राखेचा बुधवार
दिनांक: १४/२/२०१८
पहिले वाचन: योएल २:१२-१८
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८
“मानवा, तू माती आहेस व शेवटी मातीला
मिळशील”.
प्रस्तावना:
आज आपण ‘राखेचा बुधवार’ साजरा करीत आहोत. तसेच ‘प्रायश्चित्त काळात’ पदार्पण करीत आहोत. प्रायश्चित्त काळामध्ये पवित्र ख्रिस्तसभा आपणास विविध प्रकारे उपवास करण्यास, जास्त वेळ प्रार्थनेत घालवण्यास, तसेच गरजू लोकांना मद्दत करण्यास प्रोत्साहन करीत आहे.
आजची उपासना आपणास आपल्या पापाबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित्त करून देवा बरोबर समेट घडवून आणण्यास आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात योएल संदेष्टा आपणास प्रायश्चित्त, उपोषण व शोक करून देवाकडे वळण्यास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास उद्देशून सांगत आहे की देवाचे कार्य करीत असताना जो आशिर्वाद तुम्हाला भेटतो तो व्यर्थ घालवू नका. कारण जगाच्या तारणाची वेळ जवळ आली आहे आणि हीच वेळ आपणास पापांपासून मुक्त करणार. तसेच मत्तयलिखित शुभवर्तमानात योग्य पश्चातापासाठी लागणारा दानधर्म, उपवास व प्रार्थना कशी करावी ह्याचे वर्णन केले आहे. प्रायश्चित्त काळ हा आपल्याला देवाने त्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी दिला आहे. म्हणून ह्या काळाची सुरुवात उत्तम प्रकारे सुरु करण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद प्रभू परमेश्वराकडे मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: योएल २:१२-१८
योएल संदेष्टा सांगतो की आपण पश्चातापी मनाने
परमेश्वराकडे जाण्याची गरज आहे. कारण परमेश्वर दयाळू आहे व तो आपल्या पापांची
क्षमा करणारा आहे. पश्चाताप करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: १) उपवास २)
शोक ३) रडणे इत्यादी. ह्या सर्व गोष्टी आपणास आपल्या पापांची आठवण करून देतात.
कपडे फाडणे, अंगाला राख लावणे ह्या सर्व गोष्टी पश्चातापाचे प्रतिक असले तरी ते
फक्त बाह्य रूप आहे. म्हणून योएल संदेष्टा सांगत आहे की अशा बाह्य गोष्टी
परमेश्वरास समाधानकारक ठरत नाहीत. तर आपल्या अंत:करणाने व हृदयाने केलेली तयारी
समाधानकारक ठरते. कारण खरी पश्चातापी इच्छा (आस्था) ही हृदयातून येते.
योएल
संदेष्टा हा सियोनांत कर्ण वाजवण्यास सांगत आहे. हा कर्ण बहुतंशा जुबली किंवा सणानिर्मित
वाजवला जात असे. परंतु ह्या कर्णाचा खरा अर्थ हा देवाच्या आगमनाचा आहे (निर्गम
१९:१६,१९, २०:१८) म्हणून योएल हा कर्णाच्या आवाजाद्वारे देवाच्या जवळ येण्याची कल्पना
मांडत आहे. कारण देवाचा काळ जवळ आला आहे म्हणून तो सर्वांना उपवास व शोक करून
देवाची करुणा व प्रेम अनुभवण्यासाठी बोलावत आहे.
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२
संत पौल करिंथकरांस पश्चाताप करून देवाकडे
वळण्यास सांगत आहे कारण येशू ख्रिस्त ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने आपल्या
करिता पाप असे केले; जेणेकरून आपण त्याच्या समोर पवित्र होऊ. म्हणून संत पौल आपणा
सर्वास आपल्या पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येण्यास सांगत आहे. तो आपणास आशीर्वाद
देतो परंतु तो व्यर्थ जाईल असे करु नका. जर देवाचा आशीर्वाद तुम्हास हवा असेल तर
तुमची हृदये व मने स्वच्छ व देवासाठी आतुर ठेवा म्हणजेच त्याचा आशिर्वाद तुमच्यावर
येईल.
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८
शुभवर्तमानात येशू आपणास दान, धर्म व उपवास अशा
ह्या तीन गोष्टी ज्या यहुदी परंपरेने केल्या जातात तशाच करावयास सांगत आहे. परंतु
ह्या गोष्टी जसे शास्त्री व परुशी करतात तसे नाही कारण त्यांचे हे वागणे ढोंग्याचे
स्वरूप आहे. जर तुम्हास दान, धर्म व उपवास करावयाचा असेल तर योग्य रीतीने करा.
दुसरे तुम्हाला बघून तुमची वाहवा (स्तुती) किंवा प्रशंसा करतील असे वागु नका कारण
लोकांची प्रशंसा तुम्हास स्वर्ग राज्यात घेऊन जाणार नाही कारण ती प्रशंसा फक्त
तात्पुरतीच असते. जर तुम्हांस सार्वकालिक सुख हवं असेल तर येशूख्रिस्त आपणास काय
सांगत आहे ह्याच्याकडे तुमचे जास्त लक्ष असू द्या.
जेव्हा
तुम्ही दान, धर्म करणार तेव्हा तुमचे हे कृत्य दुसऱ्यांना कळता कामा नये. फक्त तुमच्या स्वर्गीय पित्याला जो स्वर्गातून तुम्हाला तुमचा वाटा देईल त्यालाच समजले पाहिजे. तसेच
जेव्हा प्रार्थना करणार किंवा उपवास करणार तेव्हा ही तुमची हीच स्थिती राहिली
पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा सार्वकाळीक आशिर्वाद मिळेल.
आज आपण प्रायश्चित्त काळात आहोत. हा काळ आपल्याला देवाच्या अधिक जवळ
जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. ह्या प्रायश्चित्त
काळाचे महत्त्व म्हणजे फक्त उपवास करणे, दान, धर्म करणे किंवा काही वाईट
गोष्टीपासून जसे दारू, सिगारेट ह्या पासून दूर राहणे एवढेच नव्हे तर दुसऱ्यांना
क्षमा करणे, दुसऱ्यांना समजून कसे घ्यावे हे शिकवते. हा काळ आपणास देव किती दयाळू
व क्षमाशील व प्रेमळ आहे हे सांगते. शत्रूवर प्रेम करा, वाईट करणाऱ्यांचे बरे करा व
त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही आपल्या प्रेमळ येशूची शिकवण आहे आणि आपण त्याच्या
शिकवणीनुसार वागलो पाहिजे.
बोधकथा:
आपणा सर्वांना धन्यवादीत राणी मरिया हिची जीवनकथा
परिचयाची आहे. तीचे खरे नाव मरियम वाट्टालील आहे. व तीचा जन्म केरला ह्या राज्यात
झाला. धर्मभगिनी झाल्यानंतर तीचे कार्य इंडोर प्रांताच्या गरीब लोकांत झाले. ती एक
धाडसी समाज सेवक होती. ती लोकांना न्याय मिळवण्यासाठी धडपड करत होती. गरीब लोक
ज्यांना राहण्यासाठी जागा नव्हती त्यांच्यासाठी ती लढत होती. परंतु हे कार्य
जमीनदारांस पटले नाही म्हणून तीची हत्या करण्याचे त्यांनी ठरविले.
२५
फेब्रुवारी १९९५ साली जेव्हा ती बसमध्ये प्रवास करीत होती तेव्हा समंदर सिह ह्या
व्यक्तीने ४० वेळा चाकू चालवून तीची हत्या केली. त्या खुनी व्यक्तीस तुरुंगात
टाकले गेले. परंतु काही वर्षांनी धर्मभगिनी राणी मरीयाची आई व बहिण तुरुंगात येऊन
त्यास क्षमा करून त्याची सुटका केली. अशा ह्या वागणुकीने समंदर सिह ह्यास रडू आले.
त्याने राणी मरियाच्या आईकडे क्षमा मागितली व जीवनात काहीतरी चांगले करण्याचे ठरविले.
आज आपणास देऊळमाता ह्या प्रायश्चित्त काळात क्षमा मागण्यास व क्षमा करण्यास शिकवत
आहे.
मनन चिंतन:
आज आपण आपल्या कपाळावर राख लावणार आहोत. ही राख
कशाचे प्रतिक आहे? आपण ही राख कपाळावर का लावतो? असे अनेक प्रश्न आपणास भेडसावत
असतील. राख लावणे ही आधुनिक परंपरा आहे जी जुन्या करारापासून चालली आहे. राख
म्हणजे धूळ किंवा माती जी आपण आपल्या कपाळावर लावतो तेव्हा ती आपणास असे दर्शवून
सांगते की, “माणसा तु मातीचा बनला आहेस व शेवटी मातीतच जाशील” (२ तीतास २:११)
म्हणून तुझ्या ह्या शरीराला जास्त महत्व देऊ नकोस तर आत्म्याला दे कारण आत्मा अमर
आहे व शेवटी तो आत्मा देवराज्यात प्रवेश करतो.
जुन्या करारात राख ही पश्चातापाचे प्रतीक
म्हणून संबोधले जात असे. अंगाला राख फासून लोक पश्चाताप करीत असत, तशी उदाहरणे
आपणासमोर आहेत. इयोब म्हणतो ‘म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत
आहे’ (इयोब ४२:६). तसेच दानीएल म्हणतो, ‘हे जाणून मी आपले मुख प्रभूकडे लावून
प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली’
(दानीएल ९:३). नव्या करारात येशू म्हणतो, ‘खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे
बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली
ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच
गोणताट व राख अंगावर घेवून पश्चाताप केला असता” (मत्तय ११:२१). म्हणून आपण
पश्चातापाचे प्रतिक म्हणून ही राख आपल्या कपाळावर फासतो.
जुन्याकरारात काही वाईट घडल्या नंतर त्या
घटनेतून मुक्त होण्यासाठी किंवा वाईट कृत्य केल्यावर त्याच्या पासून क्षमा मागण्यासाठी
राख वापरली जात असे म्हणजेच पश्चातापाची इच्छा आपणात जागृत झाली आहे असे संबोधते.
परंतू आज ख्रिस्ती ह्या नात्याने ही राख खूप महत्वाची मानली जाते. जरी आपण ही राख
खूप महत्वाची मानली जाते. जरी आपण ही राख आज आपल्या मरणाचे प्रतिक म्हणून लावली असली
तरी ती राख आपणास येशू बरोबर पुन्हा उठण्याचा विश्वास करून देते. म्हणून आज आपण ही
राख लावून स्वयसेवी निश्चयाने व स्व:इच्छेने येशूबरोबर चालून त्याच्या दु:ख सहनात
सहभागी होणार आहोत. जेणेकरून आपणास पुनरुत्थानाचा आनंद उपभोगावयास मिळेल. व
त्याच्या समवेत राहावयास मिळेल.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू
आम्हाला क्षमा करावयास शिकव.
१. ख्रिस्तसभेची
धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मबंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त
सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्याठी जी जबाबदारी सोपविली आहे ती त्यांनी पवित्र
आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जी लोक
देऊळमातेपासून दुरावलेली आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेली आहेत अशा लोकांना
प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे व तसेच
अशा लोकांना त्यांच्या अपराधांची जाणीव होवून त्यांची क्षमा व्हावी म्हणून
प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. उत्तम ख्रिस्ती
ह्या नात्याने आपणास एकमेकांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार
करण्यास प्रभूकडून शक्ती व कृपा मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ह्या प्रायश्चित काळात
सर्वानी उपवास, प्रार्थना व दानधर्म करून देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी उत्तम अशी
तयारी करावी व सार्वकाळीक जीवन उपभोगण्यास मदत मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना
करूया.
५. जी लोक बेरोगगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या आशीर्वादाने चांगली नोकरी
मिळावी व त्यांचे जीवन सुखा समाधानात जावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment