Friday 16 August 2019

Reflections for the homily of 20th Sunday in Ordinary time 
(18-08-2019) by: Br Jackson Nato




सामान्य काळातील विसावा रविवार


दिनांक : १८/०८/२०१९
पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०
दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४
शुभवर्तमान:  लुक १२:४९-५३
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी  माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आजची उपासना येशू ख्रिस्त परमेश्वराचे राज्य पसरविण्यासाठी आला ह्याबद्दल सांगत आहे. परमेश्वराचे राज्य हे प्रेमाचे आहे आणि ते जगाच्या कायद्यानुसार अवास्तव आहे. म्हणून हे पसरवित असताना प्रत्येकाला त्रासाला सामोरे जावे लागते.
आजच्या उपासनेवर जर आपण नजर फिरवली तर पहिल्या वाचनात आपणास पाहण्यास मिळते कि परमेश्वराचा शब्द प्रकट केल्यामुळे यिर्मयास  विहिरीत टाकण्यात आले. दुसऱ्या वाचनात लेखक आपल्याला ह्या जगातील त्रासासमोर धैर्याने  उभे राहण्यास सांगत आहे जेणेकरून आपण स्वर्गीय मुकुट आपणास प्राप्त होईल. तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या कार्या बद्दल उल्लेख करत आहे आणि ते पुढे नेण्यास  त्यांचे अनुयायी म्हणून आपली मनोरचना कशी असावी ह्याबद्दल उपदेश करत आहे.
ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जगत असताना आपण ख्रिस्त प्रेमाने भरावे व तेच प्रेम संपूर्ण जगाला देण्यास व येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबालीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०
          आजच्या पहिल्या वाचनात आपण यिर्मया संदेष्टाला, सुबुद्धीणे केलेल्या मार्गदर्शनाविषयी झालेल्या शिक्षेविषयी ऐकतो. कारण यिर्मया संदेष्टा आतापर्यंत होऊ गेलेल्या राज्यांनी कशा प्रकारे स्वखुशीसाठी व स्वार्थासाठी दुसऱ्या देशाबरोबर चुकीचे करार केले होते व त्याचा परिणाम म्हणजे यहुदी लोक परमेश्वरापासून दूर गेले होते ह्याबद्दल राजाला व लोकांना संदेश देत होता. ह्या काळात बॅबीलोन हे सर्वाधिक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास आले आणि आजूबाजूच्या राष्ट्रांकडून कर वसुली करू लागले पण यहुद्यांच्या राजकुमारांनी त्यास विरोध केला व इजिप्तचे सहाय्य घेण्याचे ठरवले पण यिर्मायाने राजाला ते न करता बॅबीलोन देशास कर भरावा ह्याबद्दल मार्गदर्शन केले. जेणेकरून यहुदांची संपत्ती व मंदिरातील पवित्र मौल्यवान वस्तू तसेच यहुदाप्रांताची येणाऱ्या आपतीपासून सुटका होईल. परंतु यिर्मयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे होऊ नये म्हणून राजकुमांरानी राज्याचे कान भरले व यिर्मयास शिक्षेस पात्र ठरवले अशाप्रकारे यिर्मयाला कोरड्या  विहिरीत टाकण्यात आले जेणेकरून उपासमारीने तो मरणास बळी पडेल पण राजाचा सेवक अबिदमेलेय ह्याने राजाची कान उघडणी केली व यिर्मयास विहिरीतून बाहेर काढले. पण यिर्मया संदेष्टाचा सल्ला धूडकारून लावण्याचा परिणाम असा की यहुदा स्वतःचे स्वांतत्र्य हरवून बसला.
दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४
          आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ती पाचारणाशी एकनिष्ठ राहण्यास आमंत्रण करत आहे. आबेलपासून ख्रिस्तापर्यंत जेवढ़े पवित्र लोक होऊन गेले ते सर्व परमेश्वरची एकनिष्ठ राहिले. त्यांना झालेल्या त्रासाची व विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही म्हणून आपण ख्रिस्ती ह्या नात्याने त्यापेक्षा अधिक जोमाने देवाशी एकनिष्ठ राहिले. त्यांना झालेल्या त्रासाची व विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही म्हणून आपण ख्रिस्ती ह्या नात्याने त्यापेक्षा अधिक जोमाने देवाशी एकनिष्ठ राहिलो पाहिजे कारण आपल्यासमोर ख्रिस्त हे आपले परम उदाहरण आहे. म्हणून देवाशी एकनिष्ठ राहणे हि आपली एक शर्यत आहे ज्या अंती आपले प्रतिफळ आपल्याला मिळेल म्हणून हि शर्यत पार करताना येणारे सर्व अडथळे, ओझी म्हणजे पाप आपण टाकून दिले पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने पर्वा न करता क्रूसावरील मरण सोसले व परमेश्वराच्या उजव्या हाताशी आपले स्थान कायम केले त्याचप्रमाणे आपणसुद्धा होणाऱ्या त्रासाला न घाबरता, न कंटाळता स्वीकारले पाहिजे जेणे करून आपले प्रतिफल आपण प्राप्त करू.  
शुभवर्तमान:  लुक १२:४९-५३
आजच्या शुभ वर्त मानात थोडक्या शब्दात येशू आपले कार्य व त्यांस होणार असलेला विरोध स्पष्ट करतो येशू म्हणतो कि तो ह्या जगात शांती नव्हे तर फाटा फुट म्हणजे त्याचा संदेश स्वीकारणारे आणि न स्वीकारणारे ह्यामध्ये. येशू पुढे बाप्तीस्म्या विषयी बोलतो. तो बाप्तिस्मा म्हणजे संदेश पसरवितांना त्याला जो त्रास सहन करावा लागणार आहे तो पण तो सहन करण्यास तयार आहे. त्याचा संदेश घराघरां मध्ये फाटाफूट पाडेल ह्याचा अर्थ असा कि त्याच्यावर विश्वास ठेवणारे अर्थात ख्रिस्ती सुद्धां आपआपल्या मध्ये भांडून वेगळे होतील. अशाप्रकारे आपण पाहतो कि ख्रिस्ताचा संदेश सर्वांनाच पचणार नाही ह्याची शाश्वती ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानात देत आहे.
बोधकथा:
ग्रीस ह्या देशात दि ओश्कोरोस नावाचा एक श्रीमंत मनुष्य होता. त्याला बार्बरा नावाची एक अतिसुंदर मुलगी होती. तिची सौदंर्य तिच्या असुरक्षितेचे कारण बनू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिला नजर कैदेत बंद केले. तिला अनेक राजकुमारांचे वर आले पण त्या सर्वांना तिने नाकार दिला. कारण तिने ख्रिस्ताला आपला वर मानले होते म्हणून एक दिवस तिचा वडील दूर देशात असताना तिने गुप्तपणे बाप्तिस्मा घेतला. ह्या बाप्तीस्म्या द्वारे तिला कृपेचे दान प्राप्त झाले ज्याद्वारे तिने आपल्या घरातील ख्रीस्तेतर सर्व मुर्त्या फोडून काढल्या.
जेव्हा बार्बराचे वडील दूर देशातून परत आले तेव्हा त्याने पाहिले कि त्याच्या घरातील सर्व दैवी मुर्त्या अस्ताव्यस्त फुटून पडल्या होत्या हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोहचली व ह्यांचे कारण त्याने बार्बराला विचारले त्यावर बार्बरा म्हणाली कि तिने ख्रिस्त स्वीकारला आहे म्हणून मुर्तीपुजा करणे हे तिच्या मनाविरुद्ध होते. आपल्या मुलीने केलेल्या कृत्याबद्ल चीडचिडा होऊन त्याने बार्बराला तुरुंगात टाकले जिथे तिला असंख्य शारीरिक यातना सहन कराव्या लागल्या पण ह्या यातनांचे सांत्वन ख्रिस्ताने तिला दर्शन देऊन केले. अखेरीस तिच्या वडिलांनी तिला मरण दंड ठोठावला. मरणानंतर ज्या ठिकाणी तिला पुरण्यात आले त्या गावात अनेक चमत्कार घडून आले.
मनन चिंतन:
          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या भाविकांनो आजचे शुभवर्तमान एकूण आपल्याला धक्का बसतो. पायाखालची जमीनच हलल्या सारखे वाटते. आजपर्यंत आपल्याला ख्रिस्ताविषयी असलेल्या समजूतीला तडा जातो.  कारण येशू स्वतः म्हणतो की, “मी ह्या जगात आग लावण्यासाठी आलो आहे.”  तसेच तो पुढे म्हणतो की, “मी ह्याजगात शांती पसरविण्यासाठी नव्हे तर फुट पाडण्यासाठी आलो आहे.” हे विधान त्याच्या शिकवणुकीशी जुळत नाही. कारण येशूच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत पाहिले की येशू शांतीचा संदेश पसरविण्यासाठी होता. येशुच्या जन्माच्यावेळी गाब्रीयाल दूताने शांतीचा राजा जन्मास येणार आहे हा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचविला. व्यभिचारी स्त्रीला मोशेच्या नियमशास्र्ताप्रमाणे दगडमार करण्याऐवजी क्षमा केली. ख्रूसावरून स्वतःच्या मारेकार्यांना क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली. अशाप्रकारे आपण पाहतो की येशूचे शांती पसरविण्यास प्राधान्य दिले. पण आजच्या शुभवर्तमानात ‘शांतीचा राजा’ हे शिर्षक त्याच्यापासून हिरावून घेतल्यासारखे चित्र आपल्या डोळ्या समोर येते पण वास्तविक रुपात हे सत्य नाही. कारण येशूच्या शब्दाने तो देवराज्याची  घोषणा करण्यासाठी आला आहे. हा संदेश दडलेला आहे. म्हणून जरी येशूच्या शब्दांनी अशांतीचा वेश परिधान केला तरी त्या वेशामागे शांतीचा संदेश आहे.
          म्हणून येशू आगलावण्यासाठी आला हे सत्य आहे पण ती आग म्हणजे देवराज्याची. जुन्या करारात मोशेला परमेश्वराने अग्नीने पेटलेल्या झुडूपात दर्शन दिले. यहेज्केलच्या पहिल्या अध्यायात पवित्र आत्मा अग्नीच्या रुपाने प्रेषितांवर उतरला व त्यांना ध्येर्याने भरले अशाप्रकारे बायबल मध्ये अग्नी परमेश्वराचे अस्तित्व प्रकट करतो म्हणून हा अग्नी नाश करणारा नव्हे तर देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा व उत्साह देणारा आहे.
          पुढे येशू म्हणतो की तो शांती पासरविण्यासाठी नव्हे तर फुट पाडण्यासाठी आला आहे. देवाराज्याचा संदेश पचवणे सर्वाना शक्य नाही. कारण हा संदेश ऐकूण  काहीजण येशुजवळ येतील, तो आचरणात आणतील पण काहीजणांना तो कडू वाटेल म्हणून त्याचा स्विकार करणे किंवा आचरणात आणणे त्यांच्या इच्छेविरुद्ध जाईल. जगात अशाप्रकारे फुट पडेल, ती म्हणजे “ख्रिस्तासाठी व ख्रिस्ताविरद्ध”  असलेल्या लोकांमध्ये - सासू विरुद्ध सून, मुला विरुद्ध बाप.  हि फुट जुनी पिढी नवीन पिढी म्हणजेच जुना करार विरुद्ध नवीन करार येशूच्या येण्याने आपले पवित्र शास्त्र दोन भागात विभागले आहे. नवा करार जुन्याकरारास पूर्णत्वांस नेतो. म्हणून देवराज्य जरी जुन्या करारापासून प्रकट केले जात असले तरी नव्या करारात देवराज्याच्या प्रेमाचा संदेश अधिक उघडपणे नमूद केलेला आहे. जुन्या करारात याहावे हा फक्त इस्त्राएलचा देव म्हणून ओळखला जातो. पाप्यांना शिक्षा, मूर्ती पुजकावर परमेश्वरचा राग ह्या गोष्टी ठळकपणे नमूद केल्या आहेत.  
          पण नव्या करारात देवाच्या प्रेमाला अधिक प्राधान्य दिले आहे. परमेश्वर हा प्रेमळ आहे, तो इस्त्राएलचाच नव्हे तर सर्वांचा देव आहे. आपण सर्व त्याची मुले आहोत आणि जरी पण आपण त्याच्यापासून दूर गेलो तरी तो आपल्याला जवळ घेण्यास आतुर आहे. पण तोच प्रेमाचा संदेश आजच्या जगात सर्वाना मान्य नाही. ख्रिस्तसभा ‘शेजाऱ्यावरील प्रिती’ हे सर्व अडचणीचे औषध आहे हे घसा फोडून प्रकट करते पण जगाला ‘प्रितीने’ अडचणी दूर करणे हा मार्ग व्यवहार शून्य वाटतो.
          हाच संदेश दुसऱ्यापर्यंत पोहचण्यास आजच्या जगातच नव्हे तर ख्रिस्तालासुद्धा त्याच्या काळात कठीण झाले त्यासाठी त्याला विरोध झाला, त्याला दुःख सहन करावे त्यासाठी त्याला विरोध झाला, त्याला दुःख सहन करावे लागले. म्हणून येशू म्हणतो की मला बाप्तिस्मा घ्यायला हवा व तो घेईपर्यंत माझी किती तळमळ होणार. इथे बाप्तिस्मा म्हणजे त्याच्या वाटेत येणारे काटे व यातना. हे चित्र आपल्या जीवनात पुनरावृत्तीत होणे अटळ आहे. ख्रिस्ताचा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहचविताना त्रास सहन करावा लागेल, सहाजिकच आहे. आजच्या पहिल्या वाचनात पाहतो की यिर्मयाला सुद्धा देवाचा शब्द प्रकट करण्यावरून कोरड्या विहिरीत टाकण्यात आले. त्याप्रमाणे आपणसुद्धा ख्रिस्ताबरोबर रहायचं असेल त्याच्याबरोबर कालवरीपर्यंत जाणे अगत्याचे आहे. त्याच्यासारखा क्रूस वाहने जरुरीचे आहे कारण कालवरी नंतरच पुनरुत्थानाची पहाट आहे.
          आपले दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्तासाठी व ख्रिस्ताविरोधी लोकांच्या संपर्कात येणे निःसंदिग्ध आहे अशा वेळी आपण ख्रिस्त निवडावा व शेवटपर्यत त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रेम इतरांना द्यावे म्हणून त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया. 
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘ हे प्रभू आमची प्रार्थना ऐक’.
१.    ख्रिस्त प्रेमाचा संदेश जगाला देण्यास झटणारे आपले पोप फ्रान्सीस कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनींवर परमेश्वराचा वरदहस्त असावा व ह्या प्रेमाचा अनुभव अधिकाधिक लोकांना यावा म्हणून लागणारी कृपा शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आज संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरली आहे ह्या अशांततेचे कारण समजून घेऊन त्याजागी शांती प्रस्तापित करण्यास राजकीय व धर्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.    नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरे व निवारा उद्वस्थ झालेली आहेत ह्या सर्व लोकांना परमेश्वराचा आश्रय मिळावा व त्यांचे निवास पुन्हा उभे करण्यास अनेक मदतीचे हाथ पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शिक्षांना पासून वंचित रहावे लागत आहे अशा सर्वांना चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांनी समाजातील वाईट गोष्टींचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.    आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडूया.     

No comments:

Post a Comment