Reflections for the homily of 4th Sunday in Ordinary Time (28-01-2018) by Br Camrello D'Mekar.
सामान्यकाळातील चौथा रविवार
दिनांक: २८-०१-२०१८
पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०
दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र ७:३२-३५
शुभवर्तमान: मार्क १:२१-२८
“तो त्यांना अधिकार असल्यासारखा शिकवीत होता”.
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या भक्तगणांनो, आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजच्या चिंतनाचा मुख्य विषय आहे: येशू ख्रिस्ताचा त्याच्या शब्दांवर आणि कृत्यावर असलेला अधिकार.
पहिल्या वाचनात अनुवादक मोशेद्वारे देवाचा संदेश लोकांना सांगत आहे. देव लोकांमधून एका संदेष्ट्याची निवड करणार ह्याची जाणीव आपल्याला ह्या वाचनातून दिसून येते. दुसऱ्या वाचनात संत पौल विवाह म्हणजे काय, त्यांनी त्याचे विवाहीक जीवन कसे जगावे ह्या बद्दल बोध करत आहे; तसेच अविवाहीत स्त्री आणि पुरुषाने जीवनात प्रभू येशूला अधिका-अधिक महत्व देऊन, ख्रिस्ताची सेवा करावी म्हणून सांगत आहे. शुभवर्तमानात येशूख्रिस्त सभास्थानात अधिकाराने शिकवण देत आहे असे आपण पाहतो; ह्याच अधिकाराने येशूख्रिस्त अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला मुक्त करतो, त्यामुळे सर्व लोक ह्याविषयी थक्क होतात.
बाप्तिस्माद्वारे आपण येशुख्रिस्ताचे निवडलेले झालेलो आहोत. एक ख्रिस्ती म्हणून आपली जबाबदारी येशूचे कार्य चालू ठेऊन, देवाने प्रस्थापिलेले राज्य अनैतिक रीतींपासून जपावे व अधिकाराने येशूच्या लोकांची सेवा करावी असे आहे. हे सर्व कार्य प्रामाणिकपणे करण्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या ख्रिस्तयागामध्ये सहभागी होत असताना मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०
अनुवाद ह्या पुस्तकातील एक महत्वाचा भाग म्हणजे लोकांना दिलेली स्थाने, त्याच्या पदव्या आणि त्याच्या नेमणुका इत्यादी. हे सर्व देवाने मोशेच्या नेतृत्वाखाली निवडलेल्या लोकांना बहाल केलेले आहे. शास्त्रे, राजे, याजक आणि प्रवक्ते हे लोकांच्या सेवेसाठी दिले जातील असे परमेश्वराचे वचन होते. त्यामुळे लोकांचे सामाजिक आणि धार्मिक जीवन व्यवस्थितपणे सुरु राहील. प्रवक्त्यांना देवाचे मुख असे सुद्धा म्हणण्यात येते. कारण ते देवाचा शब्द त्याच्या मुखातून लोकांपर्यंत पोहचवत असतात. ज्याप्रमाणे शास्त्रे, राजे आणि याजक होऊन गेले होते त्याचप्रमाणे प्रभूचा संदेश देण्यासाठी प्रवक्त्यांची गरज होती. त्यामुळे प्रभू त्यांच्यामधूनच एखादा प्रवक्ता निवडण्याचा विचार करतो.
दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र ७:३२-३५
पहिल्या शतकात ज्यांचा वाड्निश्चय झाला असेल त्यांनी विवाह करणे अगत्याचे होते. काही कारणाने लगेच विवाह झाला नाही तरी हे वाग्दत वधूवर कायमचे एकमेकांचे बांधलेले असत. घटसस्फोट हाच वाड्निश्चय मोडण्याचे एकमेव साधन होते. वाड्निश्चय झालेल्या काही तरुणांनी आताच विवाह करावा किंवा करू नये असा प्रश्न उपस्थित केला होता. करिंथमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हा प्रश्न विचारला होता.
प्रत्येक ख्रिस्ती अविवाहित पुरुषाने प्रभूला संतोष कसा देता येईल तेच पाहावे, तेच त्याचे कर्तव्य आहे; स्वत:ला संतोष देण्याची कल्पना येथे नव्हतीच. विवाहित पुरुष आपल्या पत्नीला संतोष देता यावा हीच खटपट करीत असतो, ख्रिस्ती विवाहात स्वार्थी, आत्म-केंद्रितपणाला मुळीच स्थान नाही. पतीचा निम्मा वेळ पत्नीची मनधरणी करण्यात व निम्मा वेळ प्रभूला संतोष देण्यात खर्च होतो; विवाहामुळे त्याच्यावर आणखी अधिक जबाबदाऱ्या येतात. पाचारणाच्या संबंधात अविवाहित स्त्रीची स्थिती काही वेगळी नाही. पण तिच्या बाबतील थोड्या वेगळ्या प्रकारे बोध केला आहे. तिने देहाने व आत्म्याने प्रभूची एकनिष्ठ असावे. विवाहित स्त्रीनेही स्वत:ला नव्हे तर आपल्या पतीला संतोष द्यावा हेच तिचे कर्तव्य आहे.
शुभवर्तमान: मार्क १:२१-२२
कफर्णहुम येथील एका सभास्थानात येशूचे ठाम निर्धाराने भाषण ऐकून लोक चकित झाले. येशूचे वक्तव्य त्यांच्या नेहमीच्या शिक्षकांहून अगदी वेगळे होते आणि त्याच्या शब्दांना अधिकाराचे धारधार वलय होते. येशूने जे केले, तो जे बोलला ते पाहून व ऐकून ओळ आश्चर्याने थक्क झाले असे मार्क अनेकदा सांगतो पण त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असे नाही हे ही तो सांगतो.
येशूचा अधिकार केवळ सभास्थानातील उपासकांनीच ओळखला असे नाही, अशुद्ध आत्म्याच्या कऱ्हात असणाऱ्या एका माणसानेही ते ओळखले. हा माणूस सर्वस्वी शत्रूच्या शक्तीला वश झालेला होता.
पवित्र शास्त्रात भुते काढणे हा काही जादूटोण्याच्या प्रकार नाही त्यासाठी मंत्रतंत्र अगर नावे उच्चारण्याची गरज नाही, तर संबधित व्यक्तींना येशूची सुवार्ता सांगणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे.
बोधकथा:
नेल्सन बालपणापासून वडिलांबरोबर जंगलात टोळीत रहात होता. वडील टोळी प्रमुख होते. दक्षिण आफ्रिकेतील कुणु गावात राहणारा हा मुलगा आपल्या संस्कृतीला जपायचा. त्याचे वडील त्याला खूप धाडसी कथा सांगायचे. आपल्या लोकांच्या ह्क्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढण्याची वृत्ती त्याच्या ह्या संस्कृतीच्या प्रेमातूनच निर्माण झाली. गोऱ्या लोकांनी काळ्यांवर कुठेकुठे आणि कसेकसे अन्याय केले आहेत. ह्याची त्याला जाणीव होती. आपल्या जातीजमातीच्या नेतृत्वाची कल्पना त्याला त्याच्या संस्कृतीनिष्ठेतून प्राप्त झाली. त्याचे शिक्षण कँथलिक शाळेत झाले. तिथे त्याचे नाव नेल्सन मंडेला हे देण्यात आले. तो जोहान्सबर्गला आला तेव्हा माणसाला गुराढोरांसारखे वागवतात त्याने पाहिले आणि त्याच्यातील क्रांतिकारक जागा झाला. नेल्सन मंडेलाने आपल्या लोकांच्या हक्कासाठी स्वतःकायदयाचा अभ्यास केला होता. मात्र कायद्याचे प्रशिक्षण लोकांना देण्यासाठी मंडेलाला गावी जाण्यास सरकारने बंदी घातली होती.
त्याने इतर आफ्रिकन देशात प्रवास केला होता. १९५२ साली तरूण मंडेलाने आपल्या लोकांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहिले. आपली लढाई पुढे नेताना १९६४ साली मंडेलाचे कम्युनिस्ट व इतर विरोधी पार्टीबरोबर खटले उडाले होते.
युरोपच्या गोऱ्या लोकांनी दक्षिण आफ्रिकेवर आक्रमण करून तेथील खनिज संपती लुटून नेली व स्त्रीपुरुषांना गुलाम म्हणून युरोप अमेरीकेत नेले. हा व्यापार चालू ठेवण्यासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिका ताब्यात घेऊन त्यांच्यावर राज्य केले. माणूस म्हणून त्यांना जगता येत नव्हते. म्हणूनच ह्या गोऱ्या लोकांना हाकलून देण्यासाठी काळ्यांची लढाई चालू होती. महात्मा गांधी तिथे असताना त्यांनी त्यांना प्रेरणा दिली होती. इंग्रजांना हाकलून देण्याची मोहीम मंडेलाने सुरु केली तेव्हा त्यालाही २७ वर्षे तुरुंगात काढावी लागली. अनेक संघर्षाना तोंड द्यावे लागले. अग्नी दिव्यातून ते पोळून निघाले. परंतु मरगळलेल्या समाज्याला त्याने जीवन दिले. १९९७ साली त्यांना स्वातंत्र्य लाभले आणि नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. १८ जुलै २००८ रोजी ते ९० वर्षाचे झाले.
नेल्सन मंडेला ह्यांना बी. बी. सी. टी. व्ही. च्या प्रतिनिधीने विचारले, “तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत आणि राष्ट्राध्यक्षांच्या मोहिमेत कसे यशवी झालात?” मंडेला म्हणाले, “दृष्टीकोण सकारात्मक असला की यश धावून येते. मी आशावधी असून यशाचे स्वप्न पाहून अखंड कष्ट करतो.” बी. बी. सी. टीव्हीने त्यांच्यावर अर्धातास कार्यक्रम तयार केला. त्याचे नाव होते, “सकारात्मक दृष्टीकोण ठेवा आणि राष्ट्राध्यक्ष बना” निराशावादी लोक निरर्थक जीवन जगतात नाहीतर आत्महत्या करतात. ह्या दृष्टिकोणामुळे मंडेलांना १९९३ साली शांततेचे नोबेल पारितोषिक लाभले.
मनन चिंतन:
येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवतो आणि भूत लागलेल्या माणसाला मोकळे करतो. येशूच्या शब्दामध्ये शक्ती आहे. या शक्तीचा अनुभव लोकांच्या दृष्टीने नवीनच आहे. येशू आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करतो; आपल्या चुकीच्या कल्पना, आपले विचार सुधारतो; खोटे देव आणि फसव्या कल्पना सवयी किंवा अंधप्रथा यांची बंधने झुगारून देतो.
या नव्या देवराज्याची आपल्या देशाला गरज आहे. प्रस्थापिताविरुद्ध जाण्याची गरज आहे. संपूर्ण जीवन शुद्ध करायला हवं, आपल्यावर अनेक पगडे बसले आहेत. ते सर्व फेकून दिल्याशिवाय देवाच्या अधिकाराची जाणीव होणार नाही. अनेक रूढी आणि परंपरा आपल्याला इतरांपासून दुरावत असतात. माणूस माणसाला ओळखत नाही. देवावर आणि शेजाऱ्यावर असलेले प्रेम ह्यामध्ये दुरावा दिसरून येत आहे. पूर्वी माणूस डोके वर करून चालत होता मात्र आजच्या युगात माणूस चालताना डोके खाली ठेऊन चालत आहे; त्याचा अर्थ असा नाही कि रस्त्यावर अनेक खड्डे आहेत तर माणसाचे लक्ष मोबाईल फोनने वेढलेले आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो.
जातीच्या नावाखाली आपण माणसांना उच्च-निच मानतो. असंख्य लोकांना जातीच्या गुलामगिरीत ठेवतो. हे भूत झुगारून देणे ख्रिस्ती धर्मालाही जमलं नाही. त्यासाठी अधिकारवाणी आमच्यात निर्माण झाली नाही. ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी संत मदर तेरेसा ह्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या शब्दांद्वारे आणि कृत्यांद्वारे ह्या रूढी आणि परंपरा लयास लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मानाने सर्वात श्रेष्ठ हा माणुसकीचा धर्म आहे. आपण ख्रिस्ती बांधव आहोत. पवित्र शास्त्र आपल्याला शिकवण देते कि आपण देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे आहोत. आपल्याला देवाने त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे. म्हणूनच आपल्याला इतरांमध्ये देव पाहणे अगत्याचे आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अनैतिक परंपरा थांबवण्याची गरज आहे. कधी-कधी ख्रिस्ती धर्मामध्ये जातीभेद जाणवतो. भारतीयांच्या रक्तामध्येच ते मिसळले आहे. ख्रिस्ताची जीवनमूल्येच आम्हाला नवीन जीवन देऊ शकतात.
दलितांच्या व आदिवासींचा प्रश्न देशव्यापी आहे. तसा तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे. ह्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आमच्या गुरुजनांकडे अधिकारवाणी असायला हवी.
ख्रिस्ताची अधिकारवाणी त्याच्या निर्मळ जीवनातून तयार झाली होती. त्याची मुळे स्वर्गात होती. या मातीनं त्याला माखलं नव्हतं. आपण बाप्तिस्माद्वारे देवाची मुले बनत असतो. आपल्यालासुद्धा येशूख्रिस्ताप्रमाणे तीन महान देणग्या भेटल्या आहेत. आपण सामान्य धर्मगुरू / याजक बनत असतो; आपण देवाचे प्रवक्ते बनत असतो आणि तसेच आपल्याला राजेपद सुद्धा प्राप्त होत असते. आपल्याला आंतरिक स्वातंत्र्याची गरज आहे. आपल्यामध्ये आंतरिक स्वातंत्र्य नाही म्हणून आमच्या शब्दात दैवी धार नाही. म्हणून अशुद्ध आत्मे हाकलून लावणे आम्हाला कठीण जाते.
यासाठी प्रापंचिक आणि याजकही यांना अध्यात्मिक तयारी करावी लागेल. ख्रिस्ताच्या शक्तीने प्रेरित व्हावे लागेल. आज ही शक्ती जागी होत आहे हे आपलं भाग्य आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, तुझा शब्द कृतीत आणण्यासाठी आम्हांला शक्ती दे.
१. सर्व जगाला सेवेचा आदर्श देण्यासाठी ख्रिस्ती मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केवळ सेवेसाठी करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. आपल्या राष्ट्राच्या सर्व राज्यकर्त्यांनी आपल्या जनतेची न्यायाने सेवा करून, आपल्या राष्ट्राची प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मगग्रामाच्या बंधू-भगिनींनी आपल्या प्रभू येशूख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची घोषणा गर्विष्ठपणे आणि स्वाभिमानाने न करता, ती नम्रपणाने करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशात शांततेचे, अहिंसेचे आणि माणूसकिचे वातावरण निर्माण करून आपण सर्वांनी इतरांच्या सेवेसाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment