Thursday, 28 November 2019


Reflections for the homily of First Sunday of Advent 
               (01-12-2019) by: Br Jackson Nato










आगमन काळातील पहिला रविवार      




दिनांक: १/१२/२०१९
पहिले वाचन: यशया २:१-५
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३: ११-१४
शुभवर्तमान:  मतय  २४: ३७-४४

प्रस्तावना:

          आज आपण आगमन काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला जागृत रहावयास सांगत आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू येशूच्या येण्याचा काळ. म्हणून त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. ही आपली तयारी कशी असावी याबद्दल आजची उपासना आपल्याला मार्गदर्शन करते.
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा बाबीलोनच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या यहुदी लोकांना, परमेश्वर त्यांचे तारण करेल व एक समृद्ध जीवन बहाल करेल असे आश्वासन देतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपली अंधकारमय कृत्ये म्हणजेच वाईट कृत्ये सोडून आपल्याला ख्रिस्ताकडून प्राप्त होणार असलेल्या तारणासाठी तयार राहण्यास सांगत आहे. तर आजच्या शुभवर्तमानात येशू अचानक येईल व त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे याविषयी बोध मिळतो.
          आगमन काळ म्हणजे फक्त नाताळची तयारी नव्हे तर येशूच्या पुनरागमनाची आणि म्हणून येशू येईल तेव्हा येशूला स्वीकारण्यास आपली तयारी आहे का? जर नसेल तर या मिस्साबालीदानात खिस्ताकडे आपल्या पापांची क्षमा मागूया व येशूसाठी सतत जागृत राहण्यास ह्या मिसाबालीदानात विशेष कृपा मागूया.

सम्यक  विवरण

पहिले वाचन: यशया: २:१-५

          यशया हा जुन्या करारातील एक नावाजलेला संदेष्टा आहे. कारण त्यांच्या जीवन कालात त्याने लोकांना देवाचा संदेश दिला तो काळ म्हणजे इ.स.वी स.न पूर्व ७२२ ते ७००. हा कालखंड इस्रायली लोकांसाठी गंभीर होता. कारण या कालखंडातच म्हणजे इ.स.वी स.न पूर्व ७२२ मध्ये असीरीयाच्या लोकांनी उत्तरीय जमाती म्हणजे इस्रायल वर चढाई केली, त्यांचा वध केला व इस्रायल समूळ नष्ट करण्याच ठरवलं होत. ह्या कारणास्तव यहुदी सुद्धा भयभीत झाले. पण देवाकडे धाव घेण्याएवजी त्यांनी दुसऱ्या राष्ट्रांबरोबर युती करण्यासाठी धाव घेतली. परीणामी यशयाने इस्रायलला दोषी ठरवले व त्यांच्या हद्दपारीचे भाकीत केले.
          हे भाकीत सत्य ठरले बाबीलोन राष्ट्राने यहुद्यांवर चढाई केली व यहुदी लोकांना हद्दपार केले. अशा ह्या हालाखीच्या परिस्थितीत यशया संदेष्टा यहुदी लोकांना तारणाऱ्या विषयी भाकित करतो व एक आशेचा किरण त्यांना दाखवितो. तो असा की, भविष्यात परमेश्वर त्यांना गुलामगिरीतून सोडवेल. परमेश्वराचे मंदिर ज्या डोंगरावर बांधले आहे तो डोंगर सर्व पर्वताहून उंच होईल. म्हणजेच, परमेश्वराला आधी प्राधान्य दिले जाईल. एवढेच नव्हे तर सर्व राष्ट्रांसाठी परमेश्वराचे मंदिर एक आकर्षक केंद्र होईल. परदेशी, अधर्मी, परधर्मी, परमेश्वराकडे वळतील. ते परमेश्वराचा संदेश आत्मसात करून तो सर्वत्र पसरवतील तेव्हा नवीन करार प्रस्थापित करण्यात येईल, जो इस्रायलच नव्हे तर सर्वांसाठी असेल. आणि ह्या काळात लोकं एकमेकांविरुद्ध झगडण्याऐवजी आपसात समेट करून राहतील. अशा प्रकारे यशया संदेष्टा यहुद्यांना आधार देतो व परमेश्वराकडे वळण्याचे आमंत्रण देतो.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३: ११-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार राहण्यास सांगत आहे. रोमी लोकं ख्रिस्ती होण्याअगोदर परधर्मी होते आणि धर्मांतराचे मुख्य कारण म्हणजे, ख्रिस्त हा आपल्याला तारण प्राप्त करून देणार आहे यावर त्याचा विश्वास ठाम झाला होता. म्हणून संत पौल त्यांना त्यांच्या जुन्या सवयी सोडून देण्याविषयी सांगत आहे. जेव्हा तो परधर्मी होते तेव्हा ते झोपेत होते. पण आता मात्र त्यांना तारणासाठी तयार राहायला हवे. त्यासाठी शुभवर्तमानाची मुल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कारण हे पहिल्या पेक्षा आता अधिक जवळ आहे. संत पौल त्यांचे जुने जीवन रात्री बरोबर व ख्रिस्ती जीवन दिवसाबरोबर तोलतो. म्हणून अंधाकाराची कामे सोडणे म्हणजे त्यांच्या भूतकाळातील सवयी सोडणे व प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करणे म्हणजे ख्रिस्ती मुल्ये आत्मसात करणे.

शुभवर्तमान: मतय २४: ३७-४४

          ह्या शुभवर्तमानाच्या उताऱ्या अगोदर, म्हणजेच  २४ व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की, येशू येरूशलेम मंदिराच्या नाशा विषयी व तदनंतर नव्या युगाच्या सुरुवाती विषयी म्हणजेच त्याच्या परत येण्याविषयी सांगत आहे, आणि त्यासाठी आपण तयार असावे हा बोध करत आहे. कारण येशूचे येणे हे आकस्मित असेल. ज्याप्रमाणे नोहाच्या काळात जलप्रलय आला तेव्हा लोकांना माहित नव्हते. त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे असेल तेंव्हा लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात गुंतलेले असतील. मौजमजा करत असतील पण जे देवाला धरून असतील त्यांना स्वर्गात घेतले जाईल. हे अधिकपणे स्पष्ट करण्यासाठी येशू चोराचे उदाहरण देत आहे. ज्याप्रमाणे चोर आपल्या नकळत येतो. त्याचप्रमाणे ख्रिस्त येईल, म्हणून आपण तयार असले पाहिजे. याचा अर्थ असा की, आपण प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी ख्रिस्ताला धरून जगलो पाहिजे.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आजची उपासना आपल्याला जागृत राहण्यास निमंत्रण देत आहे. जागृत राहणे म्हणजे नक्की काय? जागृत राहणे म्हणजे 'सावध असणे, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होत आहेत त्यांची बारकाईने जाणीव ठेवणे व त्यांपासून जो धोका तयार होतो त्याला सामोरे जाण्यास किंवा त्यापासून सुरक्षित राहण्यास तयार असणे. जेणेकरून त्यापासून उद्भवणाऱ्या परिणामांचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सावध असतो का? जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो तेव्हा आपण योग्य दिशेने चालायला हवे. रस्ता ओलांडताना चहुबाजूला नजर ठेवणे, आजारावर औषधे घेतो तेव्हा ते बरोबर आहेत का? त्याची कालबाह्य तारिख म्हणजेच एक्सपायरी डेट संपली तर नाही ना? अशाप्रकारे आपण काळजी घेतो. एवढेच नव्हे तर आपल्या मुलांना सुद्धा सांगतो की घराबाहेर अनोळखी व्यक्ती पासून शक्यतो दूर राहायचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण स्वतःची व आपल्या जीवलगांची काळजी घेतो. कुठलीही आपत्ती आपल्यावर किंवा आपल्या नातलगांवर उद्भवू नये म्हणून आपण सावध राहतो. थोडक्यात, जागृत राहतो. ही झाली शारीरिक जागृतता.
          मनुष्य हा फक्त शरीर नव्हे; तर शरीर आणि आत्मा यांचे मिलन आहे. म्हणून येशू ह्या शरीरा पलीकडे जाऊन आत्म्याची जागृतता बाळगण्यास आपल्याला सांगत आहे. कारण शरीराने आपण या जगात वावरतो. जगातील गोष्टींचा आनंद उपभोगतो; अर्थात शारीरिक जीवन जगतो. हे जीवन किती काळ टिकेल ६० वर्षे, ७० वर्षे, जास्तीत जास्त १०० किंवा १२० तदनंतर पूर्णविराम. पण आत्मिक जीवन हे सार्वकालिक आहे. म्हणून जर या सर्वकालीक जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल; तर आपले तारण होणे गरजेचे आहे.
          संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो की, "आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आपल्या अधिक जवळ आले आहे." या वाक्याचा संदर्भ पाहिला तर, आपल्या लक्षात येईल की; येशूच्या काळातील ख्रिस्ती म्हणजेच येशूच्या पुनरुथानानंतर ज्यांनी ख्रिस्त स्वीकारला होता, त्यांची अशी कल्पना होती की, त्यांच्या जीवन काळातच येशू ढगांवर स्वार होऊन त्याच्या वैभवात पुन्हा येईल. तो येईल तेव्हा जगाचा न्यायनिवाडा करील. पण येशू आजच्या शुभवर्तमानात म्हणतो की, मी चोराप्रमाणे येईन. ज्याप्रमाणे चोर लोकांच्या नकळत ते गाढ झोपेत असतांना व अनपेक्षित वेळी येतो, त्याप्रमाणे तुम्ही या ऐहिक जीवनात गुंतलेले असताना मी येईन.
          येशूचे येणे समजण्यासाठी त्याची तीन काळात विभागणी करणे जरुरीचे आहे. पहिला म्हणजे 'भूतकाळ': 'येशू आला' म्हणजे २००० वर्षांपूर्वी येशू मानवरूप धारण करून या भूतलावर आला. दुसरे म्हणजे 'येशू येईल' 'भविष्यकाळ': म्हणजेच येशू त्याच्या वैभवात जगाच्या अंतकाळी येईल. शेवटी 'येशु येतो' 'वर्तमानकाळ': म्हणजेच येशू साक्रामेंताद्वारे, ख्रिस्तप्रसादा द्वारे किंवा आपल्या मृत्यूद्वारे आपल्या मध्ये येतो. आपणा प्रत्येकाचा मृत्यू अढळ आहे व अनपेक्षित आहे. म्हणजेच मृत्यु कधी येईल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. म्हणून मृत्यूने येशू माझ्यामध्ये येत असेल तर, माझे तारण होण्यासाठी मी पात्र आहे का? नोहाच्या काळात लोक खात-पीत होते, मौज-मस्ती करत होते, आनंद करत होते. पण जलप्रलय आला तोपर्यंत त्यांना काहीच समजले नाही. तेव्हा ते त्यांच्या तारणास मुकले. म्हणून आपण जागृत राहीले पाहीजे.
          जागृत राहणे म्हणजे, आपले रोजचे जीवन सोडून फक्त आध्यात्मिक जीवनाकडे वळणे नव्हे; तर रोजच्या जीवनाला आध्यात्माचा रंग चढविणे. आपले प्रत्येक विचार, कृत्य अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणे. म्हणून येशू म्हणतो की, "जात्यावर बसलेल्या दोघींपैकी एकीला घेतले जाईल व एक ठेवली जाईल." याचा अर्थ असा की, आपले संसारीक किंवा रोजचे जीवन जगणे, त्याचा उपभोग घेणे गरजेचे आहे. पण त्याचा उपभोग घेत असता परमेश्वराचा विसर पडणे, जगाच्या आनंदात ख्रिस्ताचे भान हरपणे चुकीचे आहे.
          आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा प्रसंगांना सामोरे जातो, जिथे आपल्या ख्रिस्ती जीवनाची परीक्षा होते. ख्रिस्ताची शिकवण व ऐहिक लाभ ह्यांच्यात आपण दुभागले जातो का? अशा वेळी आपण ख्रिस्त निवडावा. संत पौलच्या आजच्या दुसऱ्या वाचनातील शिकवणीप्रमाणे 'ख्रिस्ताचे वस्त्र परिधान करावे.' ख्रिस्ताचे वस्त्र; म्हणजेच बाप्तिस्माच्या वेळी आपण परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र जे आपल्या निष्पाप जीवनाची साक्ष देते. म्हणून सर्वकालिक जीवनाचा लाभ घेण्यासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण या मिसाबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: येशू तुझ्या स्वागतास आम्हाला तत्पर बनव.’

१.ख्रिस्तात जीवन जगण्यास मार्गदर्शन करणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना सतत शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ व्हावा व दैवी कार्य सतत चालू ठेवण्यास त्यांना कृपा व शक्‍ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.आपल्या देशात, समाजात अनेक लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजा ऐवजी स्वतःच्या स्वार्थास महत्व देत आहेत. त्यांना या स्वार्थी वृत्ती पासून दूर राहण्यास व समाज कल्याणाचा विचार करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आज अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यांना व्यसनमुक्त होण्यास परमेश्वराचे सहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.सत्तेच्या लोभाने राजकारण्यांनी आपल्या राज्यात कल्लोळ घातला आहे व लोकांच्या अपेक्षांचा भंग केला आहे. अशा या परिस्थितीत लोकहिताच्या योजनेस प्राधान्य देण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.जेव्हा आपण ख्रिस्ती जीवनाऐवजी ऐहिक जीवनात गुरफटून जातो. तेव्हा स्वतःला तारणापासून वंचित करतो. याची जाणीव आपणास व्हावी व ख्रिस्ती मूल्यांवर आपले जीवन पुनर्स्थापित करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक, व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment