सामान्य काळातील पाचवा रविवार
दिनांक: ४/२/२०१८
पहिले वाचन: ईयोब ७:१-४, ६-७
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र ९:१६-१९, २२-२३
शुभवर्तमान: मार्क १:२९-३९
संकटसमयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील.
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा
सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताच्या
दैवीस्पर्शाबद्दल सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण
पाहतो की, दु:खाने निराश
झालेला ईयोब परमेश्वराशी वाद घालतो व आपले दु:ख, कष्ट व चिंता पूर्ण अंत:करणाने देवापुढे प्रकट करतो. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात संत पौल आपल्या
सेवेद्वारे व सुवार्तेद्वारे ख्रिस्ताची ओळख इतरांना देतो व आपण येशूचे दास आहे
ह्याची ग्वाही देतो. शुभवर्तमानात संत मार्क सांगतो की, जेव्हा येशू ख्रिस्त व त्याचे शिष्य
सभास्थानातून पेत्राच्या घरी गेले तेव्हा
कफर्णहूमातील घर ख्रिस्ताच्या कार्याचे केंद्र बनले. तसेच ख्रिस्ताने सर्वांची सेवा केल्यानंतर आपला
काही वेळ पित्याच्या सहवासात घालविला.
आपल्यालाही
देवाची कुपा व दैवी शक्ती मिळावी म्हणून आपण ह्या प्रभूभोजनविधी मध्ये विशेष
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण :
पहिले वाचन : ईयोब ७:१-४, ६-७
इयोब ह्या
पुस्तकात इयोब आपले दु:ख व्यक्त करतो. देवा, हे देवा, अद्याप तू मला का जगू देतोस? एकदाचे संपून जावे ही ईयोबची इच्छा उसळून येते. ईयोबने त्यात आपल्या सर्वसाधारण अनुभवाची भर
घालून पुन्हा देवाला विनविले आहे. येथे इयोबने आपली निराशा सर्वसामान्यपणे मानवी
अस्तित्त्वाचा एक अंश असल्याचे दाखवले आहे. दैनंदिन जीवनात येणारे कष्ट आणि खडतर परिश्रम हेच
मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देते असे आपल्याला ह्या वाचनातून समजते. म्हणून आपले जीवन एवढे क्षणभंगूर आहे तरी ते किती
कष्टप्रदा नको नकोसे वाटते असा विरोधाभास आहे.
दुसरे वाचन : करिंथकरास पहिले
पत्र ९:१६-१९, २२-२३
प्रिती करणे हा
ख्रिस्ताचा नियम आहे. म्हणून अधिकाधिक लोकांचे व निरनिराळ्या गटातील लोकांचे तारण व्हावे या ज्वलत
इच्छेला व प्रीतीला पौल पेटलेला होता. संत पौल स्व:त दास बनून करिंथकरांस ख्रिस्ताची ओळख व्हावी
म्हणून तो आपल्या सेवेद्वारे व सुवार्तेद्वारे लोकांना प्रेरित करत असे. यहुदी लोकांनी ख्रिस्ताकडे यावे यासाठी पौल
यहुदी सभास्थानातील उपासनेला हजर राहत असे. तसेच जे यहुदी नव्हते त्यांच्या परंपरा व
रूढींना त्याने तुच्छ मानले नाही तर ख्रिस्ताप्रमाणे सर्व लोकांचा स्वीकार केला.
शुभवर्तमान : मार्क १:२९-३९
संत मार्क आपल्या
शुभवर्तमानात येशूने पेत्राच्या सासूला व इतर रोगी ह्यांना बरे केले ह्याचे वर्णन
करत आहे. येशूच्या ह्या कार्याद्वारे संत मार्क सागंतो की पेत्राचे कफर्णहुमातील घर येशूच्या
कार्याचे केंद्र बनले.
सभास्थानातून
निघाल्यावर येशू व त्याचे शिष्य शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले. तेव्हा शिमोनाची (पेत्र) सासू तापाने पडली होती. येशूला हे कळल्यावर त्याने जवळ जाऊन तिच्या
हाताला धरून तिला उठविले व तिचा ताप निघाला, आणि ती त्याची सेवा करू लागली. तसेच, येशूने नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या
पुष्कळ लोकांना रोगमुक्त केले. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सेवा केल्यावर
ख्रिस्त पहाटेस उठला व तो प्रार्थना करण्यासाठी रानात गेला. कफर्णहूमातील लोकप्रियते पासून तो दूर गेला व
त्याने पित्याच्या सहवासात वेळ घालविला. ह्या सर्व घटनेद्वारे संत मार्क येशूच्या
दैवीशक्तीचे स्वरूप स्पष्ट करतो.
बोधकथा :
काही वर्षापूर्वी
मुंबईतील एक लीजनरी बाई कलकत्याला गेली होती. मदर तेरेजाचे आश्रम खूप जवळ होते, म्हणून तिने मदरला भेटून जायचं ठरवल. तिला वाटलं मदर तेरेजा एखाद्या राणी प्रमाणे
ऑफिसात (कचेरीत) पंख्याखाली बसली असेल आणि तिच्या सिस्टरांना सर्व काम करायला लावत असेल; परंतु तो तीचा गैरसमज ठरला. कारण ती तेथे गेल्यावर तिला समजलं की मदर
दुसऱ्या सिस्टरांना घेऊन पिडीतांना भेटण्यासाठी गेली आहे आणि ती त्याच्या झोपडपट्टीतून तीन
तासांनीच परत येईल. त्या बाईने झोपडपट्टीचा पत्ता मागितला व ती जवळच असल्यामुळे तेथे गेली आणि मदर
तिला तेथे भेटली. मदर जे काम करीत
होती ते पाहून त्या बाईला मदरांचा किळस आला. कारण एका ब्रेनच्या कॅसरग्रस्त महिलेची डोके
मदरच्या हातात होते आणि दुसरी एक सिस्टर कात्रीने हळूहळू तिचे केस कापत होती. त्याच वेळेला तिच्या मस्तकातून किंवा डोक्यातून वळवळणारे किडे खाली पडत होते. मदरला एवढ कठिण काम करत असताना कसलंच वाईट वाटत नव्हतं. ते पाहून त्या बाईने डोक्यावर एक हात ठेवून
मदरांना स्वतःची ओळख करून दिली. नंतर म्हटले, मदर एवढं घाणेरड काम तुम्ही कसं करता? तुम्हांला काम करायला प्रेरणा आणि शक्ती कोण
पुरवतो? मला तर हा सर्व
प्रकार पाहून शिसारी आली आणि अंगावर काटे उभे राहिले. त्यावर मदर म्हणाल्या, ‘जनसेवा हीच ख्रिस्तसेवा आहे. हे डोकं माझ्या ख्रिस्ताच आहे.
मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानामध्ये
आपल्याला असे ऐकायला मिळते की, जेव्हा पेत्राची सासू तापाने पडली होती तेव्हा
शिष्यांनी जाऊन ख्रिस्ताला तिच्याविषयी सांगितले. ख्रिस्ताने ह्या विनंतीकडे दुलर्क्ष केले नाही
तर त्याने जवळ जाऊन तिला उठविले व तिचा ताप गेला. इतकेच नव्हे तर त्याच क्षणी तिला शक्ती मिळाली
व ती उठून त्यांची सेवा करू लागली.
पेत्राने येशू
ख्रिस्ताला बोलावले.
पेत्राने येशू
ख्रिस्ताला त्यांच्या घरी येण्यास निमंत्रण दिले होते. परंतु त्याचे घर व्यवस्थित नव्हते. सर्व ठिकाणी राढा झाला होता. त्यामुळे तो पाहुण्याचा चांगल्याप्रकारे
पाहुणचार करू शकला नाही. तसेच त्यांची सासू देखील आजारी होती. तरी देखील पेत्राने ख्रिस्ताला त्याच्या घरी
बोलावले. या कारणास्तव: येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी व शहरातील लोकांसाठी एक आशीर्वाद बनला.
जेव्हा येशू
ख्रिस्ताने पेत्राच्या सासूला बरे केले तेव्हा ती बातमी सर्व ठिकाणी पोहोचली व
येशू ख्रिस्ताची प्रतिष्ठा वाढली. जे लोक नाना प्रकारच्या रोगांनी पछाडलेली कितीतरी
माणसे होती, ती सर्व माणसे पेत्राच्या घरी आणली होती. तेथे येशू ख्रिस्ताने सर्व रोग्यांना बरे केले
व भूतग्रस्तांना मुक्त केले. हेच घर कफर्णहुमातील ख्रिस्ताच्या कार्याचे
केंद्र बनले.
आपणही ख्रिस्ताला
आपल्या घरी येण्यास आमंत्रण दिले पाहिजे. जरी आपण गरीब असलो तरी येशू ख्रिस्त आपल्या घरी
येतो. एकदा तो आपल्या
घरी आला म्हणजे आपल्याच नव्हे तर आजूबाजूच्या कुटुंबाला ही आशीर्वाद मिळतो.
लोकांनी किंवा
शिष्यांनी ख्रिस्ताला तिच्या आजाराविषयी सांगितले.
जेव्हा ख्रिस्त त्याच्या
घरी आला तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला तिच्या आजाराविषयी सांगितले. लोकांनी ख्रिस्ताला आव्हान केले की तिला ह्या
आजारातून मुक्त कर. हे सर्व त्याच्या सरळ हृदयातून आले. ख्रिस्ताने त्याच्या हृदयाकडे पाहून पेत्राच्या
सासूला आजारातून मुक्त केले. स्तोत्रसंहिता ५०:१५ मध्ये आपण वाचतो की, “संकटसमयी माझा धावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील”.
कधी-कधी आपण आपल्या जीवनात गोंधळून जात असतो. आपल्याला माहित नसते की आपण देवाकडे काय मागावे. आपण देवाकडे ऐहिक व क्षणिक गोष्टी मागत असतो. उदा: पैसा, मालमत्ता, आरोग्य व भेटवस्तू. परंतु आपण देवाकडे नेहमी आध्यात्मिक व धार्मिक
गोष्टी मागितल्या पाहिजेत. जेणेकरून आपण वाईट व पापी गोष्टीपासून दूर राहू. संत पौल आपल्याला फिलीपीकरांस पत्र अध्याय ४
ओवी ६ मध्ये सांगत आहे की, “कशाविषयी चिंता करू नका तर सर्व गोष्टीविषयी
प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
येशू ख्रिस्ताने
तिचा हात धरला व तिला उठवले.
ख्रिस्ताने
पेत्राच्या सासुंचा हात पकडला व तिला
उठवले. ख्रिस्ताच्या
स्पर्शामध्ये दैवी शक्ती होती. त्याने अनेकदा अनेक लोकांना त्यांच्या दैवी
स्पर्शाने बरे केले. जेव्हा एक कुष्टरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला
विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा (मार्क १:४०).
जुन्या करारात
आपण पाहतो की, देवाने त्यांच्या लोकांचा हात धरला, जेणेकरून त्यांच संरक्षण करण्यासाठी व त्यांना
सामर्थ्य देण्यासाठी आणि देव इस्राएली लोकांना बोलला की, “मी परमेश्वराने न्यायानुसार बोलाविले आहे, मी तुझा हात धरिला आहे, तुला राखिले आहे, तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा
असे मी तुला करीन (यशया ४२:६).
देवाने आपला हात
धरवा व आपल्यासाठी दैवी शक्तीने स्पर्श करावे म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करू या, तसेच त्यांची कृपा व आशीर्वाद मागु या. जसा यशया संदेष्टा आपल्याला अध्याय ४१ ओवी १०
मध्ये सांगत आहे की, “तू भिऊ नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला
सावरितो.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आज आम्ही ख्रिस्तसभेसाठी
प्रार्थना करतो; विशेषकरून पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरु व धर्मभगिनी ज्यांनी आपले सर्व आयुष्य
प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची कृपा व आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाची सुवार्ता जगाच्या काना-कोपऱ्यात पसरावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे लोक आजारी आहेत व खाटेला खिळलेले आहेत, त्यांना प्रभूचा दैवी स्पर्श व्हावा व ते
लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करु या.
३. जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय नाही, अशा सर्व युवक व युवतींना देवाच्या प्रेमाचा
स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. येथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांची श्रद्धा
वाढावी. तसेच त्यांनी
ह्या जगातील संपत्तीवर, वस्तूवर व व्यक्तीवर अवलंबून न राहता ख्रिस्ताच्या वचनावर व श्रद्धेवर अवलंबून
राहून, त्यांचा विश्वास
अधिकाअधिक बळकट व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून, आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी
विशेष प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment