Wednesday 21 February 2018

Reflection for the Homily of 2nd Sunday of Lent (25-02-18) By  Br. Amit D'brito







प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक: २५-०२-२०१८
पहिले वाचन: उत्पती २२:१-२, ९-१३, १५-१८
दुसरे वाचन: रोमककरांस पत्र ८:३१-३५
शुभवर्तमान: मार्क ९:२-१० 








प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळातील दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करीत आहोत. आजची उपासना आपल्याला आपला देवावरील विश्वास दृढ करण्यास आमंत्रित करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की देव अब्राहमला आपल्या एकुलत्या एक पुत्राचा बळी देण्यास आज्ञा करतो. येथे परमेश्वर अब्राहामाच्या श्रद्धेची सत्वपरीक्षा पाहतो व ह्यामध्ये अब्राहम विजय मिळवतो. दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्रात लिहितो की, परमेश्वराने आपल्या स्वत:च्या एकुलत्या एक पुत्रास मानवकल्याणासाठी अर्पण केले आणि तो त्याच्या पुत्राद्वारे आपणास सर्व काही देतो. तसेच शुभवर्तमानात येशूचे त्याच्या तीन शिष्यांसमक्ष झालेल्या रूपांतराचे वर्णन ऐकावयास मिळते.
     जीवनाचे सर्व मार्ग ख्रिस्तामध्ये एकरूप करण्यास व ख्रिस्ताचे सेवाकार्य करण्यासाठी आपल्याला गरज असलेली प्रेरणा व कृपा सतत मिळावी व आपण आपल्या विश्वासात अधिक दृढ व्हावे म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पती २२:१-२, ९-१३, १५-१८

     उत्पतीच्या पुस्तकातील ही एक अतिशय नाट्यमय घटना आहे. येथे अब्राहाम आपल्या मुलाला यज्ञार्पणच्या जागी जड अंत:करणाने मुलाला घेऊन जातो व त्याचे  यज्ञार्पण करताना स्वर्गातून हस्तक्षेप होतो व एडक्याचे अर्पण केले जाते.
     अब्राहामाच्या विश्वासाची ही सत्वपरीक्षा आहे. कारण एकीकडे अपत्यप्रेम व दुसरीकडे देवाचे आज्ञापालन अशा कात्रीत सापडलेल्या अब्राहामाला काही सुचेना. परंतु शेवटी विश्वास व आशा ह्याचा विजय झाला. अब्राहाम ह्या कसोटीत उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाला. अब्राहामने केलेल्या ह्या कठोर आज्ञापालनामुळे आशीर्वादाची सर्व अभिवचने पूर्ण करण्यात आली. जुन्या करारात अब्राहामाने यज्ञार्पणासाठी आपल्या एकुलता एक पुत्र दिला. त्याचप्रमाणे नवीन करारात प्रभू पित्याने ही मानवाच्या कल्याणासाठी ‘आपल्या स्वत:च्या पुत्राला राखून ठेवले नाही’.

दुसरे वाचन: रोमककरांस पत्र ८:३१-३५

     देव आपल्या पक्षाचा आहे व आम्हांला अनुकूल आहे याचे पौलाने पुन्हा एकदा स्मरण दिले आहे. त्याने आपला पुत्र दिला आणि त्यातून त्याच वेळी या जीवनातून पार होण्यसाठी आणि अंतिम तारण प्राप्त होण्यासाठी जे जे आवशयक ते ते सर्व आम्हांला उपलब्ध करून दिले. त्यामुळे आम्हांला दोषी ठरवणे कोणालाही शक्य नाही. कारण देवानेच आम्हांला निवडले आहे, त्यानेच आम्हांला नीतिमान ठरवले आहे आणि आमच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपाला त्याचा स्वत:चा पुत्र प्रत्युत्तर देतो. तसेच येथे संत पौल ख्रिस्ताचे आमच्यावर असलेल्या प्रीतीचे वर्णन करतो. देवाच्या प्रीतीपासून आम्हांला विभक्त करणे कोणत्याही आत्मिक शक्तीला शक्य नाही. या नव्या राजवटीत देवाची प्रीती ख्रिस्तामध्ये आमच्यावर सत्ता चालवते व येशू आम्हांला काढून टाकील असे संपूर्ण सृष्टीत नाही.

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०

येशूचे रुपांतर:
     येशू हा ख्रिस्त आहे आणि देवाचे राज्य कसे सामर्थ्याने येईल याचा पुरावा येशूच्या रूपांतराने शिष्यांना मिळाला. यावरून तो गौरवाने कसा प्रगट होईल याची त्याच्या शिष्यांना कल्पना आली.
     लाबानोन पर्वताच्या एका उंच डोंगरावर येशू आपल्या तीन शिष्यांसह प्रार्थना करीत असताना त्याचे रुपांतर झाले. येशुमध्ये असलेले गौरव त्याच्या शरीरातून प्रगट झाले.
एलीया व मोशे तेथे प्रगट झाले. ते या जगात असता इस्राएल राष्ट्रात देवाचे राज्य यावे यासाठी झटले होते. ख्रिस्ताच्या मरणाद्वारे या राज्याची स्थापना होणार होती त्याविषयी ते बोलत होते. देवपित्याने आपले लक्ष येशू ख्रिस्तावर वळविले व येशूचे प्रभुत्व मानण्यास सांगितले. ख्रिस्त मृतातून उठणार आहे हा विचार त्या शिष्यांना गोंधळात टाकणारा होता. मसिहा हा दु:ख सोसेल हे त्यांनी समजून घेतले नव्हते. 

बोधकथा :

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता. १९८३ मध्ये त्याच्या हृदयावर शस्ञक्रिया करावी लागली. त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे त्याला कॅन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पत्रे येत राहिली. त्यातील एका पत्रात म्हटले होते... इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पत्राला उत्तर देताना आर्थर म्हणतो... ५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस सर्किटमध्ये दाखल झाली, त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम स्पर्धेसाठी निवडली गेली. त्यातील फक्त ५० टेनिसपटू विम्बलडनसाठी निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत पोचले. त्या दोन जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले नाही की, माझीच निवड का केलीस? मग आता अशा वेदना होत असताना माझीच निवड का केली, असे मी देवाला कसे विचारु? सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
     ह्या उपवास काळात आपण सूद्धा अब्राहाम व आर्थर अँश ह्या प्रमाणे अधिका-धिक विश्वासी होण्यास प्रयत्न करूया.

मनन चिंतन:
     
      कदाचित आजच्या पहिल्या वाचनात आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल की, ‘परमेश्वर अब्राहामाला आपल्या एकुलत्या मुलाचा बळी देण्यास सांगतो’ हे कसे शक्य आहे? परंतु आपल्या असे लक्षात येते की, त्या वेळी देव अब्राहामास त्याची बलिदानापेक्षा सत्वपरीक्षा पाहत होता. कदाचित प्रत्येक आई-वडिलांना प्रश्न पडला असेल की, ‘मी ही परीक्षा पास झालो असतो का?’ देवाच्या आज्ञेवरुन मी माझ्या पुत्राचा त्याग करण्यास लागणारा विश्वास माझ्यामध्ये आहे का? त्यामुळेच आपल्या असे लक्षात येते की, ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याकडून प्रचंड अशा विश्वासाची अपेक्षा केली जाते.
     आजच्या शुभवर्तमानात आपण येशूचे रुपांतर पाहतो. प्रभू येशू आपल्या सोबत पेत्र, याकोब व योहान ह्यांना घेऊन उंच पर्वतावर जाऊन त्यांना आपल्या प्रतिष्ठेचे व गौरवाचे ओझरते दर्शन देतो. स्वर्गीय तेज प्रभू येशूच्या चेहऱ्यावर झळाळत होते आणि मग मेघातून अशी वाणी झाली की, ‘हा, माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका’.  परमेश्वर पिता येथे असे सुचवतो की प्रभू येशू हा फक्त मानव नसून तो देव सुद्धा आहे.
     ह्यामागचा विशेष हेतू असा आहे की, पित्याला शिष्यांचा विश्वास अधिक बळकट करायचा होता. कारण काही दिवसापूर्वीच प्रभू येशूने स्वत:च्या मरण व पुनरुत्थान ह्याविषयी भविष्य सांगितले होते. म्हणूनच परमेश्वर पिता येशूच्या शिष्यांची योग्य अशी तयारी करीत होता. जेणेकरून ते प्रभू येशूचा ‘देवाचा पुत्र’ असा स्वीकार करतील.
     परंतु आपल्या असे लक्षात येते की इतके स्वर्गीय रुपांतर दाखवून सुद्धा ते गोंधळात पडले. जेव्हा येशूने सांगितले की, ‘जे तुम्ही पाहिले ते कोणालाही कळवू नका’ तेव्हा ते विचार करू लागले. त्यांना काही समझले नाही. कदाचित ते त्यांच्या विश्वासात कमी पडले.
     आजच्या पहिल्या वाचनात अब्राहामाची कसोटी व शुभवर्तमानातील शिष्यांचा अपुरा विश्वास अशी परिस्थिती आपणही अनेक वेळा हे जीवन जगत असताना पाहत असतो. आपणही शिष्यांप्रमाणे गोंधळून जातो. आपल्याही जीवनात अनेक कसोटीचे क्षण येतात. आपलीही जीवनरूपी जहाज अनेक वेळा संकटामुळे जीवनात अनेक चढ-उतार पाहत असतो.
     परंतु आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास ह्या समस्याचे उत्तर देत आहे. संत पौल म्हणतो की, देव आपणांस अनुकूल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण? जरी अब्राहामाला आपल्या पुत्राला बळी द्यावे लागले नाही तरीही परमेश्वर पित्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्यास जगाच्या तारणासाठी अर्पण केले व त्याच पुत्राद्वारे तो आपली प्रत्येक मागणी पूर्ण करतो; त्यामुळेच आपण गरीब आहोत की श्रीमंत किंवा सुखी आहोत की दु:खी ह्याविषयी काहीच फरक पडत नाही. परंतु सत्य इतकेच आहे की पित्याने आपल्या पुत्राचे बलिदान केले.
     संत पौल म्हणतो की, जरी आपल्याला उपासमार, छळ, संकटे, आपत्त्ती सहन करावी लागली तरीही प्रभू येशूने जे आपल्यासाठी सहन केले आहे ते सर्वश्रेष्ठ आहे.
     आपण आपल्या समस्याची प्रभू येशू ख्रिस्ताच्या दु:खाबरोबर तुलनाही करू शकत नाही. म्हणूनच ह्या उपवासकाळात छोटे-मोठे प्रायश्चित व त्याग अतिशय आनंदाने करूया. कारण हा प्रायश्चित काळ फक्त दु:खाचा समय नसून आनंदाचा आहे कारण आपण ह्या काळात आपल्या पित्याला काहीतरी परत देऊ शकतो ज्याने आपल्या तारणासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्रास अर्पण केले. 
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या जवळ येण्यास आम्हांला सहाय्य कर.


१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरु व धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे प्रभू येशूची खरी ओळख संपूर्ण जगाला करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळात सर्व भाविकांनी अतिशय पवित्र जीवन जगावे व प्रभूच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. दयाळू प्रभो आजच्या प्रभूरुपांतर सणाच्या दिवशी आमच्या हृदयाचे व मनाचे परिवर्तन कर. जेणेकरून, आम्ही तुझे कार्य पसरविण्यासाठी सदैव झटावे म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.
४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सदैव नांदत रहावे व आपण प्रभूच्या प्रेमाने भरून जावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment