Friday, 1 February 2019




Reflection for the Homily of 
4th SUNDAY IN ORDINARY TIME 
 (03-02-19) By Br. Jackson Nato 






सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: ३/०२/२०१९
पहिले  वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
शुभवर्तमान: लूक ४:२१-३०







कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.

प्रस्तावना:
          आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत असताना ख्रिस्त हा असामान्य व्यक्ती होता, हे ओळखण्यास देऊळमाता आपल्याला आमंत्रण देत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात, यिर्मयाला देवाने केलेल्या पाचरणाची गोष्ट आपण ऐकतो व यिर्मयाप्रमाणे आपणाला सुद्धा परमेश्वराने निवडले आहे, ह्याची आठवण आपण करणे गरजेचे आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणांस प्रेमाचा बोध करत आहे. आपले जीवन हे प्रेमावर आधारित असावे कारण प्रेम हे शाश्वत आहे. तर आजचे शुभवर्तमान येशूचा त्याच्याच लोकांनी केलेल्या धिक्काराबद्दल सांगत आहे.
          आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपणा प्रत्येकाला वेगवेगळ्या कार्यासाठी निवडले आहे व ते कार्य आपण प्रेमाने करावे ह्याची सतत आठवण ठेवली पाहिजे. प्रेमावर आधारित जीवन आपल्याला ख्रिस्ताची ओळख पटवून देईल व त्याद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनाचा कायापालट करील हे मात्र नक्की. ख्रिस्ताला ओळखण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
आजच्या वाचनात परमेश्वर म्हणतो की, मी तुला अनाधी काळापासून ओळखत आहे आणि तू माझी सुवार्ता संपूर्ण राष्ट्रांत घेवून जावी म्हणून मी तुला माझा संदेष्टा नेमिले आहे आणि त्यासाठी तुला पवित्र ठेविले आहे. म्हणून तू तयार रहा मी जे वचन तुला सांगत आहे ते सर्व लोकांना निर्भीडपणे घोषित कर. कारण जर तू त्यांना घाबरलास, ते काय म्हणतील तुझा स्वीकार करतील की  नाही ह्याकडे लक्ष दिलेस, तर मी तुला त्यांच्यासमोर घाबरवीन. म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो घाबरू नकोस मी तूला ध्यैर्य देईन. आणि म्हणून तू माझे वचन सर्व लोकांना, गरीब-श्रीमंत, राजे व सामान्य माणसे ह्या सर्वांना घोषित कर ते कदाचित तुझा धिक्कार करतील पण त्यांचा वर्चस्व तुजवर होणार नाही कारण मी तुझ्या पाठीशी आहे.    

दुसरे वाचन: १ करिंथ १२:३१-१३:१३
ह्या वाचनात संत पौल करिंथकरांस बोध करून सांगतो की, ह्या प्रीतीवाचून श्रेष्ठ काहीही नाही. आपणा प्रत्येकाला वेगवेगळ्या कृपादानांनी परमेश्वराने आशीर्वादित केले आहे. पण समाजाच्या सुरळीत कारभारासाठी प्रीतीची गरज भासते. कारण एकमेकाप्रीत्यर्थ असणारी प्रीती आपणा सर्वांना एकत्र बांधून ठेवते. कारण प्रीती आपल्या समाजाला तडा पाडणाऱ्या अनैतिक मुल्यांपासून दूर ठेवते. हेवा, राग, मत्सर, गैरवर्तणूक, बढाया मारणे ही अनैतिक मुल्ये आहेत. त्यात प्रीती आनंद मानत नाही. तर सत्यामध्येच स्वतःचे पूर्णत्व शोधते. संत पौल पुढे सांगतो की, प्रीती कधी अंतर देत नाही. ह्या जगातील सर्व गोष्टींची मुदत एक ना एक दिवस संपेल आणि फक्त विश्वास, आशा आणि प्रीती अशा ह्या तीन गोष्टी शेवटपर्यंत उरतील आणि ह्यात सर्वात श्रेष्ठ प्रीती आहे.

शुभवर्तमान: लूक ४:२१-३०
आजचे शुभवर्तमान हे गेल्या रविवारच्या शुभवर्तमानाचा दुसरा भाग आहे. गेल्या रविवारच्या उपासनेत आपण पाहिलं की, येशू ख्रिस्त स्वतः बद्दल आपणच ‘तारणारा आहे’ ह्याची साक्ष देतो व स्वतःची ओळख दर्शवितो. पण आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, त्याला स्वतःच्या गावात, लोकांत स्विकारण्यास लोक तयार नाहीत. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की, संदेष्ट्याला त्याच्या गावात व देशांत मान नाही. कारण येशू ख्रिस्तालाच नव्हे, तर भूतकाळात त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा संदेष्ट्यांना हीच वागणूक दिली होती. म्हणून येशू ख्रिस्त हे कडू शब्द त्यांना उद्देशून म्हणतो. कारण अशा ह्या कठोर हृदयामुळे यशया, एलिया संदेष्ट्यांच्या काळात परमेश्वराने परदेशीयांना प्राधान्य दिले. परमेश्वराने परदेशीयांना प्रथम स्थान द्यावे व इस्राएल लोकांना दुय्यम स्थान द्यावे हे इस्राएल लोकांना स्विकारणे अजिबात मान्य नव्हते. कारण परमेश्वर हा फक्त इस्राएल लोकांचाच आहे अशी त्यांची समजूत होती. म्हणून त्यांनी रागाच्या भरात येशूला ठार मारण्याची धमकी दिली. ह्याचा अर्थ असा की, परमेश्वराचे वचन सांगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठीण अडचणींचा सामना करावा लागेल.       

 बोधकथा:
          एकदा एका मठवाशी संस्थेचे मठवाशी कमी झाले. ते फक्त चारजण राहिले आणि ह्यापुढे आपली संस्था बंद पडेल ह्या विचाराने ते खंतीत झाले, कारण कित्येक वर्षे त्यांच्या संस्थेस एकही पाचारण लाभले नव्हते. एक दिवस ते एका यहुदी सन्यासी व्यक्तीला भेटले. हा सन्यासी एक चांगला व ज्ञानी मनुष्य होता. त्यांने मठवासीयांना सांगितले की, त्यांच्यामधील एक मठवासी हा मसीहा किंवा ख्रिस्ताचे रूप आहे. हे ऐकून ते चकित झाले व त्या दिवसापासून एक-दुसऱ्याला मसीहा म्हणून वागवू लागले. काही दिवसानंतर त्यांच्यातील एकामेकाबद्दल असलेली प्रेम भावना वाढीस लागली, त्यांच्यातील आपुलकीचा परिणाम असा झाला की, त्यांच्या ह्या वर्तनाने आजूबाजूचे लोक, युवक-युवती त्यांच्या मठाला भेटी देऊ लागली. त्यांच्यासह प्रार्थना करू लागली व सरतेशेवटी काहीजण त्यांच्या मठात सामील झाले. अशाप्रकारे मठवासीयांची संख्या अधिकाधिक वाढत गेली व पुन्हा त्यांची सख्या पुर्नरचित झाली.      

मनन चिंतन:
आजचे शुभवर्तमान हे गेल्या रविवारच्या उपासनेचा दुसरा भाग आहे. गेल्या रविवारी आपण पहिले की, येशूने मंदिरात जाऊन ग्रंथपट उघडला व त्यातून यशया ६१:१ हे वचन वाचले ज्यात लिहिले होते, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे, हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले.ह्या वचनाद्वारे येशूने त्यांच्यासमक्ष घोषणा केली की, हे वचन त्यांच्यासमोर पूर्ण झाले आहे. ह्याचा अर्थ असा की, ज्या मसिहाची ते वाट पाहत होते, तो आज त्यांच्यासमोर उभा आहे. येशूने स्वतःला प्रकट केले आणि त्या प्रकटीकरणाला लोकांचा प्रतिसाद काय आहे? हे आजचे शुभवर्तमान आपल्या लक्षात आणते.
लोकांचा प्रतिसाद काय होता? ‘हा योसेफचा पुत्र ना?’ ह्या शब्दांनी त्यांनी येशू हा खरोखरच मसिहा नाही ह्या विधानावर शिक्कामोर्तब केला. येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. त्याच्या गावातील लोकाव्यतिरिक्त इतर गावातील लोकांनी, येशूने केलेली चिन्हे पहिली होती आणि विश्वास ठेवला होता. पण नाझरेथकरांना ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जात होते. येशूच्या वचनाने ते चक्क झाले होते; कारण त्याच्या मुखातून कृपावचने बाहेर पडत होती. तरीसुद्धा ह्या आश्चर्याची नशा काय त्यांच्या डोक्यावर पकड धरू शकली नाही आणि ते लगेच म्हणाले, “हा योसेफचा पुत्र ना?”
सामान्य गोष्टी जेव्हा असामान्य वाटू लागतात, तेव्हा त्या गोष्टीचा असामान्यपणा कबुल करणे आपणास कठीण जाते. समाजात वावरताना ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याला पावलोपावली येतो. एखादा कमी गुण मिळवणारा विद्यार्थी, जेव्हा मेहनत करून प्रथम क्रमांक पटकावतो तेव्हा त्याला त्याचे श्रेय देण्यास आपण अनिच्छता दर्शवतो. त्याला इतके गुण मिळालेच कसे? नक्कीच त्याने कॉपी केली असेल, असे निष्कर्ष लावतो. आणि हेच येशूच्या बाबतीत घडले. येशू हा सामान्य सुताराचा मुलगा होता. त्याला लहानाचा मोठा होताना त्यांनी पाहिले होते. ज्या गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती करतो, त्या करताना त्यांनी येशूला पहिले होते. म्हणून 'मसीहा' असा असू शकतो, हे त्यांना पटले नाही. कारण त्यांच्या विचारानुसार 'मसीहा' हा त्यांना राजकीय स्थैर्य मिळवून देणार होता. कित्येक वर्षे दुसऱ्या देशाच्या व आता रोमन लोकांच्या आदेशाखाली ते होरपळून निघाले होते. म्हणून येणारा मसीहा आपल्याला आजूबाजूंच्या देशातच नव्हे, तर जगातील सर्व राष्ट्रांवर व इस्राएलचे वर्चस्व प्राप्त करून देईल, अशी व्याख्या त्यांनी आखली होती. म्हणून आपला मसीहा हा आध्यात्मिक नसून, राजकीय असेल हे त्यांच्या मनात बिंबले होते. पण येशूने त्यांच्या विचारास प्रतिकार केला. कारण येशूचे कार्य हे राजकीय वर्चस्वाचे नव्हते तर, आध्यात्मिक वर्चस्वाचे होते म्हणून येशूने त्यांना विदेशी, पापी, ह्याबरोबर परमेश्वराच्या राज्याचे भागीदार होण्याचे आमंत्रण दिले पण त्यांनी ते धुडकावून लावले.
संदेष्ट्याला त्यांच्या मायदेशात जागा नाही, ह्या शब्दाद्वारे येशूने त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कारण त्यांनी येशूला ओळखण्यास नकार दिला. स्वदेशी कुर्ता घालायला मात्र कधी-कधी आपल्याला  लाज वाटते, परंतु परदेशी जीन्स, जरी ती फाटकी असेल तरीसुद्धा ती घालून मिरवायला आपण संकोचत नाही. आपण आपल्या जीवनात स्वतःचे महत्त्व ओळखायला कमी पडतो. माझ्यामध्येसुद्धा काही कलागुण आहेत. मी सुद्धा एक विशिष्ट कामगिरी करू शकतो. असा आत्मविश्वास बाळगण्यास आपण स्वतःला सामान्य लेखतो. मी सुद्धा काही चांगले करू शकतो, ह्यावर आपण लक्ष देत नाही व दुसऱ्यांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे आपण स्वतःची वाट खुंटवतो.
म्हणून आजचे शुभवर्तमान आपल्याला आध्यात्मिक पातळीवर येशूला ओळखण्यास व त्याद्वारे वैयक्तिक पातळीवर स्वक्षमतेला ओळखण्यास निमंत्रण देत आहे. गेल्या रविवारी येशूने स्वतःला प्रकट केले, पण आज मी त्याच्या दैवी पणाला कबूल करतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला द्यावयाचे आहे. कारण जर आपण आज ख्रिस्ताला ओळखले, तर उद्या ख्रिस्त आपली ओळख जगभर पसरवेल यात मात्र अजिबात शंका नाही.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१. 'ख्रिस्ताची सेवा हेच जीवन' ह्या वचनावर आपले जीवन आधारित करणारे आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना मानसिक व शारिरीक आरोग्याचा लाभ व्हावा व ख्रिस्ताची सेवा अधिक जोमाने करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या युगात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, ह्यास आळा घालण्यास आपण सर्वांनी पुढे यावे व त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक शारिरीक, भावनिक व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आहेत, त्यांना समाजात वावरण्यास आधार मिळावा व लोकांनी त्यांच्याशी प्रेमाने वागावे व त्यांना आनंदाने जीवन जगण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशात वादविवादाला दुजोरा मिळत आहे व धर्माच्या नावाने लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, ह्या सर्व गोष्टीस वाव न देता एकमेकां प्रीत्यर्थ प्रेम व आपुलकीची भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment