Sunday, 25 March 2018


Reflection for the Homily of Easter  Sunday (01-04-2018) 
By Fr. Malcolm Dinis









पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)

दिनांक: १/४/२/०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९







प्रस्तावना:

“ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला”

आज संपूर्ण ख्रिस्तसभा ‘पास्काचा सण’ साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणावरती विजय मिळवला म्हणजेच ख्रिस्ताने पाप, मरण व सैतान ह्यावर विजय मिळवला. पुनरुत्थानामुळे ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांना जशी विजयी जीवनाची आशा प्राप्त होते त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवनावरील श्रद्धाही बळकट होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे अंधःकाराच्या राज्यावर मिळविलेला विजय होय. या विजयामुळे सैतानी शक्तीचा कायम निःपात करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या ह्या आगळ्यावेगळ्या शक्तीमुळे त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना विजयी जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून प्रत्येक मानवाच्या मनात आशेचा अंकुर फुलविला आहे. त्याच्या पुनरुत्थानाने आपणास नवजीवन व आशा प्राप्त करून दिली आहे. जसा गव्हाचा दाणा कुजतो, रुजतो तेव्हा हजारो दाणे निघतात तसेच ख्रिस्ताच्या मरणाने प्रत्येक मानवाचे तारण झाले आहे. आपल्या सर्वांना विजयी जीवन जगण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशिर्वाद, कृपा व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलित विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३

संत लूकचा खरा मुख्य हेतू असा होता की, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे आणि सर्व लोक येरुशलेममध्ये त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होतील. हीच साक्ष संत पेत्र ह्या वाचनात देत आहे की, नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला कारण देव त्याच्या बरोबर होता. अशाप्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशातील मंडलीस स्वास्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या कृपेत व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. ही पुनरुत्थानाची साक्ष खुद्द प्रभूने आम्हास दिलेली आहे व आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जीवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

     या जगातील गोष्टी क्षणभंगुर व व्यर्थ आहेत. देवाच्या गोष्टी सार्वकालिक व सार्थ आहेत म्हणूनच आपले लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करणे स्वर्गीय लाभाचे आहे. जे ख्रिस्ताशी जडलेले आहेत ते त्याच्या विचारांशी सुद्धा जडलेले आहेत. विश्वासणारा ख्रिस्ताबरोबर मेला तर त्याच्याबरोबर जिवंतही होईल. कारण ख्रिस्त स्वतः विश्वासणाऱ्याचे जीवन आहे हे सत्य आपल्या नवीन जीवनाचा पाया आहे. जो ख्रिस्तावर आपले संपूर्ण जीवन केंद्रित करतो तो मेला तरी जगेल व त्याच्या गौरवात प्रगट होईल.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

     पुनरुत्थानाविषयी घटना सांगताना योहानाने निवडक प्रसंगाचाच उल्लेख केल्याचे स्पष्टच दिसते. या घटनेमधून शिकावयाच्या काही आध्यात्मिक धडयांचे विवरण करण्याचा त्याचा उद्देद्श आहे
      चारही शुभवर्तमानकरांनी सांगितलेल्या विविध प्रसंगांची एकवाक्यता साधून त्यातून एकच सलग चित्र उभे करणे सोपे नाही. मरीया मग्दालीया एकटीच कबरे जवळ होती असे योहान सांगतो, तर मत्तय व मार्क हे यात इतरांचाही समावेश करतात. तथापि मरीया मग्दालीया तेथे होती यावर सर्वांचे एकमत आहे.   
            कबरेमध्ये असलेल्या वस्त्रांची जागा योहानाने नेमकेपणे सांगितली आहे. डोक्याला असलेला रुमाल वेगळा एकीकडे होता, यावरून असे समजून येते की, त्यांना कुणीच हात लावला नाही हे सूचित होते. लाजर कबरेतून प्रेतवस्त्रे गुंडाळलेला असा बाहेर आल्याचे आठवण योहानाने कदाचित हे वेगळेपणा दाखवले असेल. येशूच्या कार्यध्येयामध्ये शास्त्रलेख परिपूर्ण होण्याचे महत्त्व काय व किती आहे ते आरंभीच्या ख्रिस्ती लोकांना पुढे नंतरच समजले.

बोधकथा:

     दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी अधिकारी उद्वस्त झालेल्या परिस्थितीची पाहणी करत होता, सर्वत्र राख, अर्धवट जळालेली प्रेते, झाडांच्या खोडामधून निघणारा धूर अश्या परिस्थितीत त्या अधिकाराचे लक्ष एका लहानशा झाडाकडे गेले, त्या झाडाला नवीन पालवी फुटली होती. त्या माणसाने विचार केला जर ह्या लहानश्या झाडाला अश्या परिस्थितीत पालवी फुटते तर मग ह्या आमच्या मानवी जीवनाला काय झाले आहे, आमच्या मनाला व विचारांना पालवी का फुटू नये ? अश्या विचाराने ह्या माणसाने इतरांना पुन्हा उठण्याची व भरारी मारण्याची प्रेरणा दिली.
     येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला आज हेच शिकविते.        

मनन चिंतन:

     मनुष्याचे या जगातील जीवन अतिशय क्षणिक आहे. या जीवनाची अखेर ज्या घटनेने होते, तिला आपण मरण म्हणतो. गवताप्रमाणे मनुष्यजीवन अल्पकाळ टिकते, सृष्टीतील पशुप्राणी, वनस्पती देखील नश्वरतेच्या अधीन आहेत. आपल्याला एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. इथली धनदौलत, उच्च पदव्या, नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांचा निरोप घ्यावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती मानवी जीवनावर नैराश्याचे सावट आणणारी आहे. जसे मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगूर आहे, तसे पृथ्वीवरील आनंदही क्षणभंगुर आहेत. मधुर फळ खाताना आनंद होतो. नवा कोरा पोशाख चढवताना आनंद होतो. चित्रपट पाहताना आनंद होतो. मात्र हे सर्वच आनंद विरघळून जातात. केवळ अल्पकाळ टिकणारे जगिक आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी जर मनुष्य जगत असेल व मरणानंतर आपलं काय होत हे त्याला ठाऊक नसेल तर मानवी जीवन ही एक क्लेशदायी शोकांतिका आहे.
     परंतु मरण हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसून तो एका खऱ्या नवजीवनाचा प्रारंभ आहे. म्हणूनच गुडफ्रायडेला अर्थ आहे तो इस्टरच्या पुनरुत्थित प्रभू येशूच्या प्रकाशात कारण पुनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त हा आदि आणि अंत आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. रात्र आणि दिवस ह्यांच जस नात आहे तस गुडफ्रायडे आणि इस्टर ह्या दोन दिवसाचं नात आहे. रात्रीनंतर निश्चितपणे पहाट होत असते तशीच गुडफ्रायडेच्या अंधारानंतर इस्टरची मंगल पहाट फुटत असते. किंबहुना इस्टरची सुंदर पहाट होण्यासाठी गुडफ्रायडेच्या रात्रीची आवश्यकता आहे. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुपात पुनरुत्थित झाले आहे.
आजचा दिवस हा आम्हा श्रद्धावंतासाठी एक आनंदाचा दिवस आहे. पुनरुत्थान म्हणजे ‘पूर्ण बद्दल’ राखेतून पुन्हा उठण्याचा अनुभव.
     अनेक वेळा जीवनातील दुःखभोग, वेदना, अरिष्टे, संकटे, एकाकीपणा यामुळे आम्ही निराश आणि हतबल होतो. सर्व आशा गमावून बसतो. हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने वधस्तंभालाच अर्थपूर्ण केले. म्हणूनच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना निश्चितच भविष्यात आशा आहे. ह्या आशेच्या किरणामुळेच निराशेतून आशेकडे, अपयशातून यशाकडे, दु:खातून सुखाकडे, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. कारण ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन जगावर, मृत्यूवर आणि सैतानावर संपूर्णपणे विजय मिळवलेला आहे. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत आहे. ज्यांना ह्या जिवंत ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे त्यांनी देवाला अनुभवलेला आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वच्छ अंतःकरणाने प्रभू येशुला शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्याला दर्शन देत असतो. ज्याप्रमाणे शुभवर्तमानामध्ये ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले पण जेव्हा त्यांनी शुद्ध अंतःकरणाने प्रभूला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रभूने त्यांना दर्शन दिले व ही आनंदाची शुभवार्ता इतरांना देण्यासाठी त्यांना पाठविले.
     आज जगात पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे. अर्धेअधिक लोक मेलेले आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांची ध्येयधोरणे मेलेली आहेत. जगात द्वेष, हेवा प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे खून, रक्तपात, जाळपोळ, युद्ध होत आहेत. पुरुष व्यसनात जळून जात आहेत. स्त्रिया वेश्या व्यवसायात कुजून गेलेल्या आहेत. राजकीय नेते पैशांच्या गुलामगिरीत बंदिस्त आहेत. व्यापारी लोक फसवेगीरीच्या साखळदंडानी बांधले गेले आहेत. अन्याय, अत्याचार अशा विकृतीत जीवन जगणाऱ्या सर्वांना प्रभू येशूच्या जीवनाची व पुनरुत्थानाची अधिक गरज आहे. ज्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत असे प्रेमभंग झालेले लोक, ज्यांना लुटून गेले आहे असे उद्ध्वस्त झालेले लोक ह्या सर्वांना पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे.
     ज्याप्रमाणे प्रभूने मरणावर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपणदेखील ह्या आपल्या आधुनिक संकटावर विजय मिळवूया. कारण आपण पुनरुत्थित प्रभूचे लोक आहोत आणि ‘आल्लेलूया’ हे आपले गीत आहे. म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषित करूया व म्हणूया “विजयी तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी”.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा द्या कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे आपल्या लोकांना आणि स्वतःच्या जीवनात नवजीवनाचा अनुभव यावा म्हणून कष्ट घेतात. त्यांच्या कार्यात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या कृपेने यश लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यास तरूण तरुणींनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आदर्शातून पाचारण घडावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील गरजवंत, आजारी व एकाकी लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. राष्ट्रा-राष्ट्रांमधील, देशांतर्गत चाललेले वाद व हिंसाचार निवळावे, आपण सर्व एकाच देवाची लेकेरे आहोत ही ऐक्य भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया. 



No comments:

Post a Comment