Friday, 25 January 2019


Reflection for the Homily of 3rd Sunday of ordinary time
 (27-01-19) By Br. Rahul Rodrigues





सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २७/०१/२०१९
पहिले वाचन: नहेम्या ८:२-४, ५-६, ८-१०
दुसरे  वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:१२-३०
शुभवर्तमान: लूक १:१-४, ४:१४-२१




प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणांस देवाची वचने ऐकून, ती कशाप्रकारे अंगीकारावीत ह्या विषयी मनन चिंतन करण्यास आमंत्रित करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये, एज्रा याजक युद्धात यातना व दुःख सहन करून येरुसलेमेत परतलेल्या लोकांना नियमशास्त्राद्वारे धीर देऊन, नवीन जीवनास सुरुवात करण्यास सांगत आहे. तर करिंथकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रात संत पौल देवाच्या मंडळीला ख्रिस्ताच्या शरीराची उपमा देतो व तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात असे सांगतो.
लुककृत शुभवर्तमानात येशू त्याच्या मिशन कार्याविषयी सांगताना आढळतो. तो म्हणतो, “प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने माझा गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदिवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळण्यासाठी व जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी अभिषेक केला आहे. तर ह्या पवित्र मिस्सा बलिदानात भाग घेत असताना विशेष कृपा व शक्ती मागुया व देवाच्या वचनावर विचार विनिमय करून तसे वागूया.   

सम्यक विवरण:
पहिले वाचन: नहेम्या ८:२-४, ५-६, ८-१०

नियमशास्त्राचे वाचन शिकण्यास उत्सुक असे लोक आणि शिकविण्यास तयार व सक्षम असा शिक्षक यांचा अजोड मेळ या अध्यायातून साधला आहे. लोकांनी पुढाकार घेऊन नियमशास्त्राचा ग्रंथ आणा, अशी एज्राला विनंती केली. तो ऐकण्यासाठी सर्व मंडळी एकत्र जमली यावर वचन २ मध्ये भर दिला आहे. ते मोठ्या अपेक्षेने व अति आदराने ऐकण्यास तयार झाले आणि दीर्घकाळ चाललेले वाचन लोकांनी एकचित्ताने कान देऊन ऐकले. अशी वृत्ती धरल्याने श्रोत्यांवर देवाच्या वचनाचा जास्तीत जास्त प्रभाव पडतो, हे पुढील परिणामातून सिद्ध झाले आहे.
एज्राने लोकांची विनंती तात्काळ मान्य केली, पण त्याने या ग्रंथाचे वाचन मंदिराच्या अंगणात केले नाही. त्यासाठी त्याने सर्व लोकांना सहज येता येईल अशी जागा निवडली आणि तो सर्वांच्या दृष्टीस येईल असा उभा राहिला. तेथे कोणाला प्रतिबंध केला नव्हता. या कार्यामध्ये सहाय्यासाठी त्याने सर्व सामान्य लोकांना आपल्याबरोबर घेतले. नियमशास्त्र हे कोणा धर्मपंडिताचे खाजगी क्षेत्र आहे असे कोणी समजू नये हे दाखविण्यासाठी एज्राने असे केले असावे.
नियमशास्त्राचे निरुपण अर्थविवरण या परिच्छेदाच्या दोन भागांमध्ये एक लक्षणीय भेद दिसतो. नियमशास्त्र समजून घेतल्याने प्रथम लोक रडू लागले आणि मग आनंदाने उत्सव करू लागले. लोकांना नियमशास्त्राचा परिचय नव्हता या कारणाने ते आरंभी रडू लागले असे म्हणता येत नाही. ते ऐकून हे सर्व आमच्या आजच्या परिस्थितीला समर्पकपणे लागू पडते याची नव्याने जाणीव झाल्याने लोकांना रडू कोसळले असे म्हटले पाहिजे.  परिणामी लोकांचा विवेकभाव जागृत झाला. आपली जीवने, आपण देवाच्या मानदंडांना किती उणे पडलो आहोत हे त्यांच्या लक्षात आले.

दुसरे वाचन - १ करिंथ १२:१२-३० 

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ लोकांना सांगत आहे की, ‘तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.’ मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले असून, सर्व अवयव एकत्र मिळून कार्य करतात. ख्रिस्ताचा व स्थानिक मंडळीचा संबंध असाच आहे. सर्व विश्वासू लोक अवयवाप्रमाणे असून जशी अवयवांची कार्ये निराळी असतात तसेच विश्वासणाऱ्यां मंडळीची कार्ये निरनिराळी असतात व ख्रिस्त मस्तकाप्रमाणे मंडळीवर नियंत्रण ठेवतो.
पुढे तो म्हणतो, प्रत्येक अवयव हा गरजेचा आहे, शरीराचे कार्य चालविण्याकरिता प्रत्येक अवयवाने आपा-पले कार्य केले पाहिजे. मगच शरीर आपले कार्य करू शकते. तसेच, मंडळीतील प्रत्येक व्यक्तिला कार्य नेमून दिले आहे. ते कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याने कृपादान दिलेले आहे. मंडळीतील आपले कार्य करणे हि प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी असते. आपणाला दिलेले कार्य निराळे आहे म्हणून कोणी स्वतःला वेगळे करू नये.
देवाने आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाची नेमणूक केली आहे. मंडळीत कोणी इतरांपेक्षा श्रेष्ठ नसतात, फक्त कार्य भिन्न असतात. सर्वांना एकमेकाची गरज असते. कित्येक अशक्त असतात, त्यांचीही गरज असते. समाजात कित्येकांना कोणी मान देत नाहीत. ते मंडळीच्या सहभागीतेत असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना उत्तेजन द्यावे. मंडळीतील सर्व जण एकमेकांची काळजी घेतात. ते एकमेकांना उत्तेजन देतात. तेव्हा मंडळीत ऐक्य निर्माण होते. सर्वांना प्रत्येकाचे मोल समजते व सर्वांच्या भल्यासाठी जे चांगले ते करण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. सर्व एकमेकाची सुख-दुःखे समजतात, सर्वजण एकमेकांना आधार देतात.

शुभवर्तमान: लूक १:१-४, ४:१४-२१

आजचे शुभवर्तमान प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात आपल्याला वाचकाची ओळख करून दिलेली आहे; तर दुसऱ्या भागात येशू ख्रिस्त मंदिरात असतानाचे दृष्य वर्णन केलेले आहे.
प्रत्येक विश्वासणाऱ्या - नवा जन्म झालेल्या – व्यक्तीला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचे आहे. येशू ख्रिस्त हा जगात ह्याच प्रकारे जगला. त्याचे जीवन आपणाकरिता फार चांगले उदाहरण आहे. यहुदी लोकांच्या सभास्थानात नियमशास्त्राचे वाचन व अभ्यास स्तोत्र गाणे आणि प्रवचने होत. येशू ख्रिस्तही एखाद्या गावात गेला की तेथील सभास्थानात शिक्षण देई.
एक दिवस तो नाजारेथ गावी आला. तो शब्बाथ दिवस होता. नेहमीप्रमाणे तो शास्त्रातील वचने वाचण्यास उभा राहिला. यशया संदेष्ट्याचा ग्रंथ उघडून त्याने स्वतःविषयी काही वचने वाचली. दीनांना सुवार्ता सांगण्यास, देवाने त्याला नेमले होते. देवाच्या कृपेचे कार्य करण्यास तो आला होता. तो मुक्त करणारा व दृष्टी देणारा होता. तो देवाच्या कृपेची घोषणा करणारा होता. असे ह्या वाचनात लिहिले होते.
लोकांनी ह्या गोष्टी कधीच ऐकल्या नव्हत्या. त्याच्या मुखातील शब्द दयेने व प्रीतीने भरलेले होते. आज देवाला याविषयी सर्वांना कळवायचे आहे. ख्रिस्ताद्वारे देव कृपा करतो व पापांच्या व मरणाच्या बंधनातून मुक्त करतो. आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहाल तर आपणही हाच संदेश कृपेने इतरांना देऊ शकतो.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, ज्याप्रमाणे एखादे पतंग हे धाग्याविना उडू शकत नाही, बाग माळीविना फुलू शकत नाही, मेंढरे मेंढपाळाशिवाय कुरणात जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे आपले जीवन आहे. जर का आपण ख्रिस्तामध्ये व त्याच्या वचनामध्ये एकरूप झालो नाही तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. आपल्या जीवनात आपले एक ध्येय असते व ते आपल्याला गाठायचे असते. परंतु जर का आपण त्यासाठी प्रयत्न केला नाही तर आपण ते कसे गाठणार? त्यासाठी आपल्याला जीवनात त्याग, परिश्रम व मेहनत करावी लागते. तसेच ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणे फार गरजेचे आहे, त्याच्या वचनावर चालणे फार महत्वाचे आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि नियमशास्त्राचे वाचन झाल्यानंतर लोकांना रडू कोसळले कारण त्यांनी आत्मपरीक्षण केले कि आपण देवाच्या किती जवळ आहेत? आपण देवाचे वचन कितपर्यंत पूर्णत्वास नेतो. परंतु जेव्हा त्यांना त्या वाचनाचा शब्दशहा अर्थविवरण करण्यात आले तेव्हा त्यांना आनंद झाला.
तसेच संत पौल करिंथ लोकांना म्हणतो कि, आपण सर्व वेगळे असलो तर आपण एक आहोत. जरी शरीराने आपण अलग असलो तरी आपण आत्म्याने एक आहोत. कारण आपल्या सर्वांना एकच आत्मा दिला आहे (१ करिंथ १२:१३). परंतु आपण ख्रिस्तामध्ये तेव्हाच एक शरीर बनू जेव्हा आपण देवाच्या वचनानुसार वागतो व जेव्हा आपण देवाचे वचन आपल्या आचारणात आणतो. याचे सुबक उदाहरण आज शुभवर्तमानात प्रभू येशू मध्ये आढळून येते. प्रभू येशू आपल्या पित्याशी एकनिष्ठ राहून त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या. त्याचमुळे प्रभू येशू सुवार्ता पसरवण्याचे व आजाऱ्याना बरे करण्याचे आपले प्रेषितीय कार्य करू शकला.
आज ख्रिस्तसभा आपल्याला सुद्धा हेच प्रेषितीय कार्य पुढे नेण्यास सांगत आहे. ज्याप्रमाणे नेहम्या आणि येशू अभिषिक्त केलेले होते आपणही स्नानसंस्कार आणि दृढीकरण संस्काराने अभिषिक्त झालो आहोत. आपणही ख्रिस्ताचे अनुकरण करून देवाची सुवार्ता पसरविली पाहिजे. आपल्याला मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा योग्य तो उपयोग करून दीनांना सुवार्ता सांगितली पाहिजे. हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये राहून त्याच्या वचनाप्रमाणे वागू व त्याचे वचन आपल्या दररोजच्या जीवनात उतरवू. त्यासाठी लागणारी कृपा व प्रेरणा आपल्याला मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१) आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना  प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमन करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.
३) जे लोक आजारी आहेत अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 17 January 2019


Reflections for the homily of 2nd Sunday of ordinary Time
 (20-01-2019) by: Br. Lipton Patil.



सामान्य काळातील दुसरा रविवार

दिनांक: २०/०१/२०१९
पहिले वाचन: यशया ६२:१-५
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र १२:४-११
शुभवर्तमान: योहान २:१-११



स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता

प्रस्तावना:
          आज देऊळमाता सामान्य काळातील दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. आजची उपासना आपल्याला ख्रिस्तावरील आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी विशेष आमंत्रण देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया ६२:५ मध्ये असे सांगण्यात आले आहे की, ‘नवरा जसा नवरी पाहून हर्षतो, तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.’ आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहीलेल्या पत्रात म्हणतो की, कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत. तसेच सेवा, ज्ञान, विद्या व शक्ती ह्या पवित्र आत्म्याच्या दानांविषयी सांगत आहे. ही सर्व दाने ख्रिस्त स्वतः च्या इच्छेप्रमाणे वाटून देत असतो. तसेच आजच्या योहानकृत शुभवर्तमानात येशूने कानागावी लग्नसमयी पाण्याचा केलेला द्राक्षरस ह्याविषयी वर्णन केले आहे. कानागावी येशूने केलेल्या पहिल्या चमत्कारावरून शिष्यांची त्याच्यावरील श्रद्धा बळकट झाली.
          आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपली सुध्दा प्रत्येकाची येशुवरील श्रद्धा मजबूत व घट्ट व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया: ६२:१-५
वधूसारखी नटलेली सुंदर सियोने पासून सुरु झालेली ही कविता आहे.  या कवितेत पतीची व मुलीची आतुरतेने वाट पाहणारी स्त्री व सियोन ह्याची तुलना केलेली आहे. येथे एक होण्यामध्ये देवाच्या बाजूवर विशेष भर दिला आहे. त्याच्या इच्छेतील उत्कट जोम सियोनाविषयीच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेची उंची आणि व्याप्ती तिला परिपूर्ण करण्यात त्याला वाटणारा अभिमान, त्याचा आनंद आणि या सर्वाचे केंद्रस्थान असलेले रहस्य हे कार्य होत नाही तर त्याच मुळाशी असलेली प्रीती आहे. सियोनाची मुले या शब्दांनी जे सात्विक आहेत त्यांना माता नगरीने उत्पन्न केले असले तरी ते या नगरीशी संलग्न आहेत आणि नगरीची पुनःस्थापना हा देवाप्रमाणे त्यांचाही आनंदाचा विषय आहे.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:४-११
सर्व दानांचा उगम देवापासून होतो व पवित्र आत्म्याच्याद्वारे ती वरदाने आपल्याला मिळतात. ही दाने चांगल्या कार्यासाठी दिली जातात व ह्यातून आपण चांगले कार्य करत असतो. पौलाचा दाखला समोर ठेवून मंडळीनेही या तिन्ही संज्ञा वापराव्यात हे स्पष्ट आहे. करिंथ शहरातील नागरिक आपला मान, शक्ती, संपत्ती मिरवीत. स्वतःला श्रेष्ठ समजत. सेवाकार्य करणे हे चुकीचे आहे असे ते समजत. आपण प्रत्येकाचे स्वतः साठी नव्हे तर इतरांच्या हितासाठी आत्म्याने प्रकटीकरण होते. जगातील जीवनात हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते. जगात दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी आपण जगलो पाहिजे. दुसऱ्यांचे चांगले केले पाहिजे याबद्दल संत पौल सांगत आहे.

शुभवर्तमान: योहान २:१-११
पाण्याचा द्राक्षरस करणे हा ख्रिस्ताचा पहिला चमत्कार आहे. ह्या पहिल्या चमत्कारावरून ख्रिस्ताचा गौरव दिसून येतो. हा चमत्कार योहानाच्या शुभवर्तमानात दुसऱ्या अध्यायात नमूद केला आहे. यावरून असे समजते की, ख्रिस्ताच्या सेवाकार्याची महती मिळते असा योहानाचा मानस असावा. येशू व त्याची आई त्यांच्या समाजातील दोन बाबी लक्षात घ्याव्यात. द्राक्षरस संपल्याने यजमानावर लाजीरवाणा प्रसंग येणार हे मरीयेच्या मनात होते, तर येशूच्या मनात त्याच्या मुख्य कार्याचा विचार होता. त्याचा निर्देश येथे ‘वेळ’ ह्या शब्दाने शब्दांकित केला गेला आहे. जेव्हा मरीयेने येशूला विनंती केली, तेव्हा येशू ज्या प्रकारे आपल्या आईशी बोलला ते चमत्कारीत वाटले, तथापि तो पित्याखेरीज इतर कोणाचेही ऐकतो असा गैरसमज होऊ नये हाच त्याचा स्पष्ठ उद्देश ह्यात होता.

बोधकथा
एका गावात एक विधवा आई व तिचा मुलगा विजय राहत होते. विजय हा मनिषा नावाच्या मुलीवर अपार प्रेम करत होता. प्रेमामुळे विजय आपल्या आईला विसरून गेला होता. मनिषासाठी तो काहीपण करायला तयार होता. हे सर्व चालू असताना आईला वाटत होते कि, विजय कुठेतरी चुकत आहे; पण शेवटी प्रेमामुळे विजय आंधळा झाला होता. काही दिवसा नंतर ह्याच प्रेमाने म्हणजेच मनिषाने विजयला फसवले व ती त्याला सोडून गेली. विजय फार दुःखी झाला. त्याला आपल्या जीवनाचा कंटाळा आला व तो आत्महत्या करण्याचा विचार करू लागला. परंतु त्याच्या आईने त्याच्याशी बोलून व त्याची समझुत घालून त्याला जीवनाचे महत्व पटवून दिले. त्याला प्रार्थना व बायबल वाचन करायला सांगून त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. आपल्या आईच्या हाकेला प्रतिसाद दिल्याने त्याच्या जीवनात परिवर्तन घडून आले. तेव्हापासून विजयाच्या जीवनात अनेक चमत्कार घडू लागले.

मनन चिंतन
ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराबद्दल आपण शुभवर्तमानात ऐकत असतो. परंतु योहानाच्या शुभवर्तमानात ख्रिस्त त्याच्या आईच्या सांगण्यावरून काना गावी पाण्याचा द्राक्षरस करतो व आपल्या सेवाकार्यास प्रारंभ करतो. आपल्या कार्याद्वारे तो प्रभूचे राज्य, वैभव व सत्ता प्रस्थापित करतो. या चमत्कारावरून असे समझते कि येशू हा देवाचा पुत्र आहे. चमत्काराच्या वेळी शिष्यही उपस्थित होते त्यामुळे त्यांची श्रद्धा अधिक मजबूत झाली व त्यांना कार्य करायला शक्ती मिळाली. ख्रिस्ताने चमत्कार करून लग्न घराण्यातील लोकांना आनंदित केले. ख्रिस्ताने आपल्या आईच्या शब्दाला प्रतिसाद दिला.
आज कितीतरी मुले-मुली आपल्या आई-वडिलांना सन्मान देत नाही. त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांना दुःखी करतात. आज अनेक पालक एकाकी जीवन जगत आहेत. आपल्या स्वतःच्या मुलांनी त्यांना त्यागिले आहे. आजचे शुभवर्तमान सांगते कि ख्रिस्त आईच्या आज्ञेत राहिला. आपण सुद्धा ख्रिस्ताचा आदर्श घेऊन आपल्या आई-वडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. खिस्ताने आपल्या मिशन कार्यास सुरवात करून लोकांच्या जीवनात चमत्कार केले. परंतु त्यावर आपला विश्वास न ठेवता आपण अजून नवीन चमत्काराची वाट पाहत आहोत.
सेवा, दानधर्म, चांगली कृत्ये, समझुतदारपणा, ज्ञान, शक्ती ह्या आपल्याला मिळालेल्या दानाचा वापर करून जे दुःखी, गरजवंत, व आजारी आहेत त्यांच्या जीवनात चमत्कार केले पाहिजे. आपल्या लहान कृत्यांद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली पाहिजे. प्रभू येशूच्या शिष्यांनी आपली श्रद्धा मजबूत झाल्यावर ख्रिस्ताच्या कार्यात सहभाग घेतला व त्याची सुवार्ता अनेक भागात पसरवली. आपणही त्याचप्रमाणे जीवन जगले पाहिजे. शिष्य ख्रिस्तासाठी जगले व शेवटी ख्रिस्तासाठीच मरण पावले. आज कितीतरी धर्मगुरू/भगिनी, प्रापंचिक जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत आहेत. ह्या सर्वांचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आज मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक!
१) आपल्या ख्रिस्तसभेची आध्यात्मिक काळजी घेणारे आपले पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या कृतीतून देवाचे प्रेम लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) आज आपली युवक पिढी नोकरीच्या शोधात आहेत. अशा युवकांना नोकरी मिळून त्यांची व कुटुंबाची उन्नती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) पवित्र आत्म्याने आपल्याला अनेक दानांनी भरलेले आहे. त्या दानांचा आपण योग्य वापर करावा व त्या दानांनी आपण दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) येशू ख्रिस्त आपल्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहिला व त्यांना मान व सन्मान दिला. आज मुल-मुली आई-वडिलांना अपशब्द बोलतात व दुखवितात अशा मुला-मुलींना ईश्वराचे प्रेम मिळावे, जेणेकरून ही मुल-मुली आपल्या आई-वडिलांचा आदर राखतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.    
           

Friday, 11 January 2019


Reflection for the Homily of Feast of The Baptism of the Lord (13-01-19) By Br. Godfrey Rodriques





येशूच्या स्नानसंस्काराचा सण

दिनांक: १३/०१/१९
पहिले वाचन: यशया ४०: १-५, ९-११
दुसरे वाचन: संत पौलाचे तीताला पत्र २:११-१४, ३:४-७  
शुभवर्तमान: लूक ३:१५-१६, २१-२२ 


तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.
प्रस्तावना:
आज देऊळमाता आजच्या उपसानेद्वारे आपणा प्रत्येकाला आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी घेतलेल्या वचनाची पुनरावृत्ती करण्यास बोलावत आहे. कारण आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजची उपासना, ‘स्नानसंस्काराद्वारे’ आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते, ह्या महत्वाच्या मुद्द्यावर मनन-चिंतन करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा लोकांना तारणप्राप्तीसाठी पश्चाताप आणि देवपुत्राच्या आगमनाची तयारी करावयास सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल तीताला लिहिलेल्या पत्रात सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे लाभली आहे, अशे सांगतो. तसेच लूकलिखित शुभवर्तमानात योहानाने येशू विषयी केलेली, ‘माझ्या पेक्षा समर्थ असा कोणी येत आहे, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे’ ही घोषणा ऐकावयास मिळते.
‘स्नानसंस्कार’ हा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती श्रद्धा अधिक भक्कम होण्यासाठी लागणारी कृपा शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
योहानाने लोकांस पश्चाताप करावयास सांगितले आणि बाप्तिस्मा करण्याची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे डूबणे, डूबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो. नवीन करारात जणू ख्रिस्ताच्या मृत्यूत पुरले जाणे व नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुत्थानात सहभागी होणे असा अर्थ होतो. म्हणून आपण ऐकतो की, संत पौल कलैसेकरांस सांगतो, तुमचा बाप्तिस्मा झाला, तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्हाला उठविले जाईल. येशू ख्रिस्त म्हणतो, ‘पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. ह्याच ख्रिस्त वचनानुसार बाप्तिस्मा संस्काराला पवित्र आत्म्याठायी नवजीवन असे सुध्दा म्हटले जाते. योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता येशू गालीलातून यार्देन नदीजवळ त्याच्याकडे आला. येशूने संत योहान बाप्तीस्ताच्या हस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरुवात केली. आपल्या पुनरुत्थानानतर येशूने आपल्या प्रेषितांनाही ह्याच प्रेषित कार्याची दीक्षा दिली. “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले आहे ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”
जेव्हा संत योहानाने लोकांस पश्चाताप करण्याचे आव्हान केले तेव्हा येरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देनच्या आसपासच्या अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला व त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला. योहान येशूविषयी म्हणतो, “मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या पायताणाचे बंध देखील सोडण्याची माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.”
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये पेत्र लोकांस सांगतो की, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. (२:३८) येशू ख्रिस्त देवाचा पुत्र व योहानापेक्षा श्रेष्ठ असूनही त्याने योहानाकडून बाप्तिस्मा का घ्यावा? ह्याचे उत्तर आपणांस मत्तय अध्याय ३ ओवी १५ वरून स्पष्ट होते. प्रभू येशू केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वः इच्छेने घेतो तो फक्त धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच. जेव्हा प्रभूने बाप्तिस्मा स्वीकारला तेव्हा जो पवित्र आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्यास सुभारंभ करून व घोषित केले की, हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे.
नव्या करारात आपण अनेक ठिकाणी पाहतो की, अनेक लोकांनी बाप्तिस्मा स्वःइच्छेने व विश्वासाने स्वीकारलेला आहे. उदा. फिलीप देवाचे राज्य व येशूख्रिस्ताचे नाव ह्याविषयी सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलीपाच्या सहवासात राहिला. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.   

मनन चिंतन:
आज पवित्र देऊळमाता ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा किंवा स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात येशूच्या स्नानसंस्काराविषयी नमूद केलेले असून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या येण्याची कशी तयारी केली हे सांगत आहे.
१. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा
येशू गालीलातील नाझरेथहून आला तेव्हा त्याने योहानाच्या हातून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. येशू जरी देवाचा पुत्र होता, तरी त्याने श्रेष्ठपणा न दाखवता नम्रपणाने योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारला यावरून येशू मानव होता हे आपणास दिसून येते. तसेच तो देवपुत्र असल्यामुळे पाण्यातून वर येताना आकाश विदारले व पवित्र आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर येशूला दिसला व आकाशवाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्या विषयी मी संतुष्ट आहे.” देवाचा कृपा आशीर्वाद त्याच्यावर येतो व इथूनच प्रभू येशूच्या प्रेषितीय कार्याची सुरुवात होते.
२. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची तयारी
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या अशी घोषणा केली, कारण इस्त्रायलचे संदेष्टेही हाच सुपरिचित संदेश देत असत. हाच संदेश देत योहान प्रभूच्या येण्याचा मार्ग तयार करीत होता. त्याच्या ह्या घोषणेने तेथील लोकांचे परिवर्तन झाले व त्यांनी लगेच योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारला. तसेच योहानाने प्रभू येशूच्या येण्याचा संदेश जगजाहीर केला. योहान घोषणा करताना म्हणत असे की, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्या मागून येत आहे. त्याच्या पायताणाचा बंध सोडण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. येथे योहानाचा नम्रपणा जाणवतो; कारण त्यास ठाऊक होते की, त्याच्यामागून जगाचा तारणारा प्रभू येशू येत आहे. त्यामुळेच त्याने प्रभूचा मार्ग अतिशय योग्यपणे तयार केला. प्रभू येशू आत्म्याने, अंतःकरणे शुद्ध करणार होता त्यामुळे येथे आपणास येशूचे कार्य हे योहानापेक्षा वेगळे व सामर्थ्यशाली होते ह्याची प्रचीती येते.
३. स्नानसंस्काराद्वारे आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ
आपल्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा पाण्याने व पवित्र आत्म्याने झालेला आहे व त्याद्वारे देवाने आपणाला त्याची लेकरे म्हणून निवडले आहे. आपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ झाली आहे व त्याचीच साक्ष देण्यासाठी ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला जगात पाठवले आहे. आपल्याविषयी देव संतुष्ट आहे. आपले आईबाप, तसेच धर्म आईबाप आपल्यासाठी देवाला वचने देतात. आपण ती वचने आपल्या दररोजच्या जीवनात आचरणात आणली पाहिजे व जगाला ख्रिस्ताच्या प्रेमाची व दयेची साक्ष देणे गरजेचे आहे.
स्नानसंस्काराद्वारे आपण प्रत्येकजण देऊळ मातेचे अविभाज्य घटक झालो असून ख्रिस्त आपल्याला त्याच्या कार्यासाठी बोलावत आहे. चर्च हे उत्तम प्रकारचे कार्य करण्याचे साधन आहे. चर्च-संलग्न अशा खूप संघटना आहेत. ह्या संघटनेत सहभागी होऊन देवाचे कार्य करूया म्हणजे आपण खरे ख्रिस्ती असल्याचा अभिमान वाटेल. स्नानसंस्काराच्या वेळेला घेतलेल्या वचनाची पुनरावृत्ती करूया व देऊळमातेशी एकनिष्ठ राहून विश्वास व श्रद्धेत वाढ व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
१) आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व धार्मिक अधिकारी ह्यांना देव-राज्याची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या काम धंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) स्नान-संस्काराद्वारे आपल्यावर असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नान-संस्काराच्या वचनांशी आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशित आणि दुःखी-कष्टी आहेत, अशा सर्वांना दैवी-दयेचा स्पर्श होऊन त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.   
   


Thursday, 3 January 2019


 Reflection for the Homily of Solemnity of Epiphany of the Lord (06-01-19) By Br. Isidore Patil


प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०६-०१-१९
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 
पहिले वाचन: यशया ६०: १-६



"आम्ही त्याला नमन करण्यास आलो आहोत."

प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे. पूर्वेकडील आलेल्या तीन राजांनी आपली दाने ख्रिस्ताला समर्पित करून ह्याच प्रकाशमय ख्रिस्ताचे दर्शन घेतले म्हणून देवाने त्यांचे जीवन प्रकाशमय बनवले.
यशया आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगतो, ‘सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवास व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला झालेली भेट ह्याविषयी सांगत आहे. 
तीन राजांनी ज्याप्रमाणे आपली दाने ख्रिस्ताला समर्पित केली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आजच्या या पवित्र मिस्स्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६०: १-६

आजचे पहिले वाचन हे सियोन या माता नगरीला उद्देशून आहे. तिचे पुत्र व कन्या केवळ इस्त्रायलातील पांगलेले नाहीत तर प्रत्येक राष्ट्रातील आहेत. ही सर्व राष्ट्रे प्रकाशात येतील आणि ज्याप्रमाणे कबुतरे आपल्या खुराड्याकडे आपोआप येतात तसे ते देवाकडे येतील आणि आशेने देवाकडे पाहतील. हे आपणास यशया संदेष्टा सांगत आहे.
दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६ 

यहुदी लोकांना वाटत होते की, ‘ते देवाची निवडलेली माणसे आहेत’. म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनात विदेशी लोकांचा देवामध्येच समावेश आहेया बाबीवर विशेष भर देतो कारण दुसऱ्या जातीतील लोकांना प्रभूच्या राज्यात वारसा मिळावा व त्यांनीसुद्धा त्या एकाच शरीराचे अवयव व्हावे आणि त्यांना ही ख्रिस्ताची अभिवचने मिळवावीत असे पौलाला वाटते. देवासाठी सर्व लोक एक समान व प्रिय आहेत. आपण प्रेषितांची कृत्ये १०: ३४-३५ मध्ये एकतो, ‘देव तोंड पाहून माणसांना वागवीत नाही तर जे त्याला भितात व त्याच्या इच्छेप्रमाणे योग्य तेच करतात मग ते कोणत्याही वंशाचे व जातीचे असो, देवाला त्या व्यक्ती मान्य व प्रेमळ असतात’.
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

येशूहा जुन्या करारातील देवाने वचन दिलेला इस्त्रायलचा तारणारा आहे. तो इस्त्रायलचा राजा आहे असा विषय मत्तयच्या शुभवर्तमानात मांडला आहे. भविष्यवाद्यांनी भाकीत केलेला तारणारा आणि राजा हा येशूच आहे आणि त्याचे आपण मनोभावे स्वागत करावे व आपण विश्वास ठेवावा असे मत्तय आपल्या वाचकांना आवर्जून सांगत आहे. 
आजच्या शुभवर्तमानात जे मागी लोक ख्रिस्ताला भेट देण्यास येतात ते ज्योतिषी होते. ग्रहताऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण आणि अवलोकन यांच्या आधारे ते आपले निष्कर्ष काढीत. पूर्वेकडील प्रदेशात ग्रहताऱ्यांचे निरीक्षण व गणिते करून पॅलेष्टाइन देशात राजकुळात महत्त्वपूर्ण व्यक्तीचा जन्म झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. अर्थात या बाळराजाच्याभेटीसाठी थाटामाटाने जाणे त्यांना अगत्याचे वाटले कारण देवाचे हे त्यांना अस्सल प्रकटीकरण होते.
बोधकथा:

     एकदा एक तरुण मुलगा मुलीच्या पाठीमागे चालत होता. त्या मुलीने त्या मुलाला पहिले आणि धाडस करून त्याला विचारले, ‘माझा पाठलाग तू का करतोस?’ मुलाने सांगितले, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. मुलीला आश्चर्य वाटले. ती त्याला म्हणाली माझ्या पाठीमागे येणारी मुलगी माझी बहिण आहे, ती माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहे. तू जा आणि तिला बघ.
     त्या मुलाने कुठलाही विचार न करता घाईमध्ये पाठीमागे तिच्या बहिणीला बघायला गेला. जेंव्हा त्याने येणाऱ्या मुलीला पहिले तेंव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ती मुलगी सुंदर दिसत नव्हती. रागामध्ये तो मुलगा परत पहिल्या मुलीकडे धावत गेला आणि विचारले, ‘तु मला खोटे कशाला सांगितले?’ तिने न घाबरता प्रतिउत्तर दिले, ‘तर मग तु मला कधी सत्य सांगितले कि तू माझ्यावर प्रेम करतो. जर तुझे खरोखर माझ्यावर प्रेम असते तर तू दुसऱ्या मुलीच्या शोधात पाठीमागे गेला नसता.
      येशू ख्रिस्त, राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला हि बातमी ऐकल्यावर ते तीन राजे त्याच्या शोधात निघाले तेंव्हा त्यांच्या मार्गावर अनेक अडथळे आले, कधी-कधी ते रस्ता विसरले पण ते कधी गोष्टीतील मुलाप्रमाने पाठीमागे फिरले नाही. त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश त्याच्या अंगी स्विकारायचा होता म्हणून ते पाठीमागे अंधारात फिरले नाहीत. देवाने दाखविलेल्या ताऱ्याच्या मदतीने त्या तीन राज्यांना जगाचा सुपरस्टारशेवटी गाईच्या गव्हानीमध्ये गवसला. ख्रिस्ताचे दर्शन घेऊन ते आता ख्रिस्ताचे तेजस्वी तारे झाले होते. आणि म्हणूनच जाताना ते ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन निघाले.
      आपल्या स्वत:ला ख्रिस्त सापडला नसेल तर आपण दुसऱ्यांना ख्रिस्ताकडे आणू शकणार नाही. ख्रिस्त जेव्हा आपल्याला सापडेल तेंव्हा खरोखर आपण त्याचे तेजस्वी तारे होऊन या जगात प्रकशित होऊ व इतरांना ख्रिस्ताकडे येण्याचा मार्ग दाखवू शकतो. ख्रिस्ताचा शोध करत असताना कधी कधी झंझावताने आपल्या हातातील कंदील कदाचित विझेल परंतु तो पुन्हा पेटवून आपण आपला मार्ग क्रमण करीत जायला पाहिजे. त्या तीन राजांच्या मार्गावर जेंव्हा तारा अदृश्य झाला तेंव्हा ते घाबरले नाही किंवा परत पाठीमागे फिरले नाही. त्यांनी ख्रिस्ताचा शोध चालूच ठेवला, कारण ते देवापुढे नम्र झाले. देव त्यांच्याबरोबर होता. आपणही जर देवापुढे नम्र झालो तर देव आपली कधीच साथ सोडणार नाही. कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला मार्ग दाखवील.
     आपल्या जीवनाच्या मार्गावर अनेक काटे येतील. पण जर आपले ख्रिस्तावरील प्रेम खरे असेल तर ते सर्व काटे आपल्याला फुलासारखे वाटतील. आणि एक दिवस नक्कीच आपण ख्रिस्ताला भेटू. आपण ख्रिस्ताला शोधण्याची व भेटण्याची त्या राजाप्रमाणे चिकाटी धरली तर आपण यशाचे धनी बनू. देव आपल्याला नक्कीच ख्रिस्ताचा मार्ग दाखवील.
मनन चिंतन

नाताळ जवळ आला की आपण गव्हाणीची तयारी करायला सुरुवात करतो. गव्हाणीमध्ये आपण बाळ येशू, योसेफ, मारिया, मेंढपाळ, गुरे-मेंढरे आणि तीन राजे उंटावर ख्रिस्ताच्या दर्शनासाठी येतात, असे सहसा चित्र दर्शवितो. जेव्हा ह्या तीन राजांविषयी आपण ऐकतो व वाचतो तेव्हा आपल्या मनात एक किमया भासते की या राजांना खरोखर बाळ येशूचे दर्शन घेण्याची गरज होती का?
जर आपण वास्तुस्थिती हाताळली तर आपल्या लक्षात येते की, अनेक लोक दूरवरून राजांना भेटण्यासाठी त्यांच्या राजमहाली येतात. राजा कधीच लोकांना भेट द्यायला त्यांच्या घरी जात नाही. मात्र बायबलमध्ये आपण वाचतो कि तीन राजे स्वतः आपले स्वतःचे राज्य सोडून बेथलेहमध्ये जन्मलेल्या येशु बाळाला भेटण्यासाठी उत्सुकतेने व आनंदाने निघतात. गावातील लोकांनी त्यांची थट्टा केली असेल. ते वेडे झाले आहेत म्हणून कित्येक लोक त्यांच्यावर हसले असतील. पण देवाने जी ख्रिस्ताविषयी सुवार्ता त्यांना जाहीर केली होती कि राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जन्माला आला आहे, त्याच्यावर त्यांची पूर्ण श्रद्धा होती. म्हणूनच त्यांनी ख्रिस्ताला भेटून नमन करावे अशी आसमनी धरली. त्यांना खरोखर ख्रिस्ताच्या दर्शनाची गरज होती, कारण जरी ते राजे असले तरी त्यांचे जीवन अंधकारमय होते. त्यांना नवचेतनेची गरज होती. त्यांच्या जीवनात शांती नव्हती, ख्रिस्त शांती देणार होता. त्यांच्या जीवनातील जणूकाही प्रेमज्योत मावळली होती. ती ज्योत त्यांच्या प्रेमाने चेतणार होती.
येशू ख्रिस्त हा प्रकाशाचा प्रकाशराजांचा राजाआहे हे गूढ त्या तीन मागी राज्यांना समजले होते. म्हणून कुठलाही विचार न करता, ते लगेच ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपली दाने घेऊन बेथलेहेम गावाकडे निघतात. बायबलमध्ये आपल्याला त्यांच्याविषयी जास्त काही सांगण्यात आलेले नाही. ते तीन राजे ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत  होते. ते येशू बाळाचे दर्शन घेण्यासाठी पूर्वेकडून आले. असे सांगतात की, त्या राज्यांची नावे ग्यास्पर, रुफस आणि मेल्कीऑंर होते. येशू बाळाला भेटण्यासाठी ते रिकाम्या हाताने न येता ते आपल्याबरोबर सोने, धूप व गंधरस आणून  ते येशू बाळाला दान म्हणून भेट करतात. त्या तीन दानांचा अर्थ खालीलप्रमाणे होतो. सोने म्हणजे राजाचा सुवर्ण मुकुट. येशू हा राजांचा राजा आहे म्हणून सोने हे येशूचे राजेपण दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण जरी देवशब्द मनुष्य झाला तरी तो देवाचा पुत्र होता. आणि गंधरस येशुच्या म्रुत्युशय्येवर शिंपडण्यासाठी आणलेले होते.
येशु म्हणतो, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे”(मत्तय १६:२४). हे शब्द तीन राजांनी हे ख्रिस्ताचे शब्द ऐकले नाही, तरीही त्यांनी आपले राज्यावैभव, कुटुंब आणि प्रजा सोडून ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आले म्हणजे ख्रिस्ताला नमन करून असे वाटते कि जणूकाही ते ख्रिस्ताचे शिष्य बनु इछितात. ते पूर्वेकडून ख्रिस्ताचा शुभसंदेश, घेण्यासाठी आले होते. मात्र बेथलेमातून निघताना ते ख्रिस्ताचे मिशनरी व ख्रिस्ताचा प्रकाश बनून परतले ते ख्रिस्ताचे संदेशवाहक झाले.
     परमेश्वर जेव्हा माणसांवर आपल्या कृपेचा वर्षाव करतो, तेंव्हा माणूस स्वत:चा राहत नाही. तसेच जेव्हा माणूस पूर्णपणे ईश्वराला शरण जातो. तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनाचा ताबा घेत असतो. हीच अनुभूती तीन राजे आपल्याला देत आहेत. जेव्हा ते देवापुढे शरण होतात तेंव्हा देव त्यांच्या माध्यमातून योग्य रितीने मार्गदर्शन करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना 
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१.  ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्ताचा शोध खऱ्या मनाने व हृदयाने करावा व आपल्याला जीवनात ख्रिस्ताची शांती व प्रेम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे पापी लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावलेले आहेत व पापाच्या अंधारात अजूनही भटकत आहेत अश्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या प्रेमाचा किरण प्रकाशित व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.  देव हा सर्वावर प्रेम करतो. हि भावना अखिल मानव-जातीच्या मनात रुजावी व सर्वांनी एक जुटीने, आनंदित, प्रेमान जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी शांतपणे प्रार्थना करूया.