सामान्य काळातील बत्तीसावा रविवार
दिनांक: १२-११-२०१७
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८
शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३
"सतत जागृत राहावे व प्रभूची वाट पाहावी"
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणा सर्वाना प्रभूच्या आगमनासाठी सतत जागृत राहण्यास आमंत्रित करीत आहे.
शलमोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक आपल्याला सांगते की, ‘ज्ञान हे परमेश्वरामध्ये आहे आणि हे मिळविण्यासाठी आपण देवाच्या सानिध्यात राहणे गरजेचे आहे. तसेच, आजच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानात आपण ‘दहा कुमारींचा दृष्टांत’ ऐकणार आहोत. ह्या दृष्टांतात पाच शहाण्या कुमारींच्या पेटत्या दिव्यांमुळे त्यांना प्रभू पहावयास मिळाला. परंतु, इतर पाच कुमारी ज्या तेल विकत आणायला गेल्या होत्या, त्यांना प्रभूचे दर्शन झाले नाही कारण त्यांनी प्रभूच्या आगमनासाठी पुरेशी तयारी केली नव्हती.
आपणही प्रभूच्या येण्याची वाट जागृतेने पाहायला हवी कारण प्रभू येशू कोणत्या क्षणाला येईल हे आपणास ठाऊक नाही. म्हणून आजच्या ख्रिस्तयागात सहभागी होत असताना, आपण सतत जागृत राहावे व प्रभूची वाट पाहावी, ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती प्रभूकडे मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ६:१२-१६
शलमोनाचा ज्ञानग्रंथ हे पुस्तक आपल्याला ज्ञानाबद्दल सांगत आहे. ज्ञान तेजोमय आहे. त्याची आवड धरणाऱ्यांना ते सहज लाभते. त्याचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते. जो खऱ्या अंतकरणाने ज्ञानाचा शोध घेतो, त्याच्यापासून हे ज्ञान दूर ठेवले जाणार नाही. जो सकाळी लवकर उठून ज्ञानाचा शोध करील त्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जो चिंतनामध्ये ज्ञानाविषयी विचार करील, त्याला ते अवश्य सापडेल. अशा प्रकारचा बोध आपल्याला शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून होत आहे.
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ४:१३-१८
थेस्सलनीका येथील ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये ख्रिस्ताच्या परत येण्यासंबधात चुकीच्या कल्पना होत्या म्हणूनच ते अस्वस्थ झाले होते. ख्रिस्ताचे पुनरागमन अगदी लवकरच होणार ह्यामुळे मरण पावलेल्या लोकांचे काय होणार?, हीच चिंता त्यांना सतावत होती. त्याचे गौरवी आगमन व राज्य यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांना कोणता वाटा असणार? ख्रिस्त या पृथ्वीवर परत येणार, परंतु जे प्रियजन ख्रिस्तामध्ये महानिद्रा घेत आहेत, त्यांनाही देव त्याच्याबरोबर परत आणणार आहे. कारण जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत ते एकदिवस सर्व ख्रिस्ताबरोबर उठतील असा संदेश संत पौल थेस्सलनीकाकरांस देत आहे.
शुभवर्तमान: मत्तय २५:१-१३
स्वर्गाचे राज्य दहा कुमारी सारखे आहे. ज्या दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या, त्यात पाच शहाण्या व पाच मूर्ख होत्या. जेव्हा वर आला तेव्हा त्या दिवे नीट करू लागल्या. परंतु, मूर्ख कुमारींच्याकडे जास्त तेल नव्हते म्हणून फक्त शहाण्या कुमारी मध्ये गेल्या. येथे ‘वर’ ह्याची तुलना प्रभू येशूशी करण्यात आली आहे व दहा कुमारींची तुलना आपल्याशी करण्यात आली आहे.
मनन चिंतन:
जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी शाळेतून घरी वेळेवर येत नाही किंवा जर एक वाजता येणार असेल तर आपण घड्याळाकडे बघून दरवाजात वाट बघत असतो. आपल लक्ष फक्त आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या येण्याकडे असते. तसेच जेव्हा मासेमारी करणारा बांधव मासेमारीसाठी खोल समुद्रात जातो व जर तो पाच किंवा सहा दिवसात परत आला नाही तर त्याचे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहत असतात. जोपर्यंत मासेमारी करणारा बांधव घरी येत नाही तोपर्यंत त्याची घरची माणसे वाट बघत असतात.
येशू ख्रिस्त आपणास आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे की, आपणही सर्वांनी जागृत राहायला हवे कारण येशू ख्रिस्त कधी येणार यांची आपणाला कल्पना नसते. आजच्या ‘दहा कुमारींचा दृष्टांत’ ह्या दाखल्यात आपल्याला दहा कुमारींविषयी सांगितले आहे. ह्या दाखल्यात आपण पाहतो की, पाच शहाण्या व पाच मूर्ख कुमारी 'वर' येण्याची वाट पाहत होत्या. जेव्हा वर येण्याची वेळ झाली तेव्हा मूर्ख कुमारींच्याकडे पुरेशे तेल नव्हते. फक्त शहाण्या कुमारी ज्यांचाकडे पुरेसे तेल होते, त्याच वराला भेटू शकल्या. त्यांची वराशी गाठ झाली. परंतु, ज्या कुमारी तेल आणायला गेल्या होत्या त्यांची वराशी भेटू होऊ शकली नाही. त्यांना वराला पाहायला मिळाले नाही. आपण दैनंदिन लग्नाविषयी विचार न करता स्वर्गीय लग्नाविषयी मनन चिंतन करत आहोत. ‘येशू ख्रिस्त’ हा खरा वर आहे व आपण त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत. आपणा सर्वांना बाप्तिस्माद्वारे लग्नाचे आमंत्रण दिले आहे. बाप्तिस्माच्या दिवशी आपल्याला विश्वासाचे निमंत्रण दिले आहे. व आपण जसे मोठे होतो, तसा आपला विश्वास वाढायला हवा. आपणा सर्वाना ठाऊक आहे की, आपले ध्येय स्वर्ग सुखाकडे आहे. आपण आतापासूनच तयारी करायला हवी. पंरतु, आपण याची तयारी करतो का? आपण सर्वजण आपापल्या जगात सर्वजण भाबांवून गेलेलो आहोत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात भरकटून गेलेलो आहोत व ख्रिस्ताला विसरलेलो आहोत. आपल्यामधील काहीकजण रविवारचे ख्रिस्ती आहोत, काहीजण फक्त सणाचे तर काहीकजण वर्षातून एकदाच मिस्साला येत असतो. येशू ख्रिस्त आपणास पाच मूर्ख व पाच शहाणे कुमारिकांचे उदाहरण देऊन सांगत आहे की, तुम्ही सुद्धा शहाण्या कुमारीसारखे सदैव जागृत किंवा तत्पर राहा. कारण येशू ख्रिस्त कोणत्या क्षणाला, कोणत्या वेळेला किंवा कोणत्या दिवशी येईल हे आपल्याला ठाऊक नाही. म्हणून आपण सदैव जागृत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपण सदैव जागृत राहणार कसे? तर आपण रोज घरी रोझरीची प्रार्थना करायला हवी, बायबल वाचन करायला हवे. शक्य झालं तर रोज मिस्साबलीदानात भाग घ्यायला हवा नाहीतर निदान रविवारच्या मिस्साला यायला हवे. ह्याद्वारे आपण येशूच्या सानिध्यात राहू व येशु येईल तेव्हा तो आपणास ओळखून स्वर्गामध्ये त्याच्याबरोबर प्रवेश देईल. जर आपण असे केले नाही तर आपली मूर्ख कुमारीसारखी परिस्थिती होईल. तेव्हा प्रभू परमेश्वर आपणास ओळखणार नाही व आपणास स्वर्गाचे दार उघडले जाणार नाही.
‘शलमोनाचा ज्ञानग्रंथ’ ह्या पुस्तकात आपण ज्ञानाविषयी ऐकले आहे. जो ज्ञानाचा खऱ्या अंतकरणाने शोध घेतो त्याला कुठलीही अडचण येणार नाही. येथे ज्ञानाची उपमा खुद्द देवाला किंवा येशुख्रिस्ताला दिलेली आहे. म्हणून या जगामध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी भरकटलेल्या तुमच्या-आमच्या सारख्यांना या ज्ञानाची गरज आहे. कारण जेव्हा हे ज्ञान आपणास मिळते किंवा सापडते तेव्हा आपणास कशालाही कमी किंवा उणीव पडणार नाही. आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताला प्रथम स्थान द्यावे व त्या ज्ञानाचा किंवा वराच्या शोधात सदैव जागृत राहावे म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना परमेश्वराने चागंले आरोग्य द्यावे व त्यांना त्यांच्या प्रेषितकार्यात मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी आपल्या जीवनात सतत जागृत राहावे व येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, त्यांना परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील जे तरुण-तरुणी परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment