Thursday, 18 January 2018

Reflection for the homily of 3rd Sunday in Ordinary Time   (21-01-2018) by Br. Brandon Noon.





सामान्य काळातील तिसरा रविवार


दिनांक: २१/१/२०१८         
पहिले वाचन: योना ३:१-५, १०
दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१
शुभवर्तमान: मार्क १:१४-२०





प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला पश्चाताप करण्यास व देवावर विश्वास ठेऊन त्याचे अनुकरण करण्यास बोलावीत करत आहे.
     पहिल्या वाचनात आपण पाहतो की, योना निनवे ह्या शहरात जातो व तेथील  लोकांना आपले पापी जीवन बदलून देवावर श्रद्धा ठेवण्यास निवेदन करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, ख्रिस्त कधी आपला न्याय करण्यास येईल हे आपल्याला ठाऊक नाही; म्हणून आपण सदैव तयार रहावे. तसेच मार्कलिखित शुभवर्तमानात आपण येशूच्या कार्याचा प्रारंभ व पहिल्या शिष्यांना पाचारण ह्या विषयी ऐकणार आहोत.
     आपणा सर्वाना देवाने त्याचे कार्य सर्वत्र पसरविण्यासाठी बोलाविले आहे. त्याचे कार्य आपण विश्वासाने व प्रामाणिकपणे पार पाडावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असताना सर्व शक्तिमान परमेश्वराची कृपा मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: योना ३:१-५, १०

     योना हे पुस्तक इतिहास काळातील नसून हे काल्पनिक पुस्तक आहे. ह्यामध्ये देवाने योनाला निनवे या शहरात पाठवले कारण ह्या शहरातील लोकांनी वाईट मार्ग अंगिकारला होता व त्यांचा देवावर विश्वास नव्हता. योना त्या शहरात संपूर्ण दिवस ओरडत गेला की चाळीस दिवसाचा अवकाश आहे, पश्चाताप करा नाहीतर निनवे धुळीस पडेल. योनाचा संदेश ऐकून निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली व उपास नेमला. त्यांचे बदलेले जीवन पाहून, देवाने त्यांचा व त्यांच्या शहराचा नाश व नायनाट होण्यापासून वाचविले.

दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१

     ख्रिस्त एक दिवस धर्तीवर न्याय करण्यास येईल हे शिष्यांना भाकीत केले होते. परंतु, येशू ख्रिस्त कधी येईल हे कोणालाच ठाऊक नाही. म्हणून संत पौल लोकांना आवर्जून सांगत आहे की तुम्ही सदैव तयार रहा, जगाच्या ऐहिक गोष्टीपासून लांब राहा. तसेच तो सागंतो की वैवाहिक जीवनात तुम्ही एकमेकांबरोबर आनंदी राहा. पण जेव्हा परमेश्वर न्याय करण्यास येईल तेव्हा येशूला प्रथम स्थान देणे फार गरजेचे ठरेल. अशाप्रकारचा बोध संत पौल आपल्या पत्राद्वारे करत आहे.  

शुभवर्तमान: मार्क १:१४-२०

     योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालीलात देवाची सुर्वाता सांगत असताना म्हणाला देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुर्वातेवर विश्वास ठेवा. आपण पुढे पाहतो की येशू पहिल्या शिष्यांना पाचारण देतो व म्हणतो तुम्ही आतापर्यंत मासे धरत होता पण ह्या पुढे मी तुम्हाला माणसे धरायला शिकवीन. शिष्यांनी सर्व काही सोडून येशूचे अनुकरण करण्याचे ठरवले. 
  
मनन चिंतन:

     आजची उपासना आपणाला पश्चाताप, देवावर विश्वास आणि देवाचे अनुकरण करण्यासाठी बोलावीत आहे.
     आज जगभरात भरपूर मिशनरी बंधु-भगिनी आपल्या निस्वार्थी सेवेद्वारे देवाचे राज्य पसरविण्याचे काम करत आहेत. देवाने त्यांना निवडलेले आहे. त्यांनी देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन, मोठ्या धैर्याने जगाच्या कोपऱ्यात देवाची सुर्वाता सांगत आहेत.
     जेव्हा मासेमारी करणारा बांधव समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातो तेव्हा समुद्रात भरपूर मासे असतात. परंतु, मासेमारी करीत असताना सर्वच मासे त्यांना मिळत नाही तर थोडे मासे किंवा ठराविक मासे मिळत असतात. आपण पाहतो जुन्या करारापासून ते नवीन करारापर्यंत भरपूर लोकांना परमेश्वराने बोलावले आहे. उदाहरणार्थ: मोशे, आब्राहम, शमुवेल, यशया, यिर्मया, आमोस, मिखा इत्यादी. तसेच नवीन करारात आपण पाहतो की येशूने शिष्यांना बोलावून त्यांना देवराज्य पसरविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या हाती सोपविली आहे. आतासुद्धा या जगात परमेश्वर अनेकांना बोलावत आहे. संत मदर तेरेसा, संत जॉन पौल दुसरे, संत अल्फोन्सा, परमगुरु, महागुरू, धमर्गुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांना देवाने बोलावलेले आहे. तसेच आपण स्वत: आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत की भरपूर तरुण-तरुणी येशूच्या मळ्यात काम करण्यासाठी सज्ज होत आहेत.
     निवडलेल्या लोकांचे कार्य एकच होते ते म्हणजे ‘देवाची सुवार्ता घोषित करा’. जे लोक देवापासून लांब गेले आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून पुन्हा देवाच्या जवळ आणण्यासाठी ते प्रोस्ताहन करीत आहेत.
     पहिल्या वाचनात आपण ऐकतो की देव योनाला निनवे या शहरात पाठवतो कारण निनवेतील लोक वाईट मार्गाला लागले होते. ते देवावर विश्वास ठेवत नव्हते. योनासाठी हे कार्य सोपे नव्हते तरीही देवावर विश्वास ठेवून तो निनवे शहरात जावून, ओरडून देवाची घोषणा करतो व लोकांना सांगतो की पश्चाताप करा नाहीतर तुमचा सर्वांचा नाश होणार आहे. निनवेतील लोक योनावर विश्वास ठेवतात व आपली वर्तवणूक बदलून देवाचा स्वीकार करतात. 
     आजही योनासारखे भरपूर धर्मगुरु व धर्मभगिनी देवाच्या सुर्वातेची घोषणा करत आहेत. त्यांचे जीवन कठीण बनले आहे. अनेक प्रसंगांना व संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही ते आनंदाने देवाची सुर्वाता जगभरात पोहचवत आहेत. देवाची सुर्वाता पसरविण्याचे कार्य फक्त धर्मगुरु व धर्मभगिनींचे नाही तर आपणा सर्वांचे आहे. ख्रिस्ती ह्या नात्याने आपण सर्वजण देवाची लेकरे आहोत. आपण सर्वजण देवाचे शिष्य आहोत. म्हणून आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य 'देवाची सुवार्ता संपूर्ण जगभरात पसरवणे' हे आहे. 
     तुम्ही म्हणाल आमचे कुटुंब आहे, आम्हांला वेळ नाही. आम्ही आमच्या कुटुंबांसाठी रात्रं-दिवस काबाड कष्ट करत आहोत. हे खर आहे. परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनात कामाच्या जागी एक दुसऱ्यांना प्रेम व क्षमा याद्वारे देवाची सुवार्ता पसरवू शकतो व पसरविणे गरजेचे आहे. आपण आपल्या जीवनाद्वारे, जे लोक वाईट मार्गाला गेले आहेत त्यांना देवाच्या जवळ आणू शकतो. त्यांना चांगला मार्ग दाखवू शकतो, जेणेकरून ते ही पश्चाताप करून देवावर विश्वास ठेवतील व देवाच्या जवळ येतील.
ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की येशू शिष्यांना सांगतो की आजपासून तुम्ही मासे धरणारे नसून तर माणसे धरणारे व्हाल. तोच येशू ख्रिस्त आपणा सर्वांना सांगत आहे की तुम्ही आजपासून माणसे धरणारे आहात. म्हणून आपण सर्वानी देवाच्या हाकेला होकारार्थी मनाने प्रतिसाद देऊन त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याचा पाठलाग करणे आवश्यक आहे व आपल्या दैनंदीन जीवनात आपल्या वर्तवणूकीने व शब्दाने देवाचा संदेश संपुर्ण जगभरात पसरवायला हवा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरु व व्रतस्थ ह्यांनी आपल्या रोजच्या जीवनाद्वारे आपणा सर्वांना देवाच्या जवळ आणण्यास प्रोस्ताहन करावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून आपला देवावरील विश्वास अधिका- अधिक बळकट करावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील तरुण-तरुणीने देवाच्या हाकेला होकारार्थी प्रतिसाद देवून, देवाच्या मळ्यात काम करण्यासाठी जावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी व दु:खी आहेत त्यांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
    

     

No comments:

Post a Comment