Thursday, 15 February 2018

Reflection for the Homily of 1st Sunday of Lent 
(18-02-18) By  Br. Jameson Munis






उपवास काळातील पहिला रविवार


दिनांक: १८-०२-२०१८
पहिले वाचन: उत्पती ९:८-१५
दुसरे वाचन: १ पेत्र ३:११-२२
शुभवर्तमान: मार्क १:१२-१५





“पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा”


प्रस्तावना:

आज पवित्र देऊळमाता उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाचे राज्य जवळ आले आहे म्हणून पश्चाताप करण्यासाठी आणि सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी पाचारण करत आहे.
     उत्पतीच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की देव नोहाशी व त्यांच्या मागे येणाऱ्या सर्व संततीशी तसेच पृथ्वीवरील इतर सर्व सजीव प्राणी ह्यांच्याशी करार करून पुन: जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाही ह्याचे आश्वासन देतो. दुसऱ्या वाचनात, पेत्र म्हणतो की आपण ‘ख्रिस्ताला’ प्रभू म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना’ कारण प्रभुने आम्हासाठी दु:ख सोसले आहे. तसेच संत मार्क आपल्या शुभसंदेशाद्वारे आपणास ‘पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा’ म्हणून प्रेरित करत आहे.  
     आपण सर्वजण पापी आहोत. अनेक मोहांना बळी पडून देवापासून आपण दूर जात असतो. देवाची कृपा आम्हास प्राप्त व्हावी म्हणून ह्या प्रायश्चित काळात आपण सर्वानी पापांपासून दूर राहावे व सुवार्तेवर विश्वास ठेवावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया. 
   
सम्यक विवरण:

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

आजचे पहिले वाचन आपल्याला देवाने नोहाशी व त्याच्या मागे येणाऱ्या संततीशी तसेच तारवांतून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशी केलेला करार या विषयी सांगत आहे. कारण जलप्रलयाच्या अगोदर, लोक वाईट कृत्याने वागत होते. देवाची आज्ञा पाळत नव्हते. म्हणून देवाने जलप्रलयाचा वर्षाव केला. परंतु या जलप्रलयातून नोहा व त्यांच्या कुटुंबाचे व त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्याचे संरक्षण केल्यामुळे नोहाने देवाचे आभार मानले व देवाची उपकार स्तुती केली. देवाने त्या उपकार स्तुतीचा स्वीकार केला व जलप्रलया नंतर आश्वासन दिले आणि सांगितले की, मी यापुढे कधीही सर्व सृष्टीचा व प्राणिमात्रांचा नाश करणार नाही. सर्व सजीव प्राण्यामध्ये पिढ्यान-पिढ्या व युगान-युग वाढ होईल. तसेच, या कराराचे चिन्ह म्हणून आकाशात मेघ दिसतील व त्या मेघात धनुष्य दिसेल म्हणजे यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश होईल असा जलप्रलय होणार नाही.  

दुसरे वाचन: १ पेत्र ३:११-२२

     दुसऱ्या वाचनात पेत्र म्हणतो की आपण ‘ख्रिस्ताला’ प्रभू म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना’ कारण प्रभुने आम्हासाठी दु:ख सोसले आहे. आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल म्हणजे ख्रिस्त नीतिमान असून सुद्धा अनीतिमान लोकांकरिता मरण स्वीकारले. पुढे संत पेत्र आपल्याला सांगतो की, जेव्हा नोहा देवाच्या आज्ञेनुसार तारू बांधीत होता त्या काळातील लोकांनी तारवाद्वारे मिळणाऱ्या मुक्तीचा नकार केला. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही. ते सर्व अनितीमानाने जगले. त्यांनी देवाच्या वचनाचा आज्ञाभंग केला, म्हणून देवाने जलप्रलयाद्वारे लोकांना शिक्षा दिली. परंतु जलप्रलयापासून नोहा व त्याच्या कुटुंबियांचे संरक्षण केले. कारण त्यांनी देवाची आज्ञा पाळली. म्हणून आता नोहाचे तारू बाप्तीस्म्याचे प्रतिक बनले आहे. बाप्तिस्मा म्हणजे केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे तर शुद्ध मनाने देवाचे ऐकणे असे आहे. तसेच बाप्तिस्मा म्हणजे देवाशी एकनिष्ठ राहण्याचा करार आहे.  

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५

आजच्या मार्कलिखित शुभवर्तमानात येशूची अरण्यात परीक्षा व त्याच्या लौकिक कार्याचे प्रारंभ याविषयी ऐकतो. येशूच्या बाप्तिस्मा नंतर पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थना व उपवास करण्यासाठी अरण्यात नेले. ह्या चाळीस दिवसात त्याला सैतानाच्या मोहाला सामोरे जावे लागले. कारण येशूविषयी सैतान पूर्णपणे जाणून होता व त्याला माहित होते की, जर येशूने आपले कार्य चालू ठेवले तर त्याच्या अस्तित्वाला धोका होईल. म्हणून तो येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. परंतु येशू सैतानाच्या मोहावर विजय मिळवून आपल्या कार्याला यशस्वीरीत्या सुरुवात करतो. तसेच या घटनेनंतर जेव्हा योहान बाप्तीस्माला अटक केल्यानंतर येशू गालीलांत येतो व देवाची सुवार्ता पसरवितो व म्हणतो, “देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा”.  

बोधकथा:

अनिल एक चांगला मुलगा होता. त्याला रेशमा व राजेश ही लहान भावंडे होती. अनिल आपल्या आईवडीलांना मान देई व त्यांचे ऐकत असे. एक दिवस आईने मिठाई आणली होती. अनिलला मिठाई फार आवडत असे. आईने अनिलला त्याचा वाटा दिला. थोडी मिठाई खाऊन अनिलचे मन भरले नाही. आई जवळ पुन्हा मागायला त्याला लाज वाटली. अनिलच्या डोक्यात एक विचार आला. रेशमा व राजेशसाठी ठेवलेली मिठाई अनिलने कापडातून हळूच काढली व खाल्ली. रेशमा व राजेश शाळेतून घरी आल्यावर मिठाई त्यांना देण्यासाठी आईने कपाट उघडले. कपाटात आईला मिठाईचा डब्बा मिळाला नाही. आईने अनिलला विचारले असता, तो म्हणाला, “आई मला क्षमा करा, कारण मीच मिठाई खाल्ली. मी तुला दुखःविले आहे. मला क्षमा करा. तेव्हा अनिलच्या आईने त्याला जवळ बोलाविले व डोक्यावरून हात फिरवला व त्याला क्षमा केली.

मनन चिंतन:

ही छोटीशी गोष्ट आपल्याला आजच्या शुभवर्तमानाची आठवण करून देत आहे. ती म्हणजे, येशू ख्रिस्त सांगतो की, पश्चाताप करा व देवाच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. देवाने आपल्याला दहा आज्ञा दिल्या आहेत. देव म्हणतो चोरी करू नका, खोटे बोलू नका, कोणाला मारू नका आणि देवाला, आई-वडिलानां व मोठ्यानां मान द्या. देवावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. तरी सुद्धा जेव्हा आपण चोरी करतो, खोटे बोलतो, आई-वडिलानां उलट बोलतो, वाईट शब्द बोलतो व कोणाला फसवतो. ह्या सर्वामुळे आपण देवापासून देवाच्या आशिर्वादापासून दूर जात असतो. यालाच पाप म्हणतात. पाप करणे म्हणजे देवाशी नाते तोडणे, देवाच्या प्रेमळ ह्द्याला दुखावणे, देवाच्या प्रेमाला नकार देणे; व आपण त्याचे नाते तोडतो तसेच, जेव्हा आपण पाप करून देवापासून दूर जात असतो तरीपण देव आपल्यावर खूप प्रेम करतो व सांगतो. “पश्याताप करा आणि माझ्याकडे या”. आपण सर्वजण देवाला खूप आवडतो, म्हणून आपण सर्वांनी देवाकडे आपली चूक कबूल केली पाहिजे. तसेच आपल्या आई-वडिलांकडून माफी मागितली पाहिजे व आपण सुद्धा दुसऱ्यांना माफ केले पाहिजे. कारण, आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. उपवासकाळ हा प्रभू येशूच्या दु:खसहनावर मनन चिंतन करण्याचा तसेच आपण आपल्या पापांबद्दल व वाईट कृत्याबद्दल प्रायश्चित करण्याचा असतो व देवाच्या आशिर्वादाने पापमुक्त होण्याचा काळ आहे. आजची वाचनेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा संदेश देत आहेत. पहिल्या वाचनात देवाने जलप्रलयापासून नोहाचे व त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण केले व मेघात दिसणारा धनुष्याद्वारे एक करार केला. दुसऱ्या वाचनात पेत्र सांगतो की, आपण सर्वानी ख्रिस्ताला प्रभू मानून त्याला आपल्या अंत:करणात पवित्र मनाने व शुद्ध मनाने देवाची आज्ञा पाळावी आणि देवाशी एकनिष्ठ राहावे. तसेच, शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की, “पश्चाताप करून देवाच्या वचनावर विश्वास ठेवा”.
ह्याद्वारे ख्रिस्त आपल्याला सांगतो की जो पाप करून पश्चाताप करत नाही तो दु:खी होतो, तो सर्वांना दु:खी बनवतो, आई-वडिलांना दु:खी करतो आणि देवालाही दु:खी करतो. तसेच जो पाप करीत नाही व जो पश्चाताप करून देवावर विश्वास ठेवतो तो आनंदी असतो. तो सर्व संतासारखा व पवित्र मरीयेप्रमाणे पवित्र व आनंदी राहतो. त्याला देवाचा व स्वर्गाचा अनुभव येतो. सर्वांना तो आवडतो. पापापासून दूर राहण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. चांगली संगत धरली पाहिजे. नेहमी चांगले छंद लावून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मोहावर विजय प्राप्त करू. येशू खुप दयाळू आहे. तो आपल्या पापांची क्षमा करतो. त्याच्याकडे चूक कबुल करून व माफी मागून आपणांस पुन्हा चांगले बनता येते. मरिया माग्दालेना पापी होती. तिने क्षमा मागितली. येशूने तिला क्षमा केली. ती येशूची अनुयायी बनली आणि ती संत बनली. जक्क्यने पुष्कळ लोकांना लुबाडले होते. तो खूप पापी होता. एक दिवस येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढला. येशूने त्याला खाली बोलाविले व त्याच्या घरी गेला व जेवला. त्याने पाप सोडून दिले. त्याने पश्चाताप केला. देवाने त्याला क्षमा केली आणि पुन्हा तो चांगला बनला. पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले. तो येशूचा शिष्य होता. तो येशूविषयी खोटे बोलला. तो दु:खी झाला. तो जाऊन आणि त्याने पश्चाताप केला. येशूने त्याला क्षमा केली. परंतु जुदास मोहात पडला. त्याने येशूचा म्हणजेच त्याच्या गुरूचा विश्वासघात केला. पैसे घेऊन त्याने येशूला विकले व शत्रूच्या हाती दिले. त्याने नंतर देवाकडे क्षमा मागितली नाही. तो दु:खी झाला व त्याने गळफास घेतला व मरण पावला. आपल्या जीवनात सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडत असतात. पण आपण आपल्या वाईट कृत्याकरीता क्षमा मागतो का? आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या जीवनातील घटनांची आठवण करूया व नम्रपणे प्रायश्चित करून येशूच्या जवळ येण्यासाठी प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू, आमचे अंतःकरण शुद्द कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरु व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी देवाच्या पश्चातापाचे वचन व प्रेम दुसऱ्यापर्यंत प्रसारीत करण्यासाठी देवाने त्यांना सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतःकरणे उघडून देवाच्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवावा व त्यांच्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, अशा लोकांनी पश्चाताप करून, देवाच्या वचनावर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. शाळेत व कॉलेजात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

1 comment: