Reflection for the
Homily of 6th SUNDAY IN ORDINARY TIME (17-02-19) By Br. Julius Rodrigues
सामान्य काळातील सहावा रविवार
सामान्य काळातील सहावा रविवार
दिनांक: १७/०२/२०१९
पहिले वाचन: यिर्मया १७:५-८
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र १५:१२, १६-२०
शुभवर्तमान: लूक ६:१७, २०-२६
तो
त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणा सर्वांना देवावर
विसंबून राहण्यासाठी आमंत्रण देत आहे. कारण असे म्हटले जाते, ‘कर्ता आणि करविता,
तो एकटा सर्वसमर्थ पिता परमेश्वर आहे.’
आजच्या
पहिल्या वाचनात प्रवादी यिर्मया म्हणतो, ‘मानवी शिकवण तुमचा नाश करील परंतु, दैवी
शिकवण तुमचे तारण करील. देवावर आपल्या जीवनाचे कल्पतरू बांधा, तुमचा विकास अधोधित
होईल, म्हणजेच दुसऱ्या शब्दात देवावर विसंबून राहण्यासाठी तो आपणांस बोलावित आहे. दुसऱ्या
वाचनात संत पौल करिंथकरांस सांगत आहे की, तुमचा विश्वास दृढ करा, कारण त्यामुळे
तुम्हांस नवीन जीवनाची देणगी प्राप्त होणार आहे; कारण ख्रिस्त हा मेलेल्यातून उठला
आहे. तर कशाप्रकारे आपल्याला आपले जीवन सुखी-समाधानी करता येईल, ह्या विषयी संत
लूकच्या शुभवर्तमानात आपणास येशूने सांगत आहे.
आजच्या
पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना त्या परमेश्वराकडे नवजीवनाच्या देणगीसाठी
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १७:५-८
यिर्मया प्रवादी हा देवाने निवडलेला होता
आणि म्हणून देवाचे देवपण आपण त्याच्यामध्ये अनुभवत आहोत. देवावर अवलंबून राहणे,
ह्याचे वर्णन तसेच मानवी साधनावर भरवसा आणि देवावर भरवसा ह्यामधील फरक आजच्या
वाचनात दर्शविला आहे. त्याचप्रमाणे, स्वास्थ्यासाठी, मानवी शक्तीवर विसंबून
राहणारा आणि देवावर विसंबून राहणारा अशा दोघोंमध्ये तुलना केली आहे. स्वतःची शक्ती
आणि क्षमता यांवर स्वास्थ्यासाठी विसंबून आपले जीवन सुरळीत पायावर आधारण्याचा
प्रयत्न सर्वस्वी विफळ होतो. देवावर भरोसा ठेवणे म्हणजे विश्वासाने आज्ञापालन करणे
आणि निष्काम कर्म किंवा स्वहित बाजूस ठेवून कार्य करणे हाच जीवनाकडे जाणारा मार्ग
आहे.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:१२,
१६-२०
आजच्या
दुसऱ्या वाचनात संत पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र यात संत पौल ख्रिस्ताचे
पुनरुत्थान व आमचे पुनरुत्थान ह्याविषयी बोलत आहे. त्याने चांगल्याप्रकारे
पुनरुत्थानाविषयीची शिकवण लोकांना दिलेली आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे सत्य
असल्याचे सांगून, तो पुढे म्हणतो की, ख्रिस्ताचे पुनरुत्थान हेच मेलेल्यांचे
पुनरुत्थान होईल ह्याची हमी आहे. उदा. कोणत्याही पिकाची पहिली फळे, हे आणखी पिक
मिळण्याचे चिन्ह आहे.
शुभवर्तमान: लूक ६:१७, २०-२६
शुभवर्तमानकार लूक प्रस्तुत उताऱ्यात धन्यवाद आणि दुःखोद्गार ह्यांच्यात
तुलना करीत आहे. त्याने दोन प्रकारच्या लोकांची तुलना येथे केलेली आहे. पहिल्या
गटातील लोक आहेत त्यांचे बाह्यरूप, त्यांची परिस्थिती पाहिली, तर कोणालाही त्यांची
दया आणि कीव येईल. दुसऱ्या गटातील लोकांना, सर्व काही मिळाले आहे; ऐहिक, भौतिक
मालमत्तेसंबंधीची त्यांची इच्छा तृप्त झाली आहे. जगामध्ये त्यांना चांगल, नावलौकिक
प्रतिष्ठा आणि सौख्य मिळाले आहे. परंतु, दुसऱ्या गटातील लोकांना येशूने म्हटले आहे
की, त्यांच्याकडे काहीच असणार नाही.
मनन चिंतन:
आज आपला देश, समाज आणि आजूबाजूची परिस्थिती बदलत चालली आहे. सर्व जग हे
पैशाच्या, अभिमानाच्या, श्रीमंतीच्या मागे धावत आहे. माणूस दुसऱ्यांची पर्वा करत
नाही आणि माणुसकी सुद्धा विसरत चालला आहे. जर माझ्याकडे श्रीमंती असली, तर मला
ह्या जगातील सर्व गोष्टी प्राप्त होतील, असा समज प्रचलित होत आहे. एका हिंदी
चित्रपटातील संवाद पुढीलप्रमाणे आहे, ‘मेरे पास पैसा है, बंगला है, तुम्हारे पास
क्या है?’ आणि अश्या वेळेस प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे उत्तर असले पाहिजे, ‘मेरे
पास भगवान है|’ आज श्रीमंतीने देवाला हिरावून घेतले आहे. आज पुष्कळव्यक्ती
‘मी’पणाने स्वार्थी जीवन जगत आहेत.
आजच्या पहिल्या वाचनात सुध्दा प्रवादी यिर्मया प्रखर शब्दांत सांगतो की,
जो माणूस स्वतःवर अवलंबून राहतो, स्वतःची वाहवा करतो त्याचा नाश होईल, त्याला
देवाच्या आशीर्वादाचे फळ मिळणार नाही व त्याचा नायनाट होईल; परंतु जो विश्वास
ठेवतो तो सर्व आशीर्वादाचा अनुभव घेईल. त्याच्या जीवनात आनंद पसरेल व त्याची
भरभराट होईल. खरा आनंद हा ख्रिस्ताशी एकरूप होण्यात आहे. कारण तोच कर्ता आहे.आज
आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू प्रभू येशू आहे का? आपल्या जीवनरूपी नावेचा नावी हा
ख्रिस्त आहे, कि जगातील इतर गोष्टी आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतातकी, ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’परंतु प्रत्येक
ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा पाया आणि शिल्पकार बनवले पाहिजे.
मेलेला माणूस पुन्हा जिवंत होतो का? असा प्रश्न पुर्वजापासून आजपर्यंत
आपल्याला भेडसावत आहे. त्याच प्रकारचा प्रश्न करिंथ येथील लोकांना सुद्धा होता.
दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील मंडळीना येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगत आहे.
कारण लोकांच्या मनात शंका होती की, हे कसे शक्य आहे? पौलाने ख्रिस्त सभेची शिकवण
ह्या लोकांना दिलेली होती. कारण ख्रिस्ती विश्वासाचा गाभा हे ख्रिस्ताचे
पुनरुत्थान आहे.
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्याला नवीन जीवन लाभले आहे. प्रत्येक
ख्रिस्ती व्यक्तीचा ह्यावर विश्वास असायला हवा असे संत पौल ह्या लोकांस सांगत आहे.
ह्या ठिकाणी देखील ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा गाभा आहे, असे संत पौल आपणास दर्शवून
देण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या शुभवर्तमानात संत लुक आपल्याला येशूच्या शिकवणुकीची तोंड ओळख करून
देत आहे. येशूची शिकवणूक हीजगाच्या शिकवणुकीपेक्षा वेगळी आहे. मत्तयच्या
शुभवर्तमानात ह्या शिकवणुकीला डोंगरावरील प्रवचन, तर लुकच्याशुभवर्तमानात सपाट
मैदानावरील प्रवचन असे म्हटले आहे. येशू म्हणतो की, दीन ते धन्य कारण देवाचे राज्य
त्यांचे आहे. जे भुकेले आहेत ते धन्य, जे रडत आहेत ते धन्य; उद्या तुम्ही तृप्त
होणार, हसणार. पण हे कसे शक्य आहे? आपणास असे लक्षात येते की, लुक येथे चार दुःख व
चार आशीर्वाद मांडत आहे.
कोंकणीत अशी एक म्हण आहे, ‘आज माका, फाल्या तुका.’ म्हणजे जे आज माझ आहे,
ते उद्या तुझ असणार आहे. माझी आजची परिस्थिती उद्या तुझी होणार आहे. हिंदी मध्ये
अस म्हटलं जातं कभी ख़ुशी, कभी गम.खरोखरच आयुष्य हे सुख-दुःखाच्या दोन धाग्यांनी
विणलेले आहे, आज सुख, तर उद्या दुःख. प्रभू येशू ख्रिस्त देखील
माझ्या मते आपल्याला हेच सांगत आहे, सबका वक्त आयेगा. ख्रिस्त आपल्याला सांगत आहे
की, दुसऱ्यांना हसू नका, कमी लेखू नका, तर एकमेकांना सहाय्य करा आणि परमेश्वराचे
वैभव, राज्य या भूतलावर निर्माण करा. खरोखरच परमेश्वर आपला प्रेमळ पिता आपल्या
बरोबर सतत असतो आणि म्हणूनच आजच्या तिन्ही वाचनांमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला
समजून येईल कि आशीर्वाद आणि दुःख ह्यांची मांडणी केली आहे. ह्या वाचनांद्वारे एक
संदेश घेवूया की, ख्रिस्त माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि केंद्रबिंदू असला पाहिजे.
शेवती कागदाची नाव होते,
पाण्याचा किनारा होतो,
मित्रांचा सहारा होतो,
खेळण्याची मस्ती होते,
परंतु ख्रिस्ताच्या
येण्याने,
जीवनाची लॉटरी होते.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती नांदावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे राहून, प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होईल ह्यासाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.
३) मादक पेये व मद्य यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू नये, तर आपल्या जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) सुखी जीवनाचा महामंत्र परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील जे कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेत, त्यांनी प्रार्थनेबरोबर औषधोपचार व मानसोपचारही करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता आपल्या वैयक्तिक व सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment