ख्रिस्त राजाचा सण
दिनांक: २४/११/२०१९
पहिले वाचन: २
शमुवेल ५: १-३
दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र
१: १२-२०
शुभवार्मान: लुक
२३: ३५-४३
“ख्रिस्त करुणेचा राजा”
प्रस्तावना:
आज आपण ख्रिस्त राज्याचा सण
साजरा करत असून आज सामान्य काळातील शेवटचा आठवडा आहे. देऊळ माता आज आपल्याला आठवण
करून देत आहे की, प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा राजा नसून तो आपल्या
हृदयाचा, आत्म्याचा, शांतीचा, शरीराचा व कुटुंबाचा राजा आहे. त्याचे हे राज्य हे अनंत
काळाचे राज्य.
आजच्या
पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्रायलच्या लोकांनी दावीदला आपला राजा म्हणून निवडले.
तर दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ताला विविध अशी उपमा देऊन ख्रिस्ताची श्रेष्ठता
आपल्याला सांगत आहे. पुढे लूक लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त एक विश्वासू चोराला
त्याच्या स्वर्ग ऐश्वर्यात तारणाचे आश्वासन देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या
ही जीवनाचा राजा व तारण करत आहे. वधस्तंभावरील चोरा प्रमाणे आपल्यालासुद्धा
तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा व येशूची करूणा अनुभवावी म्हणून आपण एक चित्ताने
ह्या मिस्साबालीदानात मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: २
शमुवेल ५: १-३
दावीद
इस्रायल राष्ट्रांचा राजा होतो हे प्रस्तुत उतारा यातून स्पष्ट करून दिले आहे.
इस्रायलच्या सर्व वंशांच्याकडून दावीदला राजा
होण्यासाठी विनंती केली गेली. मग इस्रायलच्या सर्व वडीलजणांनी हेब्रोनात एकत्र
येऊन दावीदचा अभिषेक केला आणि त्याला
इस्रायल वर राजा म्हणून नेमले.
दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र
१: १२-२०
संत
पौलने
कलस्सैकरांस लिहिलेल्या
दुसऱ्या पत्रात ख्रिस्ताच्या सर्व अधिकाराचे योग्यरीतीने विवरण केलेले दिसून येते.
तो ख्रिस्ताविषयी सात गौरवी सत्य सांगत
आहे. ती ख्रिस्ताची श्रेष्ठता प्रगट करतात. संत पौल म्हणतो, ख्रिस्त अदृश्य देवाचे
प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ते श्रेष्ठ आहे. तो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता
आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी व मृतांतून प्रथम जन्मलेला आहे.
त्याच्यामध्ये देवाची सर्व पूर्णता वसते व
समेट करणारा आहे. अशाप्रकारे ख्रिस्ताला सर्वाधिक प्राधान्य व वर्चस्व प्रदान
करण्यात आले.
शुभवार्मान: लुक
२३: ३५-४३
लुक
लिखित शुभवार्मानात आपल्याला आपल्या विश्वासाच्या रहस्याचे दर्शन घडते. येशू
ख्रिस्त क्रुसावर मरत असताना त्याला आपला तारणकर्ता व राजा म्हणुन घोषित करण्यात
येते. लूक लिखित शुभवर्तमानात आजचा मुख्य विषय हा तारण असा आहे व हेच आज आपल्याला
शुभवर्तमानात दर्शविण्यात येत आहे. येशू ख्रिस्त हा राजा आहे पण ही गोष्ट फक्त ज्यांचा
दृढ विश्वास आहे, तेच मान्य करतात.
येशूला
वधस्तंभावर खिळताना त्याची फार निंदानालस्ती करण्यात आली होती. तसेच त्याला यहुद्यांचा
राजा असे शीर्षकही त्याच्या उपहास म्हणून दिले गेले. वधस्तंभावर खिळलेला एका अपराध्याने
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यास म्हटले की, “आपण आपल्या राजाधिकाराने याल
तेव्हा माझी आठवण करा.” प्रभू येशूने लगेच त्याला त्याच्या तारणाचे अभिवचन दिले. “तू
आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” त्या वधस्तंभावर या अपराधाला सार्वकालिक जीवन मिळाले.
बोधकथा:
एकदा एक राजा एक आपल्या राज्यातील गरीब मुलीच्या
प्रेमात पडला. मग त्याने ठरवले की, ह्या मुलीला आपण आपल्या राजवाड्यात आणूया व
लग्न करूया. परंतु त्याला असे वाटले की, आपण असे केल्यास त्या मुलीवर आपण अन्याय व
जबरदस्ती करतो. त्यात त्यास त्याचे प्रेम कुठेच दर्शवले जाणार नाही. मग त्याने
बरेचसे दिवस विचार केल्यानंतर व आपल्या राजावाडा व सर्व काही सोडून त्या मुलीच्या
शेजारी राहू लागला. त्याचा हा त्याग व प्रेम पाहून ती मुलगी ही त्या राज्याच्या
प्रेमात पडते.
मनन चिंतन:
प्रारंभी शब्दच हो शब्द देवासह होता.”
आपण खूप अशा राजा विषयी
निरनिराळ्या पद्धतीने ऐकले आहे. इतिहासातही बरेचसे राजे होऊन गेले. त्यामुळे
राज्याची प्रतिमा आपल्यासाठी काही नवीन नाही. राजा या शब्दाची फोड केल्यास
आपल्याला दोन वेगळे अर्थ मिळतात: ‘रा’ म्हणजे जो राज्य करतो व ‘जा’ म्हणजे
जो आपल्या प्रजेला जाणतो तो. बरेच राजे आले आणि धुळीस मिळाले, कारण ते स्वतःसाठी,
स्वतःच्या स्वार्थासाठीच जगले. त्यांनी जनतेचा विचार फार कमी; मात्र स्वतःचा विचार
जास्त केला. म्हणून आज लोक त्यांना विचारतही नाहीत. किंबहुना काही राजे चांगले सुद्धा
होते. त्यांनी लोकांची सेवा केली.
प्रत्येक
राज्याची एक प्रजा होती. त्याचा राजवाडा होता. तो आपल्या थाटा माटात गजब जायचा.
आपल्या सिंहासनावर बसून डोक्यावर सोन्याचा मुकुट घालून लोकांचा न्याय करत असत व
कधी अन्याही करत असत.
परंतु
आजचे लुक लिखित शुभवर्तमानात आपल्यासमोर एक वेगळाच राजा प्रदर्शित करत आहे. तो आपल्या
राजवाड्यात नाही तर कालवरीच्या डोंगरावर आहे. तो सिहांसनावर बसला नाही; तर ख्रुसावर
निर्बल व हतबल होऊन टांगला आहे. तो लोकांचा न्याय करत नाही व लोक त्याची वाहवा ही करत
नाहीत, तर ख्रुसा खाली जमलेले लोक त्याची थटा व निंदानालस्ती करत आहेत.
मग
हा कसा आपला राजा? जो क्रूर असे अपराध्या सारखा क्रुसावर मरत आहे? तर ख्रिस्त हा
शांतीचा, प्रेमाचा, दयेच्या राजा आहे. “त्याचे राज्य इथले नाही तर त्याचे राज्य हे
स्वर्गाचे आहे.” (योहान १८:३६) खरे पाहता येशूने कधीच राजेपणा सारखा कधीही वावर
केला नाही; किंवा, ‘मी राजा आहे’ असे कधी घोषित ही केले नाही. मग येशूला यहुद्यांचा
राजा असे का म्हटले? तर पाहता यिर्मया संदेष्ट्याने भाकीत केले होते की; “देव
आपल्याला एक राजा देईल व तो त्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित करील.” (यिर्मया
२३:५-६) आणि तो अभिषिक्त केलेला असेल. (दानियेल ९:२५) म्हणून जेव्हा येशूने म्हटले
की “मीच तो निवडलेला आहे.” (लुक ४:१८) आणि स्वर्गाच्या राज्याचाउल्लेख केला. ह्या कारणास्तव
शास्त्री आणि परुषांनी येशूचा गैरफायदा घेतला, व आपल्या जाळ्यात पकडले.
येशूला
हे ठाऊक होते की; हे लोक त्याला जिवे मारू पाहतात. परंतु येशू एका हतबल शेळी सारखे
आपले अर्पण करतो. कारण त्याला आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करावयाची असते. येशूला
लोकांवर क्रूरतेने किंवा जबरदस्तीने राज्य करावयचे नव्हते, तर त्याला लोकांच्या
मनात, त्याच्या हृदयावर राज्य करावयचे होते. जे राज्य कधीच संपुष्टात येनार नाही.
त्यामुळेच येशूकडे
राजदंड नव्हता, तर रुमाल होता.
लोक त्याच्यासमोर झुकले
नाहीत, तर येशू स्वतः हा झुकला व आपल्या शिष्यांचे पाय धुतले
त्याच्याजवळ सैन्य
नव्हते, परंतु शिष्य होते.
तो राजासनावर नाही बसला,
परंतु गाढवावर बसला.
त्याने सोन्याचा मुकुट
नाही घातला, परंतु काट्यांचा मुकुट घातला.
त्याने कोणाचा प्राण
नाही घेतला, परंतु आपला प्राण दिला.
त्याने कुठलीही सीमा
नाही ठेवली, तर त्याने सर्वांना आपला राज्यात सामावून घेतले.
त्याने कोणाचे शोषण
नाही केले, तर त्याने लोकांची सेवा केली व त्यांना धीर दिला.
इतकेच
नाही तर मरतेवेळी सुद्धा आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, व आपल्या उजव्या
बाजूच्या चोराला स्वर्गाचे आश्वासन दिले. कारण त्याने येशूचे करुणेचे राज्य ओळखले
व त्याला कळून चुकले की, येशू दयेचा व करुणेचा राजा आहे. आपणही आज ख्रिस्त राज्याचा
सण साजरा करत असताना आपल्याला सुद्धा स्वर्ग राज्याचा अनुभव यावा, व आपण ही
येशूच्या दयेचा व करुणेचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ’हे प्रभू तुझे राज्य
आम्हांवर येवो.’
१.आपल्या ख्रिस्त सभेचा कारभार पाहणारे पोप
फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभू
सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांना देवाची कृपा-आशीर्वाद मिळावा व त्यांनी येशूची
सुवार्ता सर्वत्र पसरवली म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपले सर्व राजकीय पुढारी व नेते ह्यांनी येशू
प्रमाणे जनहितासाठी झटावे व जनतेची अधिकाधिक सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३.जे कोणी आजारी, दुःखी व संकटांनी ग्रासलेले आहेत, आयुष्याला
कंटाळलेले आहेत अशांना प्रभुचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना
प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याचे राज्य आपल्या हृदयात यावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
५.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक
व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment