Thursday, 7 November 2019


 Reflection for the Homily of 32nd SUNDAY IN ORDINARY TIME (10-11-2019) By Br. Godfrey Rodriques.




सामान्य काळातील बत्तीसाव रविवार


दिनांक: १०/११/२०१९
पहिले वाचन:  २ मक्काबी ७: १-२, ९-१४
दुसरे वाचन:  थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५
शुभवर्तमान: लुक २०:२७-३८

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील बत्तीसावा रविवारी प्रदर्पन करीत असताना आजची  उपासना आपणास सार्वकालीन जीवनावर आपली श्रध्दा बळकट करण्यास  व ख्रिस्ताच्या विश्वासात वाढण्यास बोलावत आहे.  
     आपण आपल्या जीवनात सर्वदा सुख: दुखांना सामोरे जात असतो अश्या ह्या सुख दुखाच्या जीवनात जसा जन्म आपल्याला लाभलेला असतो तसेच मरण सुद्धा अटळ असते. आपली अशी  समजूत आहे की  ज्या प्रमाणे आपल्या जन्माने आपल्या आयुष्याची सुरवात होत असते त्याच प्रमाणे  मरणाने जीवनाचा शेवट होतो परंतु आपला  ख्रिस्ती विश्वास व शिकवण  आपणास शिकविते की, मरण हा आयुष्याचा शेवट नसून ख्रिस्तामध्ये अनंत काळाच्या जीवनाची जणू नवीनच सुरवात आहे.
          आजचा देव शब्द तिन्ही वाचनांनद्वारे आपणास जीवितांच्या देवावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे आपला देव हा मृतांचा देव नसून जीवितांचा देव आहे. तो आपणास मरण नव्हे तर नवीन जीवन देण्यासाठी आला आहे आणि हे नवजीवन आपल्याला ख्रिस्ताद्वारे प्राप्त होत असते. म्हणून आजच्या उपसानेद्वारे आपण जीवितांचा देव प्रभू येशु ख्रिस्त ह्याच्याकडे मरणा नंतर अनंत काळाचे जीवन जगण्यास लागणारी विशेष कृपा मागुया व स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन:  २मक्काबी ७: १-२, ९-१४

     आजच्या पहिल्या वाचनात आपण सात भाऊ व त्यांची विधवा आई ह्यांच्याबद्दल ऐकतो. एक विधवा आई व तिची सात मुले ह्यांस राजाने बंदिस्त करून ठेवले होते. हे कुटुंब धार्मिक असल्यामुळे त्यांच्या धर्माला काळिमा फासण्यासाठी चाबकाचे फटके मारून निषिद्ध असलेले डुकराचे मांस त्यांस खावयास सांगितले परंतु मुलांनी त्यांच्या वडिलांनी दिलेल्या नियमशास्त्राचा आज्ञाभंग न करता मरण पत्करले. कारण त्यांचा विश्वास होता की, ‘जीवनाच्या अनंत नुतनीकरणासाठी विश्वाचा राजा आम्हाला उठवील.

दुसरे वाचन:  थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र २:१६-३:५

          प्रस्तुत उताऱ्यात संत पौल थेस्सलनीकाकरांस त्यांचा दृष्ट शत्रूपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थनेसाठी विनंती करत म्हणतो की, ‘आम्हासाठी प्रार्थना करीत रहा ह्यासाठी की जसा तुमच्या मध्ये प्रभूच्या संदेशाचा प्रसार झाला तसा इतरांमध्येही तो व्हावा आणि ते गौरविले जावे. संत पौलाचा देखील असा विश्वास होता की, ‘आपला ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व दुष्टांपासून आपल्याला राखील व श्रद्धेत स्थिर करील.

शुभवर्तमान: लुक २०:२७-३८

          संत लुकलिखीत शुभवर्तमानात आपण ऐकतो की, परमेश्वर हा मृतांचा देव नसून जीवीतांचा देव आहे.  नव्या करारात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते की, ख्रिस्ताला पकडण्यासाठी शास्री, परुशी व सदुकी योग्य वेळेची वाट पाहून त्यास संभ्रमात टाकण्यासाठी वेग-वेगळे प्रश्न विचारत असत आणि अशातलाच एक प्रश्न आजच्या शुभवर्तमान आपल्याला ऐकावयास मिळतो. येशू ख्रिस्त त्याला विचारलेल्या पुनरुत्थानाच्या प्रश्नाला परलोकविद्येने अचूक उत्तर देतो.

बोध कथा:

          दोन वर्षा अगोदर मुबई येथे एका पंचवीस वर्षाच्या मुलीला कॅन्सरच्या आजाराने ग्रासले होते व ती तिच्या जीवनातील शेवटची घटका मोजत होती. अशा वेळेस तिचे नाते वाईक व सर्व मित्र मंडळी तिला भेटावयास येत असत व तिच्या तब्बेती विषयी विचारत असत अशा तिच्या ह्या दैनंदिन भेटी-गाठीत एकदा त्यांचा  धर्मगुरू तिला भेट देण्यास आले असताना;  तिच्याशी बोलत असता व तब्बेती विषयी विचारत असता, तिच्या स्मित हास्याचे कौतुक करत, धर्मगुरूने म्हटले कि तुझ्या ह्या दुख दायक प्रवासात सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून मनाला आनंद होतो, फादरांच्या त्या म्हणण्याला प्रतिसाद म्हणून ती म्हणाली “फादर लहान असताना आमचे धर्मशिक्षणाचे क्लास घेण्यासाठी एक ब्रदर यायचे  ते नेहमी एकाच गोष्टीवर भर दयायचे ते म्हणायचे कि, आपले शरीर मरण पावले तरी आपला आत्मा हा ख्रिस्ता समवेत एक होत असतो व आपण सार्वकालीन जीवन जगत असतो” त्या सार्वकालीन जीवानाचीच मी तयारी करीत आहे, सार्वकालीन जीवनाच्या आनंदामध्ये मी माझे हे क्षणिक दु:ख विसरून गेली आहे.    

मनन चिंतन:

          आजच्या शुभवर्तमानात आपण एकले आहे की, सादुकी हे अतिशय हुशार व शिकलेले होते. त्यांस संपूर्ण नियम शास्र अवगत होते. ह्यास्तव सर्वदा ते येशूची परीक्षा पाहण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवगेळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असत. जेव्हा प्रभू येशू पुनरुत्स्थाना बद्दल बोलत होता तेव्हा सादुकिनी ख्रिस्तास पुनरुत्थाना  बद्दल एका उदाहरणा द्वारे  प्रश्न विचारला की, ‘एका घरात सात भावांनी एका पाठोपाठ एका स्त्रीशि लग्न केले. आता जेव्हा ते मरण पावले तेव्हा पुनरुत्थाना वेळी ती स्त्री कोणाची बायको असणार? असा हा फसवा प्रश्न विचारला.    
          जुन्या  करारातील नियमशास्त्रात सामाजिक परिस्तिथीनुसार व समाजकल्याणासाठी काही नियम बनवले होते त्याच्यातील एक नियम म्हणजे, मुल बाळ नसलेला मोठा भाऊ जर का मरण पावला तर त्याच्या पत्नीशी छोट्या भावाने लग्न करावे व आपला वंश वाढवावा. ह्या संबंधात सादुकिनी येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारला होता. सादुकी येशूच्या उत्तराची अपेक्षा करत असता ख्रिस्ताने अतिशय हुशारीने  त्यांस उत्तर दिले. ख्रिस्त म्हणाला की, ह्या युगात अशी नाती आहेत परंतु मरणानंतर ही सर्व नाती संपृष्टात येतात, कारण येणाऱ्या सार्वकालीन युगात ह्या सर्व नात्यांना स्थान नसते. लग्न करणे व लग्न करून घेणे हे फक्त पृथ्वीवरच आहे. नाती-गोती हि फक्त ह्या जागाची आहेत. आई-वडील, भाऊ-बहिण, मामा-मामी इत्यादी सर्व ह्या युगाचे आहे.
          पुन्हा येशू ख्रिस्त  पुनरुत्थाना विषयी बोलत असताना उदगारतो की, येणारे युग जिथे मी आणि माझा स्वर्गीय पिता आहे. ते युग सार्वकालीन आहे तिथे सर्वजण हे देवदूताप्रमाणे असतात, तेथे नाती-गोती चालत नाही. आपण सर्व सार्वकालीन जीवनात ख्रिस्तासमवेत एक होत असतो. देव मेलेल्यांना सुद्धा मरणांतून जिवंत करतो व त्याच्या समवेत एक करून सार्वकालीन जीवन देतो. कारण देव मेलेल्यांचाच नव्हे तर जिवंताचा देव आहे. आणि सर्वलोक जे त्यांचे आहेत ते जिवंत आहेत. ख्रिस्त म्हणतो; पुनरुत्स्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. ह्यास्तव आपल्या ख्रिस्तावरील विश्वासाने आपणास सार्वकालीन आनंद मिळत असतो .आपला पुनरुस्थित येशूवर कितपत विश्वास आहे? आपण जीवतांचा देव ह्याच्यावर विश्वास ठेवतो का?  कि की, सादुकी प्रमाणे ह्या क्षणिक युगातील नाती-गोती करण्यामध्ये गुंतलेलो आहोत? ह्या प्रश्नांवर मनन चिंतन करूया, व सार्वकालीन जीवना साठी लागणारी  कृपादाने व आशिर्वाद मागुया.   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझ्या पुनरुत्थानात सहभागी कर.”          

१. आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात अहोरात्र कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी आपल्या कार्याद्वारे बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोत, निराशेने बरेच लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशांना ख्रिस्ताच्या आशेचा शुभसंदेश प्राप्त व्हावा व त्यांना नवचैतन्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. काही लोक हे पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाहीत व दुसऱ्यांना विश्वासू लोकांचा विश्वास उध्वस्त करून त्यांस येशुपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक  कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment