Thursday, 4 January 2018


Reflection for the Homily of Solemnity of Epiphany of the Lord  (07-01-18) by Fr. Wilson D'souza. 



प्रकटीकरणाचा सण


दिनांक: ०७-०२-२०१८
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिस ३:२-३, ५-६
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२









प्रस्तावना:

आज देऊळ माता ‘येशूच्या प्रकटीकरणाचा सण’ साजरा करीत आहे. येशूचे प्रकटीकरण काही काळापुरते नसून तर ते जगाच्या उदयापासून ते अंतापर्यत आहे. येशू सदोदित आपल्या बरोबर आहे. भक्त त्याच्या प्रकटीकरणाचा अनुभव घेण्याऐवजी तोच त्याच्या भक्तांना प्रकट होतो हेच ह्या सणाचे वैशिष्ट व महत्व आहे. येशू आपल्याला स्वतःहून प्रकट होत असताना त्याचा अनुभव घेण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण: 

पहिले वाचन: यशया ६०:१-६

यशया संदेष्टा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणणाऱ्या तेजाविषयी सांगत आहे. परमेश्वराचा पुत्र येशू केवळ एका जाती जमातीसाठी, धर्मासाठी किंवा एखाद्या संस्कृती पुरता मर्यादित नाही तर तो सर्व राष्ट्रांचा प्रकाश व तेज आहे.

दुसरे वाचन: इफिस ३:२-३, ५-६

संत पौल इफिसीकरांस लिहिलेल्या पत्रात असं सांगतात की देवाची कृपा परराष्ट्रीयांना वाटली गेली आहे. पण संत पौलाने ती आपल्या जीवनात अनुभवली आहे. येशूच्या प्रकटीकरणाचे रहस्य दमस्कस रस्त्यावर त्याला झाले आणि त्या रहस्याबद्दल तो आपल्याला लिहित आहे.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

शुभवर्तमानात आपण पाहतो की तीन ज्ञानी माणसांनी येशूचे दर्शन घेऊन त्याला नमन केले व सोने, ऊद व गंधरस यांचे नजराणे दिले. पूर्वेकडून आलेल्या ह्या तीन शहाण्या ज्ञानी माणसांना येशू प्रकट झाला व त्यांनी त्याला नमन केले.

बोधकथा:

एका राजाला तीन मुलं होती. आपले वय झाल्यामुळे आपला राज्यकारभार आपल्या मुलांच्या हाती सोपविण्याचा विचार ते करत होते. कोणा एकाच्या हाती कारभार म्हणजे दोघांना नकार. त्याने आपल्या अधिकाराला आपली समस्या सांगितली. मला माझा राज्यकारभार एकाच्या हाती सोपवायचा आहे. तिघांना हा कारभार मी देऊ शकत नाही. तेव्हा अधिकारी म्हणाला आपण त्यांची परीक्षा घेवू. यात जो उत्तीर्ण होईल तो राज्यकारभार पाहून ह्या देशाचा राजा बनेल.
तीन राजपुत्रांना तीन खोल्या देण्यात आल्या. त्यांना पैसे देण्यात आले व त्या खोल्या कोणत्याही सामानाने भरण्यासाठी सांगितले. तिन्ही राजपुत्रांची इच्छा होती की आपण राजा व्हावे व राज्यकारभार पाहावा. आपली शक्ती व बुद्धीपणाला लावून त्यांनी खोल्या भरण्याचा विचार केला. एकाने त्यात भरपूर लाकड भरली तर दुसऱ्याने त्यात कापूस भरला. त्यांचे अनेक दिवसांचे प्रयत्न पाहून राजे महाराज खुश झाले. परंतू त्यांना एका गोष्टीचे वाईट वाटले की त्याचा तीसरा राजपुत्र काही करत नव्हता केवळ भरकटत होता. ठरलेल्या दिवसात राज्यातील तीन व्यक्ती संध्याकाळी राजवाड्यात जावून तपासणी केली. पहिल्या राजपुत्राची खोली उघडली पण अंधारापोटी त्यांना काही पाहायला मिळालं नाही. दुसऱ्याच्या खोलीत पावूल टाकले पण काही दिसले नाही. दोघांच्या बाबतील ते निराशित झाले आणि तीसरा काहीच न करताना त्यांनी पाहिलेले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी तिसऱ्याची खोली तपासणीसाठी उघडली. आणि ती खोली संपूर्णपणे प्रकाशाने भरलेली होती. त्या अंधाऱ्या रात्रीचे अंधत्व एका मेणबत्तीमुळे तेजोमय झाले होते. राजाने आपल्या तिसऱ्या मुलाची चातुर्य, बुद्धिमता व हुशारकीवर खुष होवून आपले राज्यअधिकार व राजेपण तिसऱ्या मुलाला बहाल केले.

मनन चिंतन:

     यशया संदेष्टा आपला तारणारा येणार आहे, जीवनात व समाजात परिवर्तन घडवणार आहे असे सांगतो. तीसरा यशया (५५-६६) अध्यायामध्ये बंदिवासातून परत आलेल्या इस्रायली लोकांना मुक्तीचा संदेश देतो. ६०वा अध्याय ओळी १-६ मध्ये देवाचे तेज पृथ्वीवर अवतरल्याच सांगितले आहे. अंध:काराच राज्य नष्ट झाले आहे. देव दु:खी, कष्टी अडी-अडचणीत असलेल्या आपल्या प्रजेबरोबर आहे. अंधारात चालण्यासाठी तेज प्रकाश जन्मला आहे (यशया ९:२).
     परमेश्वराच्या सेवकाविषयी बोलताना दुसरा यशया सांगत आहे, “तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करील (४२:६). तुझे कार्य आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून, बंदीवासात व अंधारात बसलेल्या कारागृहात बाहेर काढावे म्हणून मी असे करीन” (४२:७). प्रभूच्या तेजाने पुढे काय होईल ह्या विषयी यशया ४२:१६ मध्ये लिहितो, “माहित नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यास नेईल, अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांस चालवीन, त्याच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंच सखल जागा सपाट मैदान होईल. यशया ह्या सहा ओळीमध्ये आपल्या आशा उंचवीत आहे. त्यांना ठरवलेल्या जागी आणून आपली वचने पूर्ण करत आहे. दुसऱ्या वाचनात मनन चिंतन करण्यासाठी गोष्ट म्हणजे देवाचे रहस्य जे पौलाला प्रकट झाले होते ते परराष्ट्रीयांना प्रकट झाले आहे. पौल ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. देव प्राचीन काळी अशाप्रकारे संदेष्ट्याच्याद्वारे व आपल्या पूर्वजाशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे (इब्री १:१-२). परराष्ट्रीयांना हे रहस्य सुवार्तेच्याद्वारे प्रकट केले आहे. जे प्रेषितांना, संदेष्ट्यांना व स्वत:हा पौल ह्याला प्रकट झाले होते. ते रहस्य दुसरे तिसरे कोणी नसून ‘येशू’ स्वत:हा होता.
     आधुनिक जगात दैवी रूपे धारण करणारी साधू महाराज, संन्यासी महात्मे, साधू-संत आणि धर्मगुरु देव प्रकट झाल्याचे व तो माझ्याशी बोलला अस छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा देवाच्या नावाने युक्तीवाद लढण्याचा प्रयत्न करतात. देवाने मला दैवी शक्ती, दाने आणि पवित्र आत्म्याच्या फळाने भरून काढले आहे असा दावा करतात. ज्याला देवाचा अनुभव आला असतो, ज्याला देवाच खर ज्ञान लाभलेले असते, ज्याला देव प्रकट झालेला असतो तो मनुष्य फुकटचा देखावा करत नाही. हेरोदाने देवाला नमन करण्याचा फुगीर भाव दाखवला. त्यात देवाला जाणून घेणे, त्याचा अनुभव घेणे ह्याच्यात काही लेणे देणे नाही. माझ्याहून कोणीतरी महान जन्मला आहे, माझ्या पदाला थारा राहणार नाही, अशावेळी नाटकी स्वरूप त्याने धारण केले.
     पण देवाच्या योजना वेगळ्या असतात. तो खोट्यांना, दिखाऊपणा करणाऱ्यांना, त्याचा अनुभव झालेला आहे असा दावा करणाऱ्यांना तो कधीच प्रकट होत नाही किंवा ताऱ्याची चिन्हे त्याच्या नजरेत पडत नाही.
     पूर्वेकडील तारा फक्त तीन ज्ञानी, समजदार, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना दिसला. त्यांनी देव म्हणून ओळखले. त्यांना तो प्रकट झाला. त्यांच्या नजराणा व त्यांनी खरेखुरे केलेले नमन त्याला मान्य होते. 
             
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझे दर्शन घडव.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशस्प, धर्मगुरू व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेम, द्या व शांती इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे नवीन वर्ष चांगले, सुखा-समाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.  
    


No comments:

Post a Comment