Wednesday 7 February 2018

Reflection for the Homily of 6th Sunday in Ordinary Time (11-02-18) By Br. Minin Wadkar. 


सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक: ११-०२-२०१८
पहिले वाचन: लेवीय १३:१-२४५-४६
दुसरे वाचन: १ करिंथ १०:३१११:१
शुभवर्तमान: मार्क १:४०४५



‘आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.’







प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य देऊन विश्वासात दृढ होण्यास सांगत आहे.
     पहिले वाचन लेवीय ह्या पुस्तकातून घेण्यात आले असून हे पुस्तक कुष्ठरोग्याला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल सांगते कारण त्या काळामध्ये कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ‘मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.’ संत मार्कलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशु कुष्ठरोग्याला बरे करून त्याचा विश्वास दृढ करतो. कुष्ठरोगी येशूला म्हणतो, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे.’ यावरून कुष्ठरोग्याने देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले आहे हे आपल्या नजरेस येते.
     देव आपला तारणहार आहे. आपल्या सर्व गरजा, इच्छा व आकांक्षा देवाला माहित आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून नम्र हृदयाने प्रभूचरणी याचना करूया.  

सम्यक विवरण:     
                            
पहिले वाचन : लेवीय १३:१-२, ४५-४६.

     लेवीय हे पुस्तक प्रार्थनेचे नियम, याजकगण, जबाबदारी व हक्क, जेवणाचे नियम, अशुद्धता व पवित्रता इत्यादी बाबींचा उल्लेख करते. तसेच, शारीरिक रोगाबद्दलसुद्धा हे पुस्तक नियम देते. शारीरिक रोगामध्ये कुष्ठरोग हा महारोग होता. कुष्टरोग्यांच्या तपासणीचे काम व जबाबदारी याजकांकडे होती. कुष्ठरोग इतरांना होऊ नये म्हणून याजक रुग्णाच्या तपासणीनंतर त्याला छावणीच्या किंवा गावाच्या बाहेर पाठवत असत. कुष्ठरोग, तसेच शरिरावरील सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असलेले सर्व लोकांना प्रार्थनेत सहभाग घेता येत नसे. जो पर्यत ते पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत त्यांना गावाबाहेर राहावे लागत असे. तसेच फाटके कपडे परिधान करावी लागत असे. त्याच बरोबर त्यांना तोंड झाकून ठेवावे लागत असे. अध्याय १३ या मध्ये इतर त्वचा रोग नमूद करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ: शरिरावरील सूज, खवंद अथवा तकतकीत डाग इत्यादी.

दुसरे वाचन: १ करिंथ १०:३१-११:१

संत पौल करिंथकरास ख्रिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून देत आहे. तो म्हणतो तुमचे खाणे, पिणे किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी असले पाहिजे. तुमचे जीवन हेल्लेणी यहुदी व देवाची मंडळी ह्यांच्या जीवनाला अडथळा होता कामा नये (१०:३१-३३). तर आपण आपल्या कार्याद्वारे प्रभूचा गौरव तसेच आपल्या शेजाऱ्यांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणूनच आपल्या कार्याने दुसऱ्यांना त्रास होता कामा नये.  संत पौलाने (११:१) मध्ये म्हणतो की, जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझं अनुकरण करा.पौलाने फक्त लोकांना सूचना दिली नाही तर त्याने स्वत:च्या जीवनाद्वारे व राहणीमानाद्वारे लोकांना येशूचे अनुकरण करा असा सल्ला दिला. या संदेशावरून आपल्याला समजते की संत पौल हा येशूच्या नावाने झपाटलेला होता. त्याने सदैव येशूची स्तुती व आराधना केली.

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५

      येशूने सुरुवातीलाच म्हणजेच मिशन कार्याच्या प्रारंभीस गालील येथे पिडीत लोकांना रोगमुक्त केले होते. तसेच, ज्यांचे जीवन वाईट / दृष्ट आत्म्याने भरले होते त्यांना देखील येशूने आपल्या स्पर्शाने बरे केले (मार्क १:२१-३४). दुसऱ्या दिवशी येशूने कुष्ठरोग्याला बरे केले, ह्याचे स्पष्टीकरण शुभवर्तमानकार (evangelist) मार्क सविस्तरपणे वरील उताऱ्यात देतो.
    कुष्ठरोगाविषयी लेवीय पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, संत मार्क देखील कुष्ठरोगाविषयी आपल्याला सांगत आहे. त्याकाळी कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. ह्या काळामध्ये जी लोक ह्या भयग्रस्त आजाराने पिडीत होती त्या लोकांना विशेष अशी वागणूक दिली जात असे. वागणुकीबद्दल आपण लेवीय पुस्तकात पाहतो.
     येशू आपल्या तारणासाठी ह्या भूतलावर आला आहे. म्हणून तो कुष्ठरोग पिडीत व्यक्तीला समाजाच्या कठोर नियमातून मोकळे करून स्वर्गाची वाट दाखवतो; म्हणजेच त्याला रोगमुक्त करून समाजाचा अविभाज्य घटक बनवतो. कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा. येशू त्याला म्हणाला, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच कुष्ठरोगी बरा झाला. येशूने त्याला याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर म्हणून सांगितले. पण त्याने येशूचे ऐकले नाही तर आपण बरे झालो आहोत ह्याची साक्ष तो सर्वांना देत राहिला. ह्या कारणास्तव येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरीदेखील लोक रोगमुक्त होण्यासाठी मोठ्या संख्येने येशुकडे आले.    

बोधकथा:

     संत फ्रान्सिस ह्याच्या जीवनातील एक सुंदर कथा आहे. हि कथा फ्रान्सिस व कुष्ठरोग ह्यांच्यात रमलेली आहे. असिसी गावात कुष्ठरोग्यांची वस्ती होती. त्या गावात कुष्ठरोग हा महारोग होता. म्हणून इतर लोकांवर ह्या रोगाचा प्रभाव पडू नये म्हणून सर्व कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. फ्रान्सिसला सुद्धा त्यांचा किळस वाटत असे. त्यांना बघितल्यावर तो आपले नाक बंद करून जात असे. एके दिवशी तो घोड्यावर बसून जात असता एक महारोगी त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहताक्षणी तो परत फिरणार होता, पण... तसे न करता तो घोड्यावरून खाली उतरला. त्या महारोग्याला भिक्षा घातली व त्याच्या सडक्या हाताचे चुंबन सुद्धा घेतले. परत जाताना जेव्हा फ्रान्सिसने मागे वळून पाहिले तर त्याला कुष्ठरोगी दिसला नाही. तो येशू ख्रिस्त होता हे त्याच्या नंतर लक्षात आले. ह्या धाडसी कृत्याने फ्रान्सिसचे जीवन बदलले. त्याचा देवावरील विश्वास वाढला. दुसऱ्याच दिवशी त्याने एका महारोग्यांच्या दवाखान्यात भेट दिली. तेथील सर्व महारोग्यांनवर दानधर्म, त्यांची विचारपूस केली आणि प्रेमाने आणि सहानुभूतीने त्यांची सेवा केली.
     ह्या परिवर्तनाचे कारण फक्त देवच आहे. फ्रान्सिस म्हणतो, ‘देवाने मला त्यांच्याकडे ओढीले आणि मला त्यांच्यावर दया करण्यास भाग पाडले. आणि जे मला कडू वाटलं ते मला देवाच्या सामर्थ्याने गोडं वाटू लागलं’. ह्याचा अर्थ: ज्या महारोग्यांचा त्याला किळस वाटत होता आता त्याला त्यांना भेटायचे होते. फ्रान्सिसने देवाच्या इच्छेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन गरजवंतांना समर्पित केले. देवाच्या इच्छेनुसार त्याने सर्व लोकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले.  

मनन चिंतन:

     आजच्या गतशील युगात किंवा आधुनिक जगात बहुतेक युवक-युवती नवीन मोबाईल्स (recent mobiles) वापरतात. मोबाईल्स मध्ये असलेले मेमरी कार्ड रिकामी असे सांगणारे क्वचितच आपल्या नजरेस येतात. मेमरी कार्ड संपूर्ण भरलेले असते. दोन जीबीचं (2 GB) मेमरी कार्ड वापरलं तर फक्त दोनच जीबीच मिळते. आपण त्यात गाणी, व्हिडीओ आणि फोटो भरून ठेवतो. आणि आमचे मित्र येऊन त्यांचे नवीन मोबाईल्स दाखवतात. नवीन मोबाईल्स बघितल्यावर आपण त्यातील चित्रपट (मुव्ही) बघण्यात दंग होतो. त्यातील एक चित्रपट (मुव्ही) आपल्याला आवडतो. आपण त्याला सांगतो मला तो चित्रपट (मुव्ही) दे ना. तो चित्रपट (मुव्ही) देण्यास नकार देत नाही. तुझं ब्लूटूथ ओपन कर म्हणून सांगतो. तो ब्लूटूथ ओपन करतो. ‘picture sending’, लगेच ह्याला मेसेज येतो, ‘Not enough memory, delete some application’. ह्या चित्रपटासाठी (मुव्हीसाठी) तुझ्याकडे पुरेशी मेमरी नाही. थोड काढून टाक. ह्या मुव्हीसाठी तो नको असलेले फोटोस आणि गाणी काढून टाकतो. आणि म्हणतो आता मला मुव्ही पाठव.
     आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अंत:करणातून नको त्या गोष्टीला डिलीट (delete) मारून परमेश्वराच्या कृपेसाठी आपण जागा रिक्त ठेवली पाहिजे. देवाने आम्हामध्ये वास करण्यासाठी आम्हाला आमच्या हृदयाची दारे उघडण्याची गरज आहे. देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही स्वत:च्या योजना काढून टाकल्या पाहिजेत. आपल्या इच्छेला प्रथम प्राधान्य न देता देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. जेव्हा आपण असे करणार तेव्हा परमेश्वर देव आम्हामध्ये राहील. मरीयेने स्वत:ला रिक्त करून देवाचा शब्द पाळला. ह्याचे पारितोषिक म्हणून देवाने तिला शेवटी देवाची माता म्हणून घोषित केले. जेव्हा येशूने जक्क्यला भेट दिली तेव्हा येशूने त्याला म्हटले आज तुझ्या घरास तारण प्राप्त झाले आहे. देवाच्या तारणाचा स्पर्श होताच, जक्क्यने स्वत:ला रिक्त करून गरिबांना आपली धन-दौलत वाटली (लूक १९:१-१०). खरोखर देवाच्या स्पर्शाने आश्चर्यकारिक जीवनाचा लाभ होतो. जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होते. यिर्मया ह्या पुस्तकात आपण वाचतो, ‘परमेश्वर म्हणतो, तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांस पावेन’ (यिर्मया २९:११).  
     आजच्या उपासनेचा विषय आहे: ‘देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन जीवन विश्वासाच्या आधारस्तंभावर बांधूया’. कुष्ठरोग हा जुन्या करारात आणि आता देखील एक भयानक आजार मानला जातो. आपण लेवीय पुस्तकात पाहतो की जी व्यक्ती कुष्ठरोग्याने पिडीत आहे त्या व्यक्तीला वेगळ्याप्रकारची वागणूक देण्यात येत असे. त्याला विशिष्ट प्रकारचे कपडे घालून समाजाच्या बाहेर ठेवेले जात असे व कोणत्याही धार्मिक विधीसाठी सहभाग दिला जात नसे. परंतु, येशूच्या जीवनात ह्या घटनेला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजच्या शुभवर्तमानात कुष्ठरोगी येशूला म्हणतो आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा (मार्क १:४०). येशूला त्याचा कळवला आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच, कुष्टरोगी बरा झाला. येशूने त्याला कोणालाही सांगू नये ह्याची ताकीद दिली. परंतु बरा झालेल्या कुष्ठरोग्याने येशूच्या चमत्काराची घोषणा सर्वत्र पसरवली.
     प्रार्थनेचे फळ मोठे असते. प्रार्थनेने विश्वासाला अंकुर फुटतो. तत्वज्ञानी सोरेन केकेकार्ड म्हणतो, प्रार्थना देवाला बदलत नाही तर प्रार्थना करणाऱ्याला बदलते. कुष्ठरोग्याने येशूकडे विश्वासाने भरलेली प्रार्थना केली. त्याने स्वत:ची इच्छा अमलात आणली नाही तर येशूच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून येशूकडे विनंती केली. त्याने स्वत:ला देवाच्या हाती स्वाधीन केले. देवाच्या आश्रयाखाली त्याने स्वत:ला झोकून दिले. म्हणून त्याने केलेली प्रार्थना स्वत:च्या हितासाठी ठरली. त्याने स्वत:ला रिक्त करून देवाच्या कृपेला आपल्या जीवनात स्थान दिले. ह्या मार्गाचा अवलंब करून कुष्ठरोग्याचे तारण झाले. माणूस जीवनात स्वत:ची इच्छा करून भरपूर गमावत असतो. स्वत:च्या इच्छेने माणूस स्वार्थी बनतो. स्वार्थी होऊन गरजेवून जास्त आपल्या पदरी येण्याची शक्यता असते. जर आपण देवाच्या इच्छेनुसार वागलो तर सर्वकाही साध्य होते. जीवनात आनंद, सुख व सौख्य लाभते. येशूची इच्छा स्वीकारून कुष्ठरोगी पूर्णतःहा बरा झाला. ह्यातच त्याच सार्थक झालं.      
     संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, आपले खाणे, पिणे व सर्व वागणूक ही देवाच्या गौरवासाठी असली पाहिजे. जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करा असे तो म्हणतो. लोकांच्या सेवेसाठी व देवाच्या सुवार्तेसाठी पौल सातत्याने झटत राहिला. त्याने सदैव देवाची इच्छा स्वीकारून स्वत:ला लोकांच्या सेवेसाठी वाहीले. म्हणून त्याचे जीवन ख्रिस्ती जीवनाला साजेसे आहे. ह्यात संकोच नाही.
     आज आपला समाज स्वार्थी वृत्तीने गुरफटून गेलेला आहे. स्वत:ची इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी एखादी व्यक्ती कोणतीही सीमा पार करायला मागे पाहत नाही. खुन करणे, खोटे बोलणे, सूड घेणे इत्यादी क्रूर भावनेचं दृश आपल्याला सभोवताली पहावयास मिळते. राजकारणात राजकीय नेते प्रजेची इच्छा अमलात न आणता आपली स्वत:ची इच्छा अमलात आणतात. ह्यामुळे वारंवार समाजात हिंसा, अत्याचार व वादविवाद आपल्याला पहावयास मिळतात. कौटुंबिक जीवनात देखील एखादी व्यक्ती बळजबरीने आपली हुकुमत गाजवत असेल तर घरातील शांती, एकोपा, प्रेम व क्षमा धुळीस जाते. ह्या सर्व कारणामुळे प्रेमाला व विश्वासाला तडा गेली आहे. जर ह्या विश्वासाची व प्रेमाची ज्योत पुन्हा पेटती ठेवायची असेल तर प्रत्येकाने स्वत:च्या स्वार्थी इच्छेला कमी प्राधान्य देण्याची गरज आहे. जेव्हा आपण आपली स्वार्थीवृत्ती बाजूला ठेवून दुसऱ्यांना जागा देतो तेव्हा आपल्या जीवनात आनंद व सुख येते. संकटाना सामोरे जाण्यास धैर्य लाभते.
     येशू ख्रिस्ताने जीवनभर त्याच्या पित्याची इच्छा परिपूर्ण केली. पित्याच्या इच्छेनुसार येशूने आपला प्राण मानवजातीच्या कल्याणासाठी व तारणासाठी अर्पिला. येशूने आम्हा सर्वाना ‘आमच्या स्वर्गीयबापा’ ही प्रार्थना शिकवली. ह्या प्रार्थनेत आपण म्हणतो, ‘जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’. स्वर्गीयबापाची इच्छा ही स्वार्थी नाही तर ती सलोख्याची व प्रेमाची आहे. स्वर्गीय पित्याच्या आज्ञेनुसार जर आपण वागलो तर आपले खरोखर कल्याण होईल; जीवनात चोहीकडे सुख, शांती व वैफल्य नांदत राहील. येशू म्हणतो, ‘अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन’ (मत्तय ११:२८). जीवनात जर खरोखर सुख मिळवायचे असेल तर आपण येशूकडे आलो पाहिजे. तोच आपला तारणहार आहे. त्याला आपल्या सर्व गरजा व उणीवा माहित आहे. जर आपण देवाकडे जाण्यासाठी एक पावूल उचललं तर देव शंभर पाऊले उचलून आपल्याकडे येतो. हे प्रभो आपली इच्छा असेल तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा. देवाची इच्छा आपल्या ठायी व्हावी म्हणून आपण देवाकडे दयेची याचना करूया.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी आपल्या प्रेमळ सेवाकार्याद्वारे व सुवार्तेद्वारे सर्व ख्रिस्ती भाविकांना देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्वीकारता आपली इच्छा, योजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मी-पणा, अहंकार, नावलौकीक इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्वीकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.
३. आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे; म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.
४. ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे – विशेषकरून; आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचा, कृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.     

५. थोडा वेळ शांत राहून  आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


1 comment:

  1. It would be good if you could also provide homilies for special Sundays of the year like Mission Sunday, Vocation Sunday, Bible Sunday, etc

    ReplyDelete