Wednesday, 21 February 2018

Reflection for the Homily of 2nd Sunday of Lent (25-02-18) By  Br. Amit D'brito







प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक: २५-०२-२०१८
पहिले वाचन: उत्पती २२:१-२, ९-१३, १५-१८
दुसरे वाचन: रोमककरांस पत्र ८:३१-३५
शुभवर्तमान: मार्क ९:२-१० 








प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळातील दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपला देवावरील विश्वास दृढ करण्यास आमंत्रित करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की देव अब्राहमला आपल्या एकुलत्या एक पुत्राचा बळी देण्यास आज्ञा करतो. येथे परमेश्वर अब्राहामाच्या श्रद्धेची सत्वपरीक्षा पाहतो व ह्यामध्ये अब्राहम विजय मिळवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्रात लिहितो की, परमेश्वराने आपल्या स्वत:च्या एकुलत्या एक पुत्रास मानवकल्याणासाठी अर्पण केले आणि तो त्याच्या पुत्राद्वारे आपणास सर्व काही देतो. तसेच शुभवर्तमानात येशूचे त्याच्या तीन शिष्यांसमक्ष झालेल्या रूपांतराचे वर्णन ऐकावयास मिळते.
     जीवनाचे सर्व मार्ग ख्रिस्तामध्ये एकरूप करण्यास व ख्रिस्ताचे सेवाकार्य करण्यासाठी आपल्याला गरज असलेली प्रेरणा व कृपा सतत मिळावी व आपण आपल्या विश्वासात अधिक दृढ व्हावे म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पती २२:१-२, ९-१३, १५-१८

     उत्पतीच्या पुस्तकातील ही एक अतिशय नाट्यमय घटना आहे. येथे अब्राहाम आपल्या मुलाला यज्ञार्पणच्या जागी जड अंत:करणाने मुलाला घेऊन जातो व त्याचे  यज्ञार्पण करताना स्वर्गातून हस्तक्षेप होतो व एडक्याचे अर्पण केले जाते.
     अब्राहामाच्या विश्वासाची ही सत्वपरीक्षा आहे. कारण एकीकडे अपत्यप्रेम व दुसरीकडे देवाचे आज्ञापालन अशा कात्रीत सापडलेल्या अब्राहामाला काही सुचेना. परंतु शेवटी विश्वास व आशा ह्याचा विजय झाला. अब्राहाम ह्या कसोटीत उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला. अब्राहामने केलेल्या ह्या कठोर आज्ञापालनामुळे आशीर्वादाची सर्व अभिवचने पूर्ण करण्यात आली. जुन्या करारात अब्राहामाने यज्ञार्पणासाठी आपल्या एकुलता एक पुत्र दिला. त्याचप्रमाणे नवीन करारात प्रभू पित्याने ही मानवाच्या कल्याणासाठी ‘आपल्या स्वत:च्या पुत्राला राखून ठेवले नाही’.

दुसरे वाचन: रोमककरांस पत्र ८:३१-३५

     देव आपल्या पक्षाचा आहे व आम्हांला अनुकूल आहे याचे पौलाने पुन्हा एकदा स्मरण दिले आहे. त्याने आपला पुत्र दिला आणि त्यातून त्याच वेळी या जीवनातून पार होण्यसाठी आणि अंतिम तारण प्राप्त होण्यासाठी जे जे आवशयक ते ते सर्व आम्हांला उपलब्ध करून दिले. त्यामुळे आम्हांला दोषी ठरवणे कोणालाही शक्य नाही. कारण देवानेच आम्हांला निवडले आहे, त्यानेच आम्हांला नीतिमान ठरवले आहे आणि आमच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपाला त्याचा स्वत:चा पुत्र प्रत्युत्तर देतो. तसेच येथे संत पौल ख्रिस्ताचे आमच्यावर असलेल्या प्रीतीचे वर्णन करतो. देवाच्या प्रीतीपासून आम्हांला विभक्त करणे कोणत्याही आत्मिक शक्तीला शक्य नाही. या नव्या राजवटीत देवाची प्रीती ख्रिस्तामध्ये आमच्यावर सत्ता चालवते व येशू आम्हांला काढून टाकील असे संपूर्ण सृष्टीत नाही.

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०

येशूचे रुपांतर:
     येशू हा ख्रिस्त आहे आणि देवाचे राज्य कसे सामर्थ्याने येईल याचा पुरावा येशूच्या रूपांतराने शिष्यांना मिळाला. यावरून तो गौरवाने कसा प्रगट होईल याची त्याच्या शिष्यांना कल्पना आली.
     लाबानोन पर्वताच्या एका उंच डोंगरावर येशू आपल्या तीन शिष्यांसह प्रार्थना करीत असताना त्याचे रुपांतर झाले. येशुमध्ये असलेले गौरव त्याच्या शरीरातून प्रगट झाले.
एलीया व मोशे तेथे प्रगट झाले. ते या जगात असता इस्राएल राष्ट्रात देवाचे राज्य यावे यासाठी झटले होते. ख्रिस्ताच्या मरणाद्वारे या राज्याची स्थापना होणार होती त्याविषयी ते बोलत होते. देवपित्याने आपले लक्ष येशू ख्रिस्तावर वळविले व येशूचे प्रभुत्व मानण्यास सांगितले. ख्रिस्त मृतातून उठणार आहे हा विचार त्या शिष्यांना गोंधळात टाकणारा होता. मसिहा हा दु:ख सोसेल हे त्यांनी समजून घेतले नव्हते. 

बोधकथा :

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता. १९८३ मध्ये त्याच्या हृदयावर शस्ञक्रिया करावी लागली. त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे त्याला कॅन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पत्रे येत राहिली. त्यातील एका पत्रात म्हटले होते... इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पत्राला उत्तर देताना आर्थर म्हणतो... ५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस सर्किटमध्ये दाखल झाली, त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम स्पर्धेसाठी निवडली गेली. त्यातील फक्त ५० टेनिसपटू विम्बलडनसाठी निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत पोचले. त्या दोन जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले नाही की, माझीच निवड का केलीस? मग आता अशा वेदना होत असताना माझीच निवड का केली, असे मी देवाला कसे विचारु? सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
     ह्या उपवास काळात आपण सूद्धा अब्राहाम व आर्थर अँश ह्या प्रमाणे अधिका-धिक विश्वासी होण्यास प्रयत्न करूया.

मनन चिंतन:
     
      कदाचित आजच्या पहिल्या वाचनात आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल की, ‘परमेश्वर अब्राहामाला आपल्या एकुलत्या मुलाचा बळी देण्यास सांगतो’ हे कसे शक्य आहे? परंतु आपल्या असे लक्षात येते की, त्या वेळी देव अब्राहामास त्याची बलिदानापेक्षा सत्वपरीक्षा पाहत होता. कदाचित प्रत्येक आई-वडिलांना प्रश्न पडला असेल की, ‘मी ही परीक्षा पास झालो असतो का?’ देवाच्या आज्ञेवरुन मी माझ्या पुत्राचा त्याग करण्यास लागणारा विश्वास माझ्यामध्ये आहे का? त्यामुळेच आपल्या असे लक्षात येते की, ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याकडून प्रचंड अशा विश्वासाची अपेक्षा केली जाते.
     आजच्या शुभवर्तमानात आपण येशूचे रुपांतर पाहतो. प्रभू येशू आपल्या सोबत पेत्र, याकोब व योहान ह्यांना घेऊन उंच पर्वतावर जाऊन त्यांना आपल्या प्रतिष्ठेचे व गौरवाचे ओझरते दर्शन देतो. स्वर्गीय तेज प्रभू येशूच्या चेहऱ्यावर झळाळत होते आणि मग मेघातून अशी वाणी झाली की, ‘हा, माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका’.  परमेश्वर पिता येथे असे सुचवतो की प्रभू येशू हा फक्त मानव नसून तो देव सुद्धा आहे.
     ह्यामागचा विशेष हेतू असा आहे की, पित्याला शिष्यांचा विश्वास अधिक बळकट करायचा होता. कारण काही दिवसापूर्वीच प्रभू येशूने स्वत:च्या मरण व पुनरुत्थान ह्याविषयी भविष्य सांगितले होते. म्हणूनच परमेश्वर पिता येशूच्या शिष्यांची योग्य अशी तयारी करीत होता. जेणेकरून ते प्रभू येशूचा ‘देवाचा पुत्र’ असा स्वीकार करतील.
     परंतु आपल्या असे लक्षात येते की इतके स्वर्गीय रुपांतर दाखवून सुद्धा ते गोंधळात पडले. जेव्हा येशूने सांगितले की, ‘जे तुम्ही पाहिले ते कोणालाही कळवू नका’ तेव्हा ते विचार करू लागले. त्यांना काही समझले नाही. कदाचित ते त्यांच्या विश्वासात कमी पडले.
     आजच्या पहिल्या वाचनात अब्राहामाची कसोटी व शुभवर्तमानातील शिष्यांचा अपुरा विश्वास अशी परिस्थिती आपणही अनेक वेळा हे जीवन जगत असताना पाहत असतो. आपणही शिष्यांप्रमाणे गोंधळून जातो. आपल्याही जीवनात अनेक कसोटीचे क्षण येतात. आपलीही जीवनरूपी जहाज अनेक वेळा संकटामुळे जीवनात अनेक चढ-उतार पाहत असतो.
     परंतु आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास ह्या समस्याचे उत्तर देत आहे. संत पौल म्हणतो की, देव आपणांस अनुकूल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण? जरी अब्राहामाला आपल्या पुत्राला बळी द्यावे लागले नाही तरीही परमेश्वर पित्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्यास जगाच्या तारणासाठी अर्पण केले व त्याच पुत्राद्वारे तो आपली प्रत्येक मागणी पूर्ण करतो; त्यामुळेच आपण गरीब आहोत की श्रीमंत किंवा सुखी आहोत की दु:खी ह्याविषयी काहीच फरक पडत नाही. परंतु सत्य इतकेच आहे की पित्याने आपल्या पुत्राचे बलिदान केले.
     संत पौल म्हणतो की, जरी आपल्याला उपासमार, छळ, संकटे, आपत्त्ती सहन करावी लागली तरीही प्रभू येशूने जे आपल्यासाठी सहन केले आहे ते सर्वश्रेष्ठ आहे.
     आपण आपल्या समस्याची प्रभू येशू ख्रिस्ताच्या दु:खाबरोबर तुलनाही करू शकत नाही. म्हणूनच ह्या उपवासकाळात छोटे-मोठे प्रायश्चित व त्याग अतिशय आनंदाने करूया. कारण हा प्रायश्चित काळ फक्त दु:खाचा समय नसून आनंदाचा आहे कारण आपण ह्या काळात आपल्या पित्याला काहीतरी परत देऊ शकतो ज्याने आपल्या तारणासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्रास अर्पण केले. 
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या जवळ येण्यास आम्हांला सहाय्य कर.


१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरु व धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे प्रभू येशूची खरी ओळख संपूर्ण जगाला करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळात सर्व भाविकांनी अतिशय पवित्र जीवन जगावे व प्रभूच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. दयाळू प्रभो आजच्या प्रभूरुपांतर सणाच्या दिवशी आमच्या हृदयाचे व मनाचे परिवर्तन कर. जेणेकरून, आम्ही तुझे कार्य पसरविण्यासाठी सदैव झटावे म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.
४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सदैव नांदत रहावे व आपण प्रभूच्या प्रेमाने भरून जावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




Thursday, 15 February 2018

Reflection for the Homily of 1st Sunday of Lent 
(18-02-18) By  Br. Jameson Munis






उपवास काळातील पहिला रविवार


दिनांक: १८-०२-२०१८
पहिले वाचन: उत्पती ९:८-१५
दुसरे वाचन: १ पेत्र ३:११-२२
शुभवर्तमान: मार्क १:१२-१५





“पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा”


प्रस्तावना:

आज पवित्र देऊळमाता उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाचे राज्य जवळ आले आहे म्हणून पश्चाताप करण्यासाठी आणि सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी पाचारण करत आहे.
     उत्पतीच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की देव नोहाशी व त्यांच्या मागे येणाऱ्या सर्व संततीशी तसेच पृथ्वीवरील इतर सर्व सजीव प्राणी ह्यांच्याशी करार करून पुन: जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाही ह्याचे आश्वासन देतो. दुसऱ्या वाचनात, पेत्र म्हणतो की आपण ‘ख्रिस्ताला’ प्रभू म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना’ कारण प्रभुने आम्हासाठी दु:ख सोसले आहे. तसेच संत मार्क आपल्या शुभसंदेशाद्वारे आपणास ‘पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा’ म्हणून प्रेरित करत आहे.  
     आपण सर्वजण पापी आहोत. अनेक मोहांना बळी पडून देवापासून आपण दूर जात असतो. देवाची कृपा आम्हास प्राप्त व्हावी म्हणून ह्या प्रायश्चित काळात आपण सर्वानी पापांपासून दूर राहावे व सुवार्तेवर विश्वास ठेवावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
   
सम्यक विवरण:

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

आजचे पहिले वाचन आपल्याला देवाने नोहाशी व त्याच्या मागे येणाऱ्या संततीशी तसेच तारवांतून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशी केलेला करार या विषयी सांगत आहे. कारण जलप्रलयाच्या अगोदर, लोक वाईट कृत्याने वागत होते. देवाची आज्ञा पाळत नव्हते. म्हणून देवाने जलप्रलयाचा वर्षाव केला. परंतु या जलप्रलयातून नोहा व त्यांच्या कुटुंबाचे व त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्याचे संरक्षण केल्यामुळे नोहाने देवाचे आभार मानले व देवाची उपकार स्तुती केली. देवाने त्या उपकार स्तुतीचा स्वीकार केला व जलप्रलया नंतर आश्वासन दिले आणि सांगितले की, मी यापुढे कधीही सर्व सृष्टीचा व प्राणिमात्रांचा नाश करणार नाही. सर्व सजीव प्राण्यामध्ये पिढ्यान-पिढ्या व युगान-युग वाढ होईल. तसेच, या कराराचे चिन्ह म्हणून आकाशात मेघ दिसतील व त्या मेघात धनुष्य दिसेल म्हणजे यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश होईल असा जलप्रलय होणार नाही.  

दुसरे वाचन: १ पेत्र ३:११-२२

     दुसऱ्या वाचनात पेत्र म्हणतो की आपण ‘ख्रिस्ताला’ प्रभू म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना’ कारण प्रभुने आम्हासाठी दु:ख सोसले आहे. आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल म्हणजे ख्रिस्त नीतिमान असून सुद्धा अनीतिमान लोकांकरिता मरण स्वीकारले. पुढे संत पेत्र आपल्याला सांगतो की, जेव्हा नोहा देवाच्या आज्ञेनुसार तारू बांधीत होता त्या काळातील लोकांनी तारवाद्वारे मिळणाऱ्या मुक्तीचा नकार केला. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही. ते सर्व अनितीमानाने जगले. त्यांनी देवाच्या वचनाचा आज्ञाभंग केला, म्हणून देवाने जलप्रलयाद्वारे लोकांना शिक्षा दिली. परंतु जलप्रलयापासून नोहा व त्याच्या कुटुंबियांचे संरक्षण केले. कारण त्यांनी देवाची आज्ञा पाळली. म्हणून आता नोहाचे तारू बाप्तीस्म्याचे प्रतिक बनले आहे. बाप्तिस्मा म्हणजे केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध मनाने देवाचे ऐकणे असे आहे. तसेच बाप्तिस्मा म्हणजे देवाशी एकनिष्ठ राहण्याचा करार आहे.  

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५

आजच्या मार्कलिखित शुभवर्तमानात येशूची अरण्यात परीक्षा व त्याच्या लौकिक कार्याचे प्रारंभ याविषयी ऐकतो. येशूच्या बाप्तिस्मा नंतर पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थना व उपवास करण्यासाठी अरण्यात नेले. ह्या चाळीस दिवसात त्याला सैतानाच्या मोहाला सामोरे जावे लागले. कारण येशूविषयी सैतान पूर्णपणे जाणून होता व त्याला माहित होते की, जर येशूने आपले कार्य चालू ठेवले तर त्याच्या अस्तित्वाला धोका होईल. म्हणून तो येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु येशू सैतानाच्या मोहावर विजय मिळवून आपल्या कार्याला यशस्वीरीत्या सुरुवात करतो. तसेच या घटनेनंतर जेव्हा योहान बाप्तीस्माला अटक केल्यानंतर येशू गालीलांत येतो व देवाची सुवार्ता पसरवितो व म्हणतो, “देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा”.  

बोधकथा:

अनिल एक चांगला मुलगा होता. त्याला रेशमा व राजेश ही लहान भावंडे होती. अनिल आपल्या आईवडीलांना मान देई व त्यांचे ऐकत असे. एक दिवस आईने मिठाई आणली होती. अनिलला मिठाई फार आवडत असे. आईने अनिलला त्याचा वाटा दिला. थोडी मिठाई खाऊन अनिलचे मन भरले नाही. आई जवळ पुन्हा मागायला त्याला लाज वाटली. अनिलच्या डोक्यात एक विचार आला. रेशमा व राजेशसाठी ठेवलेली मिठाई अनिलने कापडातून हळूच काढली व खाल्ली. रेशमा व राजेश शाळेतून घरी आल्यावर मिठाई त्यांना देण्यासाठी आईने कपाट उघडले. कपाटात आईला मिठाईचा डब्बा मिळाला नाही. आईने अनिलला विचारले असता, तो म्हणाला, “आई मला क्षमा करा, कारण मीच मिठाई खाल्ली. मी तुला दुखःविले आहे. मला क्षमा करा. तेव्हा अनिलच्या आईने त्याला जवळ बोलाविले व डोक्यावरून हात फिरवला व त्याला क्षमा केली.

मनन चिंतन:

ही छोटीशी गोष्ट आपल्याला आजच्या शुभवर्तमानाची आठवण करून देत आहे. ती म्हणजे, येशू ख्रिस्त सांगतो की, पश्चाताप करा व देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. देवाने आपल्याला दहा आज्ञा दिल्या आहेत. देव म्हणतो चोरी करू नका, खोटे बोलू नका, कोणाला मारू नका आणि देवाला, आई-वडिलानां व मोठ्यानां मान द्या. देवावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. तरी सुद्धा जेव्हा आपण चोरी करतो, खोटे बोलतो, आई-वडिलानां उलट बोलतो, वाईट शब्द बोलतो व कोणाला फसवतो. ह्या सर्वामुळे आपण देवापासून देवाच्या आशिर्वादापासून दूर जात असतो. यालाच पाप म्हणतात. पाप करणे म्हणजे देवाशी नाते तोडणे, देवाच्या प्रेमळ ह्द्याला दुखावणे, देवाच्या प्रेमाला नकार देणे; व आपण त्याचे नाते तोडतो तसेच, जेव्हा आपण पाप करून देवापासून दूर जात असतो तरीपण देव आपल्यावर खूप प्रेम करतो व सांगतो. “पश्याताप करा आणि माझ्याकडे या”. आपण सर्वजण देवाला खूप आवडतो, म्हणून आपण सर्वांनी देवाकडे आपली चूक कबूल केली पाहिजे. तसेच आपल्या आई-वडिलांकडून माफी मागितली पाहिजे व आपण सुद्धा दुसऱ्यांना माफ केले पाहिजे. कारण, आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. उपवासकाळ हा प्रभू येशूच्या दु:खसहनावर मनन चिंतन करण्याचा तसेच आपण आपल्या पापांबद्दल व वाईट कृत्याबद्दल प्रायश्चित करण्याचा असतो व देवाच्या आशिर्वादाने पापमुक्त होण्याचा काळ आहे. आजची वाचनेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा संदेश देत आहेत. पहिल्या वाचनात देवाने जलप्रलयापासून नोहाचे व त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण केले व मेघात दिसणारा धनुष्याद्वारे एक करार केला. दुसऱ्या वाचनात पेत्र सांगतो की, आपण सर्वानी ख्रिस्ताला प्रभू मानून त्याला आपल्या अंत:करणात पवित्र मनाने व शुद्ध मनाने देवाची आज्ञा पाळावी आणि देवाशी एकनिष्ठ राहावे. तसेच, शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की, “पश्चाताप करून देवाच्या वचनावर विश्वास ठेवा”.
ह्याद्वारे ख्रिस्त आपल्याला सांगतो की जो पाप करून पश्चाताप करत नाही तो दु:खी होतो, तो सर्वांना दु:खी बनवतो, आई-वडिलांना दु:खी करतो आणि देवालाही दु:खी करतो. तसेच जो पाप करीत नाही व जो पश्चाताप करून देवावर विश्वास ठेवतो तो आनंदी असतो. तो सर्व संतासारखा व पवित्र मरीयेप्रमाणे पवित्र व आनंदी राहतो. त्याला देवाचा व स्वर्गाचा अनुभव येतो. सर्वांना तो आवडतो. पापापासून दूर राहण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. चांगली संगत धरली पाहिजे. नेहमी चांगले छंद लावून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मोहावर विजय प्राप्त करू. येशू खुप दयाळू आहे. तो आपल्या पापांची क्षमा करतो. त्याच्याकडे चूक कबुल करून व माफी मागून आपणांस पुन्हा चांगले बनता येते. मरिया माग्दालेना पापी होती. तिने क्षमा मागितली. येशूने तिला क्षमा केली. ती येशूची अनुयायी बनली आणि ती संत बनली. जक्क्यने पुष्कळ लोकांना लुबाडले होते. तो खूप पापी होता. एक दिवस येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढला. येशूने त्याला खाली बोलाविले व त्याच्या घरी गेला व जेवला. त्याने पाप सोडून दिले. त्याने पश्चाताप केला. देवाने त्याला क्षमा केली आणि पुन्हा तो चांगला बनला. पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले. तो येशूचा शिष्य होता. तो येशूविषयी खोटे बोलला. तो दु:खी झाला. तो जाऊन आणि त्याने पश्चाताप केला. येशूने त्याला क्षमा केली. परंतु जुदास मोहात पडला. त्याने येशूचा म्हणजेच त्याच्या गुरूचा विश्वासघात केला. पैसे घेऊन त्याने येशूला विकले व शत्रूच्या हाती दिले. त्याने नंतर देवाकडे क्षमा मागितली नाही. तो दु:खी झाला व त्याने गळफास घेतला व मरण पावला. आपल्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडत असतात. पण आपण आपल्या वाईट कृत्याकरीता क्षमा मागतो का? आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या जीवनातील घटनांची आठवण करूया व नम्रपणे प्रायश्चित करून येशूच्या जवळ येण्यासाठी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू, आमचे अंतःकरण शुद्द कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरु व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी देवाच्या पश्चातापाचे वचन व प्रेम दुसऱ्यापर्यंत प्रसारीत करण्यासाठी देवाने त्यांना सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतःकरणे उघडून देवाच्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवावा व त्यांच्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, अशा लोकांनी पश्चाताप करून, देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. शाळेत व कॉलेजात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Sunday, 11 February 2018

Reflection for the Homily of Ash Wednesday (14/02/2018) By Br. Cedrik Dapki



राखेचा बुधवार


दिनांक: १४/२/२०१८
पहिले वाचन: योएल २:१२-१८
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२ 
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८







“मानवा, तू माती आहेस व शेवटी मातीला मिळशील”.


प्रस्तावना:

         आज आपण ‘राखेचा बुधवार’ साजरा करीत आहोत. तसेच ‘प्रायश्चित्त काळात’ पदार्पण करीत आहोत. प्रायश्चित्त काळामध्ये पवित्र ख्रिस्तसभा आपणास विविध प्रकारे उपवास करण्यास, जास्त वेळ प्रार्थनेत घालवण्यास, तसेच गरजू लोकांना मद्दत करण्यास प्रोत्साहन करीत आहे. 
     आजची उपासना आपणास आपल्या पापाबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित्त करून देवा बरोबर समेट घडवून आणण्यास आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात योएल संदेष्टा आपणास प्रायश्चित्त, उपोषण व शोक करून देवाकडे वळण्यास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास उद्देशून सांगत आहे की देवाचे कार्य करीत असताना जो आशिर्वाद तुम्हाला भेटतो तो व्यर्थ घालवू नका. कारण जगाच्या तारणाची वेळ जवळ आली आहे आणि हीच वेळ आपणास पापांपासून मुक्त करणार. तसेच मत्तयलिखित शुभवर्तमानात योग्य पश्चातापासाठी लागणारा दानधर्म, उपवास व प्रार्थना कशी करावी ह्याचे वर्णन केले आहे.                                                            प्रायश्चित्त काळ हा आपल्याला देवाने त्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी दिला आहे. म्हणून ह्या काळाची सुरुवात उत्तम प्रकारे सुरु करण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद प्रभू परमेश्वराकडे मागुया. 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: योएल २:१२-१८

            योएल संदेष्टा सांगतो की आपण पश्चातापी मनाने परमेश्वराकडे जाण्याची गरज आहे. कारण परमेश्वर दयाळू आहे व तो आपल्या पापांची क्षमा करणारा आहे. पश्चाताप करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: १) उपवास २) शोक ३) रडणे इत्यादी. ह्या सर्व गोष्टी आपणास आपल्या पापांची आठवण करून देतात. कपडे फाडणे, अंगाला राख लावणे ह्या सर्व गोष्टी पश्चातापाचे प्रतिक असले तरी ते फक्त बाह्य रूप आहे. म्हणून योएल संदेष्टा सांगत आहे की अशा बाह्य गोष्टी परमेश्वरास समाधानकारक ठरत नाहीत. तर आपल्या अंत:करणाने व हृदयाने केलेली तयारी समाधानकारक ठरते. कारण खरी पश्चातापी इच्छा (आस्था) ही हृदयातून येते.
     योएल संदेष्टा हा सियोनांत कर्ण वाजवण्यास सांगत आहे. हा कर्ण बहुतंशा जुबली किंवा सणानिर्मित वाजवला जात असे. परंतु ह्या कर्णाचा खरा अर्थ हा देवाच्या आगमनाचा आहे (निर्गम १९:१६,१९, २०:१८) म्हणून योएल हा कर्णाच्या आवाजाद्वारे देवाच्या जवळ येण्याची कल्पना मांडत आहे. कारण देवाचा काळ जवळ आला आहे म्हणून तो सर्वांना उपवास व शोक करून देवाची करुणा व प्रेम अनुभवण्यासाठी बोलावत आहे.

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२ 

     संत पौल करिंथकरांस पश्चाताप करून देवाकडे वळण्यास सांगत आहे कारण येशू ख्रिस्त ज्याला पाप ठाऊक नव्हते  त्याने आपल्या करिता पाप असे केले; जेणेकरून आपण त्याच्या समोर पवित्र होऊ. म्हणून संत पौल आपणा सर्वास आपल्या पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येण्यास सांगत आहे. तो आपणास आशीर्वाद देतो परंतु तो व्यर्थ जाईल असे करु नका. जर देवाचा आशीर्वाद तुम्हास हवा असेल तर तुमची हृदये व मने स्वच्छ व देवासाठी आतुर ठेवा म्हणजेच त्याचा आशिर्वाद तुमच्यावर येईल.

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८

     शुभवर्तमानात येशू आपणास दान, धर्म व उपवास अशा ह्या तीन गोष्टी ज्या यहुदी परंपरेने केल्या जातात तशाच करावयास सांगत आहे. परंतु ह्या गोष्टी जसे शास्त्री व परुशी करतात तसे नाही कारण त्यांचे हे वागणे ढोंग्याचे स्वरूप आहे. जर तुम्हास दान, धर्म व उपवास करावयाचा असेल तर योग्य रीतीने करा. दुसरे तुम्हाला बघून तुमची वाहवा (स्तुती) किंवा प्रशंसा करतील असे वागु नका कारण लोकांची प्रशंसा तुम्हास स्वर्ग राज्यात घेऊन जाणार नाही कारण ती प्रशंसा फक्त तात्पुरतीच असते. जर तुम्हांस सार्वकालिक सुख हवं असेल तर येशूख्रिस्त आपणास काय सांगत आहे ह्याच्याकडे तुमचे जास्त लक्ष असू द्या.
     जेव्हा तुम्ही दान, धर्म करणार तेव्हा तुमचे हे कृत्य दुसऱ्यांना कळता कामा नये.  फक्त तुमच्या स्वर्गीय पित्याला जो स्वर्गातून तुम्हाला तुमचा वाटा देईल त्यालाच समजले पाहिजे. तसेच जेव्हा प्रार्थना करणार किंवा उपवास करणार तेव्हा ही तुमची हीच स्थिती राहिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा सार्वकाळीक आशिर्वाद मिळेल.
      आज आपण प्रायश्चित्त काळात आहोत. हा काळ आपल्याला देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. ह्या प्रायश्चित्त काळाचे महत्त्व म्हणजे फक्त उपवास करणे, दान, धर्म करणे किंवा काही वाईट गोष्टीपासून जसे दारू, सिगारेट ह्या पासून दूर राहणे एवढेच नव्हे तर दुसऱ्यांना क्षमा करणे, दुसऱ्यांना समजून कसे घ्यावे हे शिकवते. हा काळ आपणास देव किती दयाळू व क्षमाशील व प्रेमळ आहे हे सांगते. शत्रूवर प्रेम करा, वाईट करणाऱ्यांचे बरे करा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही आपल्या प्रेमळ येशूची शिकवण आहे आणि आपण त्याच्या शिकवणीनुसार वागलो पाहिजे.

बोधकथा:

     आपणा सर्वांना धन्यवादीत राणी मरिया हिची जीवनकथा परिचयाची आहे. तीचे खरे नाव मरियम वाट्टालील आहे. व तीचा जन्म केरला ह्या राज्यात झाला. धर्मभगिनी झाल्यानंतर तीचे कार्य इंडोर प्रांताच्या गरीब लोकांत झाले. ती एक धाडसी समाज सेवक होती. ती लोकांना न्याय मिळवण्यासाठी धडपड करत होती. गरीब लोक ज्यांना राहण्यासाठी जागा नव्हती त्यांच्यासाठी ती लढत होती. परंतु हे कार्य जमीनदारांस पटले नाही म्हणून तीची हत्या करण्याचे त्यांनी ठरविले.
     २५ फेब्रुवारी १९९५ साली जेव्हा ती बसमध्ये प्रवास करीत होती तेव्हा समंदर सिह ह्या व्यक्तीने ४० वेळा चाकू चालवून तीची हत्या केली. त्या खुनी व्यक्तीस तुरुंगात टाकले गेले. परंतु काही वर्षांनी धर्मभगिनी राणी मरीयाची आई व बहिण तुरुंगात येऊन त्यास क्षमा करून त्याची सुटका केली. अशा ह्या वागणुकीने समंदर सिह ह्यास रडू आले. त्याने राणी मरियाच्या आईकडे क्षमा मागितली व जीवनात काहीतरी चांगले करण्याचे ठरविले. आज आपणास देऊळमाता ह्या प्रायश्चित्त काळात क्षमा मागण्यास व क्षमा करण्यास शिकवत आहे.

मनन चिंतन:

आज आपण आपल्या कपाळावर राख लावणार आहोत. ही राख कशाचे प्रतिक आहे? आपण ही राख कपाळावर का लावतो? असे अनेक प्रश्न आपणास भेडसावत असतील. राख लावणे ही आधुनिक परंपरा आहे जी जुन्या करारापासून चालली आहे. राख म्हणजे धूळ किंवा माती जी आपण आपल्या कपाळावर लावतो तेव्हा ती आपणास असे दर्शवून सांगते की, “माणसा तु मातीचा बनला आहेस व शेवटी मातीतच जाशील” (२ तीतास २:११) म्हणून तुझ्या ह्या शरीराला जास्त महत्व देऊ नकोस तर आत्म्याला दे कारण आत्मा अमर आहे व शेवटी तो आत्मा देवराज्यात प्रवेश करतो.
जुन्या करारात राख ही पश्चातापाचे प्रतीक म्हणून संबोधले जात असे. अंगाला राख फासून लोक पश्चाताप करीत असत, तशी उदाहरणे आपणासमोर आहेत. इयोब म्हणतो ‘म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत आहे’ (इयोब ४२:६). तसेच दानीएल म्हणतो, ‘हे जाणून मी आपले मुख प्रभूकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली’ (दानीएल ९:३). नव्या करारात येशू म्हणतो, ‘खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राख अंगावर घेवून पश्चाताप केला असता” (मत्तय ११:२१). म्हणून आपण पश्चातापाचे प्रतिक म्हणून ही राख आपल्या कपाळावर फासतो.
     जुन्याकरारात काही वाईट घडल्या नंतर त्या घटनेतून मुक्त होण्यासाठी किंवा वाईट कृत्य केल्यावर त्याच्या पासून क्षमा मागण्यासाठी राख वापरली जात असे म्हणजेच पश्चातापाची इच्छा आपणात जागृत झाली आहे असे संबोधते. परंतू आज ख्रिस्ती ह्या नात्याने ही राख खूप महत्वाची मानली जाते. जरी आपण ही राख खूप महत्वाची मानली जाते. जरी आपण ही राख आज आपल्या मरणाचे प्रतिक म्हणून लावली असली तरी ती राख आपणास येशू बरोबर पुन्हा उठण्याचा विश्वास करून देते. म्हणून आज आपण ही राख लावून स्वयसेवी निश्चयाने व स्व:इच्छेने येशूबरोबर चालून त्याच्या दु:ख सहनात सहभागी होणार आहोत. जेणेकरून आपणास पुनरुत्थानाचा आनंद उपभोगावयास मिळेल. व त्याच्या समवेत राहावयास मिळेल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला क्षमा करावयास शिकव.


१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मबंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्याठी जी जबाबदारी सोपविली आहे ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जी लोक देऊळमातेपासून दुरावलेली आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेली आहेत अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे व तसेच अशा लोकांना त्यांच्या अपराधांची जाणीव होवून त्यांची क्षमा व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. उत्तम ख्रिस्ती ह्या नात्याने आपणास एकमेकांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार करण्यास प्रभूकडून शक्ती व कृपा मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ह्या प्रायश्चित काळात सर्वानी उपवास, प्रार्थना व दानधर्म करून देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी उत्तम अशी तयारी करावी व सार्वकाळीक जीवन उपभोगण्यास मदत मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. जी लोक बेरोगगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या आशीर्वादाने चांगली नोकरी मिळावी व त्यांचे जीवन सुखा समाधानात जावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.   

Wednesday, 7 February 2018

Reflection for the Homily of 6th Sunday in Ordinary Time (11-02-18) By Br. Minin Wadkar. 


सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक: ११-०२-२०१८
पहिले वाचन: लेवीय १३:१-२४५-४६
दुसरे वाचन: १ करिंथ १०:३१११:१
शुभवर्तमान: मार्क १:४०४५



‘आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.’







प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य देऊन विश्वासात दृढ होण्यास सांगत आहे.
     पहिले वाचन लेवीय ह्या पुस्तकातून घेण्यात आले असून हे पुस्तक कुष्ठरोग्याला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल सांगते कारण त्या काळामध्ये कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ‘मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.’ संत मार्कलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशु कुष्ठरोग्याला बरे करून त्याचा विश्वास दृढ करतो. कुष्ठरोगी येशूला म्हणतो, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे.’ यावरून कुष्ठरोग्याने देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले आहे हे आपल्या नजरेस येते.
     देव आपला तारणहार आहे. आपल्या सर्व गरजा, इच्छा व आकांक्षा देवाला माहित आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून नम्र हृदयाने प्रभूचरणी याचना करूया.  

सम्यक विवरण:     
                            
पहिले वाचन : लेवीय १३:१-२, ४५-४६.

     लेवीय हे पुस्तक प्रार्थनेचे नियम, याजकगण, जबाबदारी व हक्क, जेवणाचे नियम, अशुद्धता व पवित्रता इत्यादी बाबींचा उल्लेख करते. तसेच, शारीरिक रोगाबद्दलसुद्धा हे पुस्तक नियम देते. शारीरिक रोगामध्ये कुष्ठरोग हा महारोग होता. कुष्टरोग्यांच्या तपासणीचे काम व जबाबदारी याजकांकडे होती. कुष्ठरोग इतरांना होऊ नये म्हणून याजक रुग्णाच्या तपासणीनंतर त्याला छावणीच्या किंवा गावाच्या बाहेर पाठवत असत. कुष्ठरोग, तसेच शरिरावरील सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असलेले सर्व लोकांना प्रार्थनेत सहभाग घेता येत नसे. जो पर्यत ते पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्यांना गावाबाहेर राहावे लागत असे. तसेच फाटके कपडे परिधान करावी लागत असे. त्याच बरोबर त्यांना तोंड झाकून ठेवावे लागत असे. अध्याय १३ या मध्ये इतर त्वचा रोग नमूद करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ: शरिरावरील सूज, खवंद अथवा तकतकीत डाग इत्यादी.

दुसरे वाचन: १ करिंथ १०:३१-११:१

संत पौल करिंथकरास ख्रिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून देत आहे. तो म्हणतो तुमचे खाणे, पिणे किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी असले पाहिजे. तुमचे जीवन हेल्लेणी यहुदी व देवाची मंडळी ह्यांच्या जीवनाला अडथळा होता कामा नये (१०:३१-३३). तर आपण आपल्या कार्याद्वारे प्रभूचा गौरव तसेच आपल्या शेजाऱ्यांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या कार्याने दुसऱ्यांना त्रास होता कामा नये.  संत पौलाने (११:१) मध्ये म्हणतो की, जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझं अनुकरण करा.पौलाने फक्त लोकांना सूचना दिली नाही तर त्याने स्वत:च्या जीवनाद्वारे व राहणीमानाद्वारे लोकांना येशूचे अनुकरण करा असा सल्ला दिला. या संदेशावरून आपल्याला समजते की संत पौल हा येशूच्या नावाने झपाटलेला होता. त्याने सदैव येशूची स्तुती व आराधना केली.

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५

      येशूने सुरुवातीलाच म्हणजेच मिशन कार्याच्या प्रारंभीस गालील येथे पिडीत लोकांना रोगमुक्त केले होते. तसेच, ज्यांचे जीवन वाईट / दृष्ट आत्म्याने भरले होते त्यांना देखील येशूने आपल्या स्पर्शाने बरे केले (मार्क १:२१-३४). दुसऱ्या दिवशी येशूने कुष्ठरोग्याला बरे केले, ह्याचे स्पष्टीकरण शुभवर्तमानकार (evangelist) मार्क सविस्तरपणे वरील उताऱ्यात देतो.
    कुष्ठरोगाविषयी लेवीय पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, संत मार्क देखील कुष्ठरोगाविषयी आपल्याला सांगत आहे. त्याकाळी कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. ह्या काळामध्ये जी लोक ह्या भयग्रस्त आजाराने पिडीत होती त्या लोकांना विशेष अशी वागणूक दिली जात असे. वागणुकीबद्दल आपण लेवीय पुस्तकात पाहतो.
     येशू आपल्या तारणासाठी ह्या भूतलावर आला आहे. म्हणून तो कुष्ठरोग पिडीत व्यक्तीला समाजाच्या कठोर नियमातून मोकळे करून स्वर्गाची वाट दाखवतो; म्हणजेच त्याला रोगमुक्त करून समाजाचा अविभाज्य घटक बनवतो. कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा. येशू त्याला म्हणाला, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच कुष्ठरोगी बरा झाला. येशूने त्याला याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर म्हणून सांगितले. पण त्याने येशूचे ऐकले नाही तर आपण बरे झालो आहोत ह्याची साक्ष तो सर्वांना देत राहिला. ह्या कारणास्तव येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरीदेखील लोक रोगमुक्त होण्यासाठी मोठ्या संख्येने येशुकडे आले.    

बोधकथा:

     संत फ्रान्सिस ह्याच्या जीवनातील एक सुंदर कथा आहे. हि कथा फ्रान्सिस व कुष्ठरोग ह्यांच्यात रमलेली आहे. असिसी गावात कुष्ठरोग्यांची वस्ती होती. त्या गावात कुष्ठरोग हा महारोग होता. म्हणून इतर लोकांवर ह्या रोगाचा प्रभाव पडू नये म्हणून सर्व कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. फ्रान्सिसला सुद्धा त्यांचा किळस वाटत असे. त्यांना बघितल्यावर तो आपले नाक बंद करून जात असे. एके दिवशी तो घोड्यावर बसून जात असता एक महारोगी त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहताक्षणी तो परत फिरणार होता, पण... तसे न करता तो घोड्यावरून खाली उतरला. त्या महारोग्याला भिक्षा घातली व त्याच्या सडक्या हाताचे चुंबन सुद्धा घेतले. परत जाताना जेव्हा फ्रान्सिसने मागे वळून पाहिले तर त्याला कुष्ठरोगी दिसला नाही. तो येशू ख्रिस्त होता हे त्याच्या नंतर लक्षात आले. ह्या धाडसी कृत्याने फ्रान्सिसचे जीवन बदलले. त्याचा देवावरील विश्वास वाढला. दुसऱ्याच दिवशी त्याने एका महारोग्यांच्या दवाखान्यात भेट दिली. तेथील सर्व महारोग्यांनवर दानधर्म, त्यांची विचारपूस केली आणि प्रेमाने आणि सहानुभूतीने त्यांची सेवा केली.
     ह्या परिवर्तनाचे कारण फक्त देवच आहे. फ्रान्सिस म्हणतो, ‘देवाने मला त्यांच्याकडे ओढीले आणि मला त्यांच्यावर दया करण्यास भाग पाडले. आणि जे मला कडू वाटलं ते मला देवाच्या सामर्थ्याने गोडं वाटू लागलं’. ह्याचा अर्थ: ज्या महारोग्यांचा त्याला किळस वाटत होता आता त्याला त्यांना भेटायचे होते. फ्रान्सिसने देवाच्या इच्छेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन गरजवंतांना समर्पित केले. देवाच्या इच्छेनुसार त्याने सर्व लोकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले.  

मनन चिंतन:

     आजच्या गतशील युगात किंवा आधुनिक जगात बहुतेक युवक-युवती नवीन मोबाईल्स (recent mobiles) वापरतात. मोबाईल्स मध्ये असलेले मेमरी कार्ड रिकामी असे सांगणारे क्वचितच आपल्या नजरेस येतात. मेमरी कार्ड संपूर्ण भरलेले असते. दोन जीबीचं (2 GB) मेमरी कार्ड वापरलं तर फक्त दोनच जीबीच मिळते. आपण त्यात गाणी, व्हिडीओ आणि फोटो भरून ठेवतो. आणि आमचे मित्र येऊन त्यांचे नवीन मोबाईल्स दाखवतात. नवीन मोबाईल्स बघितल्यावर आपण त्यातील चित्रपट (मुव्ही) बघण्यात दंग होतो. त्यातील एक चित्रपट (मुव्ही) आपल्याला आवडतो. आपण त्याला सांगतो मला तो चित्रपट (मुव्ही) दे ना. तो चित्रपट (मुव्ही) देण्यास नकार देत नाही. तुझं ब्लूटूथ ओपन कर म्हणून सांगतो. तो ब्लूटूथ ओपन करतो. ‘picture sending’, लगेच ह्याला मेसेज येतो, ‘Not enough memory, delete some application’. ह्या चित्रपटासाठी (मुव्हीसाठी) तुझ्याकडे पुरेशी मेमरी नाही. थोड काढून टाक. ह्या मुव्हीसाठी तो नको असलेले फोटोस आणि गाणी काढून टाकतो. आणि म्हणतो आता मला मुव्ही पाठव.
     आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अंत:करणातून नको त्या गोष्टीला डिलीट (delete) मारून परमेश्वराच्या कृपेसाठी आपण जागा रिक्त ठेवली पाहिजे. देवाने आम्हामध्ये वास करण्यासाठी आम्हाला आमच्या हृदयाची दारे उघडण्याची गरज आहे. देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही स्वत:च्या योजना काढून टाकल्या पाहिजेत. आपल्या इच्छेला प्रथम प्राधान्य न देता देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा आपण असे करणार तेव्हा परमेश्वर देव आम्हामध्ये राहील. मरीयेने स्वत:ला रिक्त करून देवाचा शब्द पाळला. ह्याचे पारितोषिक म्हणून देवाने तिला शेवटी देवाची माता म्हणून घोषित केले. जेव्हा येशूने जक्क्यला भेट दिली तेव्हा येशूने त्याला म्हटले आज तुझ्या घरास तारण प्राप्त झाले आहे. देवाच्या तारणाचा स्पर्श होताच, जक्क्यने स्वत:ला रिक्त करून गरिबांना आपली धन-दौलत वाटली (लूक १९:१-१०). खरोखर देवाच्या स्पर्शाने आश्चर्यकारिक जीवनाचा लाभ होतो. जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होते. यिर्मया ह्या पुस्तकात आपण वाचतो, ‘परमेश्वर म्हणतो, तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांस पावेन’ (यिर्मया २९:११).  
     आजच्या उपासनेचा विषय आहे: ‘देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन जीवन विश्वासाच्या आधारस्तंभावर बांधूया’. कुष्ठरोग हा जुन्या करारात आणि आता देखील एक भयानक आजार मानला जातो. आपण लेवीय पुस्तकात पाहतो की जी व्यक्ती कुष्ठरोग्याने पिडीत आहे त्या व्यक्तीला वेगळ्याप्रकारची वागणूक देण्यात येत असे. त्याला विशिष्ट प्रकारचे कपडे घालून समाजाच्या बाहेर ठेवेले जात असे व कोणत्याही धार्मिक विधीसाठी सहभाग दिला जात नसे. परंतु, येशूच्या जीवनात ह्या घटनेला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजच्या शुभवर्तमानात कुष्ठरोगी येशूला म्हणतो आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा (मार्क १:४०). येशूला त्याचा कळवला आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच, कुष्टरोगी बरा झाला. येशूने त्याला कोणालाही सांगू नये ह्याची ताकीद दिली. परंतु बरा झालेल्या कुष्ठरोग्याने येशूच्या चमत्काराची घोषणा सर्वत्र पसरवली.
     प्रार्थनेचे फळ मोठे असते. प्रार्थनेने विश्वासाला अंकुर फुटतो. तत्वज्ञानी सोरेन केकेकार्ड म्हणतो, प्रार्थना देवाला बदलत नाही तर प्रार्थना करणाऱ्याला बदलते. कुष्ठरोग्याने येशूकडे विश्वासाने भरलेली प्रार्थना केली. त्याने स्वत:ची इच्छा अमलात आणली नाही तर येशूच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून येशूकडे विनंती केली. त्याने स्वत:ला देवाच्या हाती स्वाधीन केले. देवाच्या आश्रयाखाली त्याने स्वत:ला झोकून दिले. म्हणून त्याने केलेली प्रार्थना स्वत:च्या हितासाठी ठरली. त्याने स्वत:ला रिक्त करून देवाच्या कृपेला आपल्या जीवनात स्थान दिले. ह्या मार्गाचा अवलंब करून कुष्ठरोग्याचे तारण झाले. माणूस जीवनात स्वत:ची इच्छा करून भरपूर गमावत असतो. स्वत:च्या इच्छेने माणूस स्वार्थी बनतो. स्वार्थी होऊन गरजेवून जास्त आपल्या पदरी येण्याची शक्यता असते. जर आपण देवाच्या इच्छेनुसार वागलो तर सर्वकाही साध्य होते. जीवनात आनंद, सुख व सौख्य लाभते. येशूची इच्छा स्वीकारून कुष्ठरोगी पूर्णतःहा बरा झाला. ह्यातच त्याच सार्थक झालं.      
     संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, आपले खाणे, पिणे व सर्व वागणूक ही देवाच्या गौरवासाठी असली पाहिजे. जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करा असे तो म्हणतो. लोकांच्या सेवेसाठी व देवाच्या सुवार्तेसाठी पौल सातत्याने झटत राहिला. त्याने सदैव देवाची इच्छा स्वीकारून स्वत:ला लोकांच्या सेवेसाठी वाहीले. म्हणून त्याचे जीवन ख्रिस्ती जीवनाला साजेसे आहे. ह्यात संकोच नाही.
     आज आपला समाज स्वार्थी वृत्तीने गुरफटून गेलेला आहे. स्वत:ची इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी एखादी व्यक्ती कोणतीही सीमा पार करायला मागे पाहत नाही. खुन करणे, खोटे बोलणे, सूड घेणे इत्यादी क्रूर भावनेचं दृश आपल्याला सभोवताली पहावयास मिळते. राजकारणात राजकीय नेते प्रजेची इच्छा अमलात न आणता आपली स्वत:ची इच्छा अमलात आणतात. ह्यामुळे वारंवार समाजात हिंसा, अत्याचार व वादविवाद आपल्याला पहावयास मिळतात. कौटुंबिक जीवनात देखील एखादी व्यक्ती बळजबरीने आपली हुकुमत गाजवत असेल तर घरातील शांती, एकोपा, प्रेम व क्षमा धुळीस जाते. ह्या सर्व कारणामुळे प्रेमाला व विश्वासाला तडा गेली आहे. जर ह्या विश्वासाची व प्रेमाची ज्योत पुन्हा पेटती ठेवायची असेल तर प्रत्येकाने स्वत:च्या स्वार्थी इच्छेला कमी प्राधान्य देण्याची गरज आहे. जेव्हा आपण आपली स्वार्थीवृत्ती बाजूला ठेवून दुसऱ्यांना जागा देतो तेव्हा आपल्या जीवनात आनंद व सुख येते. संकटाना सामोरे जाण्यास धैर्य लाभते.
     येशू ख्रिस्ताने जीवनभर त्याच्या पित्याची इच्छा परिपूर्ण केली. पित्याच्या इच्छेनुसार येशूने आपला प्राण मानवजातीच्या कल्याणासाठी व तारणासाठी अर्पिला. येशूने आम्हा सर्वाना ‘आमच्या स्वर्गीयबापा’ ही प्रार्थना शिकवली. ह्या प्रार्थनेत आपण म्हणतो, ‘जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’. स्वर्गीयबापाची इच्छा ही स्वार्थी नाही तर ती सलोख्याची व प्रेमाची आहे. स्वर्गीय पित्याच्या आज्ञेनुसार जर आपण वागलो तर आपले खरोखर कल्याण होईल; जीवनात चोहीकडे सुख, शांती व वैफल्य नांदत राहील. येशू म्हणतो, ‘अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन’ (मत्तय ११:२८). जीवनात जर खरोखर सुख मिळवायचे असेल तर आपण येशूकडे आलो पाहिजे. तोच आपला तारणहार आहे. त्याला आपल्या सर्व गरजा व उणीवा माहित आहे. जर आपण देवाकडे जाण्यासाठी एक पावूल उचललं तर देव शंभर पाऊले उचलून आपल्याकडे येतो. हे प्रभो आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा. देवाची इच्छा आपल्या ठायी व्हावी म्हणून आपण देवाकडे दयेची याचना करूया.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी आपल्या प्रेमळ सेवाकार्याद्वारे व सुवार्तेद्वारे सर्व ख्रिस्ती भाविकांना देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्वीकारता आपली इच्छा, योजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मी-पणा, अहंकार, नावलौकीक इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्वीकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.
३. आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे; म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.
४. ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे – विशेषकरून; आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचा, कृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.     

५. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.