल
सांगत आहे की, परमेश्वर स्वतः त्याच्या कळपाचा शोध करून त्यांचा मेंढपाळ होणार आहे. जी मेंढरे हरवली आहेत त्यांना परमेश्वर शोधून
काढून त्यांच्या गरजांची पूर्तता करणार आहे. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या
पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला ख्रिस्ताच्या
विश्वासात खंबीर व दृढपणे उभे राहण्यास प्रोत्साहित करत आहे. कारण येशू ख्रिस्त
मरणातून उठला आहे व तो जेव्हा येईल तेव्हा सर्व लोक जिवंत होतील. तसेच मत्तयलिखीत
शुभवर्तमानात संत मत्तय आपल्याला सांगतो की, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर
आपल्या दूतांसह वैभवाने व गौरवाने येईल व सर्वांचा न्याय करील.
जर आपण न्यायाने व सत्याने जीवन जगलो तर आपण
देवाचे राज्य ह्या भूतलावर प्रस्थापित करू शकतो. त्यासाठी लागणारी कृपा व आशिर्वाद
आपण ह्या प्रभू भोजनविधीमध्ये सहभाग घेत असताना मागू या.
पहिले वाचन: यहेज्केल
३४:११-१२,१५-१७
देवाचे लोक जणू मेंढरांचा कळप आहे अशी
प्रतिमा पवित्र शास्त्रात आपल्याला आढळ्ते. या संदेशानुसार त्या वेळच्या मेंढळाची
म्हणजे इस्रायलच्या अधिपतींची कानउघडणी केली आहे. कारण ते अति लोभी व स्वार्थी
होते. आपल्या प्रजेची त्यांना काळजी नव्हती, शिवाय काही मेंढरे इतरांच्या जीवांवर जगून
चांगली धष्टपुष्ट झाली होती. याचा अर्थ म्हणजे जे दिन दुबळे होते त्यांच्यावर अधिपतींनी
जुलूम करून आपली सत्ता स्थापन केली आणि भरपूर धन मिळवले होते. ह्या सर्व गोष्टींचा
आढावा घेऊन यहज्केल सांगतो की, न्यायाची पुन:स्थापना होईल.
दुसरे वाचन: करिंथकरांस
पहिले पत्र १५:२०-२६
‘जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरण पावले
आहेत, त्यांचे पुनरुस्थान नक्कीच होणार आहे’ हे सांगताना ख्रिस्ताने या
पुनरुस्थानाची सुरुवात करून दिली आहे असे पौलाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
आदामाने जगात पाप व मरण आणले, आणि ख्रिस्ताने
समेट, जीवन व पुनरुस्थान आणले. जे ख्रिस्तामध्ये मेले आहेत ते जिवंत होतील. कारण
देवाचा पुत्र सर्वशक्तिमान व गौरवशाली आहे हे पृथ्वीवरील सर्व लोक कबुल करतील. अशा
प्रकारचा विश्वास संत पौल आपल्या पत्रातून व्यक्त करत आहे.
शुभवर्तमान: मतय २५:३१-४६
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर
आपल्या वैभवाने येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसत्तावर बसेल व त्याच्यासमोर
सर्व राष्ट्रातील लोकांना जमविले जाईल. त्यावेळी या परराष्ट्रीय लोकांचे दोन गट
करण्यात येतील. त्याच्या उजवीकडे असलेल्यांना ख्रिस्त स्वतः आशिर्वादीत करेल व
आपल्या राज्यात राहण्यासाठी त्यांचा स्वीकार करील.
इस्राएल
लोकांचा ह्यामध्ये समाविष्ट केलेला नाही. महासंकटाच्या काळात इस्राएल लोकांचा अतोनात छळ करण्यात येईल व
त्यांची सर्व जगभर पांगापांग होईल. या
इस्राएल लोकांपैकी जे राजाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतील त्यांची स्थिती चांगली
असेल. जे परराष्ट्रीय लोक अशांना आधार देतील, ते ख्रिस्ताच्या लोकांना मदत करणारे
ठरतील व ख्रिस्त त्यांना नीतिमान मानेल. ते सर्वकाळ ख्रिस्त समवेत राहतील.
जे इस्राएल लोकांना आश्रय देणार नाहीत ते
डाव्या बाजूच्या गटात असतील. ते शेरडे असतील व शापग्रस्त ठरतील. जे ख्रिस्ताचा
विरोध करतील, ते सार्वकालिक शिक्षा भोगण्यास पात्र ठरतील.
बोधकथा:
एकदा एका सैनिकाला रोमन न्यायाधिशाच्या समोर
आणण्यात आले. त्याचा गुन्हा असा होता की तो ख्रिस्ती होता. न्यायाधीशाने त्याला
विचारले की, तू ख्रिस्ती आहेस का? त्या खिस्ती शिपायाने उतर दिले ‘होय’. न्यायाधीशाने
त्याविषयी चौकशी केली व त्याला सांगितले की तू रोमन सम्राटाचा शत्रू आहेस. पुन्हा
ख्रिस्ती सैनिकाने उत्तर दिले ‘नाही’. तेव्हा न्यायाधीशाने सैनिकाला सांगितले की
तुम्ही रोमन सम्राटाच्या पुतळयाला धूप वाहा व त्याला नतमस्तक हो.
ख्रिस्ती
सैनिकाने असे करण्यास ठाम नकार दिला. मी फक्त एकाच देवाची पूजा व आराधना करतो आणि
तो देव येशू ख्रिस्त आहे. मी येशू ख्रिस्तावरच प्रेम करतो व त्याची आराधना करतो.
त्याची जागा कोणिही घेऊ शकत नाही.
रोमन न्यायाधीशाने सैनिकाला सांगितले की जर
तुम्ही नकार दिला तर तुमचा शिरछेध्द करण्यात येईल. तुमचं डोक शरीरापासून अलग
करण्यात येईल. ख्रिस्ती सैनिकाने पुन्हा धैर्याने उत्तर दिले की तुम्ही माझे डोके
शरीरापासून अलग करू शकता परंतु, तुम्ही माझे हृदय येशू ख्रिस्तापासून दूर करू शकत
नाही कारण येशू ख्रिस्त हाच माझा राजा आहे. तो माझे सर्वस्व आहे.
मनन चिंतन:
येशू ख्रिस्त ह्या जगात लोकांसाठी देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी
आला, जेणेकरून देवाचे राज्य लोकांच्या हृदयात स्थापन केले जाईल.
आपण
आपल्या शक्तिशाली देवाला पुढील शब्दांत स्वागत केले पाहिजे. “अहो वेशिनों आपल्या कमानी
उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा”, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल (स्तोत्रसंहिता
२४:७).
येशू ख्रिस्ताच्या दुःखसह्नाच्या वेळी त्याला
यहुदी राज्याच्या समोर आणण्यात आले. तेव्हा पिलात सरकारवाड्यात गेला आणि येशूला
बोलावून म्हणाला, ‘तू यहुद्याचा राजा आहेस काय’? येशूने उत्तर दिले, ‘मी राजा आहे
असे आपण म्हणता’. येशूने उत्तर दिले, ‘माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य
ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी
लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही (योहान १८:३३-३६).
जर येशू
ख्रिस्ताचे राज्य येथले नव्हते तर येशू ख्रिस्त कसा काय राजा आहे. येशू ख्रिस्ताचे
राज्य हे परलोकांसंबंधीचे व आध्यात्मिक राज्य आहे. दोन हजार वर्षापासून येशू
ख्रिस्ताची राजवट सुरु झालेली आहे. प्राचीन कालखंडात ही राजवट सुरु झाली. मध्यम
वयोगटातदेखील ही राजवट आधुनिक काळात चालू आहे. रोमन साम्राज्य जरी शक्तिशाली असले
तरी त्याचे राज्य मोडकळीस आले. त्यांनी विविध प्रकारची शस्त्रे वापरली; तरी सुदधा
त्याचं राज्य संपुष्टात आले. ब्रिटीश साम्राज्याला वाटत होते की त्यांनी सर्व
जगावर राज्य करावे, परंतु आज हे राज्य एक छोटस राज्य किवा देश झाला आहे. फ्रेंच
साम्राज्य सम्राट नेपोलियन नेतूत्वाखाली फार शक्तिशाली होता, परंतु आजच्या
परिस्थितीत ही एक पुरातन गोष्ट बनली आहे. जे साम्राज्य येशू ख्रिस्ताने दोन हजार वर्षा पूर्वी स्थापन केले ते अजूनपर्यंत वाढत
आहे.
अ) आम्ही येशू
ख्रिस्ताला आपल्या घरात बोलावतो परंतु हुदयात नाही.
आपण
लूकच्या शुभवर्तमानामध्ये ऐकतो की, परुशी येशू ख्रिस्ताला त्याच्या घरी भोजनास
बोलावतो, परंतु तो येशू ख्रिस्ताला अंत:करणाततून पाहुणचार करत नाही तर तो येशू
ख्रिस्ताविषयी चुका किवा उणीवा शोधू लागतो. जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या घरी होता
तेव्हा तिथे एक पापी स्त्री देखील उपस्थित होती. ती स्त्री तिथे आली व येशू
ख्रिस्ताचे पाय पुसले आणि नंतर तिने पायावर सुगंधी तेल लावले. त्या स्त्री ने येशू
ख्रिस्ताला तिच्या ह्रदयात स्वीकारले आणि तिला तिच्या पापांची क्षमा मिळाली.
आपण ही
आपल्या जीवनात त्या परुशीप्रमाणे वागत असतो. पर्यायी आपण येशू ख्रिस्ताला आपल्या
घरी बोलावतो. आपल्या अंगी फक्त येशू ख्रिस्ताचे नाव असते आणि आपण दुसऱ्यांना सांगू
शकतो. आपल्या घरात येशू ख्रिस्ताची चागली व हुबेहूब दिसणारी चित्रे असतात, परंतु
ती फक्त आपली नजर वेधून घेतात आणि आपल्या घराचे सौदर्य वाढवतात. आपले त्यामागे खरे
नाते जोपासलेले नसते. त्यामुळे माझ्या जीवनावर येशूच्या शिकवणीबद्द्ल काहीच परिणाम
होत नाही.
परुशाने
येशूकडून काहीच अपेक्षित केले नाही आणि त्याला काहीच मिळाले नाही. याउलट त्या
स्त्री ने येशूकडून क्षमा मागितली आणि येशूने तिला क्षमा दाखवली.
ब) आपण येशू
ख्रिस्ताला आपल्या घरी तसेच आपल्या हृदयात देखील बोलवू शकतो. येशू ख्रिस्त हा
मेरी, मार्था व लाजरस यांचा देखील मित्र होता. त्यांनी नेहमीच येशू ख्रिस्ताला
त्यांच्या घरी बोलावून त्याचा आपल्या हृदयात देखील स्वीकार केला. येशू ख्रिस्त त्यांच्या
घरी मेजवानीस देखील जात होता; त्यांची ख्रिस्तामध्ये फार मोठी श्रद्धा होती.
जेव्हा लाजरस मरण पावलेला होता तेव्हा मार्था येशूकडे येऊन सांगते की, प्रभुजी आपण
येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू ख्रिस्ताने नंतर लाजरसाला मरणातून उठवून
त्यांच्या विश्वास वाढविला. ह्या कारणास्तव त्यांनी येशूला आपला रक्षणकर्ता मानले
होते.
येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर अमाऊसच्या
रस्त्यावर जेव्हा शिष्य चालत होते तेव्हा त्यांना येशूचे दर्शन झाले. परंतु,
त्यांना हे माहित नव्हते की हा येशू ख्रिस्त आहे. त्यांना वाटले की हा कोणी परकीय
आहे. त्यांनी त्याला आपल्या घरी बोलावले परंतु हृदयात नाही. जेव्हा त्यांना हे
कळून चुकले की हा येशू ख्रिस्त आहे. तेव्हा त्यांच्या अंतकरणाला आतल्या आत उकळी
येत होती (लूक २४:३२). ते फार आनंदित व उत्साहित झाले होते.
आपल्या जीवनातही आपण येशू ख्रिस्ताला आपल्या
घरीच नव्हे तर आपल्या हृदयात बोलावले पाहिजे. जेणेकरून आपले जीवन बदलून जाईल आणि
आपण सर्वजण एक धार्मिक व अध्यात्मिक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझे राज्य आम्हामध्ये येवो.
१. आपले पोप,
कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्या सर्वांनी आपल्या
कार्याद्वारे व शुभवार्ताद्वारे ख्रिस्त राजाची सुवार्ता घोषित करून सर्वत्र
ख्रिस्ताच्या प्रेमाचे, शांतीचे व सत्याचे राज्य प्रस्थापित करावे, म्हणून आपण
प्रार्थना करू या.
२. समाजामध्ये ज्या
लोकांना न्याय मिळत नाही अशा लोकांना ख्रिस्त राजाच्या कृपेने व आशीर्वादाने
न्यायाचे वरदान मिळावे. त्यांच्यावर होणारे अन्याय व अत्याचार थांबले जावे आणि
त्यांना समाजाने सन्मान व आदर देऊन त्यांचा समाजामध्ये स्वीकार करण्यात यावा,
म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या देशातील
राजकीय नेत्यांनी राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे
जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे व आपल्या देशाची व लोकांची नि:स्वार्थीपणे
सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपल्या
धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना ख्रिस्तराजाचा
दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आता थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment